आजकाल दुसऱ्याचे विचार रुचले नाहीत, पचले नाहीत की ठो ठो गोळ्या घालण्याची प्रवृत्ती बळावली आहे. जणू वैचारिक मतभेदांवरील ही हक्काची दवा आहे. कॉलेजमधील दोन भिन्न विचारांचे गट तलवार परजून एकमेकांवर तुटून पडायला अजिबात पुढेमागे पाहत नाहीत. दुसऱ्याचा वैचारिक बिमोड करण्याऐवजी शारीरिक बिमोड करण्याकडे समाजमन जास्तीत जास्त आकृष्ट होताना आज दिसते आहे.
का बाबांनो, एका ८२ वर्षाच्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनुभवसमृध्द, वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ अशा व्यक्तीवर तुम्ही बंदुकीतून बेछूट गोळीबार केलात? त्यांच्या पत्नीलाही सोडले नाहीत? मुळात एखाद्याला अशा गोळ्या घालाव्याशा वाटणे ही हिंसक विचारसरणी मानवतेला अत्यंत घातक आणि समाज स्वास्थ्याच्या मुळावर येणारी आहे असं तुम्हाला नाही का वाटत?
दाभोलकरांचे मारेकरी अद्याप या भूतलावर सुखनैव नांदत आहेत. दीड वर्षात त्यांचं नखसुद्धा शासनाच्या आणि पोलीसदलाच्या दृष्टीस पडलेले नाही. त्याच हिंसक प्रेरणेने पुनश्च एका वयस्क व्यक्तीवर त्याच पद्धतीने गोळ्या झाडून दिवसाच्या सुरवातीला त्या व्यक्तीच्या आयुष्याचे शेवटचे पान लिहिणे हे समाजाच्या पुरोगामित्वाला समूळ हादरा देणारे कृत्य आहे.
आता परत एकदा आंदोलने, निदर्शने होतील. दाभोलकर हत्येच्या जखमा अव्याहत वाहू लागतील. त्यावेळचे सरकार आणि आताचे सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात त्यांची शक्ती वाया घालवतील. यथावकाश हाही मामला कोणत्याही निकालाविना ठंडा होईल आणि यापुढील 'टार्गेट' वर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुन्हा एकदा 'तो' हिंसक गट कार्यरत होईल.
या मितीला ८२ वर्षाचे पानसरे सर हॉस्पिटल मध्ये जीवन-मरणाचा खो खो अनुभवत आहेत. त्यांच्या पत्नी उमाताई धोक्याच्या बाहेर असल्या तरी ज्या वयात प्रत्येक दिवस हा आनंदात,शांततेत व्यतीत करायचा त्या दैनंदिन आयुष्यावर ही हिंसेची काळीकुट्ट सावली त्यांना आता यापुढे बाळगावी लागणार आहे.
समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवणे, गोरगरिबांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, समाजातील घटकांना विचारप्रवृत्त करणे, आत्मसन्मानासाठी वैचारिक लढा द्यायला लावणे, कोणत्याही अन्यायाविरुध्द आवाज उठवायला लावणे या अक्षम्य चुका आहेत का?
दाभोलकर आणि पानसरे सर समाजातील वैचारिक दृष्ट्या मागास असलेल्या स्तरातील लोकांचे प्रबोधन करत होते. तो त्यांचा ध्यास होता, श्वास होता. ज्या अंधश्रद्धेच्या विळख्यात वर्षानुवर्षे स्वत:ला जखडून घेऊन ज्यांनी स्वत:च्या विकासाच्या नाड्या आवळल्या होत्या आणि आहेत त्या सामाजिक घटकांच्या नाड्या सैल करून त्याभोवतीचा अंधश्रद्धेचा फास ते काढू पाहत होते. अशा नि:स्वार्थीपणाने समाजहितासाठी झटणाऱ्या माणसांना या जगात राहण्याचा हक्क नाही का? त्यांनी या भूतलावरील पसारा आवरता घ्यावा यासाठी समाजातील जे घटक सतत कार्यरत होते व आहेत त्यांचा मागोवा अत्यंत त्वरित पद्धतीने घेणे हे सरकारचे कर्तव्य तरी सरकारला मान्य आहे का?
तलवारी,बंदुका ही शस्त्रे दिवसाढवळ्या इतरांच्या डोळ्यांदेखत वापरणारे ताबडतोब गजाआड का होत नाहीत? त्यांना न पकडता येणे ही सरकारच्या दृष्टीने वैषम्याची बाब नाही का?
आणखी किती दाभोलकर, पानसरे यांची आहुती दिल्यानंतर शासनाला जाग येणार आहे? जोवर अशा हिंसक प्रवृत्तींना समाजासमोर आणून त्यांना सज्जड शिक्षा दिली जात नाही तोवर समाजहितासाठी झटणाऱ्या अनेकांच्या आयुष्यावर सतत गदा येत राहील. कुणीही ऐऱ्यागैरयाने कुणाच्या तरी सांगण्यावरून भर रस्त्यावर अशा निरलस सेवा करणाऱ्या ऋषीतुल्य माणसांना गोळ्या घालाव्यात आणि समाजातील चुकीच्या रूढी-परंपरा - प्रथा यांविरुद्ध वैचारिक लढा देणाऱ्या व्यक्ती रेल्वेतून प्रवासी उतरून जावा इतक्या सहजतेने काळाच्या पडद्याआड जाव्यात याहून मोठी शोकांतिका ती काय?
आपले अवघे आयुष्य समाजस्वास्थ्यासाठी ज्यांनी पणाला लावले होते आणि आहे त्या व्यक्तींच्या जीविताचे रक्षण करणे या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यात खरोखर शक्य आहे हाय?
No comments:
Post a Comment