Wednesday, 23 November 2011

मुलगा-मुलगी

तुम्हाला मुलगा झाला आहे असं डॉक्टरीण बाईंनी सांगितल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. नुसत्या आईच्या चेहऱ्यावर नाही तर प्रसूतीची वाट बघत बसलेल्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य दिसतं. लढाई जिंकल्याच समाधान त्यातून प्रतीत होतं.  मुलगी झाली अशी बातमी कानी पडताच आनंद होतो खरा परंतु त्या आनंदात काहीतरी निसटल्याच शल्य असतं. मुलगी-मुलगा यातील तफावतीला इथूनच तर खरी सुरवात होते. 

कुलदीपक जन्माला आल्याचा आनंद गगनात मावत नसतो. असे कुलदीपक मोठे होऊन आई-वडिलांची जबाबदारी झटकून,परदेशी जाऊन आपापला संसार थाटून राहिले तरीही घराण्याला शोभा आणण्यासाठी,वंश पुढे नेण्यासाठी मुलगा हा हवाच!
मुलींनी आई-वडिलांचे कितीही करायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्या परक्याचे धन या बिरुदावलीखालीच राहतात. वास्तविक पाहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रियाही कामे करतात,जबाबदाऱ्या समर्थपणे पेलतात,घर आणि ऑफिस अशी दुहेरी  'टास्क' सांभाळतात. मुलांचे भविष्य घडवतात. असे असतानाही कर्त्याच्या भूमिकेचा मान मात्र  समाज पुरुषालाच बहाल करायला उत्सुक असतो. 
पुरुष आणि स्त्री मधला शारीरिक फरक वगळता आज स्त्री कुठल्याही पद्धतीने पुरुषापेक्षा कमी नाही. उलटपक्षी मानसिकदृष्ट्या स्त्रीच पुरुषापेक्षा जास्त खंबीर असते. स्त्रिया 'multi-tasking' जास्त उत्तम रीतीने करू शकतात. 
लहानपणापासून घरगुती लहानसहान कामे मुलींनाच शिकवली जातात. चहाच्या कपबश्या विसळणे,केर काढणे,जेवणाची ताटे घेणे, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, फर्निचर पुसणे, झाडझूड करणे वगैरे. मुली वयात आल्यावर जास्त हसण्या-खिदळण्यावर निर्बंध येतात. मुलांशी बोलणे,गप्पा मारणे गैर समजले जाते. कपडे कोणते घालावे,कसे बोलावे, कसे चालावे,कसे वागावे याबद्दल शाळा घेतली जाते. दिवेलागणीनंतर बाहेर राहण्याची मुभा मुलींना फारशी दिली जात नाही. 'आज ना उद्या तुझं  लग्न होईल आणि तू दुसऱ्या घरी जाशील. तिथे असं वागून कसं चालेल?' ही समज मुलीला सातत्याने  देण्याचे महत्कार्य आई-वडील करत असतात. मुलाने मात्र घरी केव्हाही यावे,इतरांशी गप्पा-टप्पा हाणाव्या,घराच्या कामांमध्ये लक्ष घालू नये असा अलिखित नियम असावा. आजही ऑफिसमधून थकूनभागून आलेला नवरा घरी आल्यावर पंख्याखाली पाय पसरून पेपर वाचत बसतो आणि त्याच्या इतक्याच थकूनभागून आलेल्या बायकोकडून आयता चहा पिण्यात धन्यता मानतो वर पुन्हा एखाद्या चमचमीत डीशची फर्माईश करण्यातही त्याला गैर काहीच वाटत नाही.  घरची गाडी असल्यास बहुतेककरून  पुरुषच ती घेऊन ऑफिसला जातात आणि बायका मात्र लोकलमध्ये अनेकांचे धक्के खात लोंबकळत प्रवास करतात. 
सकाळी उठल्यापासून घरातील सगळी कामे बाईनेच हातावेगळी केली पाहिजेत असा नियम कोणत्या कायद्याच्या पुस्तकात आहे? जसा तिचा संसार असतो तसा आणि तेवढाच त्याचाही नसतो का? तिची मुले त्याचीही असतातच ना? मग त्यांना शाळेसाठी तयार करणे,त्यांचा नाश्ता,खाऊचा डब्बा तयार करणे,त्यांचा अभ्यास घेणे,त्यांची दुखणी-खुपणी काढणे,त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही जबाबदारी फक्त तिचीच कशी? त्याच्या आई-वडिलांना तिने मान देणे खचितच गरजेचे पण तिच्या आई-वडिलांना मान देणे त्याच्यासाठी कसे गरजेचे नाही?  
मुलगा आणि मुलगी म्हणून आपल्या मुलांना वाढवण्यापेक्षा त्यांना सुजाण नागरिक म्हणून घडवणे हे आई-वडिलांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे असे मला वाटते. खाण्या-पिण्यासारख्या गोष्टींपासून  ते स्वत:च्या पायांवर भक्कम उभे राहण्यासाठी मुलगा-मुलगी हा निकष न लावता आई-वडिलांनी त्यांना सक्षम बनवले पाहिजे. वर्गभेद,वर्णभेद,लिंगभेद यांचा अतिरेक समाजहितासाठी घातक ठरू शकतो या गोष्टीचे भान असू द्यावे. दुर्लक्षित राहिलेली ,उपेक्षिलेली , फारकतीच्या झळा सोसलेली कोणत्याही घरातील,थरातील,स्तरातील मुलगी ही एकतर सोशिकतेच्या भावनेने अन्याय सहन करत आयुष्यभर पिचत राहते नाहीतर या समाजाप्रवाहाविरुद्ध बंड करून उठते. मुला-मुलींना संतुलित रीतीने,सम्यक भावाने जगायला शिकवणे हे ज्या दिवशी आई-वडील ठरवतील तो दिवस जगाच्या इतिहासातील 'सोनियाचा दिवस' ठरेल!  

Tuesday, 22 November 2011

भीती


भीती ही एखाद्या व्यसनासारखी असते. ती जडली की जडली. व्यसनांनी शरीर पोखरले जाते आणि भीतीने मन! व्यसनमुक्ती केंद्रांप्रमाणे आता जागोजागी भीतीमुक्ती केंद्रेही उघडली गेली पाहिजेत. 
हिंस्त्र प्राण्यांची अथवा खून-दरोड्यांची भीती सर्वव्यापी असते पण प्रत्येक व्यक्तिगणिक मात्र भीती कसलीही असू शकते. काळोखाची भीती असू शकते. एकटेपणाची भीती असू शकते. पुढे होणाऱ्या एखाद्या आजाराची भीती असू शकते. आगीची भीती असू शकते,पाण्याची भीती असू शकते. विमानाची भीती असू शकते. पोलिसांची किंवा तुरुंगाची भीती असू शकते. ( सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात हे क्षण जवळजवळ येत नाहीत तरीही)  रेल्वे स्टेशनवरील गर्दीची, थरथरणाऱ्या पुलाची, खिसेकापूंची, कधीही होणाऱ्या बॉम्बस्फोटांची, गर्दुल्ल्यांची यापैकी कशाचीही वा सगळ्यांचीच भीती असू शकते. चाकू-सुऱ्या,नेलकटर,कात्री अशा धारदार वस्तूंची सुद्धा भीती असू शकते. कीटकनाशक औषधांची भीती असू शकते. बंद लिफ्टची भीती असू शकते. विजेच्या उपकरणांची भीती असू शकते. घरातील सिलेंडरची भीती असू शकते. सरकत्या जिन्याची भीती असू शकते.बंद थिएटरची भीती असू शकते. रस्ता क्रॉस करायची भीती असू शकते. डॉक्टरांकडे गेल्यावर इंजेक्शनची, तपासण्यांची, बिलाची, निदानाची भीती असू शकते. वाहनात बसल्यावर वाढणाऱ्या मीटरची भीती असू शकते. रस्त्यावरच्या मवाल्यांची भीती असू शकते. वरिष्ठांची भीती असू शकते. आपली आर्थिक,सामाजिक पत खालावण्याची भीती असू शकते. अशा अनेक भित्यांच्या सावटाखाली आपली जगणं नामक दैनंदिन मालिका चालू असते.   
आपल्या भीतीचं मूळ शोधून काढायला यांपैकी कुणीच उत्सुक नसतो. उलटपक्षी या भितींच्या साम्राज्यात राहायला काहीना मनापासून आवडते. माझ्या एका आत्याला औषधाची गोळी गिळायची विलक्षण भीती वाटते. लहानशी गोळी जिभेवर ठेवूनही तिला ती यशस्वीरीत्या गिळता येत नाही. कितीही पाणी ढोसलं तरी गोळी काही घशाखाली उतरत नाही. गोळी कुटणे एवढाच पर्याय प्राप्त परिस्थितीत उरतो. तिच्या ह्या समस्येवर रामबाण उपाय कुठल्याही डॉक्टरकडे नाही. काही भीत्या तर खूपच मजेशीर असतात. एका बाईला म्हणे नुसती उशी दिसली तरी भीती वाटते. कुणीतरी तिच्या उरावर बसून त्या उशीने तिचा गळा दाबतंय असं काल्पनिक चित्र तिच्या डोळ्यांसमोर येतं. तिच्या घरच्यांची किती पंचाईत होत असेल याची कल्पनासुद्धा  आपल्याला येणार नाही. एका तरुण मुलीला म्हणे चावीवाल्या खेळण्यांची भीती वाटते. ती आपल्या अंगावर येतील या भीतीने ती त्यांच्याकडे बघतही नाही. एका बाईला टोलेजंग पाळण्याची  ( giant wheel )  भयंकर भीती वाटायची. तो वरून खाली येताना पहिला की तिच्या छातीत धडधड व्हायची आणि भीतीपोटी ती किंचाळायची. म्हणजे ते प्रत्यक्ष थ्रील अनुभवासाठी तिला पाळण्यात बसण्याची गरजच नव्हती. आमच्या नात्यातल्या एका माणसाला उंचावरून खाली पाहण्याची खुप भीती वाटायची. दहाव्या मजल्यावरून खाली नुसता दृष्टीक्षेप टाकला तरी आपण पडतोय या भीतीने हा गळाठून जायचा. एका माणसाला जिना चढताना आपल्या मागावर कुणीतरी आहे असं सारखं वाटायचं.   
प्रत्येकाचा जन्म,सभोवतालचे वातावरण,वावरणारी माणसे,त्यांच्या बोलण्याचे विषय ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे प्रत्येकाभोवती  भीतीचे अथवा सुरक्षिततेचे वलय तयार होत असते. भीतीचे वलय भेदून पुढे येण्याचा प्रयास करणारे थोडेच  असतात. प्रत्यक्ष देवाचं वास्तव्य ज्या वास्तूत आहे ती वास्तू ज्यांना भयप्रद वाटते त्यांच्या भीतीचं निरसन कोणता देव करू शकेल?

Sunday, 13 November 2011

व्यक्त व्हायला शिका !

एक किलो जिव्हाळा अधिक एक किलो माधुर्य अधिक एक किलो संवेदना यांचा मिलाफ म्हणजेच नात्यांचं घट्ट श्रीखंड असं गृहीत धरलं तरीही त्यावर सुगंधी केशरी वर्ख चढविण्यासाठी मनातील अव्यक्त रूपातील भावनांची पखरण करण्याचा खटाटोप हा हवाच! आपली दुसऱ्याविषयीची भावना जोपर्यंत योग्य माध्यमाव्दारे जाहीररीत्या व्यक्त होत नाही तोपर्यंत त्या नात्याच्या कळ्या पूर्णपणे विकसित होत नाहीत. 
आपल्या मराठी संस्कृतीत भावना व्यक्त करणे हा काही दखलपात्र गुन्हा मानला जातो की काय अशी मला नेहमीच शंका येते. एखाद्याचं कौतुक करायला आपण एवढे का कचरतो? केवळ अभिनंदनपर चार कोरडी वाक्ये फेकण्यात आपण धन्यता का मानतो? एखाद्या समारंभाच्या प्रसंगी एखाद्या विषयीची आपुलकी, प्रेम, निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपण मागेपुढे का पाहतो? तुम्ही भले एखाद्याला स्तुतीसुमनांची आंघोळ घालू नका अरे पण चार-दोन प्रशंसापर वाक्यांचे शिंतोडेही त्याच्यावर उडणार नाहीत याची खबरदारी तुम्ही का घेता? 
प्रगतीपुस्तकातून आपल्या मुलाने किंवा मुलीने कमी मार्क आणले की आपली जिव्हा तिखट बोलण्यासाठी किती लसलसते ते आठवून पहा. आपण अपमानकारक शब्दांची मुक्त उधळण करत आपल्या पाल्ल्याची  कोणतीही गोष्ट ऐकून न घेता भावनांच्या हिंस्त्र डरकाळ्या फोडतो. तेच त्याने किंवा तिने चांगले मार्क मिळवल्यास आपली चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची कक्षा आपण किती रुंदावतो? शब्दातून अथवा स्पर्शातून त्यांच्याविषयीचा अभिमान त्यांना जाणवू देण्याइतपत आपण सक्रीय होतो का? 
किमती,महागड्या भेटवस्तू मुलांना देऊन जे साध्य होत नाही ते त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना त्यांना जवळ घेऊन व्यक्त केल्यावर होतं. दोघांमधील नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी पैशांचा नव्हे तर सु-संवादाचा दोर लागतो. दिखाऊपणाच्या भिंती या पोकळ असतात परंतु समंजसपणाचे लिंपण असलेल्या भिंती मात्र परिपक्व आणि भक्कम असतात. 
सण-समारंभ येतात. माणसे भेटवस्तू देऊन, चार शब्द बोलून निघून जातात. समारंभ संपल्यावर एकाकीपणा आपल्याला खायला उठतो. जवळच्या वाटणाऱ्या माणसांनी आपापला वेळ, पैसा खर्च केलेला असतो. तरीही स्नेहाची, निखळ प्रेमाची ती जागा रिकामीच राहिल्यासारखी वाटते. शब्दांचे बुडबुडे केव्हाच हवेत विरून गेलेले असतात. आपण अपेक्षिलेल्या प्रेमाची, आपुलकीची झाक आपल्याला जमलेल्या डोळ्यांत अभावानेच दिसलेली असते. आत्तापर्यंत आपणही उपचारांचेच रतीब घातलेले असतात. स्पर्शातील उब,मुलायमता,तरलता माहित असूनही ती आपण इतरांना जाणवू दिलेली नसते. आनंदाच्या-दु:खाच्या प्रसंगी आपण तिथे फक्त आपली उपस्थिती असणे यालाच महत्त्व देत आलेले असतो. दुसऱ्याचा आनंद आपल्यामुळे कसा द्विगुणीत होईल किंवा त्याचे दु:ख कसे कमी करता येईल यासाठी आपण काही खास असे प्रयत्न केलेले नसतात. तसे करण्यामुळे आपली सहसंवेदना समृद्ध होईल याचाही आपण कधी फारश्या गांभीर्याने विचार केलेला नसतो.   
आपल्याला पडत्या काळात सांभाळणाऱ्या, समजून घेणाऱ्या, धीराचे चार शब्द सांगून मनाला उभारी आणणाऱ्या आप्तेष्टाचे आपण जाहीररीत्या आभार का मानत नाही? कारण असे करणे आपल्याला एकतर कृत्रिम वाटत असावे किंवा असे आभार मानताना समोरचा आपल्यापेक्षा मोठा होतो आहे याचा आपल्याला मनोमन खेद वाटत असावा. स्वत:च्या अंगभूत कर्तृत्वाने, गुणाने जो ठसा उमटवतो, प्रतीकूलतेला स्व-प्रयत्नाने भेदतो त्याचेही जाहीर कौतुक करायला  आपल्या जिभा का सरसावत नाहीत? आज आपल्याला त्याची जागा घेता येत नाही ही जाणीव आपल्याला बोचते का? 
प्रत्येकानेच यावर आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. आपलं आयुष्य हा जिंकण्या -हरण्याचा आखाडा नसून नात्यांचे निसटत चाललेले,उसवत चाललेले धागे स्व-प्रयत्नांनी गुंफण्याची सुसंधी आहे. तेव्हा व्यक्त व्हायला शिका,शिकवा आणि सोन्यासारख्या नात्यांना झळाळी द्या!