Sunday, 4 December 2016

रैन का सपना .......


पं संजीव अभ्यंकर . मेवाती घराण्याचे एक तरुण, सशक्त गायक. पं जसराज यांचे  संगीत परंपरेचे दायित्व समर्थपणे पेलणारे आणि जनमानसात या घराण्याचे  गाणे अतिशय कौशल्याने प्रवाहित करणारे. संगीतसाधना करणाऱ्या श्रीमती शोभा अभ्यंकर यांचा हा सुपुत्र वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी व्यासपीठावरून पहिले गाणे गायला आणि व्यासपीठाचे आणि त्याचे नाते अतूट झाले. त्याच्या गाण्याची संमोहिनी रसिकांवर त्यांच्याही नकळत पसरली आणि कान तृप्त होऊनही तृषार्तच राहिले, संजीवना अधिकाधिक ऐकण्यासाठी.
संजीवच्या गाण्यात तंत्र आणि माधुर्य यांचा अभूतपूर्व संगम आहे. गाणं केवळ तंत्राच्या आहारी गेलं तर एकवेळ अचूक होतं पण तेवढंच रुक्षही होतं. पण बुद्धी आणि भावना यांचा सुयोग्य मिलाफ असलेलं गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतं. याच पठडीतील गाणं संजीव यांचं आहे. पं भीमसेन जोशी, पुलं , वसंतराव देशपांडे, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून संजीवचं गाणं वाखाणलं गेलं. 
तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा अतीव मृदू आणि तितकाच गोड आवाज, ताना आणि बोलतानांवरील विलक्षण प्रभुत्व, मुद्रेवरील हसरा आणि शांत भाव आणि आत्मविश्वासाने ठासून भरलेलं भावपूर्ण गाणं हे संजीवच्या यशाचं गमक आहे. खळाळत्या झऱ्याचं सौंदर्य,  सळसळत्या हिरव्यागार पानांचा उत्साह आणि कोवळ्या रेशमी किरणांची ओजस्विता म्हणजे  संजीवचं गाणं. 
ललत रागातील 'रैन का सपना' असो वा मधुकौंस मधील ये ऋत'रुसवे की नाही' असो वा 'शाममुरारी बनवारी गिरिधारी' ही पुरियाधनाश्री रागातील बंदिश असो, एकेक राग हळुवारपणे उलगडत नेण्याचं संजीवचं कसब  निव्वळ लाजबाब! ध्यान लागले रामाचे किंवा यासारखी भक्तिरसाने ओथंबलेली त्यांची कैक गीते अध्यात्म्याच्या गाभ्याला अलवार स्पर्श करतात. तू असतीस तर'' सारखे त्यांनी गायलेले भावगीतंही लक्षणीय. 
जसराजजी संजीवचं गाणं ऐकताक्षणी म्हणाले की हा मागच्या जन्मातील गाणं गातो आहे. एखाद्या गवैय्याची मागील जन्माची ख्वाईश जणू संजीवच्या गळ्यातून पूर्ण होतेय. असेलही. एका आयुष्यात कधीही संपूर्णपणे प्राशन न करता येणारा हा संगीताचा विराट समुद्र आहे. त्यामुळे हे पूर्वजन्मीचे सांगीतिक तरंग आणि  लाटा बरोबर  घेऊनच संजीव याजन्मीच्या किनाऱ्याला लागले असतील कुणी सांगावे. 
 असेच स्वच्छ, नितळ गाणे संजीवनी अव्याहतपणे गात राहावे आणि रसिकश्रोत्यांनी तितक्याच अव्याहतपणे ते हृदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे बंदिस्त करत राहावे अशी ईश्वरी योजना असावी असे प्रकर्षाने वाटते.

No comments:

Post a Comment