Wednesday, 16 May 2012

तिची 'प्रभाच' आगळी!

शास्त्रीय संगीताच्या तंत्रशुद्ध चौकटीत गातानाही ज्यांनी लालित्याचे नाते कधी सुटू दिले नाही त्या 'स्वरमयी' डॉ. प्रभाताई अत्रे ह्या एक आदर्श गायिका आहेत. काही वेळेस तंत्राकडे जरा जास्तच लक्ष पुरवल्यामुळे गायलेला राग हा रुक्ष किंवा रसहीन वाटण्याची भीती असते. त्या रागाचा ठराविक परीघ सांभाळणे गायकाच्या दृष्टीने जरी अत्यावश्यक असले तरी त्याच्या रसपरिपोषाचे  अवधान सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. गायक रागाचा रतीब घालतोय आणि श्रोते कंटाळून तो ऐकताहेत असे दृश्यही बरेच वेळा दिसून येते. यमनसारखा एखादा राग श्रोत्यांचा कब्जा घेताना वेळ लावत नाही परंतु काफी सारखा राग गाताना मात्र तो जर योग्य रीतीने श्रोत्यांसमोर मांडता आला नाही तर निरस, रुक्ष आणि कंटाळवाणा होण्याचीच जास्त शक्यता असते. 
आबासाहेब आणि इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी हे कन्यारत्न १९३२ साली जन्माला आलं.  प्रभाताई आणि त्यांची बहिण उषा दोघींनाही गाणे ऐकण्यात रुची होती पण गाणे हेच करियर म्हणून निवडणे असे त्यांच्या मनात तोपर्यंत आले नव्हते. प्रभा लहान असताना इंदिराबाईंची तब्येत ठीक राहत नव्हती. तेव्हा कुणीतरी त्यांना गाणे शिकण्याचे सुचवले. बाईंनी संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली आणि लहानग्या प्रभाला इथूनच प्रेरणा मिळाली. आधी श्री.विजय करंदीकर यांच्याकडून आणि नंतर सुरेशबाबू माने तसेच हिराबाई बडोदेकर अशा संगीत क्षेत्रातील किराणा घराण्यातील दिग्गजांकडून प्रभाताई गाणे शिकल्या. त्यांच्या गायकीवर उस्ताद आमीर खान आणि बडे गुलाम अली खान या दिग्गजांचाही प्रभाव जाणवतो. शास्त्र आणि कायदा या विषयांतील पदवी त्यांनी मिळवली. शिवाय गंधर्व महाविद्यालयातून त्यांनी 'संगीतालंकार' ही पदवीही प्राप्त केली.  पुढे प्रभाताईंनी संगीतात पी.एच.डी. घेतली. 
प्रभाताई एक उत्तम शास्त्रीय गायिका तर आहेतच परंतु त्यांनी आजपर्यंत अनेक बंदिशी बांधल्या आहेत. 'स्वरांगिनी' तसेच 'स्वरंजनी' या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट केल्या आहेत. त्यांनी रचलेल्या ख्याल, छोटा ख्याल, टप्पा, ठुमरी, दादरा यांची संख्या जवळजवळ पाचशेच्या घरात आहे. अपूर्व कल्याण, दरबारी कंस, पटदीप मल्हार, तिलंग भैरव यासारखे नवीन राग त्यांच्या प्रतिभेतून निर्माण झाले आहेत. देश-विदेशांत जाऊन त्यांनी गायन तसेच शास्त्रीय संगीतावर मार्गदर्शनही केले आहे. डॉ.सुचेता भिडे चाफेकर यांनी दिग्दर्शित केलेला  'नृत्य प्रभा' हा नृत्याविष्कार प्रभाताईंच्या रचनांवर आधारित आहे. अनेक संगीतिकांसाठी त्यांनी स्वररचना केली आहे. मानापमान, संशयकल्लोळ, सौभद्र, विद्याहरण आदी संगीत नाटकांत त्यांनी अभिनयही केला आहे. 
अत्यंत तरल आवाज, सर्व सप्तकांतील उत्तम फिरत, हरकती-ताना-बोलताना घेण्यातील नजाकत, स्पष्ट स्वरोच्चार आणि रागाची भावस्पर्शी मांडणी ही प्रभाताईंच्या गायनाची वैशिष्टे आहेत. 'मन तू गाई हरीनाम', 'लागी लागी रे' या यमन मधील बंदिशी, 'जागू मै सारी रैना बलमा' ही मारुबिहाग रागातील बंदिश, 'तनमनधन तोपे वारू ' ही कलावती रागातील बंदिश, 'सगुण सरूप नंदलाल' ही बंदिश गात आळवलेला चंद्रकंस तसेच 'शाम मोरे मंदिर आये' ह्या बंदिशीने खुलवलेले मधुवंती या रागाचे रूप आणि त्यांच्या अशा अनेक बंदिशींनी वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर विलक्षण मोहिनी घातली आहे. 
अनेक पुरस्कारांनी प्रभाताई सन्मानित झाल्या आहेत. जगतगुरू शंकराचार्यांनी त्यांना 'गान-प्रभा' हा किताब बहाल केला आहे. आचार्य अत्रे पारितोषिक, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पद्मश्री, पद्मभूषण या सन्मानाच्या त्या मानकरी आहेत. कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान आदिंनी त्या विभूषित आहेत. आजवर अनेक महत्वपूर्ण पुरस्कारांच्या त्या धनी झाल्या आहेत.  
'स्वरमयी गुरुकुल' नावाची संस्था त्यांनी पुण्याला स्थापन केली आहे जिथे पारंपारिक शास्त्रोक्त संगीताचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो. 
प्रभाताईंच्या गानप्रतिभेला आणि स्वररचनांतून सौंदर्यानुभूती देणाऱ्या त्यांच्यातील रचनाकाराला माझा सलाम!



No comments:

Post a Comment