Sunday, 22 February 2015

व्हायोलिनीस्ट आजी - एन राजम

ज्या वयात म्हणजे मूल साधारणपणे तीन एक वर्षाचे असताना ABCD ची चित्रपुस्तके किंवा खेळणी मुलांच्या हातात दिली जातात त्या वयात परंपरेनुसार या आजीने नातींच्या हातात व्हायोलीन दिले. आपण म्हणू तीन वर्षाचे मूल काय व्हायोलीन वाजवणार कप्पाळ! पण आपल्याला त्या वयात जसे आणि जेवढे कळले तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कळेल अशा खात्रीने आजीने ते त्यांच्या हाती सोपविले.ह्या आजीकडून त्यांचे वडील रोज एक-दोन तासांपासून ते पुढेपुढे पाच-सहा तासांपर्यंत रियाज करून घेत. त्या वेळेस टाईमपास करण्यासाठी टी. व्ही., मोबाइल आणि मॉल्स नव्हते हे आजीच्या वडिलांचे सुदैवच! त्यामुळे अवघ्या बारा-तेराव्या वर्षीच ही आजी व्हायोलीन वाजवण्यात निष्णात झाली.तिच्या मुलीला तिने निष्णात केले आणि आता नातींच्या हाती हा वारसा सोपवून ही आजी कृतकृत्य झाली आहे.  
बऱ्याच साऊथ इंडियन माम्या सर्वसाधारणपणे इडली,सांबार,अवियल,पायसम करण्यात त्यांचे हात जरा जास्तच कष्टवतात. अर्थातच त्यांना गायन,वादन, नृत्य या कलांमध्ये तशी लहानपणापासूनच रुची असते. पण आपले सूर किंवा आपल्याला येणारे वाद्य हे कर्नाटक संगीताच्या पाकात घोळवण्यातच त्या उत्सुक असतात. पण राजमजींनी कर्नाटक संगीताच्या पाकाबरोबरच  हिंदुस्तानी संगीतरसातील माधुर्यही ओळखलं आणि दोन्ही वादन पद्धतींवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं. तांत्रिक अंगाने व्हायोलीन वाजवण्यापेक्षा गायकी अंगाने वाजवण्याकडे त्यांचा अधिक कल होता. त्यात निपुण होण्यासाठी त्यांना तब्बल पंधरा वर्षे साधना करावी लागली.           
राम मराठे संगीत महोत्सवात एन राजम यांनी सादर केलेले 'नरवर कृष्णा समान' हे नाट्यसंगीत आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या काळजात घर करून राहिलं आहे. त्यांच्या व्हायोलीन मधून नुसते सूर नव्हेत तर नाट्यपदातील शब्द न शब्द ऐकू येतो. त्यातील सूक्ष्म कंपने व हरकती सुद्धा त्या लाजबाब सादर करतात. नाट्यसंगीत गावं तर त्यांच्या व्हायोलीनने असं म्हणायचा मोह आवरत नाही.    
त्यांची मुलगी संगीता शंकर आणि दोन्ही नाती लहापणापासून त्यांच्याकडे व्हायोलीनवादनाची रीतसर दीक्षा घेत आहेत. संगीता शंकर यांनी तर त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या नव्या पिढीच्या नातींना कोणत्याही इलेक्ट्रोनिक खेळण्यांपेक्षा हे सुरात वाजणारे खेळणे अधिक भावले आहे असे वाटते. नाती म्हणतात त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या या अम्माकडून अजून खूप शिकायचे आहे.     
अतिशय शांत, मृदू, सौम्य आणि हसरं व्यक्तिमत्व एन राजम च्या रूपाने आपल्यासमोर येतं. या आपल्यातल्याच आहेत, कोणी खूप मोठ्या नाहीत असा त्यांच्या सान्निध्यात आपला समज सहज होऊ शकतो. व्हायोलीन वाजवता वाजवता त्या पटकन आत जाऊन सांबाराला फोडणी देऊन आणि इडल्यांचा  घाणा शिजायला ठेवून त्याच सहजतेने बाहेर येउन पुन्हा व्हायोलीनशी तद्रूप होतील असे वाटत राहते. नाहीतर एकेका परफोर्मरचा दबदबा एवढा असतो की त्याच्या मागेपुढे घोटाळायचे किंवा त्यांच्याशी बोलायचे धाडसच होत नाही. व्हायोलीन शिवाय मला काहीच येत नाही. राजमजी हसत हसत नम्रपणे सांगतात. ( म्हणजे त्यांना स्वयंपाक येत नसेल असं मानायचं काही कारण नाही )        
त्या लहान असताना सण-समारंभ, नातेवाईक, मित्रमैत्रिणी,खेळ  अशा अनेक गोष्टींना त्यांना तिलांजली द्यायला लागली होती. रात्री उशिरापर्यंत  त्यांचे वडील त्यांच्याकडून व्हायोलीनाचा सराव करून घ्यायचे. त्या अक्षरश: रडकुंडीला येत. पण त्या गोष्टीची किंमत आता कळते असे त्या म्हणतात. त्यांचे बंधूही पट्टीचे व्हायोलिनवादक. सगळं घरंच व्हायोलीनमय, सूरमय!      
ख्यातनाम शहनाईवादक कै.बिस्मिल्ला खान यांच्याबरोबर केलेला जुगलबंदीचा कार्यक्रम हा राजमजींच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. असे अनेक कार्यक्रम उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबरोबर त्यांनी पुढे केले.   
मुलीला,नातीला भरवताना जशी एखादी आई,आजी काऊचिऊच्या गोष्टी सांगते तशा राजमजींनी बहुधा मुलीला आणि नातींना व्हायोलीनच्या गोष्टी सांगितल्या असाव्यात. कोणता दागिना अंगावर घातला यापेक्षा आज व्हायोलीनवर कोणत्या रागाचा साज चढणार आहे याची चर्चा करण्यात या कलाकार आजीला जास्त रस असावा. कलेने आज याही वयात त्यांना आनंदी,हसरं,उत्साही आणि मनाने तरुण ठेवलं आहे यात शंका नाही. नाहीतर वर्षानुवर्षे घरात राबराबून मानेचे व कंबरेचे पट्टे आणि हातात काठी या देणग्या अनेक आज्यांच्या पदरात या वयात पडलेल्या दिसतात. ( तोंडाच्या पट्ट्याला मात्र काही केल्या खीळ बसत नाही )      
शिकवण्याच्या बाबतीत मी कडक शिस्तीची आहे असं त्या सांगतात खरं पण त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यावरून याचा नीटसा अंदाज येत नाही. या वयातही आयुष्यातील एकही सूर न गमावलेली अशी सुरेल आई आणि आजी ज्यांना लाभली त्यांचेही अहोभाग्यच!
राजमजींचे  व्हायोलीन आणि ते ऐकून तृप्ततेने सुखावणारे असंख्य कान यांचे नाते यापुढेही असेच अव्याहतपणे चालू राहो हीच सदिच्छा!           


No comments:

Post a Comment