महागाईने केले सामान्यांना बेजार
सरकारला भाववाढीचा जडला आजार
गरिबांच्या तोंडचे पळाले पाणी
गायची आता त्यांनी अश्रूंची गाणी
श्रीमंतांच्या महालात विजेचा चमचमाट
गरीबाच्या झोपडीत उजेडाचा नायनाट
उच्चभ्रू घरांमधून खळखळते पाणी
गरीबाच्या नळाची कोरडीठक्क वाणी
भाज्या-डाळी-पेट्रोल-फळे उंच भाव जाती
सामन्यांच्या खिशाचे रोज बारा वाजती
नित्य वस्तू गरजेच्या कशा काय टाळाव्या?
मुठी फक्त रागाने घट्ट आवळाव्या ?
अर्थहीन चर्चा अन अर्थहीन वाद
जनांपुढे उभा रोज नवा छळवाद
राजकारणी चरकातून जनतेची पिळवणूक
आश्वासने भरमसाट बघून निवडणूक
नव्या बांधकामांची महाकाय भूक
रयतेला नाडले तर झाली कुठे चूक?
नैसर्गिक संपत्ती लुटा-तोडा-बुजवा
उघडणारी तोंडे आता पैशांनी मिटवा
कर्जाचा असुर घाले विळखा देशाला
बुलडोझर महागाईचा छिन्न करी मनाला
दारू-बाई-बाईक अन रेव्ह पार्ट्या धुंद
पैसेवाल्या तरुणांचे बीभत्स छंदफंद
खून-लुटमारीने पोखरला देश
आत्महत्यांचा दारोदार हैदोस
गळाठले भान आणि सारासार शक्ती
भ्रष्टाचारी बडव्यांनी नासवली भक्ती
बेकारी-लाचारी नागविते मानव
नाईलाजापोटी मग आकारतो दानव
स्त्री-भ्रूणहत्या अन शोषण बाल्याचे
हळहळती क्षणिक फक्त घोळके षंढांचे
चंगळ-भोगांची चिपडे चढती डोळ्यांवर
बासनात सत्वाला लागली घरघर
स्व-स्वरूप ब्रम्हाला नाचविते माया
येईल कोण आता माय-भू ताराया?
No comments:
Post a Comment