आपल्या सर्वांचीच कमाल आहे हं! म्हणजे आपण थंडीत म्हणतो केवढी थंडी आहे आणि उन्हाळ्यात म्हणतो केवढं उकडतंय. हे म्हणजे कॉंग्रेसच्या राजवटीत केवढा हा भ्रष्टाचार आणि भाजपच्या राजवटीत केवढी ही धर्मांधता असं म्हणण्यासारखं आहे.
रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसले की आम्ही नाकावर रुमाल तरी धरणार किंवा रस्ता तरी बदलणार. आपल्या लहानपणापासून रस्त्यावरील, ट्रेनमधील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गलिच्छता पाहूनही डोळ्यांना आणि नाकांना त्याची सवय होत नाही म्हणजे काय ? उघडी गटारे, घाणीने तुंबलेले नाले, पानांच्या पिचकाऱ्यांनी बरबटलेल्या भिंती, थुंकीने सजलेले रस्ते, क्रियाकर्म करून सजवलेले आडोसे हे सगळे आपल्या राज्याचे, देशाचे वैभव नाही का? म्हणूनच या घाणेरड्या सवयी अशा वर्षानुवर्षे जतन केल्या जातात.
कुठेतरी, कोणातरी चिमुरडीवर पाशवी बलात्कार झाला तर आमचे मन एवढे आक्रंदून का उठते ? कित्येक वर्षांपासून अशाच प्रकारच्या बातम्या वाचून आणि ऐकून आपली गात्रे बधिर कशी होत नाहीत? बलात्कार करणारी माणसे आहेत का पशु? यांना आया-बहिणी नाहीत का? असे वांझोटे प्रश्न आपण स्वत:ला का पुन्हा पुन्हा विचारात राहतो? शिवाय बलात्कारा सारख्या अधम आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्याला शिक्षा मिळायलाच हवी असं कुठल्या बुकात लिहिलंय? आणि लिहिलं असेल तरी कायद्याच्या पळवाटा आहेतच ना त्यांच्या या कृष्णकृत्यावर पांघरूण घालायला? सकाळी बातमी वाचून आपण मात्र सबंध दिवस उद्विग्न मनस्थितीत घालवणार. काय चाललंय या देशात असे विषण्ण होऊन म्हणणार. बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिलं पाहिजे, हत्तीच्या पायदळी दिलं पाहिजे, तोफेच्या तोंडी दिल पाहिजे, टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला पाहिजे, त्याचे हात-पाय कलम केले पाहिजेत असं संतापाने बोलत राहणार. स्वत:शीच. अहो इथे वेळ आहे कुणाला? ज्याला त्याला आपल्या चरितार्थाशीच मतलब आहे. शिवरायांचा जमाना केव्हाच इतिहासजमा झाला आहे हे तरी आपल्या लक्षात येते आहे का?
अंधश्रद्धेविरुध्द जन्मभर लढा देत ज्या वयात शरीराने आणि मनाने निवृत्त जीवन जगायचं त्या वयात एवढ्या तळमळीने समाजोद्धार करायला दाभोलकर का सरसावले? ८२ वर्षाचे वृद्धत्व अंगावर घेऊन गोर-गरिबांच्या न्याय्य हक्कासाठी आणि टोलविरोधी आंदोलनात पानसरे एवढे सक्रिय का झाले ? दोघांनाही माहिती होतं की दबा धरून बसलेला मृत्यू क्षणाक्षणाला त्याचा पाठलाग करतो आहे. तरी झपाटल्यासारखे काम करत राहिले. नतीजा? दोघांनाही या भूमीवरून एकाच प्रकारे नेस्तनाबूत करण्यात आलं. दाभोलकर गेल्यावर जशा चर्चा रंगल्या तशाच पानसरे गेल्यावरही रंगल्या. सरकार आणि विरोधकांची एकमेकांवर आगपाखड करून झाली. व्यवस्थेला दूषणे देऊन झाली. पोलिसांच्या हतबलतेबद्दल सुस्कारे सोडून झाले. गवसले का काही हाती? तो काळाकुट्ट दिवस आपण शोकमग्न अवस्थेत घालवला आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटचा सामना बघण्यात गर्क झालो. महाराष्ट्र बंद किती यशस्वी झाला?
आजकाल काळ जणू शेतकऱ्यांच्या जीवावरच उठला आहे. पिकामागून पिकं उध्वस्त होताहेत. बागाच्या बागा जळून जात आहेत. मनाने आधीच मेलेला शेतकरी फास लावण्याचा केवळ उपचार पार पडतो आहे. पण विशेष काय त्याचं? सत्ताधारी पक्षाने कोट्यवधींची मदत जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांना मिळो वा न मिळो. शाब्दिक रित्या जाहीर करणं महत्वाचं. सत्ता कोणाचीही असो, शेतकऱ्याच्या नशिबी सत्यानाश हा प्रारब्धभोग लिहिलेलाच आहे. दुष्काळाने करपून गेलेली शेते किंवा अवकाळी पावसाने वाहून गेलेली शेते आपण उघड्या डोळ्यांनी बघत रहायची आणि ही दुर्दशा सहन न झाल्याने शेतकऱ्याने डोळे मिटायचे हीच वहिवाट आजवर चालत आली आहे. शेतकरी कर्जबाजारी होवो नाहीतर त्याची जीवनयात्रा संपून जावो, एकमेकांची उणीदुणी काढण्याचे राजकीय कर्तव्य सर्व पक्षांनी तत्परतेने करायचे हा रिवाज आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तर घडायच्याच. त्याने काय एवढे विचलित व्हायचे?
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना लाखो लिटर दूध वाया गेले तरी चालेल पण ते गोरगरीब मुलांच्या चुकूनही तोंडी लागता कामा नये. सण-समारंभ, शाही सोहळे, कुंभमेळे,डोळे दिपवणारी रोषणाई या सर्व गोष्टींवर कितीही वीज आणि पैसा खर्च झाला तरी चालेल पण हीच वीज आणि हाच पैसा कोणत्याही विधायक कामांकडे अजिबात वळवायचा नाही. भारताला शांघाय करायचा प्रयत्न करायचा पण अजूनही गावोगावी, खेडोपाडी केवळ पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या महिलांचे प्रश्न अनुत्तरितच ठेवायचे. टोलेजंग इमारती बांधायच्या पण पायाखालचे रस्ते खड्डेविरहित म्हणून करायचे नाहीत. भारत बलाढ्य राष्ट्र म्हणून छात्या फुगवायच्या पण या राष्ट्राच्या मुळावर येऊ शकणारे परप्रांतीय लोंढे थोपवायचे नाहीत. लोकसंख्येला आळा घालण्याचे वैध उपाय मनात सुद्धा आणायचे नाहीत. परदेशांच्या धर्तीवर नाईटलाईफच्या लंब्याचौड्या बाता मारायच्या पण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेचा धसास न लागलेला प्रश्न तसाच लोंबकळत ठेवायचा. स्कॉटलंड पोलीसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर असे अभिमानाने नुसते म्हणायचे पण या पोलिसांच्या राहत्या घराची अतिशय दयनीय अवस्था, त्यांचा तुटपुंजा पगार, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण सोयीस्कररित्या दृष्टीआड करायचा.
आणि शाळेत असताना शिकवलेले 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा' हे राष्ट्रभक्तीपर गीत आठवत आपण या निष्प्राण समाजव्यवस्थेकडे आणि निष्क्रिय सत्ताधारयांकडे बघता बघता आतून संपून जायचं.
आदरणीय श्री.शिरीष कणेकर यांस
तुमचं चारशेच्या वर पृष्ठसंख्या असलेलं 'मी माझं मला' हे प्रदीर्घ आत्मचरित्र वाचलं. बऱ्याच वर्षांनंतर एवढं मोठं पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात धरलं. आजवर मी तुमची अनेक पुस्तके वाचली आहेत.( विकत घेऊन ) पण मला हे पुस्तक सौ. नंदिनी गोखले यांच्याकडून भेट मिळालं ही खास बाब आहे. माझा व्यवसाय आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या (तुमच्या भाषेत त्या शिंच्या असतातच पाचवीला पुजलेल्या ) सांभाळून मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. लेखनाची भट्टी छान जमली आहे. ( तशी तुमची नेहमीच जमते ) सगळ्या खऱ्या गोष्टी तुम्ही पुस्तकात समाविष्ट केल्या नाहीत तरी जे लिहिलं गेलं आहे ते सत्य आहे असं मानल्यास तुम्ही खूप काही लहानपणीच गमावलेलं आहे हे कबूल पण नंतर मात्र खूप काही कमावलेलही आहे याची जाणीव हे पुस्तक करून देतं.
तुम्ही विकसित केलेली 'कणेकरी शैली' खुमासदार आहे. एखाद्या प्रसंगातील बोलकं लघुभाष्य, त्या परिस्थितीतही सुचलेला विनोद,त्या विशिष्ट प्रसंगाला लाभलेली कारुण्याची झालर,काही प्रसंगांत माणसांच्या स्वभावामुळे,वर्तनामुळे त्यांच्याविषयी मनात निर्माण झालेला कडवटपणा आणि त्यातून जन्मलेलं उपरोधिक भाष्य या सगळ्या भावभावनांची सरमिसळ म्हणजे हे आत्मचरित्रपर लेखन आहे असे म्हणायला हरकत नसावी.
या पुस्तकातील काही प्रकारणे (लोकांची नव्हे ) अगोदर माझ्या वाचनात आलेली आहेत. काल्पनिक प्रकाशक कोठावळे यांच्या काल्पनिक भाच्याने तुम्हाला 'मामा ' बनविणे, लेखकाचा ऑटोग्राफ मागून मग त्याचे नाव विचारणे, advertising agency मधील लतादीदींच्या CD प्रकाशनाच्या वेळचा प्रसंग आणि असे अनेक प्रसंग तुमच्या खास शैलीत वाचायला जाम आवडले. 'पॉप्युलर' कडे तुमची सगळी ठेव बुडाल्यानंतर देखील तुम्ही जो काही प्रसंग वर्णन केला आहे त्यात पैसे बुडाल्याचे शल्य आहेच पण 'ह्या माणसांनी असेच परस्परांचे पैसे देऊन टाकावे' या कारखानिसांच्या वाक्यानंतर त्या परिस्थितीतही हसू आल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा क्रिकेटचं चालतंबोलतं तंत्र सुनील गावसकर तुमच्या घरी जेवायला येत होता तेव्हा तुमच्या मुलाने जिन्यातच त्याला विचारले, ए सुनील गावसकर तुझे दात पाडू का ? त्यावर त्यानेही तितक्याच सहजतेने 'नको. राहू देत. जेवताना उपयोगी पडतील.' हे जे हजरजबाबीपणे उत्तर दिले तेही वाचताना मजा आली. एरवी ही छोटी मुले मोठ्यांना अतिशय निरागसपणे क्लीन बोल्ड करतात. यथावकाश अमर कणेकर हा डॉक्टर झालाच पण डेंटल सर्जन झाला असता तर 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण त्याने खरी केली असती. प्रत्येक भारतीयाच्या मनात गायिका म्हणून जिचे अग्रगण्य स्थान आहे त्या लतादीदी तुमच्या घरी जेवायला आल्या, त्यांनी खिमा पटीस परत मागून घेतले आणि चक्क 'निगाहे मिलानेको जी चाहता हैं' हे आशाचं गाणं गुणगुणलं असं अनमोल भाग्य किती जणांच्या वाट्याला आलं आहे?
सिनेसृष्टीतील अनेक चेहऱ्यांना,मुखवट्यांना तुम्ही जवळून पाहिलंत. त्यांचा खरेपणा-खोटेपणा-भपका तुम्हाला अनुभवायला मिळाला. त्यातील काहींच्या मनातील सच्चेपणाला तुम्ही स्पर्श केलात, काहींशी मैत्री जोपासलीत. ज्येष्ठ नटी शशिकला यांनी अभिनेते प्राण यांच्या संदर्भात 'थरो जंटलमन' ची केलेली व्याख्या ऐकून तुम्ही अंतर्बाह्य थरारलात. अभिनेते मनोजकुमार(?) आणि अशोककुमार यांच्या एका चित्रपटातील प्रसंग मात्र डोळ्यांत पाणी आणेपर्यंत हसवून गेला. अशोककुमारचे पाय लुळे पडतात. मुंबईत काही केल्या डॉक्टर मिळत नाही. (बहुतेक सगळे ग्रामीण भागात दवाखाने उघडून असतात ) मनोजकुमार तिरका शिडीसारखा उभा राहतो आणि रेडिओ लावतो. रेडिओवर 'कदम कदम बढाये जा' हे गाणे सुरु होते आणि या गाण्यापासून स्फूर्ती घेऊन अशोककुमार त्याचे पाय ड्रील केल्यासारखे हलवू लागतो. हा प्रसंग 'परलिसिस' वर उपचार करणाऱ्या समस्त डॉक्टरांनी जरूर वाचवा. मनोरंजन तर होईलच पण त्यातून त्यांना संशोधनाची नवी दिशाही मिळू शकेल.
तुम्ही अनुभवलेला न्यूयॉर्क पासून जवळ असलेल्या तुम्ही राहत असलेल्या एका गावातील दिवे गेल्यानंतरचा प्रसंग अंगावर काटा आणतो. वैज्ञानिक,तांत्रिक,आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या देशातही असे जीवघेण्या थंडीत घाम फुटायला लावणारे प्रसंग घडू शकतात याचं प्रत्यंतर आलं. शिवाय शेजारधर्म तिथे औषधालाही नसल्याने अडचणीत सापडलेल्या माणसासाठी फक्त आणि फक्त त्याची पूर्वपुण्याईच कामाला येऊ शकते याची खात्री पटते. अशावेळेस आपल्या देशाची, येथील माणसांची आणि शेजारधर्माची किंमत आपल्याला कळते.
तुमचा 'कट्टा ग्रुप' देखील मनाला खूप भावाला. तुमच्या अनेक मिश्किल, धम्माल, हळव्या आठवणी त्या शिवाजीपार्कच्या कट्ट्याशी निगडीत आहेत. तुमच्या बऱ्याच मित्रांना तुम्ही लेखक आहात याचा पत्ताही नाही हे ऐकून मजा वाटली. आज यातील अनेक मित्र हे जग सोडून गेल्याचं दु:ख आहे, कुणाशी बिनसल्याची खंत आहे. पण डोळे ओले करणाऱ्या या सुगंधित आठवणींची शिदोरी हे तुमचे वैभव तुमच्यापाशी आहे.
एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने अकरा वेळा केलेले अमेरिकेचे दौरे, अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे दौरे आणि स्वदेशी व परदेशी प्रेक्षकांनी तुमच्या कार्यक्रमाला मनमुराद हसून दिलेला प्रतिसाद ही तुमच्या मर्मबंधातील ठेव असावी असे मानायला हरकत नाही. 'कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है' हे सूत्र जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्याला applicable आहे. तेव्हा आतातरी जुनी मढी उकरू नका कारण तुमच्याच शब्दात फक्त दु:खाचेच सांगाडे हाती लागतील. असो.
तुम्ही सिटीलाईटला 'ठाकूर आणि मंडळी' यांच्याकडे लाडू खात खात गप्पा मारता हे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. माझे माहेरही तिथलेच आहे. त्यामुळे कधी आपल्या भेटीचा योग आला तर मला खूप आवडेल आपल्याला भेटायला.
असेच लेखानाधीन होऊन लिहित जा आणि लिखाणातून वाचकांना भरपूर आनंद देत जा. ( कारण 'आनंद' नावाचा शब्द आताशा आपल्या जीवनातून हद्दपार होतो आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे )
ज्या वयात म्हणजे मूल साधारणपणे तीन एक वर्षाचे असताना ABCD ची चित्रपुस्तके किंवा खेळणी मुलांच्या हातात दिली जातात त्या वयात परंपरेनुसार या आजीने नातींच्या हातात व्हायोलीन दिले. आपण म्हणू तीन वर्षाचे मूल काय व्हायोलीन वाजवणार कप्पाळ! पण आपल्याला त्या वयात जसे आणि जेवढे कळले तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कळेल अशा खात्रीने आजीने ते त्यांच्या हाती सोपविले.ह्या आजीकडून त्यांचे वडील रोज एक-दोन तासांपासून ते पुढेपुढे पाच-सहा तासांपर्यंत रियाज करून घेत. त्या वेळेस टाईमपास करण्यासाठी टी. व्ही., मोबाइल आणि मॉल्स नव्हते हे आजीच्या वडिलांचे सुदैवच! त्यामुळे अवघ्या बारा-तेराव्या वर्षीच ही आजी व्हायोलीन वाजवण्यात निष्णात झाली.तिच्या मुलीला तिने निष्णात केले आणि आता नातींच्या हाती हा वारसा सोपवून ही आजी कृतकृत्य झाली आहे.
बऱ्याच साऊथ इंडियन माम्या सर्वसाधारणपणे इडली,सांबार,अवियल,पायसम करण्यात त्यांचे हात जरा जास्तच कष्टवतात. अर्थातच त्यांना गायन,वादन, नृत्य या कलांमध्ये तशी लहानपणापासूनच रुची असते. पण आपले सूर किंवा आपल्याला येणारे वाद्य हे कर्नाटक संगीताच्या पाकात घोळवण्यातच त्या उत्सुक असतात. पण राजमजींनी कर्नाटक संगीताच्या पाकाबरोबरच हिंदुस्तानी संगीतरसातील माधुर्यही ओळखलं आणि दोन्ही वादन पद्धतींवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं. तांत्रिक अंगाने व्हायोलीन वाजवण्यापेक्षा गायकी अंगाने वाजवण्याकडे त्यांचा अधिक कल होता. त्यात निपुण होण्यासाठी त्यांना तब्बल पंधरा वर्षे साधना करावी लागली.
राम मराठे संगीत महोत्सवात एन राजम यांनी सादर केलेले 'नरवर कृष्णा समान' हे नाट्यसंगीत आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या काळजात घर करून राहिलं आहे. त्यांच्या व्हायोलीन मधून नुसते सूर नव्हेत तर नाट्यपदातील शब्द न शब्द ऐकू येतो. त्यातील सूक्ष्म कंपने व हरकती सुद्धा त्या लाजबाब सादर करतात. नाट्यसंगीत गावं तर त्यांच्या व्हायोलीनने असं म्हणायचा मोह आवरत नाही.
त्यांची मुलगी संगीता शंकर आणि दोन्ही नाती लहापणापासून त्यांच्याकडे व्हायोलीनवादनाची रीतसर दीक्षा घेत आहेत. संगीता शंकर यांनी तर त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या नव्या पिढीच्या नातींना कोणत्याही इलेक्ट्रोनिक खेळण्यांपेक्षा हे सुरात वाजणारे खेळणे अधिक भावले आहे असे वाटते. नाती म्हणतात त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या या अम्माकडून अजून खूप शिकायचे आहे.
अतिशय शांत, मृदू, सौम्य आणि हसरं व्यक्तिमत्व एन राजम च्या रूपाने आपल्यासमोर येतं. या आपल्यातल्याच आहेत, कोणी खूप मोठ्या नाहीत असा त्यांच्या सान्निध्यात आपला समज सहज होऊ शकतो. व्हायोलीन वाजवता वाजवता त्या पटकन आत जाऊन सांबाराला फोडणी देऊन आणि इडल्यांचा घाणा शिजायला ठेवून त्याच सहजतेने बाहेर येउन पुन्हा व्हायोलीनशी तद्रूप होतील असे वाटत राहते. नाहीतर एकेका परफोर्मरचा दबदबा एवढा असतो की त्याच्या मागेपुढे घोटाळायचे किंवा त्यांच्याशी बोलायचे धाडसच होत नाही. व्हायोलीन शिवाय मला काहीच येत नाही. राजमजी हसत हसत नम्रपणे सांगतात. ( म्हणजे त्यांना स्वयंपाक येत नसेल असं मानायचं काही कारण नाही )
त्या लहान असताना सण-समारंभ, नातेवाईक, मित्रमैत्रिणी,खेळ अशा अनेक गोष्टींना त्यांना तिलांजली द्यायला लागली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचे वडील त्यांच्याकडून व्हायोलीनाचा सराव करून घ्यायचे. त्या अक्षरश: रडकुंडीला येत. पण त्या गोष्टीची किंमत आता कळते असे त्या म्हणतात. त्यांचे बंधूही पट्टीचे व्हायोलिनवादक. सगळं घरंच व्हायोलीनमय, सूरमय!
ख्यातनाम शहनाईवादक कै.बिस्मिल्ला खान यांच्याबरोबर केलेला जुगलबंदीचा कार्यक्रम हा राजमजींच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. असे अनेक कार्यक्रम उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबरोबर त्यांनी पुढे केले.
मुलीला,नातीला भरवताना जशी एखादी आई,आजी काऊचिऊच्या गोष्टी सांगते तशा राजमजींनी बहुधा मुलीला आणि नातींना व्हायोलीनच्या गोष्टी सांगितल्या असाव्यात. कोणता दागिना अंगावर घातला यापेक्षा आज व्हायोलीनवर कोणत्या रागाचा साज चढणार आहे याची चर्चा करण्यात या कलाकार आजीला जास्त रस असावा. कलेने आज याही वयात त्यांना आनंदी,हसरं,उत्साही आणि मनाने तरुण ठेवलं आहे यात शंका नाही. नाहीतर वर्षानुवर्षे घरात राबराबून मानेचे व कंबरेचे पट्टे आणि हातात काठी या देणग्या अनेक आज्यांच्या पदरात या वयात पडलेल्या दिसतात. ( तोंडाच्या पट्ट्याला मात्र काही केल्या खीळ बसत नाही )
शिकवण्याच्या बाबतीत मी कडक शिस्तीची आहे असं त्या सांगतात खरं पण त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यावरून याचा नीटसा अंदाज येत नाही. या वयातही आयुष्यातील एकही सूर न गमावलेली अशी सुरेल आई आणि आजी ज्यांना लाभली त्यांचेही अहोभाग्यच!
राजमजींचे व्हायोलीन आणि ते ऐकून तृप्ततेने सुखावणारे असंख्य कान यांचे नाते यापुढेही असेच अव्याहतपणे चालू राहो हीच सदिच्छा!
शरीराचे वस्त्र उतरवायला प्रत्येकालाच काहीना काही निमित्त होतं. जो शरीररूपी वस्त्र चढवतो त्या प्रत्येकाला कधी ना कधी इथेच या धरेवर ते उतरवायलाच लागते. हे वस्त्र चढवण्या-उतरवण्यामधील जो काही वेळ असतो त्याला आपण आयुष्य म्हणून संबोधतो. जे वस्त्र धारण केले आहे त्याचा त्याग करायला हा लागणारच हा अटळ भोग माहित असूनही या दरम्यान जो तो चरितार्थासाठी म्हणा किंवा निव्वळ स्वार्थासाठी प्रचंड उपद्व्याप करत असतो. 'जितनी चावी भरी है रामने उतना ही चले खिलौना' हे ज्ञात असूनही इतरांच्या भरलेल्या चाव्या आपल्या इंजिनाला लावायचा निष्फळ खटाटोपही अनेक जण करत असतात. हा पृथ्वीतलावरचा 'पपेट शो' आहे हे मान्य करावेसे कुणालाच वाटत नाही.
रस्त्यातून चाललेला धडधाकट मनुष्य अचानक चावी काढून घेतल्यासारखा गतप्राण होऊन खाली कोसळतो तर काही खेळणी रडत-कुंथत इच्छा नसून सुद्धा चावी काढली गेली नाही म्हणून संसार नामक भयानक वास्तव रेटत राहतात. झोळी पसरून 'मरण दे देवा' असे रोज त्या परमेश्वराला विनवत शरीर नामक सांगाडा अंगावर बाळगणारी माणसे शरपंजर अवस्थेत कित्येक वर्षे खितपत पडून असतात आणि रात्री मित्रांबरोबर मनसोक्त गप्पा मारणारा कुणी 'अ' नामक भिडू दुसऱ्या सकाळी निद्रावस्थेतच देह सोडतो. हे थ्रिल कमी असते की काय म्हणून तलवारी,बंदुका,सुरे,गुप्त्या या शस्त्रांनी दुसऱ्याच्या आयुष्यातील थ्रिल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया,टी. बी.आणि असे असंख्य आजार दरमहा सगळ्यांचीच एक्साईटमेंट वृद्धिंगत करत राहतात.
रस्त्यांवरचे दिसणारे आणि अदृश्य खड्डे ज्याची वेळ आली त्या येणाऱ्या जाणाऱ्या कुणाच्याही शरीरातील हाडांची चाचणी घेतात आणि निखळलेली हाडे सांधण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जनचं गतजन्मीच ऋण चुकतं करावं लागतं. (सगळ्यांच्या पोटाची खळगी भरायची व्यवस्था वरच्याने केली आहे याची अशावेळेस बालंबाल खात्री पटते) दारू ढोसून आणि बेदरकारपणे गाडी चालवून त्याखाली दोन-पाच माणसे सहजगत्या चिरडणे हा तर लोकसंख्या कमी करण्याचा हमखास उपाय आहे असे काही महाभागांना वाटत असावे. शिवाय गोरगरिबांना या जगात राहण्याचा काय हक्क आहे असेही काही गेंड्याच्या कातडीच्या मनुष्यवजा प्राण्यांना वाटू शकते. आपल्या देशात किडा-मुंग्यांसारखी माणसे मरतातच, त्यात विशेष काय असं म्हणायचं आणि वर्तमानपत्राचे पान उलटायचे हा रिवाज आहे.
शेतात धान्याचे पिक येण्याऐवजी आत्महत्याचं पिक येत चाललंय. सरकार भरघोस मदत (असं शासनकर्तेच सांगतात) जाहीर करतं पण ती मदत शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही. न पोहोचलेली मदत करून सरकार सुटकेचा निश्वास टाकते आणि कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मरणाचा भाव वधारतो. देवदर्शनाला गेलेली माणसे चेंगराचेंगरीत मारणे, लग्नाचे वऱ्हाडच्या वऱ्हाड बससकट नदीत कोसळणे हे थ्रिल सुद्धा दर दोन-तीन महिन्यांनी पाहायला मिळतेच. शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट, विमाने त्यातील प्रवाशांसकट गायब होणे, बिल्डिंगा रहिवाशांसकट कोसळणे अशा वैविध्यपूर्ण आपत्तींच्या सिरियल्स चालूच असतात. बलात्कार आणि हत्यांचे डेली सोप्सही असतात. एवढी सगळी निमित्ते असूनही आपल्या देशाची लोकसंख्या काही करून कमी कशी होत नाही हे जगातलं आठवं आश्चर्य मानायला हरकत नाही.
ब्लडप्रेशर, डायबेटीस हे आजच्या तरुणाईच्या मते चिंधी रोग आहेत. ते काय होतातच. माणसे काय तशातही जगतातच! कामाच्या भयंकर व अनियमित वेळा पोटातील भूक शमवू देत नाहीत. त्यात सतत संगणकासमोर बसून डोळे, मान, खांदे, पाठ हे अवयव काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतात. दुसरया व्यक्तीशी अथवा कंपनीशी स्पर्धा करण्याच्या नादात आज तिशी-पस्तिशीत केसांना पांढरा मुलामा चढतो आहे. 'वर्क प्रेशर' च्या नावाखाली अनेकांची धडधाकट हृदये कमकुवत होत चालली आहेत. ही 'दिल की घडी' कधीही टिकटिक करायची थांबवेल इतकी ही जीवघेणी मानसिक दमछाक आहे. त्यात 'स्ट्रेस डायबेटीस' हा प्रकार तर अगदी कोवळ्या मुलांच्या दप्तरातच जाउन बसला आहे. कॅन्सर नामक आजाराच्या उच्चारातच माणूस अर्धा मरतो. उरलेलं मरण त्याला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आप्तांच्या नजरेत दिसतं. 'मलाच का' या प्रश्नाचं उत्तर शोधेपर्यंत पुढच्या जन्माच्या प्रवासाची वेळ येउन ठेपते.
आपल्या जन्माला आपले आई-बाप निमित्त होतात आणि मरणाची अगणित निमित्ते आपल्या आत आणि बाहेर अव्याहतपणे घिरट्या घालत असतात. कुठल्या निमित्ताकारणे कोणाला व कधी ही इहलोकीची यात्रा आटोपती घ्यावी लागेल हे रहस्य मात्र काळाच्या कुपीत घट्ट बंद असते.
आजकाल दुसऱ्याचे विचार रुचले नाहीत, पचले नाहीत की ठो ठो गोळ्या घालण्याची प्रवृत्ती बळावली आहे. जणू वैचारिक मतभेदांवरील ही हक्काची दवा आहे. कॉलेजमधील दोन भिन्न विचारांचे गट तलवार परजून एकमेकांवर तुटून पडायला अजिबात पुढेमागे पाहत नाहीत. दुसऱ्याचा वैचारिक बिमोड करण्याऐवजी शारीरिक बिमोड करण्याकडे समाजमन जास्तीत जास्त आकृष्ट होताना आज दिसते आहे.
का बाबांनो, एका ८२ वर्षाच्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनुभवसमृध्द, वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ अशा व्यक्तीवर तुम्ही बंदुकीतून बेछूट गोळीबार केलात? त्यांच्या पत्नीलाही सोडले नाहीत? मुळात एखाद्याला अशा गोळ्या घालाव्याशा वाटणे ही हिंसक विचारसरणी मानवतेला अत्यंत घातक आणि समाज स्वास्थ्याच्या मुळावर येणारी आहे असं तुम्हाला नाही का वाटत?
दाभोलकरांचे मारेकरी अद्याप या भूतलावर सुखनैव नांदत आहेत. दीड वर्षात त्यांचं नखसुद्धा शासनाच्या आणि पोलीसदलाच्या दृष्टीस पडलेले नाही. त्याच हिंसक प्रेरणेने पुनश्च एका वयस्क व्यक्तीवर त्याच पद्धतीने गोळ्या झाडून दिवसाच्या सुरवातीला त्या व्यक्तीच्या आयुष्याचे शेवटचे पान लिहिणे हे समाजाच्या पुरोगामित्वाला समूळ हादरा देणारे कृत्य आहे.
आता परत एकदा आंदोलने, निदर्शने होतील. दाभोलकर हत्येच्या जखमा अव्याहत वाहू लागतील. त्यावेळचे सरकार आणि आताचे सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात त्यांची शक्ती वाया घालवतील. यथावकाश हाही मामला कोणत्याही निकालाविना ठंडा होईल आणि यापुढील 'टार्गेट' वर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुन्हा एकदा 'तो' हिंसक गट कार्यरत होईल.
या मितीला ८२ वर्षाचे पानसरे सर हॉस्पिटल मध्ये जीवन-मरणाचा खो खो अनुभवत आहेत. त्यांच्या पत्नी उमाताई धोक्याच्या बाहेर असल्या तरी ज्या वयात प्रत्येक दिवस हा आनंदात,शांततेत व्यतीत करायचा त्या दैनंदिन आयुष्यावर ही हिंसेची काळीकुट्ट सावली त्यांना आता यापुढे बाळगावी लागणार आहे.
समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवणे, गोरगरिबांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, समाजातील घटकांना विचारप्रवृत्त करणे, आत्मसन्मानासाठी वैचारिक लढा द्यायला लावणे, कोणत्याही अन्यायाविरुध्द आवाज उठवायला लावणे या अक्षम्य चुका आहेत का?
दाभोलकर आणि पानसरे सर समाजातील वैचारिक दृष्ट्या मागास असलेल्या स्तरातील लोकांचे प्रबोधन करत होते. तो त्यांचा ध्यास होता, श्वास होता. ज्या अंधश्रद्धेच्या विळख्यात वर्षानुवर्षे स्वत:ला जखडून घेऊन ज्यांनी स्वत:च्या विकासाच्या नाड्या आवळल्या होत्या आणि आहेत त्या सामाजिक घटकांच्या नाड्या सैल करून त्याभोवतीचा अंधश्रद्धेचा फास ते काढू पाहत होते. अशा नि:स्वार्थीपणाने समाजहितासाठी झटणाऱ्या माणसांना या जगात राहण्याचा हक्क नाही का? त्यांनी या भूतलावरील पसारा आवरता घ्यावा यासाठी समाजातील जे घटक सतत कार्यरत होते व आहेत त्यांचा मागोवा अत्यंत त्वरित पद्धतीने घेणे हे सरकारचे कर्तव्य तरी सरकारला मान्य आहे का?
तलवारी,बंदुका ही शस्त्रे दिवसाढवळ्या इतरांच्या डोळ्यांदेखत वापरणारे ताबडतोब गजाआड का होत नाहीत? त्यांना न पकडता येणे ही सरकारच्या दृष्टीने वैषम्याची बाब नाही का?
आणखी किती दाभोलकर, पानसरे यांची आहुती दिल्यानंतर शासनाला जाग येणार आहे? जोवर अशा हिंसक प्रवृत्तींना समाजासमोर आणून त्यांना सज्जड शिक्षा दिली जात नाही तोवर समाजहितासाठी झटणाऱ्या अनेकांच्या आयुष्यावर सतत गदा येत राहील. कुणीही ऐऱ्यागैरयाने कुणाच्या तरी सांगण्यावरून भर रस्त्यावर अशा निरलस सेवा करणाऱ्या ऋषीतुल्य माणसांना गोळ्या घालाव्यात आणि समाजातील चुकीच्या रूढी-परंपरा - प्रथा यांविरुद्ध वैचारिक लढा देणाऱ्या व्यक्ती रेल्वेतून प्रवासी उतरून जावा इतक्या सहजतेने काळाच्या पडद्याआड जाव्यात याहून मोठी शोकांतिका ती काय?
आपले अवघे आयुष्य समाजस्वास्थ्यासाठी ज्यांनी पणाला लावले होते आणि आहे त्या व्यक्तींच्या जीविताचे रक्षण करणे या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यात खरोखर शक्य आहे हाय?