काही दिवसांपूर्वीच मी बाजारातून नवीन 'android' खरेदी केला. स्मार्ट फोन हे आज्ञाधारक असावेतच अशा अपेक्षेनेच मी तो घेतला होता. इतर कोणी नाही तर या आपल्या मालकीच्या फोनने तरी आपलं म्हणणं ऐकावं अशी माफक अपेक्षा होती. सुरवातीला काही दिवस तो आज्ञाधारकपणे वागल्याने सुखाचे गेले
निरनिराळे गेम्स, फोटोज, गाणी, व्हीडिओज, लाइव्ह wallpapers, chats मजा येत होती. जे हवं ते क्लिक करून नव्हे नुसते टच करून मी मिळवत होते.
पण मग एक दिवस या फोनच्या अंगात आले. त्याला पुरेशी इलेक्ट्रिसिटी खाऊ घालूनही तो माझं काहीच ऐकेनासा झाला. नवा wallpaper डाऊनलोड कर म्हणून सांगितलं तर जुनाच wallpaper तो मला वारंवार दाखवू लागला. त्याला बहुधा 'जुनं ते सोनं' या म्हणीची आठवण येत असावी. त्यानंतर मी बुद्धीबळ खेळण्याचा प्रयास केला तर माझी महत्वाची मूव्ह चालली असताना याने एकदम डोळ्यांसमोर अंधार केला. मी शूटिंग बबल्स खेळताना तो मला मनाप्रमाणे शूट करू देईना. म्हणजे समोर आरोपी हात वर करून शरणागती पत्करून उभा आणि त्याचवेळेस पोलिसाच्या हातातली बंदूक घरंगळून खाली पडावी असा काहीसा सीन निर्माण झाला होता. त्यामुळे या खेळातही मलाच शरणागती पत्करावी लागली.
मी स्वत: संगीत शिक्षिका आहे. मला नुसता गळा 'अपडेट ' करून चालत नाही तर कानही अपडेट करावा लागतो. म्हणूनच मी वेगवेगळ्या शास्त्रीय गायक/ गायिकांची गाणी सातत्याने ऐकत असते. एखादा आवडीचा राग निवडून त्यातील बंदिश आवडत्या गायकाकडून ऐकावी म्हणून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फोनने नन्नाचा पाढा आळवण सुरु केलं. माझ्या आनंदाचं परिवर्तन घोर निराशेत झालं. आता काय करावं म्हणजे हा आपलं म्हणणं ऐकेल या प्रश्नाने माझं डोकं पुरतं पिंजून काढलं. माझी एक मैत्रीण म्हणाली म्हणून त्याला मी लटक्या रागाने चापट्या सुद्धा मारून पहिल्या . पण ज्याचं नाव ते! तो बहुतेक सुधारण्या पलीकडे गेला होता. त्याला न ऐकण्याचे जणू डोहाळेच लागले होते.
माझा सगळा राग त्याच्यावर निघूनही तो 'झपूर्झा' स्थितीतच होता. तुला मी ज्या सूचना देते त्या कशा कळत कशा नाहीत. तुझी बुद्धी राजकारणी लोकांसारखी नेमकी कुठे चरायला गेली आहे वगैरे प्रश्नांचा भडीमार लोकप्रिय वाहिनी वरील प्रसिध्द संचालकासारखा हातवारे करून केला तरीही माझा फोन केवळ स्थितप्रज्ञाची अवस्था दर्शवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एकही आठी , एकही सुरकुती नव्हती, त्याच्या भुवया ही वक्राकार नव्हत्या. थोडक्यात निर्बुद्ध आणि गेंड्याची कातडी पांघरलेले महाभाग जसे दिसतात तसाच तो मला वाटत होता. मला काय वाटते आहे याची त्याला जराही फिकीर नव्हती. एवढे पैसे खर्चून विकत घेतलेला हा गुणी , चपळ आणि स्मार्ट असे विशेषण असलेला फोन चक्क मला बधत नव्हता.
मी तुझे बिघडलेले डोके वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विडा मी तत्क्षणी उचलला. जाण्यायेण्यावर काही पैसे खर्च करून त्याचे डोके एकदाचे तपासून घेतले, त्याच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या आजारावर तात्पुरती का होईना उपाययोजना केली आणि त्याच्या वठणीवर आल्याची हमी मिळताच आनंदाने घरी परतले.
महागाई, निवडणुका , whats app, परीक्षा असे सगळेच तोंडावर असताना मला ऐनवेळी तोंडघशी पाडणारा हा फोन आता प्रेमाने किंवा धाकाने माझ्या आज्ञेत राहील यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. जय android !
शाळेतून १९७६ साली 'पास आउट ' झाल्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी जेव्हा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो तो सोहळा केवळ अपूर्व आणि शब्दातीत होता. एका डोळ्यात हसू आणि दुसरया डोळ्यात आसू अशी अवस्था बहुतेकांची झाली होती. अय्या असा आनंदोद्गार काढून एकमेकींना मिठी मारण्यातील सुख काय असतं ते आम्ही अनुभवलं. संपूर्ण कार्यक्रम अतिशय हृद्य झाला. प्रत्येकालाच जणू हरवलेलं बाल्य परत गवसलं होतं आणि आपल्या मुठीत ते आठवणींचे अमूल्य मोती साठवण्याचा जो तो प्रयास करत होता.
महर्षी दादासाहेब रेग्यांनी नावारूपाला आणलेली बालमोहन शाळा , त्यांचे 'बाळांनो 'असे मन हेलावून टाकणारे अतीव जिव्हाळ्याचे शब्द, 'अंतर मम विकसित करी हे परात्परा' ही पारंपारिक प्रार्थना असे अनेक क्षण आम्ही सर्वांनी पुन्हा एकवार लहान होत अनुभवले. डोळ्यांत साचणारे पाणी महत्प्रयासाने परतवायचा प्रयत्न माझ्यासारख्या अनेकांनी केला असेल.
आमच्या गिंडे बाई, सावे सर, वयाचे नव्वदी पार केलेले गायनाचे जोशी सर आणि आम्हा सर्वांचा वर्गमित्र आणि आज शिवसेना या पक्षाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर वाहणारा उद्धव ठाकरे या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. आमच्या 'ई ' तुकडीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयीची कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
ज्या आमच्या वर्गमित्रांनी अपार मेहनत घेऊन, आपल्या वर्गमित्र किंवा मैत्रिणींचा ठावठिकाणा शोधून हा सोहळा घडवून आणला त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. फोनाफोनी झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली तेव्हा एकेकाला किंवा एकेकीला भेटताना फार मजा आली. किती बदलला आहेस तू / बदलली आहेस तू, तू तेव्हा होतास/होतीस , तसाच /तश्शीच आहेस तू असे शब्द जिथून तिथून कानावर येऊ लागले. मग काय करतेस / काय करतोस इथपासून तुला किती मुलं इथपर्यंत गाडी आली. मग शाळेत असताना हुशार कोण, ढब्बू कोण , शांत कोण, टवाळ कोण याची चर्चा सुरु झाली.
आमच्या गुरुवर्यांचा सन्मान करण्यात आला, काही दिवंगत विद्यार्थी आणि गुरुजनांना भावांजली वाहण्यात आली. जे कुणी या सोहळ्यात काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नाहीत किंवा काही जणांचा थांगच लागला नाही अशांची यावेळी प्रकर्षाने आठवण झाली.
गप्पा, गाणी, नाच असा मनसोक्त धांगडधिंगा करून आम्ही आमचे वय विसरून अगदी शाळेत असल्यासारखे वागलो. उद्धवच्या शब्दांत 'पदार्थ विज्ञान ' सुद्धा छान जमून आले होते. आता थोड्याच वेळात एकमेकांचा निरोप घ्यायचा ही जाणीव मन हळवं करून गेली. मग पुढच्या वेळी कधी आणि कुठे भेटायचे याचे बेत आम्ही आखायला लागलो. सहलीला जाऊया अशीही टूम निघाली. सहा महिन्यातून एकदा की वर्षातून एकदा याचा विचारविनिमय सुरु झाला आणि अजूनही त्याला पूर्णविराम मिळालेला नाही. बघू पुनर्भेटीचा प्रत्यक्ष योग कधी येतोय ते !
आपला प्रपंच, मुले, कौटुंबिक जबाबदाऱ्या, दुखलं-खुपलं, कर्तव्ये, आपण भूषवत असलेले मानाचे हुद्दे या सर्व तपशिलांना तात्पुरते विसरण्याची ताकद शाळा नामक संजीवकात आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या प्रेरणादायी शिक्षकांत आहे यात कोणाचेच दुमत असायचे कारणच नाही.
शाळेमधले मित्र भेटले
पाय वयाचे मागे फिरले
चिंचा -बोरे, कैरया -पेरू
टपरी बुवाची शोधित बसले
वार्षिक सण अन प्रभातफेऱ्या
पाय चिमुकले हिंडून आले
गप्पा -टप्पा, मस्ती -गाणी
सहलीमध्ये हरवून बसले
नाटक -अंकामधले अंतर
कोड जिभेचे पुरवित आले
वडा -समोसा , इडली -चटणी
नाकाशी खमंग दरवळले
श्लोक -सुभाषित, कविता -गोष्टी
आठवणींचे मोती झाले
निबंध स्पर्धा, पठण -नाटके
विजयाचे सर गळ्यात आले
दिवाळी-नाताळाचे बक्षीस
उर्मी जयाची निर्मित आले
मूल्ये -संस्कारांची पखरण
नाती मनांची सांधित आले
अभ्यासाचे होई न ओझे
बाल्य न कोणी असे खुरडले
शिक्षण होते नव्हता धंदा
झाली न अभिमानाची शकले
आज सोहळा हा भाग्याचा
आनंदे मन भरून आले
पाऊलवाटेवर शाळेच्या
क्षण सोन्याचे वेचित आले
निवडणुका जसजशा जवळ येतात तशा खपली धरलेल्या जखमा खरवडून त्याचे राजकारण सुरु होते. तळागळात दफन केलेले मुडदे वर येतात. अगदी जाहीर सभांमध्येही राजकीय वक्ते त्याचा झणझणीत परामर्श घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. विविध वाहिन्यांचे संपादक, वार्ताहर, मुलाखतकार राजकीय व्यक्तींवर एखादे सावज मिळाल्यासारखे तुटून पडतात. एखाद्या पक्षाचा प्रवक्ता दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवतो. हीच संधी साधत तो प्रवक्ताही शब्दांच्या डरकाळ्या फोडत त्याच्या शत्रू पक्षाला चारी मुंड्या चित केल्याचा आव आणतो. अशी सारी राजकीय रणधुमाळी आपण सर्वचजण रोजच टीव्ही वर पाहतो. त्यातून काहींचे मनोरंजन होऊ शकते तर काहींना मनापासून या गलिच्छ राजकारणाचा संताप येऊ शकतो.
आजकाल दंगलींचे राजकारण जिथेतिथे जोरात सुरु आहे. १९८४ ची दंगल व्हर्सेस २००२ ची दंगल असे त्याचे स्वरूप आहे. मध्ये कुठेतरी १९९३च्या बाबरी मशिदीचा उल्लेखही मधेच डोकावतो. गांधी व्हर्सेस मोदी असे राजकारण सुरु असल्याने इंदिरा गांधी गेल्यानंतरच्या दंगली आणि गोध्रा हत्याकांडा नंतरच्या दंगली अशी आग पुन्हा एकदा जनमानसांत पसरवली जात आहे . या दंगलींच्या पटावर राजकारणातील प्यादी आपापली सरशी करू पाहत आहेत.
हे म्हणजे कसं आहे की मी नव्याण्णव उंदीर मारले आणि तू शंभर . अर्थात तुझे पातक माझ्यापेक्षा जास्त, त्यामुळे सत्ता उपभोगायला मी तुझ्यापेक्षा जास्त लायक असा युक्तिवाद चालला आहे. तू हजार घरफोड्या केल्यास आणि मी केवळ नऊशे नव्याण्णव तेव्हा सिंहासनावर आरूढ व्हायला तुझ्यापेक्षा मीच जास्त योग्य नाही का असा सवाल, असे प्रश्न दुसऱ्या पक्षाला विचारले जात आहेत.
इंदिरा गांधी गेल्यानंतर असंख्य निरपराध शिखांचे शिरकाण झाले. पोलिसांची कुमक तिथे योग्य वेळेस पोहोचली नाही . राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान म्हणून घोषित झाले होते . ते या क्षेत्रात अननुभवी होते. त्यांनी या प्रसंगी उधृत केलेली वाक्ये आणि एकंदर शिखांच्या मनात कायमचा उमटलेला ओरखडा या सर्व गोष्टी जनतेला ज्ञात आहेत. गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरातेत याचे उमटलेले हिंसक पडसाद सुद्धा समस्त जनतेने अनुभवले. पोलिस तिथेही योग्य वेळेत पोहोचू शकले नाहीत. ही सारी किमया नक्की कुणाची हे न कळण्याइतपत जनता दुधखुळी नाही.
सध्या भारतापुढे उभे असलेले ज्वलंत प्रश्न सोडवण्यास एकही राज्यकर्ता उत्सुक नाही. देशाचा विकास साधण्याचा खटाटोप करण्याऐवजी स्वत:चा विकास साधण्यासाठी किंवा यातून स्वत:च्या पक्षाला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठीच जो तो झटतो आहे. दंगलीत किती माणसे मारली गेली याचे statistics दाखवून आणि तुमच्या पक्षाने आमच्या पक्षापेक्षा शंभर-दोनशे अधिक मारली असे म्हणून पापक्षालन होणार आहे का? सत्ता उपभोगणे हा अंतिम हेतू असल्यामुळे हे पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी कोणत्याही थराला शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे.
एका वाहिनीवरून एक मुलाखत प्रक्षेपित होते. मुलाखतकार दंगली संबंधी प्रश्न विचारतो आणि जे उत्तर येते त्यामुळे काही वर्षांपूर्वी दुखावलेली, अपमानित झालेली मने पुन्हा एकदा नव्याने दुखावली जातात. मग मोर्चे, निदर्शने यांना उत येतो. दु:खद आठवणी जाग्या होऊन ठुसठुसायला लागतात. दंगली कोणी पेटवल्या, सक्रिय सहभाग कुणाचा, पोलिस कधी आले, किती माणसे मेली या सर्व मुद्द्यांवर परत एकदा चर्विचर्वण होते. पक्षाचा आणि वाहिन्यांचा TRP वाढायला याची मदत होत असावी . मात्र या दंगलींत प्रत्यक्ष भरडल्या गेलेल्या लोकांना याचा किती त्रास होत असेल असा साधा विचारही कुणाच्या मनात येत नाही. आपल्या गेलेल्या माणसांच्या दु:खावर काळ हेच औषध आहे असे समजून जी माणसे आज मानसिक दृष्ट्या सावरली असतील त्यांना पुन्हा त्याच भीषण गोष्टींची आठवण हे राजकीय पक्ष आणि इतर संबंधित का करून देऊ इच्छितात ?
आमच्या भारत देशाची प्राचीन परंपरा, संमृद्ध संस्कृती, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता या गोष्टींचा मागमूस तरी आता राहिला आहे काय असा प्रश्न पडतो. जळी-स्थळी स्त्रीची होणारी अवहेलना, तिची दिसामाशी ढळणारी मानसिकता, तिला भेडसावणारी असुरक्षितता, अशिक्षितता, बेकारी, चोऱ्या-दरोडे-खून, नैराश्यापोटी होणाऱ्या आत्महत्या, अस्मानाला भिडणारी महागाई, जीवनावश्यक गोष्टींची टंचाई, हॉस्पिटल्सची दुरावस्था, सार्वजनिक अस्वच्छता, चुकीच्या शिक्षणक्रमात भरडून निघणारे बाल्य, बालमजुरी, शेतकऱ्यांच्या समस्या, पोलीसदलाच्या समस्या, अंगणवाडी महिलांचे प्रश्न, रस्ते-वीज-पाणी, बोकाळलेली अश्लीलता या आणि अशा कित्येक मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी केवळ दंगलींचे राजकारण पेटवून त्यावर स्वत:ची पोळी भाजणारे सर्व पक्ष म्हणजे असंवेदनशील प्रवृत्तीचे एक जितेजागते उदाहरण आहे.
आज कोणत्याही राजकीय पक्षाला कसलेही तारतम्य, कोणताही विधिनिषेध उरलेला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. एक मुद्दा निवडायचा आणि त्यावर रान उठवायचे असा प्रकार सर्रास चाललेला आहे. सत्ता कोणाचीही येवो , जनसामान्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अजिबात शाश्वती नाही. महिलांच्या सुरक्षिततेची निश्चिंती नाही. स्वस्ताईची हमी नाही. तेव्हा कोणालाही मत देणे म्हणजे काळोख्या गल्लीत पुनश्च फिरून येणे यापेक्षा अन्य काही साध्य होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे.
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा ठरवण्यऐवजी दुसऱ्या पक्षाच्या धोरणांवर आगपाखड करण्यात आणि त्या पक्षाच्या ध्येय-धोरणांची यथेच्छ निंदा करण्यात गुंतला आहे. जागोजागी सभा होत आहेत. जनतेवर आश्वासनांची खैरात केली जाते आहे. यात आम्ही वीज दर कमी करू , काही जागांचे टोल बंद करू असे आणि यासारखे काही मुद्दे आहेत. निवडणुका झाल्यानंतरचे चित्र अर्थातच खूप वेगळे असणार आहे . वाढती लोकसंख्या थोपवण्यासाठी करावी लागणारी जनजागृती, परप्रांतीयांच्या लोंढ्यांना चाप, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, उत्तम रस्ते, मुबलक पाणी, सर्वसामान्यांना रास्त दारात भाजीपाला व फळे , महिन्याचे रेशन, वाढत्या प्रदूषणाला आळा, गरिबांसाठी स्वस्त दरात घरे असे कित्येक मुद्दे हाताळण्याची नितांत आवश्यकता आहे.
परंतु या सर्व मुद्द्यांपेक्षाही आज निकड भासते आहे ती लहानग्या मुलीपासून ते वयस्कर महिलेपर्यंतच्या सर्वांच्या सुरक्षेची! दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर जणू काही सर्व ठिकाणी बलात्कारांचे पेवच फुटले आहे. याचे मुख्य कारण असे की बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षेचे भयच उरलेले नाही. याउलट मुलींनी कोणते कपडे घालावेत, त्यांचे हावभाव कसे असावेत, त्यांनी रात्री घराबाहेर फिरू नये अशा अनेक सूचना रोज कानांवर आदळत आहेत. बलात्कार हा शब्द एखाद्या घणाप्रमाणे मनात थैमान घालतो आहे. आत्ताच हिंगोली येथे झालेले बलात्कार प्रकरण पहा. केवळ सात वर्षाचे वय असलेली मुलगी कामुक हावभाव किंवा तोकडे कपडे घालून पुरुषांना चाळवू शकेल का? तिला बिचारीला याचा अर्थ तरी माहित असेल काय? पण तरीही ती या पाशवी बलात्काराची शिकार बनलीच ना? तिची विदारक कहाणी डॉ. आशा मिरगे यांनी जेव्हा सांगितली तेव्हा मन सुन्न झाले. शाळेसारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी असा अन्याय एखाद्या मुलीवर होत असेल तर मग कुठले ठिकाण सुरक्षित समजावयाचे? फक्त अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांनाच फाशी आणि नुसता सामुहिक बलात्कार केला गेला तर त्या गुन्हेगारांना फाशी नाही या निर्णयावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.
एखाद्या मुलीचे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आयुष्य उध्वस्त करणारया अधम प्रवृत्तीला कोणत्या कारणास्तव मोकाट सोडायचे अथवा तो जहाल शिक्षेस पात्र नाही असे समजायचे? ज्या गोष्टी ज्या वयात योग्य रीतीने पालक मुलांना समजावतात त्या गोष्टी आज मात्र मुलींना त्यांच्या अजाण किंवा निष्पाप वयात समजावण्याची जबाबदारी पालकांवर येउन ठेपली आहे. शाळेतील शिक्षकांवर तरी विश्वास कसा ठेवायचा? मध्यंतरी ठाण्यातील शाळेत एका मुलावर अत्याचार झाला होता. जी माणसे आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत त्यांच्याकडे आदराने पाहावे की भीतीने, सावधपणाने अशी आत्यंतिक भीषण वेळ मुला-मुलींवर येउन ठेपली आहे.
असे बलात्कारी काही काळ सरकारी पाहुणे बनतात आणि कालांतराने सुटतात. जणू त्यांना अशा प्रकारचा गुन्हा परत करण्याचे सरकारी लायसेन्सच मिळते. एक तर ह्या अशा केसेसचा न्यायनिवाडा झटकन होत नाही. झालाच तर त्यांना कडक शासन करण्यास कोर्टाचे हात दुबळे पडतात. अशा असंख्य केसेस आजमितीला न्यायालयात प्रलंबित आहेत. यामुळे होतं काय की भविष्यात असे अनेक वासनांध या प्रकारचे गुन्हे करायला सहज धजावतात. कारण त्यांना परिणाम माहिती असतात. काही दिवस फार तर तुरुंगात राहायला लागेल यापलीकडे फारसे काही होणार नाही याची त्यांना शाश्वती असते.
बलात्कार झालेल्या मुलींना मात्र घरी-दारी वाईट प्रसंग सहन करावे लागतात. अशा मुलींचे संपूर्ण घरच ह्यात भरडले जाते. तिचे कधीच भरून न येणारे शारीरिक नुकसान आणि प्रचंड मानसिक धक्का या भांडवलावर तिला पुढचे आयुष्य कंठायचे असते. याची कल्पना फक्त त्या अभागी जीवाव्यतिरिक्त इतर कोणाला कशी येणार? सरकार त्यांच्यासाठी आर्थिक आधार देऊ पाहत आहे ही बाब स्वागतार्ह आहे पण मुळातच अशा घटना घडू नयेत यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्याची जबाबदारी मात्र शासन झटकत आहे असे वाटू लागले आहे. काही देशांत अशा बलात्कारींना देहांत शासन अथवा तत्सम इतरांना दहशत बसेल, भय वाटेल असं शासन करण्याची तरतूद आहे पण दुर्दैवाने आमच्या भारत देशात शासन आणि न्यायालये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यास पुरेसे तयारच नाहीत ही अत्यंत खेदजनक आणि समस्त स्री वर्गाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण हे हब्द आपण अनेक वेळा ऐकतो . याची रुजवात प्रत्येक घरापासून होणे अत्यावश्यक आहे. मुलाला आणि मुलीला सारखेपणाने वाढवणे, मुलीचा आत्मविश्वास दृढ करणे, घरातील महिला वर्गाचा आदर करणे, त्यांना मानसिक दृष्ट्या सबल करणे या गोष्टी लहानपणापासूनच बिंबवल्या गेल्या पाहिजेत. शाळेत खालच्या इयत्तेपासून मुलींची शारीरिक क्षमता वाढेल असे प्रशिक्षण त्यांना द्यायला हवे. स्व-संरक्षणाचे धडे त्यांना मिळायला हवेत. प्रसंगी एखादे हत्यार बाळगायची सवलत त्यांना मिळायला हवी. सगळ्या थरांत याचा प्रचार व्हायला हवा. व्यापक पातळीवर या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला हवी. मुलींच्या साठी उभारण्यात आलेल्या विद्यालयात अथवा हॉस्टेल मध्ये स्त्री -शिक्षिका आणि
स्त्री -रेक्टरच हव्यात. अन्यथा या पुढची पिढी आपण स्वत:ला खरोखरच अपत्य होऊ द्यावे का या संभ्रमात पडलेली आपल्याला दिसेल.
आज निवडणुकांच्या उंबरठ्यावर , मग कोणताही पक्ष निवडून सत्तेवर विराजमान होवो , त्या पक्षाने मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेला अग्रक्रम देणे ही युद्धपातळीवर हाती घेण्याची मोहीम आहे हे लक्षात असू द्यावे.
आपण सर्वजण शालेय शिक्षण घेऊन, कॉलेजात जातो, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करू लागतो , यथावकाश संसार थाटतो आणि इतरांप्रमाणे एकदाचे मार्गाला लागतो. या प्रवासात अनेक खड्डे, खाच-खळगे असू शकतात, सगळ्यांचीच वाट सुकर,सोपी नसते. मग अनेक वेळा आपण परिस्थितीला बोल लावतो, चिंतातूर होतो, हतबल होतो, दडपणाखाली वावरू लागतो. समाज हा आपल्याला शत्रू वाटू लागतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आपण तज्ञांचे सल्ले घेत फिरतो. आपले हित कशात आहे हेच आपल्याला कळेनासे होते. आपल्या या घुसमटीला समोरची व्यक्ती वा परिस्थिती जबाबदार आहे हे आपण मनाशी पक्के ठरवून टाकलेले असते. आपण बाहेर उत्तरे शोधत फिरतो जी केवळ आपल्या आतच आपल्याला सापडू शकतात जी आपल्याशी आयुष्याची नव्याने ओळख करून देऊ पाहत असतात.
विचार प्रत्येकजण करतच असतो अगदी समजायला लागल्यापासून! फक्त योग्य विचार कसा करावा याचे बाळकडू आपल्याला मिळालेले नसते. माणसाची विचारप्रक्रिया त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वास्तव घडवत असते. समोरच्या व्यक्तीचे विचार हे आपले विचार असू शकत नाहीत. त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेला विचार हा आपल्या आत झिरपू द्यावा अथवा नाही या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाचे असते. विचार आणि माणसाचे आरोग्य यांचे जवळचे नाते असते. घातक विचार, ऋण अर्थात निगेटिव्ह विचार, नैराश्यजनक विचार आणि निरुपयोगी विचार यांनी आपल्या शरीरातील उर्जेचा ऱ्हास होत असतो. याउलट धन अथवा चांगले विचार, आशावादी विचार यांनी व्यक्तीच्या शरीरातील उर्जा जास्त प्रमाणात स्रवते.
दोन माणसे मोबाईलवर जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ज्या उर्जालहरींमुळे हा संवाद साध्य होतो त्या लहरी कधीच दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा अमुक एक विचार करते त्यावेळी तिच्या विचारानुसार अशा लहरी अवकाशात प्रक्षेपित होत असतात. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार ज्या प्रकारची उर्जा वातावरणात सोडली जाते तीच उर्जा परतून त्या व्यक्तीकडे येत असते. माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा अनुकूल वा प्रतिकूल अशा उर्जेने भरलेला असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे निर्देशित केलेला एखादा विचार त्यातील चांगल्या-वाईट उर्जेसकट त्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याच प्रकारची उर्जा परतून तुमच्याकडे येते.
एखाद्या माणसाची हत्या करण्याआधी ती हत्या विचारांत झालेली असते. एखादा घातपात घडवण्याआधी तो विचारात झालेला असतो. एखादी लढाई प्रत्यक्ष हरण्याआधी ती विचारांतून हरलेली असते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तो आधी मनातील विचारांतून मिळवावा लागतो. दहाव्वीतील आपल्या पाल्याचा रिझल्ट अनेक पालकांनी प्रत्यक्ष परीक्षेआधीच कल्पनेत पाहिलेला असतो. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी याचे क्लासेस जरी आज उपलब्ध नसले तरी तसे साहित्य मात्र जरूर आहे. अनेक रोगांचे मूळ हे मनात केल्या जाणाऱ्या विचारांत असते या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वान आले आहेत.
घातक अथवा निगेटिव्ह विचारांमुळे शरीरातील काही प्रतिकूल हार्मोन्स स्रवू लागतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सतत उदास असणारी माणसे शक्तिपात झाल्यासारखी दिसतात. काही माणसांना सतत काही ना काही तक्रारी करायची सवय असते. मला बरे वाटत नाही, समोरील व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मला समजून घेत नाही, समाज कुठे चालला आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तरुण पिढी ऐकेनाशी झाली आहे अशी कोणतीही कारणे पुढे करून ही माणसे रडत असतात, कुढत असतात आणि स्वत:चे विचार सुधारण्याऐवजी ज्या गोष्टींवर आपले काडीमात्र नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलायची वाट पाहत बसतात.
आपण दैव किंवा प्रारब्ध असे जे काही मानतो ते दुसरे-तिसरे काही नसून आपण अवकाशात सोडलेल्या उर्जेचे परतून येणे असते. जो बाण अवकाशात मारला जातो तोच बाण तीच उर्जा घेऊन जेव्हा आपल्यासमोर येतो त्याला आपण नशीब ही संज्ञा देऊन मोकळे होतो. विचार निवडीचे स्वातंत्र्य आपले असते पण मुळात विचारांची निवड करायची कशी याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपल्याकडून अवकाशात सोडल्या जाणाऱ्या अनुकूल विचार लहरी ही आपल्या आनंदाची, सौख्याची नांदी असते. क्रोध, मत्सर, हेवा, असूया, निंदा या लहरी तीच उर्जा परत आपल्यापर्यंत पोहोचवतात याउलट आनंद, प्रशंसा, प्रेम, वात्सल्य,अनुकंपा,सहिष्णुता या लहरी तीच उर्जा परत आपल्याकडे आणतात. आपण घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, संत -महात्म्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यातील आपल्या विषयीचे प्रेम वा सद्भावना लहरींच्या रुपात आपल्यापर्यंत येउन योग्य ती उर्जा आपल्याला देत असतात.
मनात आलेला वाईट विचार आपल्या दुष्कर्मात भर टाकतो तर सद्विचार सु-कर्मात! अनेक जण म्हणतात, आम्ही काहीच करत नाही, विचार येताच राहतात. पण असे नसते. वाईट विचारांना थोपवण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते आणि प्रयत्नपूर्वक चांगले विचार करण्याची क्षमताही आपल्यात असतेच असते. चुकीचे, नसते,भलभलते विचार करून अनारोग्याला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आमंत्रण द्यायचे की चांगले, सद्विचार मनात रुजवून आपल्या भोवतीचे वातावरण आणि माणसांना आनंदी करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे!
मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण आज दुर्मिळ होत चालले आहे. नवीन नवीन शाळा आणि क्लासेसचे जिथेतिथे नुसते पेव फुटले आहे. भरमसाट फी घ्यायची, चकचकीत शाळेत, एअर कंडीशण्ड वर्गात मुलांना बसवायचे आणि तेच ते चाकोरीतले शिक्षण द्यायचे असा सगळा शिक्षणाचा खेळ चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे बहुतेक शाळा फारसे लक्ष पुरवित नाहीत. शारीरिक विकासाइतकाच मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा आहे हे आज शिक्षण क्षेत्रातील महत्वाची पदे भूषवणारे लोकही विसरून गेले आहेत. मुलांचे शिक्षण हे घरापासून सुरु होत असल्याने मुलांचे पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक असतात. पण वेळेच्या अभावापायी म्हणा किंवा इच्छेच्या अभावापायी पण बहुतांश पालक ही आद्य शिक्षकाची भूमिका निष्ठेने बजावताना दिसत नाहीत. त्यामुळेच की काय शारीरिक आणि भावनिक सक्षमता हरवून बसलेली आणि केवळ पैशालाच परब्रम्ह मानणारी पिढी यापुढे निर्माण होईल की काय अशी शंका मनाला ग्रासू लागली आहे.
मोकळ्या वातावरणात जाणे, सकाळचा अद्वितीय निसर्ग पाहणे, आजूबाजूच्या परिसरातील झाडा-फुलांशी मायेने बोलणे, सूर्योदय पाहणे, आकाशाचे रंग बदलताना डोळ्यांनी टिपणे, मुक्या प्राण्यांशी ममतेने वागणे, संकटग्रस्तांची तत्परतेने मदत करणे, कोणत्याही सामाजिक,आर्थिक स्तरातील माणसाशी शालीनतेने वागणे, त्याच्या व्यवसायाचा यथायोग्य आदर करणे, दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे, घरी पालकांना सर्व प्रकारची मदत करणे या आणि अशासारख्या सवयी आज आपण मुलांना लावतो आहोत का याचा पालकांनी आणि शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची पाळी आली आहे.
प्रदूषणावर शाळेत धडा असतो पण हे प्रदूषण टाळण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे प्रात्यक्षिक मुलांना का दाखवत नाहीत? रस्त्यावर इथेतिथे कचरा टाकू नये ही वृत्ती अंगी बाणण्यासाठी मुलांना शहराच्या, गावाच्या अस्वच्छ भागाची पाहणी करायला नेउन तेथील वातावरण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गैरसोय दाखवणे गरजेचे नाही का? विजेचा,पाण्याचा वापर नियंत्रित कसा करावा हे शिकवणे महत्वाचे नाही का? वृध्द,आजारी माणसाची शुश्रुषा कशी करावी, प्रथमोपचार कसे करावेत, शासनाने पुरविलेल्या शासकीय सुविधांचा लाभ कशा प्रकारे घ्यावा, मानवी मुल्यांची जपणूक कशी करावी, झाडे कशी लावावीत व त्यांची निगा कशी राखावी अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यास शाळा तसेच पालक अनुत्सुक दिसून येतात.
आजकाल मुलांच्या शाळेच्या सहलीही पंचतारांकित हॉटेलात उतरतात. एकंदर पॉश शाळा, हॉटेल्स आणि मॉल्स या सो-कॉल्ड उच्चभ्रू वातावरणात मुले वाढतात पण विकसित होत नाहीत. शिक्षकांनी शिकवलेल्या पाठ्यपुस्तकाच्या धड्यातील उत्तरे पाठ करून परीक्षेत घोकणे याला बुद्धीचा विकास कसे म्हणायचे? भूमितीतील प्रमेये आणि भाषेचे निबंध मुले पाठ करतात केवळ काही मार्कांचे उद्दिष्ट ठेवून! घरी पालकांना वेळ नसल्याने श्लोक वर्ग, संस्कार वर्ग इथे मुलांना बळजबरीने पाठवले जाते, कुत्र्यांच्या, मांजरींच्या पिल्लांना दगड मार, त्यांच्या शेपट्या ओढ, झाडांची पाने, फुले कुस्करून त्यांचा लगदा कर, दुपारच्या वेळी लोकांच्या घराची डोअरबेल वाजवून पळून जा अशा बाललीलांत बरीचशी मुले रमताना दिसतात, सगळ्यात कळस म्हणजे छंद वर्गात मुलांना ढकलणे! चित्रकला-गाणे-नृत्य याकडे आपल्या मुलाचा कल आहे की नाही हे आजमावण्यासाठी हा आटापिटा केला जातो. हे सगळे सातव्या-आठव्या इयत्तेपर्यंत चालते. नववी आणि दहावीत मूल गेले की हे सगळे छंद वर्ग ताबडतोब मुलाला न विचारताच बंद केले जातात. मग अभ्यास एके अभ्यास. तू अमके टक्के मिळव, तुला महागडी वस्तू मिळेल हे आमिष दाखवले की आपली जबाबदारी संपली या भ्रमात अनेक पालक वावरत असतात. नापास झालेल्या मुलांना घरी-दारी अपमान सहन करावा लागतो. तू धुणी-भांडी कर, तू वडा-पावाची गाडी चालव असे मौलिक सल्ले पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दिले जातात त्यांच्या हातात असलेल्या एखाद्या कलेची जराही दाखल न घेता!
आपण माणूस घडवतो आहोत की पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टाकसाळी बनवतो आहोत, आपण भावना-संवेदनांची कदर करणारी पिढी घडवत आहोत की कोरडेठक्क पाषाण घडवत आहोत, आपण दुसरयाला माणुसकीने वागवणारी पिढी घडवत आहोत की दुसऱ्याला सतत निंदनीय, तिरस्करणीय पद्धतीने अवमानित करणारे, अर्वाच्च्य शब्दांनी संबोधणारे, केवळ काही रकमेसाठी समाजातील कार्यनिष्ठ माणसांचा खून पाडणारे, स्त्री-जातीची अब्रू वेशीवर टांगणारे नर-राक्षस घडवत आहोत, आपण निसर्गाचे, प्राणीमात्रांचे मित्र घडवत आहोत की शत्रू, आपण जीवनातील आव्हाने खंबीरपणे स्वीकारणारी पिढी घडवत आहोत की नैराश्याच्या गर्तेत स्वत:ला झोकून आयुष्य पणाला लावणारी, आत्महत्येस प्रवृत्त होणारी, व्यसनांच्या आहारी जाउन स्वत:ला बरबाद करणारी पिढी घडवत आहोत का याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ कधीच येउन ठेपली आहे.