पण या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी दडलेली आहे मानसिकता. ती बदलायची तर आहे पण नक्की कोणत्या मार्गाने हे समजत नाही. मुलांच्या-मुलींच्या जडणघडणीसाठी एक विशिष्ट वय असते. घरात आई-वडील तर शाळेत शिक्षक हे मुलांचे मार्गदर्शक असतात. मुलांची प्रेरणास्थाने असतात. आजूबाजूच्या परिस्थितीचे, समाजाचे आघात मुलांच्या कोवळ्या मनांवर होण्याआधीच त्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक या पालकांनी तसेच शिक्षकांनी करणे अत्यावश्यक आहे. या मुलांची किंवा मुलींची ठराविक वैचारिक बैठक पक्की होण्याआधीच त्यांना निकोप मानसिक आरोग्याचे बाळकडू या आदरस्थानांकडून मिळणे गरजेचे आहे.
सर्व प्रकारच्या हिंस्त्र, वासना उद्दीपित करणाऱ्या साधनांपासून या मुलांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे नितांत आवश्यक आहे. या जगात पैशापेक्षाही मानवता अधिक महत्वाची आहे हा सु-विचार मुलांच्या मनावर सातत्याने ठसवला जायला हवा. पर्यावरणाची काळजी, मुक्या प्राण्यांबद्दल जिव्हाळा, वृद्धांबद्दल यथोचित आदर, संकटप्रसंगी दुसरयाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, मुलांच्या मनात स्त्री-जातीबद्दल आदर, मुलींच्या मनात समाजात वावरण्याची निर्भयता या गोष्टी शाळेतूनच शिकवल्या जायला हव्यात. ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेता येईल अशा थोर व्यक्तींची जीवनचरित्रे दृक-श्राव्य माध्यमाद्वारे मुलांना दाखवायला हवीत. प्रत्येक मुलाच्या मनात सहिष्णू भाव रुजायला हवा व त्यासाठी घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी आपले सक्रिय योगदान द्यायला हवे.
पूर्वी मुले गुरूगृही घडत असत. घर आणि समाज यांपासून ही मुले कैक योजने दूर असत. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या विचारांपासून विचलित करणारी माध्यमे वा प्रलोभने नसायची. गुरुवर्यांच्या नजरेसमोर ही मुले संस्कारित होत असत. त्यामुळे गुरूचा उत्तम प्रभाव या मुलांवर पडत असे. अशी मुले मग मोठी होऊन समाजात मिसळल्यानंतर एक चांगला मानसिक प्रवाह घेऊन वावरायची. त्यांची वैचारिक बैठक गुरूगृही पक्की झालेली असायची. म्हणजे त्यावेळी समाजविघातक कृत्ये व्हायची नाहीत असे नाही परंतु त्याचे प्रमाण मात्र नगण्य असायचे.
आज समाजाचे विदारक चित्र आपल्याला दिसते आहे पण ते बदलण्याची गरज किती जणांना मुळापासून वाटते हे महत्वाचे आहे. वडील-मुलगी, काका-पुतणी, मामा-भाची, आजोबा-नात ,भाऊ-बहिण या नात्यांमधील पावित्र्य नष्ट होताना आज दिसते आहे. माणसे हिंस्त्र बनत चालली आहेत. केवळ काही पैशांसाठी समाजातील चांगल्या माणसांना नष्ट करण्याचा घाट घाटला जातो आहे. कृतिशीलता कमी होऊन शिथिलता वाढली आहे. आज माणसांची यंत्रे घराघरातून टाकसाळीचे काम करत आहेत. मुले पालकांच्या अस्तित्वाला, प्रेमाला वंचित होत चालली आहेत. मुलांवर चांगले संस्कार करायला ना पालकांना वेळ आहे ना शाळेतील गुरुजनांना! मुले सुख शोधण्याच्या भरात यंत्रांतून मिळणारे बरे-वाईट ज्ञान त्यांच्या मनात भरून घेत आहेत. चांगले काय, वाईट काय याविषयी मार्गदशन करणारे पैशामागे धावत सुटले आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना अनेक उत्तमोत्तम, उंची साधने खरेदी करून द्यायची आहेत, त्यांना परदेशवारयांना घेऊन जायचे आहे, मुलांना येणारे एकाकीपण, नैराश्य काही यांत्रिक साधनांनी किंवा पर्यटन करायला नेउन घालवायचे आहे. त्यांच्या मूळ गाभ्यावर कोणतेही आवश्यक संस्कार न करता!
बाहेरील अनावश्यक खाण्याने मुलांचे शारीरिक आरोग्य ढासळते आहे आणि आवश्यक त्या संस्काराअभावी त्यांचे मानसिक आरोग्यही उतरणीला लागले आहे. स्त्रीत्व आणि पौरुष यांविषयीच्या चुकीच्या व्याख्या समाजमनात बिंबल्या आहेत. या व्याख्या बदलण्याची गरज समाजाला वाटते काय हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.
कलियुगात असेच होणार असे अकलेचे तारे तोडणारे महाभागही भरपूर आहेत. गतानुगतिक समजांनी समाज आज अगतिक, हतबल झाला आहे. पण हे चित्र बदलावयाचे असेल तर जात-धर्म-लिंग-वय-प्रांत या घटकांना बाजूला सारून मुळापासून काही करण्याची गरज भासणार आहे. योगक्रिया, आत्मसंयमन याद्वारे मुलांना लहानपणीच मानसिक दृष्ट्या सशक्त,सक्षम करण्याची गरज आहे. चांगल्या,शुध्द विचारांचे बीज मुलांच्या कोवळ्या, संस्कारक्षम मनात रुजवण्याची गरज आहे. आहारानुसार विचार बनतो आणि विचाराप्रमाणे आचार बनतो. म्हणूनच सात्विक, सकस आहार आणि उत्तम विचारांचे खतपाणी घालून मुलांचे आचरण सुयोग्य बनवणे हि तुम्हा-आम्हा सर्व समाजघटकांची सामुहिक जबाबदारी आहे. तर आणि तरच उद्याच्या सुरक्षित समाजाची हमी देता येईल.
No comments:
Post a Comment