काही वर्षांपूर्वी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत एका कार्यक्रमाला गेले होते. एका नामवंत सतारियांच्या सतारवादनाचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम संपला. ते सतारिया व्यासपीठावरून खाली उतरले आणि श्रोत्यांमध्ये मिसळले. आम्हीही त्यांना अभिप्राय देण्यास उत्सुक होतो. "मेरा बजाना आपको अच्छा लगा?" त्यांच्या या विनम्रतेने मला बुचकळ्यात टाकले. नावलौकिक प्राप्त झाल्यानंतर इतक्या अदबीने, इतक्या नम्रतेने वागणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात. काही माणसे तर आपण त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी आहोत ही न्युनतेची भावना आपल्यावर ठसवण्यासाठी कायम तत्पर असतात.
अशाच एका नामवंत कवी-साहित्यिकाला मी माझ्या काही कविता वाचण्यासाठी दिल्या व त्यावर त्यांचा अभिप्रायही मागितला. हेतू हा की त्यांच्यासारख्या साहित्याचं शिखर गाठणाऱ्याकडून माझ्यासारख्या होतकरू कवयित्रीला बहुमुल्य मार्गदर्शन मिळावं. आपण या क्षेत्रात योग्य मार्गाने जात आहोत ना याचीही खातरजमा करता यावी. परतू अभिप्राय तर सोडाच पुढल्या वेळी भेटल्यानंतर मी असा काही काव्यसंग्रह त्यांना दिला होता हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हतं. मला फार वाईट वाटलं. पण काही वेगळं वाटलं नाही. याउलट माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेले कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट,शिरीष पै या काव्याच्या प्रांतातील ज्येष्ठांचे अभिप्राय मला खूप बोलके वाटले. १९८४ साली माझ्या काही निवडक कवितांबद्दलचे विश्लेषण माझ्या पत्राच्या उत्तरादाखल म्हणून पु.लंनी अंतर्देशीय पत्रातून केले तेव्हा तर मला अस्मान ठेंगणे झाले. सुरेश भटांनी तर गझल कशी लिहावी व कशी लिहू नये याबद्दल पत्रातून आपुलकीने सविस्तर माहिती दिली. वर आणखी तुमचा पिंड गझल लिहिण्याचाच आहे हेही ठामपणे सांगितले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही त्यांना काव्यमय पत्र पाठविल्यानंतर तितक्याच तत्परतेने आणि आस्थेने पत्र पाठविले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या काव्यसंग्रहाची शीर्षके निवडून त्यावर कविता करून मी पाठवली होती. ती त्यांना पोहोचताक्षणी त्यांनी आवर्जून माझ्या घरी फोन केला होता. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. अशा काही चांगल्या घटनांमुळे माझ्या मनातील या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची एक माणूस म्हणूनही प्रतिमा उंचावली गेली.
साहित्याप्रमाणे संगीत क्षेत्रातही मी माझ्या कुवतीप्रमाणे मला थोडे आजमावले. काही प्रतिभावंताच्या रचनांना स्वरबद्ध करून ती गाणी रसिकांसमोर प्रस्तुत करून कानसेनांची तसेच संगीत क्षेत्रातील नामवंतांची दाद मिळवली. तबलावादनात ज्यांचे नाव अभिमानाने आणि अग्रणी घेतले जाते त्या पं.भाई गायतोंड्यांमुळे मराठी भावगीताचे जनक गजाननराव वाटवे यांना भेटण्याचा योग आला. पुढे आर्थिक अडचणींमुळे या कार्यक्रमांना खीळ बसली. या निमित्ताने कलावंताच्या आत वसलेल्या मानवरूपाचे मला बरे-वाईट दर्शन झाले.
मुळातच आपण एखाद्या कलावंताला हा मोठा, हा ग्रेट, हा लोकप्रिय अशी लेबले लावतो खरी परंतु ते केवळ त्याच्या कलेच्या संदर्भात! अशा एखाद्या कलावंताला माणूस म्हणून बघावे तर कधी कधी तो अतिसामान्य निघतो. कळसावर पोहोचलेल्याने कळसाच्या पायापाशी असलेल्याला मार्गदर्शन करण्यात कमीपणा का वाटावा? की उद्या याला हात दिल्यानंतर हा आपल्या पर्यंतचे अंतर लवकर कापेल अशी भीती त्यांना आतून खात असावी? "मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो" या कविवर्य बोरकरांच्या काव्यपंक्ती इथे सार्थ ठरतात. लोकप्रियता, कीर्ती, पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा ,मानसन्मान या मुखवट्याआड दडलेला माणूस खरोखरीच मोठा आहे की खुजा आहे , सामान्य आहे की असामान्य आहे , अहंकारी आहे की निरहंकारी ही एक संशोधनाची बाब आहे.