Friday, 20 July 2012

मेरे सपनों की रानी कब आएगी तू............

आराधना चित्रपटात उघड्या जीपमध्ये बसून सुजीतकुमारच्या सोबतीने राजेश त्याच्या स्वप्नातील राणीची आळवणी करत होता आणि प्रत्येक तरुणीला आपणच त्याच्या स्वप्नातील ती राणी आहोत असं मनोमन वाटत होतं. राजेशचा करिश्माच तसा होता. मान तिरकी करून पतंग उडवल्यासारखे हातवारे करून नाचणे हे जरी चाकोरीबद्ध नृत्याच्या व्याख्येत कुठेही बसत नव्हते तरीही त्या तशा नृत्याचा शिल्पकार राजेश होता. वास्तव आणि स्वप्न यांच्या सीमारेषेवरचा त्याचा अभिनयाविष्कार होता.  त्याच्या स्वप्नाळू डोळ्यांमध्ये बुडून जाण्यात अनेकींना धन्यता वाटायची. 'न भूतो न भविष्यति' अशा प्रकारची लोकप्रियता राजेशला लाभली.    
आपल्यावर प्रेम करणारा राजेशसारखाच असला पाहिजे असं अनेक युवतींना वाटायचं. चित्रपटातील प्रेमात अपयश आल्यानंतरचे त्याचे ते खिन्न हसणे अनेकींना घायाळ करून जायचे. त्याचा आराधनातील हळुवार प्रियकर तरुणींच्या हृदयातच थेट ठाण मांडून बसला. आनंद हा तसा एक नितांतसुंदर ज्याला आपण क्लासिक म्हणू असा चित्रपट. परंतु या चित्रपटातील व्याधीग्रस्त राजेशला बघणे अनेकींना नको वाटायचे. कर्करोगाने अंतर्बाह्य पोखरलेला पण तरीही आपल्या वागण्याने दुसऱ्याला सतत आनंद देणारा राजेश पावसाच्या अलवार सरीसारखा प्रत्येकाच्या मनात झिरपत गेला. 'आनंद' आणि 'राजेश' ही या चित्रपटात जणू द्विरुक्ती झाली. 'आदमी सुरण को मटण बना सकता ही और मटण को सुरण' असे म्हणत बावर्ची मध्ये राजेशने विस्कटणारे घर सावरले. यात जो 'jack of all' होता.'थोडीसी बेवफाई',  'अवतार' आणि 'अमृत' मध्ये एक वेगळाच राजेश अवतरला.  संशयपिशाच्च झालेला राजेश 'आप की कसम' मध्ये प्रेक्षकांनी अनुभवला. 'कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना' असे म्हणत प्रेमभावनेची एक श्रेष्ठतम पातळी 'अमरप्रेम' या चित्रपटात राजेशने साकारली. 'डाकिया डाक लाया' असे म्हणत राजेश पोस्टमनच्या वेशातही अवतरला. 'सफर' मधील रोगग्रस्त राजेशने अनेकांची मने हेलावून टाकली. पण त्याने जरी गंभीर भूमिका साकारल्या तरी तो तरुण पिढीसाठी एक 'romantic idol' होता. त्याची हसण्याची, बोलण्याची, बघण्याची लकब अनेकांच्या मनावर गारूड करायची. त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसलेल्या तरुणींची संख्या प्रचंड होती. रक्ताने त्याचे नाव कोरणे, त्याच्या फोटोला हार घालून त्याला मनाने वरणे ह्या गोष्टी करण्यातही अनेकजणी आघाडीवर होत्या.   
शर्मिला टागोर आणि मुमताज बरोबर त्याची विशेष जोडी जमली म्हणा किंवा लोकांनी त्यांना एकमेकांबरोबर बघणे अधिक पसंत केले. शबाना आझमी, स्मिता पाटील, आशा पारेख, राखी, वहिदा यांच्याबरोबरही राजेशने काम केले. 'खामोशी' या चित्रपटातील राजेशची भूमिका विशेष उल्लेखनीय होती. 'आखिर क्यूँ' चित्रपटातील त्याची भूमिकाही लक्षवेधी होती. त्याचे लागोपाठ पंधरा चित्रपट 'सुपरहिट' ठरले. यशाची कमान चढत गेली. अपरिमित यशाने हुरळून जाणाऱ्या अनेकांमधलाच तो एक ठरला. आपल्याशिवाय या दुनियेत कोणाचेच पान हलणार नाही अशा पोकळ भ्रमात तो वावरू लागला. आपल्या वागण्याने त्याने अनेकांचा रोष ओढवून घेतला. सेटवर उशिरा जाणे नित्याचेच होऊन बसले. अहंकार, ताठा, गुर्मी अशा नातलगांना बरोबर घेऊन तो चालू लागला. त्याचे नंतरचे चित्रपट धडाधड कोसळले. अपयशाचे कडवट प्याले रिचवणे त्याच्या पचनी पडले नाही. यशाच्या शिखरावरून त्याचा एकदम कडेलोट झाला. 'राजेश खन्ना' हे नाव अनेकांच्या ओठांवरून विरून गेले. कालांतराने राजकीय क्षेत्रातील त्याच्या पदार्पणाने राजेश खन्ना हे नाव एका वेगळ्या रुपात लोकांसमोर आले. वैयक्तिक आयुष्यातही त्याची रुपेरी पडद्यावरील आदर्श प्रेमवीराची प्रतिमा त्याला तारू शकली नाही. सुखदु:खाचे अनेक चढउतार राजेशला अनुभवावे लागले. जे दु:ख त्याने इतरांना कळत-नकळत दिले ते त्याला नंतरच्या काळात सव्याज परत मिळाले. काही महिन्यांपूर्वी एका पारितोषिक समारंभात पूर्णत: रया गेलेला राजेश दिसला आणि आतमध्ये कुठेतरी कालवाकालव झाली. हाच का तो स्वत:च्या दिलखेच अदांनी लाखो तरुणींच्या मनावर आरूढ झालेला राजेश? अशा संभ्रमात माझ्याप्रमाणेच अनेकजण निश्चित पडले असतील. 
हा राजेश डोळ्यांना त्रास देत होता. सहन होत नव्हता. मनात बंदिस्त करून ठेवलेला राजेश या वास्तवातील राजेशला नाकारत होता. राजेश आजारी असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या लीलावतीतील वाऱ्यांच्या बातम्याही अधेमध्ये प्रसृत होत होत्या. त्याला नक्की काय झाले असावे याविषयीच्या शंकाकुशंका मनात घोंघावत होत्या. तशातच काही दिवसांपूर्वी एक दिवस राजेश 'come back' करतो आहे अशी बातमी आली आणि त्या बातमीबरोबर एका जाहिरातीत तो प्रत्यक्ष दिसलाही. त्याचा खप्पड झालेला, दाढी वाढलेला, भग्न, विदीर्ण चेहरा बघवत नव्हता. त्याचे हातपाय लटपटत होते. चालताना त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज भासत होती. अशा अवस्थेत हा पुन्हा पदार्पण का करू पाहतोय असा प्रश्न मनात सारखा रुंजी घालत होता.  
पण या वास्तवातील राजेशने त्याची विस्कटलेली प्रतिमा जास्त काळ लोकांना बघू दिली नाही. लोक त्याच्या या स्थितीबद्दल हळहळत असतानाच त्याने एक्झिट घेतली. कायमची. आपली या जगाच्या रंगभूमीवरील भूमिका आता संपली असून 'pack up' ची वेळ झाली आहे हे त्याने जाणले. त्याच्या अनेक चाहत्यांनी साश्रूनयनांनी त्याचे अखेरचे दर्शन घेतले. 
आता काही दिवस तरी मनात दडलेला तो 'आनंदमय' राजेश उचंबळून येईल. त्याची ती अदा, त्या विशिष्ट लकबी, त्याचे डोळे मिचकावत हसणे आठवणींच्या रुपात वाहत राहील. 'शेवटी आपण सर्वजण त्याच्या हातातील कठपुतळ्या आहोत' या वास्तवाची जाणीव करून देणारा स्वप्नाळू राजेशचा हा डायलॉग आपल्याला विसरता येणे सर्वथैव अशक्य आहे  हे सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल.  

Thursday, 19 July 2012

आमचे विशेष बातमीपत्र ( Animal Planet च्या सौजन्याने)

आज संध्याकाळी नागवे वस्त्रोद्योग समूहाचे उदघाटन आघाडीच्या उद्योजिका श्रीमती मुंगीताई चावरे-आगओके यांच्या हस्ते करण्यात आले. वस्त्रांमागून वस्त्रांचे तागे उलगडताना एका वस्त्राच्या विळख्यात घुसमटून मुंगीताईंचे देहावसान झाले याबद्दल सर्वत्र खंत व्यक्त करण्यात येत आहे. 
काही डाकू मधमाशांनी अनपेक्षित हल्ला करून मधाचा बराच ऐवज लंपास केल्यामुळे समस्त कीटकवर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वत: मध तयार करायचे सोडून ऐदीपणे दुसऱ्याचा मध पळवल्याबद्दल  या डाकू मधमाशांवर कडक कारवाई केली जाण्याचा संभव आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी एक खास लढाऊ मधमाशांचे पथक तैनात करण्यात आले असल्याचे समजते. 
'जागतिक बिळसुंदरी' स्पर्धेसाठी एकवीस चिचुन्द्र्या उद्या अमेरिकेला रवाना होत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्षपद जगद्विख्यात बॉडीबिल्डर श्रीयुत बोकोबा चाटमिशे यांनी स्वीकारले असून त्यांच्या हस्ते विजेत्या चीचुन्द्रीला एक मोठ्ठा लोण्याचा गोळा बक्षीस देण्यात येणार आहे.  
विख्यात गायिका 'पंचमा' अर्थात कोकिळाताई यांना आज त्यांच्या अजोड कारकिर्दीबद्दल 'गोल्ड डिस्क' देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी त्यांचे जानी दोस्त 'कावळोबा कावरे' यांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली परंतु गाणे म्हणण्यासाठी त्यांनी आ करताच माईक बंद पडला याबद्दल कोकिळाताईंनी  देवाचे मनोमन आभार मानले.    
सुप्रसिद्ध 'शेष' आणि 'शेफ' श्रीयुत नागराज विषे यांना लंडनच्या पाककलास्पर्धेत  'गांडूळाच्या नूडल्स' हा विशेष लज्जतदार पदार्थ सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्या या पाककला नैपुण्याबद्दल त्यांना 'पाकसिद्ध' हा किताब तसेच पाच किलो 'गांडूळांची थैली' बहाल करण्यात आली. 


ढूशे गावातील पाच बैल एकदम गरोदर राहिल्याने निसर्गाच्या या विचित्र किमयेबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाचे हे उलटे चक्र माणसांपर्यंत  येऊन पोहोचेल की काय या भीतीने अनेक 'मर्द' 'गर्भगळीत' झाले आहेत. नाक्यानाक्यावर तंबू ठोकून पुरुषांच्या गर्भसंभव चाचण्या केल्या जात आहेत. या सर्व गरोदर बैलांची प्रसूती विनासायास व्हावी यासाठी गायी देवळांच्या पायऱ्या झिजवत आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका कोल्ह्याने आपल्या बायकोच्या चारित्र्याचा एका लांडग्यावरून संशय घेतल्यामुळे तिने स्वत:ला एका वाघोबाच्या तोंडी देऊन आपले आयुष्य संपविले. आपण केलेल्या कृत्याचा कोल्हयाला आता विलक्षण पश्चात्ताप होत असून दु:ख असह्य झाल्याने तो शेजारच्या गावातील दारूच्या गुत्त्यात शिरल्याची खात्रीलायक बातमी आहे.



आजचे विशेष बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी अशाच प्राणीविश्वातील खमंग बातम्या घेऊन. नमस्कार.  

Tuesday, 17 July 2012

प्रश्नांचा भाता आणि उत्तरांचे बाण........


सर्वात 'कठीण' गोष्ट कोणती?
शेवकांडीचे लाडू.
न मागता मिळणारी गोष्ट कोणती?
लाथ.
तुम्हाला अर्जुन व्हायला आवडेल का?
ते पोपट कोण आहे यावर अवलंबून राहील.
 तुमचे 'आदर्श' कोण?
माननीय चव्हाण साहेब.
सगळ्यात मोठी बालवाडी कोणती?
लोकसभा.
जंगलाएवढी गूढ व भयानक गोष्ट कोणती?
दाढी.
 स्वच्छ डॉक्टर, स्वच्छ हवा यात जास्त दुर्मिळ गोष्ट कोणती?
आरोग्य आणि हवामानखात्याचे स्वच्छ अहवाल पाहायला मिळाले की स्पष्ट होईल.
पाण्याइतकी वाहती गोष्ट कोणती?
सर्व 'बाबा' लोकांचे ऐश्वर्य.
मिठाईइतके गोड काय असते?
राजकारण्यांची आश्वासने.
सर्वात महाग गोष्ट कोणती?
हास्य.
सोयीस्कर आंधळ्यांना काय म्हणतात?
समाज.
सगळ्यात उत्तम कोठा कोणाचा असतो?
कितीही खाल्ले तरी अपचन न होणारयाचा अर्थात..............  
उंदीर आणि अभ्यास यांत काय साम्य आहे?
उंदीर वस्तू पोखरतात आणि अभ्यास मुलांचा मेंदू पोखरतो.
तिन्ही त्रिकाळ करायला आवडेल अशी गोष्ट कोणती?
झोप.
 अहंकाराचा फुगा कसा फोडावा?
नम्रतेच्या टाचणीने.  
राजकारणी आणि मल्ल यांच्यातील साधर्म्य कोणते?
प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दंड थोपटणे.
पावसाळ्यात कोणती गोष्ट करावी?
पर्जन्यखात्याचे अंदाज कधी खरे मानू नयेत.
राग म्हणजे काय?
जो श्रोत्यांची पर्वा न करता आळवला जातो तो.
शरीरयष्टी आणि स्वभाव यांच्यातील विरोधाभासाचे उदाहरण कोणते?
दारासिंग.
महत्वाचा दिवस कोणता?
सुट्टीचा प्रत्येक दिवस.
लोकसंख्यावाढीचे कारण काय?
प्रेम ,प्रेम आणि प्रेम.
दिवसेंदिवस दुर्लभ होत जाणारी गोष्ट कोणती?
एकमेकांचा सहवास. 
 कोणते शिखर सर करायला अत्यंत अवघड असते?
त्यागाचे.
कायदा हातात घेणाऱ्यांना काय म्हणतात?
उच्चभ्रू.
आजच्या स्त्रीला कोणती उपमा द्याल?
आधुनिकतेचा वर्ख पांघरून परंपरेच्या रंगात बुडालेली शोभिवंत मिठाई. 
रेखाने राज्यसभेत येऊन नक्की काय साधले?
जयाला विचारा.
एखादी अ-वास्तव वाटणारी गोष्ट कोणती?
आत्मचरित्र.
दोन सावत्र गोष्टी कोणत्या?
नीती आणि कीर्ती.
या पृथ्वीवरील 'देव'माणसे कोण?
यशवंत देव, रमेश देव, मंजिरी देव.
गाण्याच्या मैफिलीला जाताना काय करावे?
कापसाचे बोळे बरोबर घ्यावेत.
पापे करणाऱ्यास देव पाताळात धाडतो म्हणजे कुठे धाडतो?
सरकारी ऑफिसात.
 सर्वात मोठे कुरण कोणते?
आध्यात्मिक क्षेत्र.
सर्वात मोठे मायाजाल कोणते?
अभिनय क्षेत्र.
सर्वात मोठे उत्खनन कोणते?
राजकीय क्षेत्र.
आवाज कोणाचा?
सत्तेची भीक मागणारयांचा. 
नाच कोणाचा?
जनतेचे पाय आवळणारयांचा.
आखाडा कोणाचा?
नीतीच्या छाताडावर आरूढ होऊन मर्दानगीचा आव आणणारयांचा.
नामशेष झालेली गोष्ट कोणती?
संवेदना.
विस्मृतीत गेलेली गोष्ट कोणती?
देशाभिमान.
हरवलेली गोष्ट कोणती?
लाज.
हरपत चाललेली गोष्ट कोणती?
माणुसकी.



Sunday, 15 July 2012

शिक्षक आणि विद्यार्थी -एक कठीण प्रमेय


शिक्षणक्षेत्र हे एक पवित्र स्थान मानले जाते. विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्राचे काशी-गयेइतकंच महत्व आहे. शाळा-कॉलेज ही विद्यार्थ्यांतून उद्याचे उत्तम, सुजाण आणि सुशिक्षित नागरिक घडवायची ठिकाणे आहेत. कारण याच मुलांतून भविष्यातील संवेदनशील नेते, उद्योगपती, संशोधक, समाजसेवक, अभ्यासक, कलाकार या राष्ट्राला मिळून हे राष्ट्र अधिक संपन्न होण्याला हातभार लागणार आहे. 
परंतु आज शिक्षणक्षेत्र हे एक पवित्र स्थान राहिले नसून तो एक स्पर्धात्मक व्यवसाय झाला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. शिक्षकही विद्यादान करता करता मानवतेला लांच्छनास्पद अशी कृत्ये करू लागले आहेत. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा किंबहुना प्रत्येक कृतीचा विद्यार्थ्याच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो याचा काही शिक्षकांना सोयोस्कररित्या विसर पडत चालला आहे असे वाटते. 
तासाचा टोला पडला की त्या त्या विषयाचे शिक्षक वर्गावर येतात. मुलांना शिकवतात आणि तास संपताच निघून जातात. पण या तासातच अनेक रामायणे घडतात. एखाद्या विषयातील शंका विचारायला आलेल्या मुलाला 'गपचूप जागेवर जाऊन बस' अशी  सूचना केली जाते.  एकदा सोडवून दाखवलेले गणित पुन्हा सोडवून दाखवले जाणार नाही असे शिक्षक सांगतात. का बुवा? वर्गातील सगळीच मुले एकाच बुद्ध्यांकाची नसतात. काही मुलांना एकदा सांगितलेले गणित चटकन समजते तर काहींना तेच गणित जरा सोप्या पद्धतीने आणखी एक-दोन वेळा सांगितले तर समजू शकते. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला न समजलेला एखादा किचकट प्रश्न शिक्षकांना विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र शिक्षकांचा पुन्हा तेच गणित अथवा एखादा प्रश्न न समजावण्याचा आडमुठा बाणा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ घालू शकतो एवढेच नव्हे तर त्या शिक्षकाविषयी  एक प्रकारची अढी त्या विद्यार्थ्याच्या मनात कायम बसते. 
शाळेत शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सामाजिक आणि आर्थिक स्तर हा भिन्न असतो. सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक उच्च-शिक्षित नसतात. काही पालक फारसे शिकलेले नसतात. रोजंदारीवर काम करत असतात. अशा मुलांना घरी कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध नसते. पण म्हणून अशा एखाद्या मुलाला जर शिक्षकाने एकदा शिकवलेले समजले नाही तर  'तुला अभ्यास जमणारच नाही. तू आपली वडा-पावाची गाडी चालव' असा इतर सर्व वर्गासमोर हिणकस शेरा मारणं कितपत योग्य आहे?  प्रत्येक विद्यार्थ्याच्या आजूबाजूचे सामाजिक वातावरण हे वेगळे असते. काही मुलांच्या तोंडात अर्वाच्च्य शब्दही असतात. जशा शैक्षणिक कक्षा रुंदावतात तसे इतर सामाजिक भानही येते. पण हा अवसर शिक्षक मुलांना देत नाहीत. त्यांच्या पालकांचा उद्धार वर्गासमोर केला जातो. 'घाणेरड्या बीजाचे' हे उच्चारण्यास अतिशय लज्जास्पद व घृणास्पद असे शब्द वर्गात शिक्षकांकडून वापरले जातात. अशा शिक्षकांच्या आक्षेपार्ह वागणुकीतून उद्याची पिढी कशीकाय चांगली घडू शकेल? अशा शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना आदर कसा उत्पन्न होईल? याचा सगळ्यांनीच विचार करण्याची आज गरज आहे. कारण ज्या शिक्षकांच्या हाती आपण अतीव विश्वासाने आपली मुले सुपूर्द करतो तो शिक्षक किंवा ती शिक्षिका आपल्या मुलावर उत्तम संस्कार करेल कशावरून?    
काही शिक्षक हिंसक प्रवृत्तीचे असतात. मुलांना मारल्याशिवाय यांना चैन पडत नाही. गणित आलं नाही मुलाला मार, एखादा प्रश्न आलं नाही मुलाला मार असे सदोदित मारझोडीचे तंत्र हे शिक्षक वापरत असतात. विद्यार्थ्यांना घाबरवणे, सतत परीक्षेत नापास करण्याच्या धमक्या देणे, वर्गासमोर त्याला वा तिला घालूनपाडून बोलणे, पालकांना बोलावून घेईन आणि तुझी तक्रार करीन या व अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचे खच्चीकरण करणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे काय? स्वत:ला ग्रासणाऱ्या ताण-तणावाचा निचरा करण्याचे साधन म्हणजे ही आयती हातात आलेली मुले आहेत असा शिक्षक समज करून घेतात की काय?    
वर्गात अनेक शिक्षकांचे राजकारण चालते. काही मुले शिक्षकांची आवडती म्हणून त्यांना सतत फेव्हर करत राहायचं आणि नावडत्या मुलांना सतत बोलण्या-मारण्यासाठी टार्गेट करत राहायचं हा शिक्षकी बाणा आचरला जातो. दोन मुलांनी लिहिलेला निबंध जरी सारखा असला तरी आवडत्या विद्यार्थ्याला दोन-चार गुण अधिक द्यायचे. 'हा हुशार' 'तो ढ' हो लेबले वर्गातील मुलांना सातत्याने लावीत जायची आणि मुलांमध्येच एकमेकांविषयी द्वेष, असूयेची बीजे पेरीत जायची हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते का?  
अनेकवेळा वाहिन्यांवर आपण बघतो की अमुक एका शिक्षकाने मुलाला मरेपर्यंत मारले. त्याच्यावर किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एखादा शिक्षक किंवा शिक्षिका याहीपेक्षा अत्यंत अघोरीपणे मुलांना शिक्षा करून त्यांचे आयुष्याच शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. असे अत्यंत हिडीस वर्तन करून शिक्षणासारख्या सर्वार्थाने पवित्र असलेल्या कार्याला काळिमा फासण्याचा जाणीवपूर्वक यत्न करणाऱ्यांना समाजानेच बहिष्कृत करण्याची गरज आहे. अत्यंत कडक शिक्षेची अंमलबजावणी अशा शिक्षकांच्या बाबतीत झाली पाहिजे. असे निंदनीय कृत्य करणाऱ्यांचे जाहीररीत्या वाभाडे निघायला हवेत. एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य उध्वस्त करण्याची किंमत काय असते हे जोवर समज त्याच्या निदर्शनास आणून देणार नाही तोवर अशा अपप्रवृत्तींना आळा बसणे शक्य होणार नाही. 
शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची सर्वकष प्रगती साधायची असते अधोगती नाही हा विचार सर्वप्रथम शिक्षकांच्या अंगवळणी पडणे अत्यावश्यक आहे. उद्याची पिढी विचारांनी सुदृढ, निकोप, संमृद्ध आणि कृतीने सक्षम बनवायची असेल तर त्यासाठी चांगले शिक्षक लाभणे अपरिहार्य आहे. 

Wednesday, 11 July 2012

आध्यात्मिक 'बुवा-बाबा'..........


हल्ली जवळजवळ अनेक वाहिन्यांवर आध्यात्मिक बुवांचा सुकाळ झाला आहे. दिवस कसा घालवावा, दैनंदिन व्यवहार कसे करावेत, आचरण कसे ठेवावे अशा कैक गोष्टींसंबंधी हे बुवा उपदेश करत असतात. यांचा आलिशान थाट असतो. उत्तम बडदास्त असते. अनेक सेवक यांच्या दिमतीला असतात. हे महागड्या गाड्यांतून फिरतात. मोठमोठे हॉल, लाउडस्पीकर आणि भोवती जमलेले भक्तगण हे यांचे भांडवल असते. थोडक्यात यांचे अध्यात्म भलतेच गुबगुबीत, मखमली आणि ऐश्वर्यसंपन्न असते. 
हे लोकांचे जगणे सुसह्य आणि सोपे करणार असतात. लोकांच्या मनात दडलेल्या असंख्य प्रश्नांना पूर्णविराम देण्याचे काम हे करणार असतात. लोकांना मानसिक आधार देणार असतात.  यांच्याकडे येणाऱ्या जनसमुदायाकडे जर कटाक्ष टाकला तर असे लक्षात येते की यांच्या प्रवचनांना हजेरी लावणारी भक्तमंडळी ही चांगल्या सामाजिक वर्गातील असतात. चांगल्या आर्थिक स्तरातील असतात. शिक्षित असतात. नोकरदार आणि व्यावसायिक असतात
सुस्थितीत असलेल्या लोकांनाही समस्या भेडसावतच असतात. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना या आध्यात्मिक बुवांकडे येणे क्रमप्राप्त असते. कुणाला जागेची, कुणाला पैशांची, कुणाला मुलाबाळांची, कुणाला आजाराची चिंता पोखरत असते. त्यांच्या काळज्या, त्यांच्या चिंता, त्यांचे व्यापताप या बुवांना सांगायला ही माणसे कोण आतुर झालेली असतात. आपल्याला हमखास उत्तर मिळेल व आपली चिंता समूळ नष्ट होईल अशी यांना शंभर टक्के खात्री असते. 
आर्थिक सुस्थिती नसलेल्या माणसांसाठीही वेगळे बुवा-बाबा असतात. जितके दैन्य जास्त तितक्या अडचणी जास्त असतात. तितका स्वत:वरचा विश्वास डळमळीत होण्याचा संभाव जास्त असतो. आत्मविश्वास लयाला गेलेले, खंतावलेले, जिणे नकोसे झालेले मग अशा बुवा-बाबांच्या नादी लागतात. ते सांगतील ते यांच्यासाठी ब्रम्हवाक्य होऊन बसते. बाबांद्वारे दिले जाणारे उदी, अंगारे-धुपारे, गंडे-दोरे-ताईत, अंगठ्या यांच्यात ते मानसिक आधार शोधू लागतात. आपली वंचना होते आहे, आपण फसवले जात आहोत हे यांच्या गावीही नसते. 
आपण सगळेच 'भगवान' असल्याची खात्री हे बाबा सर्व भक्तगणांना सतत देत असतात. जर प्रत्येक जणच भगवान आहे तर प्रत्येकाला त्याच्यातील सामर्थ्याची प्रचीती का येत नाही ? स्वत:च्या आत्मिक प्रगतीसाठी का कोणावर अवलंबून राहावं लागतं? परमेश्वरी चैतन्याचा अंश जर प्रत्येकात आहे तर मग त्यांची अनुभूती घेण्यासाठी कोणा बुवा-बाबांकडे जाण्याची गरजच काय? हे प्रश्न कुणालाच कसे पडत नाहीत याचे सखेद आश्चर्य वाटते.     
एक बाई पृच्छा करते, 'मी खूप अडचणीत आहे, मला अमुक अमुक चिंता खूप भेडसावते आहे. बाबा अशा परिस्थितीत मी काय करू?' बाबा उपदेश करतात, ' तू तुझ्याहून जास्त अडचणीत असलेल्या लोकांकडे बघ. त्यांची दु:खे जाणून घे. तू आपोआप सुखी होशील.' बाबा इतक्या चलाखीने तिच्या वैयक्तिक प्रश्नाला बगल देऊन किंवा त्या प्रश्नावर कोणताही उपाय न सांगता तिला सुखी होण्याचा हा मूलमंत्र देतात. मुळातच सुख काय किंवा दु:ख काय या सापेक्ष संज्ञा आहेत. जसा कुणीतरी आपल्यापेक्षा अधिक सुखी असतो तसा कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त दु:खीही असणारच! प्रत्येकाच्या सुख-दु:खाच्या कल्पनाही ज्याच्यात्याच्या असतात. आपण दु:खी का आहोत हे आपल्याव्यतिरिक्त इतर कोणालाही कळणे अवघड असते. पण बाबांनी दिलेल्या त्या 'हुशार' उत्तराने आपण भलतेच खुश होतो आणि बाबांवरील आपली श्रद्धा अधिक दृढ होते.     
हातवारे करणे, डोळे मिचकावणे, सारखे खांदे उडवणे, भक्तांनी हसत राहावे म्हणून प्रत्येक गोष्टच हसण्यावारी नेणे, भक्तांकडून देणग्या उकळणे, धनिक आणि निरुपद्रवी भक्त पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत रहावा म्हणून नाना क्लुप्त्या योजणे आदी गोष्टी हे बुवा-बाबा नित्यनेमाने करत असतात. उंची रत्नजडीत सिंहासनावर बसून हे बाबा  स्वत:ला खरोखरीच परमेश्वर समजायला लागलेले असतात. हे बाबा म्हणजे निरनिराळे आध्यात्मिक 'brands' असतात. त्यांच्या नावाची पत्रके, पुस्तिका, मासिके, सी.डी. निघतात. उच्चभ्रू घराण्यातील, नामांकित क्षेत्रातील मंडळी ही यांची टार्गेट्स असतात. आम्ही लोकांची सेवा करतो असे म्हणत म्हणत हे बाबा लोकांनाच त्यांची सेवा करायला लावतात. 'जितकी सेवा तितके पुण्य' असा बाबांचा संदेश असतो. आपल्याला भरमसाट पुण्य मिळावे म्हणून हे धनिक त्यांच्या थैल्या जरा जास्तच सैल करतात आणि मग अशा अध्यात्म्याला आर्थिक सूज येते.        
या सर्व बुवांनी किंवा बाबांनी जमवलेली माया करोडोंच्या घरात असते. लोकोद्धाराचा, जनोद्धाराचा,समाजकल्याणाचा वसा ज्यांनी घेतलेला  असतो किंवा सामान्यांचे जे आध्यात्मिक हितकर्ते असे स्वत:ला म्हणवतात त्यांना हा अवाजवी माया जोपासण्याचा छंद हवाच कशाला? लोकांना अध्याम्याची संथा देणारा अंतर्बाह्य निर्मळ हवा, निरिच्छ हवा, नि:संग हवा. लोकांना ब्रम्हज्ञान देणारा आणि मायेचा उपासक ? उंची गाड्या, बेहिशेबी दौलत, जमिनी, श्रीमंती पण हिडीस शौक ही काही सच्च्या आध्यात्मिक गुरूंची लक्षणे नव्हेत. 
आपण कोणाला आपल्या गुरुपदी बसू द्यायचं हा विचार सुज्ञांनी करावयाचा ! अध्यात्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. ज्या गुरूचा शोध घेत आपण व्यर्थ अनेक बुवा-बाबांच्या मठांचे उंबरठे झिजवत असतो तो आध्यात्मिक गुरु आपल्या आत, आपल्या अंत:करणात सदा विराजमान आहे. असा हा परमेश्वरी चैतन्याचा स्त्रोत प्रत्येकाच्या आत स्त्रवत असताना अशा भौतिक भोगांना चटावलेल्या आध्यात्मिक बुवांचे दर्शन घेण्याची आवश्यकताच काय असा विचार करण्याइतपत आत्मभान येण्याची आज नितांत आवश्यकता आहे. 


Friday, 6 July 2012

शोध ईश्वराचा ...........

ईश्वराची संकल्पना मानवनिर्मित असली तरी चैतन्याचा मूलस्त्रोत हा ईशस्वरूपच  आहे. त्या विश्वचैतन्याची किंवा निराकारतेची केवळ कल्पनाच करणे मानवाच्या बौद्धिक मर्यादेत आहे.  हे ईशस्वरूप म्हणजे मानवी दृष्टीक्षेपात मावणारा एखादा प्रकाशाचा ठिपका नव्हे किंवा हात उंचावून गवसलेली एखादी दुर्मिळ वस्तू नव्हे. अंत:चक्षुंना जाणवणारी ही एक उच्च प्रतीची जाणीव आहे.  हे ईश्वराचे सर्वव्याप्त रूप भौतिक ज्ञानाच्या कक्षेत सामावणारे नाही. परंतु अशा अवघ्या चराचरात वसणाऱ्या ईश्वराचे स्वरूप जाणून घेणे म्हणजे निजस्वरुपाची प्रचीती येणे होय.
ज्ञानाच्या सर्व सीमा उल्लंघून काळावर आरूढ होणारे असे हे ईशतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्वे या ईशस्वरुपात अंतर्भूत आहेत. या पाच तत्वांपासून बनलेले आपले शरीर आणि ह्या शरीरात अव्याहत स्रवणारे चैतन्य आपल्या या पृथ्वीवरील अस्तित्वाचे कारण आहे. या तेजपुंज विश्वशाक्तीचा एक अंश या समस्त पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्रात आहे.  या चैतन्यामुळे जागृती, चेतना, हालचाल, चलनवलन आहे. हा मनुष्य जन्म म्हणजे या अंशरुपी चैतन्याला मिळालेला मानवी आकार आहे. 
चौऱ्याऐशी सहस्र योनी फिरून या चैतन्याने मानवी देह धारण केला आहे. अनेक चांगल्या-वाईट कर्मांचे फलित म्हणून विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट आई-वडिलांच्या पोटी या मानवी चैतन्याचा उगम झाला आहे. पृथ्वीवरील या जन्माआधीच या मानवरूपी चैतन्याचे प्रयोजन निश्चित आहे. पंचेन्द्रीयांबरोबर मन, भावना, बुद्धी,  प्रेरणा या मानवाला आत्मिक संवर्धनासाठी मिळालेल्या अनमोल देणग्या आहेत. आपल्या हृदयस्थ असलेल्या त्या वैश्विक चैतन्याला जाणून घेणे, जन्म-मृत्यू ह्या शाश्वत रहस्यांचे ज्ञान होणे आणि ह्या सृष्टीच्या प्रगतीसाठी आपण साहाय्यभूत होणे  हे वास्तविक पाहता मानवी अस्तित्वाचे खरे प्रयोजन असते पण वाढत्या वयाबरोबर फक्त जड बुद्धीची कास धरून माणूस या ईशतत्वापासून कैक योजने लांब जातो, स्व-स्वरूपापासून भरकटत जातो, आपल्या जगण्याचे प्रयोजन हरवून बसतो. 
आपले सरासरी सत्तर-ऐशी वर्षाचे सीमित आयुष्य त्या प्रचंड कालपटावरील एखाद्या क्षणासारखे असते. मुळात या पृथ्वीवरील आपले अस्तित्व एखाद्या कणाइतके असते. शाळेत विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवल्या जातात. पण या प्रार्थनेतील विचार मुलांच्या कोवळ्या मनात बिंबवले जात नाहीत. भगवतगीतेचे पठण करवून घेतले जाते पण गीतेचे सार समजावून सांगितले जात नाही. अनेक श्लोकांचे, प्रार्थनांचे अर्थ मुलांना आणि मोठ्यांनाही माहित नसतात. मानवी ज्ञानाच्या कक्षाही पुस्तकांत बंदिस्त होतात. अंत:चक्षुंना आकलन होणारे ज्ञान भौतिक सुखाच्या हव्यासापायी भ्रष्ट होते अथवा नष्ट होते.   
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हा गीतेतील संदेश आचरणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेही नसतात. कर्म करण्यासाठी जन्म असतो. माणसाच्या हातून सत्कर्म वा दुष्कर्म घडताच त्या योगे मिळणाऱ्या फलाची निश्चिती झालेली असते परंतु हे फळ  केव्हा माणसाच्या पदरात टाकायचे या विषयीचा अंतिम निर्णय त्या वैश्विक शक्तीचाच असतो. फलाची लालसा मनात धरून केलेले कोणतेही कर्म हे त्या सर्वव्याप्त  ईश्वराप्रत पोहोचत नाही.    
कोणत्याही धर्माचे, कर्मकांडाचे, रुढींचे अवडंबर माजवल्याने ईश्वरप्राप्ती होत नसते. ईश्वरप्राप्ती होण्यासाठी प्रथम वासना, लोभ, मोह, अहंकार आदी क्षुद्र रिपुंवर विजय मिळवावा लागतो. देवळांच्या वाऱ्या करून ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होत नसतो. भीतीपोटी, लोभापोटी देवळातील देवासमोर हात जोडणारे चिक्कार असतात पण कसलीही मनीषा न बाळगता निस्सीम प्रेमापोटी देवावर भक्तीचा अभिषेक करणारे अभावानेच आढळतात. पण असे ब्रम्हानंदात तल्लीन झालेले, समाजमनाची क्षिती नसलेले भक्त लौकिकार्थाने वेडे ठरतात.  
ज्यांना या हृदयातील ईशस्वरुपाची प्रचीती आली त्या थोर संतांनी, महात्म्यांनी समाजकल्याणासाठी त्यांचे आयुष्य वेचले. स्वत:च्या चरितार्थाची, तहान-भुकेची पर्वा न करता ते त्या ईशस्वरुपात रममाण झाले. सर्वांभूती एकाच तत्व नांदते आहे याची अनुभूती त्यांना झाली आणि म्हणूनच रेड्याच्या मुखातून वेद वदवले जाऊ शकले. या संतांचे, महात्म्यांचे धडे पाठ्यपुस्तकातून लावलेले असतात. या धड्यांचे पाठांतर करवून घेऊन , परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलांच्या बुद्धीचे मूल्यमापन होत असते. संतांनी घेतेलेले अनुभव समजून घेणे, त्यांच्या चरित्राद्वारे त्या विभूतींचे आकलन होणे आणि त्यांनी जो ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाचे आचरण करणे या गोष्टींशी मुलांचे, शिक्षकांचे अथवा पालकांचे काहीही देणे घेणे नसते. संतांवरचे चित्रपट पाहायचे आणि त्यांनी समाजाला, मानवजातीला त्यांच्याच उद्धारासाठी केलेला उपदेश विसरून जायचा हे वर्षानुवर्षे असेच चालू आहे. 
'कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी' ह्या गीतातील ओळींचा अर्थ आमच्या आधुनिकतेची कास धरलेल्या मनाला कधी समजणार? 





Wednesday, 4 July 2012

गैरसोयींचा पाउस

उकाडा भयंकर जाचत असतो. अंगाची लाही लाही होत असते. घामाच्या धारा असह्य झालेल्या असतात. कधी एकदाचा पाऊस येईल असे सारखे वाटत असते. आबालवृद्धांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात. पाऊस येईल आणि जिथे तिथे हिरवेगार होईल आणि पावसाच्या सरींत उन्हाळा विरून जाईल अशी रम्य स्वप्ने पाहण्यात आपण गुंतलेले असतो. केरळात पाऊस त्याच्या आगमनाची वर्दी देतो आणि आठवड्याभरात पाऊस मुम्बई आणि आसपासच्या शहरांची दारे ठोठावेल अशी मनाला निश्चिंती होते. पर्जन्यखात्याचे अंदाज नेहमीप्रमाणे चुकवीत स्वत:च्या मर्जीनुसार पाऊस येतो आणि उन्हाने कासावीस झालेला जीव सुखावतो.
पाऊस प्रत्यक्ष सुरु होण्याआधी महानगरपालिकेच्या यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत असे आपण ऐकतो. गटारे, नाले सफाई झाली असल्याचे आपल्या कानांवर आलेले असते. आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत असेही ऐकिवात येते. वास्तवात रस्त्यावरून रोज चालताना दिसणारे खड्डे, उघडी गटारे आपल्याला सतावत असतात, चिंतीत करत असतात. गटारांतून उपसलेला गाळ तिथेच पडून असतो. आजूबाजूची तिवरे नवनवीन बिल्डीन्गांच्या गराड्यात अदृश्य झालेली असतात. ठिकठिकाणी साचलेला कचरा वाहनांतून येत जाता आपल्याला नाक पकडायला भाग पडत असतो. पालिकेच्या दृष्टीकोनातून  त्यांची साफसफाई झालेली असते. आपल्याला सभोवताली दिसणारी घाण, कचरा, खड्डे आणि उघडी गटारे हा आपला दृष्टीदोष असतो. 
पाऊस येतो आणि काही तासांतच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसू लागते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल्स ठप्प होतात. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. वाहनांमध्ये अडकलेली जनता सरकारच्या नावाने बोटे मोडते. ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होते. मोटारी वाहून जातात. मुले-माणसे वाहून जातात. उघडी गटारे, खड्डे न दिसल्याने अपघात होत राहतात. भिजलेल्या कचऱ्यातून, पावसामुळे झालेल्या चिखलातून माणसे वाट काढत इच्छित स्थळी पोहोचायचा आटापिटा करत राहतात. ऑफिसला पोहोचायला उशीर, घरी यायला उशीर असा अनेक कटकटींचा मामला हा पाऊस घेऊन येतो. प्रसारमाध्यमे याच बातम्या अधिकाधिक रंगवून सांगत लोकांच्या नजरा त्या पावसातल्या दृश्यांवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. वाहनांचे आणि माणसांचे वेळापत्रक साफ बिघडून जाते. भरती आणि पाऊस यांच्या संयोगाने नदीचे पाणी शहरांत घुसते आणि पूरसदृश स्थिती निर्माण होते. ऑफिसला गेलेला माणूस घरी कसा येईल या आपत्तीचे चिंतन घरचा माणूस करत राहतो. सखल भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसते आणि माणसे आणि घरातील समान सुरक्षित स्थळी हलवावे लागते. 
 दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. पावसाबरोबर अनारोग्याच्या साथीही येतात. प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असूनही वाहतुकीचा बोजवारा, पादचाऱ्यांचा खोळंबा, खड्डे व गटारे न बुजवल्यामुळे होणारे अपघात, ठिकठिकाणी तुंबलेले पाणी, ओल्या कचऱ्याची दुर्गंधी या समस्या उद्भवतातच !  प्रशासनातर्फे या पावसाआधीच्या साफसफाईत करोडोंनी पैसा खर्च झालेला असतो. पण या सफाईची पाऊस येताक्षणी पुरती सफाई होते. हा अमाप पैसा गटार आणि नालेसफाईत निष्फळ खर्च झालेला असतो. गाळाचा उपसा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने तोच गाळ पाऊस येताक्षणी परत त्याच नाल्यात मिसळून गेलेला असतो. डास, उंदीर, घुशी, झुरळे, माश्या, गोम हे पावसाळ्यातील खास पाहुणे  त्यांचे बस्तान नगरपालिकेला न जुमानता बसवतात. परिणामी मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस , सर्दी-खोकला-ताप अशा अनेक देणग्या जनतेला मिळतात. अस्वच्छ पाण्यामुळे कावीळ, डायरिया डोके वर काढतात.    
महानगरपालिकेचा पैसा अक्षरश: पावसाच्या पाण्यात वाहून जातो. समस्या तशाच वाढत राहतात. हवाहवासा वाटणारा पाऊस नकोनकोसा वाटू लागतो. आजूबाजूला हिरवेगार दिसण्यासाठी वृक्षवल्लींची आवश्यकता असते हेच माणसे विसरून गेलेली असतात. सिमेंटच्या भिंतीवर साचलेल्या शेवाळ्याशिवाय हिरवेगार काहीच दिसत नाही. दुतर्फा ओलीचिंब झालेली भरगच्च झाडे आता फक्त काही खेड्यांतच किंवा काही चित्रपटांतच बघण्यापुरती राहिलेली असतात. तिवरे नष्ट झाल्याने पाणी शोषून न घेतले जाता जमिनीवरच साचून राहते. जमीनही मातीची नव्हे तर सिमेंटची असते. 
आपल्या लहानपणी आपण कधीतरी ती पावसातली मजा अनुभवलेली असते. पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडलेल्या असतात. पावसाची कारंजी अंगावर घेतलेली असतात. बेडकाचे डराव डराव असे ओरडणे ऐकलेले असते. भाजलेला मका आणि कीटलीतील वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतलेला असतो. मित्रांबरोबर गप्पांचे फड रंगलेले असतात. मोराचे आणि पावसाचे नाते घट्ट करणारी गाणी मनसोक्त ऐकलेली असतात. पण हे सगळे आता इतिहासजमा झालेले असते. आताचा पाऊस त्याच्याबरोबर समस्यांचा पूर आणतो. आपत्तींचा सुकाळ आणतो. अवेळी आणि अनियमित पावसाने पेरण्या लांबतात, पिके वाहून जातात, खराब होतात. शेतकऱ्याच्या माथ्यावरचा कंगालपणाचा शिक्का ठळक होतो.  आपणच झाडे तोडल्याने, नद्या-खाड्या बुजवल्याने, तिवरे नष्ट केल्याने, प्राणिमात्रांची कत्तल केल्याने निसर्गाचा समतोल ढळू  लागलेला असतो.    
टोलेजंग इमारती बांधून, अत्याधुनिक राहणीमानाची साधने उपलब्ध करून आपण प्रगतीपथावर आहोत हे दाखवण्याचा आपण खटाटोप करतो व त्या पायी निसर्गावर कुरहाड चालवतो. नैसर्गिक आपत्तीपुढे माणसाचे काही चालत नाही हे माहित असूनही हा जो निसर्गाला वेठीस धरण्याचा घाट माणसाने घातला आहे तो माणसाला आणि त्याने उभारलेल्या साम्राज्याला भविष्यात महाग पडल्यावाचून राहणार नाही. माणसाने चालवलेली निसर्गाची निर्घृण कत्तल दोषास्पद, आक्षेपार्ह आहे. रासायनिक कारखाने, यंत्रे, वाहने यांच्यामुळे उत्पन्न होणारे प्रदूषण अत्यंत घातक आहे. 
 शेवटी पाऊस हवाच आहे, तो अपरिहार्य आहे . पण माणसाने निर्माण केलेला गैरसोयींचा हा जो पाऊस आहे त्याचे उच्चाटन होणे अतिआवश्यक आहे. 

आर्ट्स अर्थात कला शाखा -- एक सर्वसाधारण समज


शालान्त परीक्षेचा निकाल लागतो आणि मुले आपापल्या शैक्षणिक शाखा निवडतात. जास्त टक्के मिळालेल्या गुणवंताला आर्ट्स या शाखेला जाणे हे कमीपणाचे वाटते. मुळातच या शाखा वैयक्तिक आवडीपेक्षाही गुणांची टक्केवारी, मित्र-मैत्रिणींचा कल, आई-वडिलांच्या अपेक्षा आणि सामाजिक इभ्रत लक्षात घेऊन निवडल्या जातात. 
अरे नव्वद टक्के मिळाले ना तुला मग आर्ट्सला का जातो आहेस अशी विचारणा सुशिक्षित म्हणवणारयांकडून केली जाते. वास्तविक पाहता कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणे ही काही लज्जास्पद किंवा कमीपणाची गोष्ट नसते. ज्याला किंवा जिला कमी टक्के तीच मुलं फक्त आर्ट्स किंवा होम सायन्स घेणार असा काही राष्ट्रीय अथवा जागतिक नियम नाही. परंतु अनेक गोष्टींविषयीचे अज्ञान, अनभिज्ञता समाजात असते त्यामुळे मार्कांच्या टक्केवारीचा आणि शैक्षणिक शाखेचा संबंध अकारण जोडला जातो.   
जेमतेम सत्तर टक्के मिळवणारा मुलगा सायन्स घेण्याच्या लायकीचा नसतो, तो फक्त आर्ट्स हीच शाखा निवडू शकतो हे कोणी ठरवायचं ? मुळातच शालान्त परीक्षेची टक्केवारी ही सरसकट सगळ्या विषयांची असते. गणित आणि शास्त्र या विषयांत उत्तम मार्क असूनही जर इतर विषयांत कमी मार्क मिळाले असतील तर त्याचा परिणाम एकूण टक्केवारीवर होतो. त्याचप्रमाणे भाषा किंवा सोशल स्टडीज मध्ये उत्तम मार्क पण गणित-शास्त्र या विषयांत कमी मार्क अशी परिस्थितीही असू शकते. शेवटी परीक्षा म्हणजे त्या त्या वेळी दिलेला एक परफॉरमन्स असतो. बऱ्याचदा एखाद्या विषयाची चांगली तयारी करूनही त्या विषयाचा पेपर मनासारखा जात नाही. उलटपक्षी एखादा विषय अगदी साधारणच तयार असला तरी त्या विषयाचा पेपर मात्र सोप्पा जातो. पश्नांचे काठिण्य किंवा सुलभता यावर लिहिलेल्या उत्तराचे भविष्य निश्चित होत असते. 
मुळात आर्ट्स असो सायन्स असो वा कॉमर्स, मुलांनी अभ्यास करणे महत्वाचे असते. त्या त्या विषयावर मेहनत घेणे गरजेचे असते. विषय कोणताही असो तो समजून घेणे अत्यावश्यक असते. गणित-शास्त्राचा गंध नसलेली मुले ढ मग इतिसास-भूगोलाचा अथवा भाषेचा गंध नसलेली मुले कशी हुशार ठरतात? कोणत्या बेसिसवर असं ठरवलं जातं की सायन्स घेणारा तेवढा हाय प्रोफाईल , कॉमर्स घेणारा ओके ओके पण आर्ट्स घेणारे केवळ डाऊनमार्केट ? शिक्षणासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात ही लाजिरवाणी वर्गवारी का?  
शालान्त परीक्षेत नेत्रदीपक मार्क मिळवलेले सगळेच काही भविष्यात हिऱ्यासारखे चमकताना आढळत नाहीत आणि भविष्यात हिऱ्यासारखे चमकणारे सगळेच काही सायन्स या शाखेचे असत नाहीत. सायन्स घेतलेत तरच भविष्य उज्ज्वल होईल असा 'सुविचार' फक्त मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनात असतो. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तो किंवा ती अमुक एका शाखेचीच असण्याची गरज नसते. 
आपल्या देशात आर्ट्स या शाखेला मर्यादित ओपनिन्ग्ज आहेत हा ती शाखा निवडणारयाचा दोष असू शकत नाही. आपल्याकडे ह्युमन सायकोलॉजी एवढाच विषय मानसशास्त्र या विषयांतर्गत शिकवला जातो परंतु अनिमल सायकोलॉजी या विषयातील शिक्षण परदेशात उपलब्ध आहे. सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. विषय कुठलाही निवडा पण त्या विषयातील आपली गती, आपला अभ्यासू दृष्टीकोन महत्वाचा असतो. 
शाळेपासून हे जे वर्गवारीचे बीज मुलांच्या कोवळ्या, निष्पाप मनात रोवलं जातं ते व्यक्तीच्या तसंच समाजाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असतं. 'अ' वर्गातील मुले ज्याप्रमाणे इतर तुकड्यांतील मुलांकडे तुच्छतेने पाहतात त्याचप्रमाणे सायन्स घेतलेली मुले आर्ट्स शाखेतील मुलांकडे पाहतात. हे अपरिपक्व विचारांचं फलित आहे. डॉक्टर झालेली मुले जेव्हा डॉक्टरकी स्वेच्छेने सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करून तिथे यशस्वी होतात तेव्हा या यशाला कोणता निकष लावायचा?  पालकही या शैक्षणिक वर्गवारीस स्वत:च्या वर्तनाने जाणते-अजाणतेपणी हातभार लावत असतात.  शिक्षणाची शाखा कोणतीही असो तिचा यथायोग्य आदर केलाच पाहिजे. आपली वाट तेवढी उत्कर्षाची आणि इतरांची अपकर्षाची ही खोटी प्रौढी, अहंमन्यता नेस्तनाबूत व्हायला हवी. 
मुलांच्या पंखांत जर प्रामाणिकपणाचे, मेहनतीचे, अभ्यासू वृत्तीचे बळ असेल तर त्यांची शैक्षणिक शाखा कोणतीही असो, त्यांची  भरारी ही उत्तुंगच असेल !  

Tuesday, 3 July 2012

माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार .......( गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने)

ज्या महर्षी व्यासांनी महाभारताची अलौकिक रचना करून माणसाला त्याच्या मनातील महाभारताकडे डोळसपणे पाहायला शिकवलं त्या व्यासमुनींना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 

ज्या मातेच्या गर्भाशयाच्या आधारे मी माझे या  पृथ्वीवरील अस्तित्व निश्चित करू शकले त्या माझ्या जन्मदात्रीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
संगीतातील सात स्वरांची बाराखडी मी ज्यांचे बोट धरून गिरवण्यास प्रवृत्त झाले त्या माझ्या जन्मदात्याला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
ज्यांनी माझ्या अक्षरांना सुबक वळण लागावे म्हणून अतोनात परिश्रम घेतले त्या माझ्या दादा आजोबांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
अभ्यासाचे आणि माझे नाते प्रयत्नपूर्वक अधिकाधिक घट्ट करणाऱ्या माझ्या नाना मामाला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
आकाशवाणी (रेडिओ ) या प्रसारमाध्यमाद्वारे माझ्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देणाऱ्या माझ्या शरयू आत्यास माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
माझ्यातील कविमनाला  सक्षम करत माझ्या काव्यरचना जास्तीत जास्त सकस आणि संमृद्ध होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या बालमोहन शिक्षिका चौबळ बाई आणि रुपारेल कॉलेजमधील प्राध्यापक आदरणीय जोग सर यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
ज्यांच्या पुस्तकातील रेखाटनाने प्रभावित होऊन चित्रकला हा जिचा विषय नाही अशा मला बऱ्यापैकी व्यक्तिचित्रे रेखाटता आली त्या आदरणीय सुबोध नार्वेकरांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
ज्या परिस्थितीने मला डळमळणाऱ्या पायवाटेवर खंबीरपणे पाय रोवण्यास शिकविले त्या परिस्थितीला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
ज्या कलांनी आयुष्याच्या प्रत्येक कडू-गोड वळणावर मला निष्ठेने जी संगतसोबत केली त्या सर्व कलांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार! 
ज्या पुस्तकांनी माझ्या सख्याची भूमिका बजावत मला जीवनाचा विविधांगी आस्वाद घ्यायला शिकवलं आणि माझं एकाकीपण सुलभ, सोपं, आनंदमय आणि प्रकाशमय केलं त्या सगळ्या पुस्तकरूपी गुरूंना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!    
दु:ख, अगतिकता, नैराश्य, असुरक्षितता यांचे कवच प्रयत्नपूर्वक भेदायला शिकवून ज्यांनी मला आनंदाच्या पायवाटेवर चालायला प्रवृत्त केलं त्या माझ्या दोन मुलींप्रतही माझी कृतज्ञता!
अहंकार, अंधश्रद्धा, अप्पलपोटेपणा, प्रतिगामित्व यांच्या आहारी मला न जाऊ देणाऱ्या माझ्या सद्सदविवेकबुद्धीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!    
माझ्या हक्काच्या चार भिंतींना घरपण बहाल करणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!    
ज्या पांडूने त्याच्या निरागस डोळ्यांतून आणि लोभस वृत्तीतून त्याच्याविषयी तसेच इतर प्राणीमात्राविषयी माझ्या मनात प्रेम आणि जिव्हाळा उत्पन्न केला त्या पांडूला ( माझा अत्यंत लाडका कुत्रा)  माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या कलाकारांनी मला त्यांच्या कलेतून सतत आनंद दिला आणि जीवन पूर्णांशाने जगण्याची उमेद दिली त्या सर्व कलाकारांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या मुरब्बी राजकारण्यांनी माणसाने कसे असावे यापेक्षा कसे असू नये याचा सातत्याने वस्तुपाठ दिला त्या समस्त राजकारण्यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या वाद्याने माझ्यातील संगीतकार जागवला तसेच माझ्या जगण्याला एक सुनिश्चित अशी दिशा दिली त्या संवादिनीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
माझ्या शरीरातील अवयवांनी मला आतापर्यंत निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगण्यात जी मोलाची साथ दिली त्यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या निसर्गाने मला इतरांना दोन्ही हातांनी भरभरून देण्याची जी संथा दिली त्या प्रज्ञावंत निसर्गाला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
अशा उल्लेखिलेल्या आणि अनावधानाने न उल्लेखिलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात गुरूंना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार- आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने!