समस्त पुरुषी मानसिकतेला आव्हान देणारा असा हा चित्रपट आहे. मुली जास्तीत जास्त काय करू शकतात हा अहंगंड जोपासणाऱ्या सो कॉल्ड पुरुषी प्रवृत्तीला या निमित्ताने दिलेलं हे चोख उत्तर आहे. आखाड्यात उतरण्यासाठी मुलगा हवा अशी स्वाभाविक इच्छा असणाऱ्या महावीरसिंग फोगट यांना एकापाठोपाठ एक अशी चार कन्यारत्न होतात आणि तेवढ्यापुरता त्यांचा हिरमोड होतो. पण एका प्रसंगा नंतर आपल्या मुलींच्या रक्तातच पहिलवानकी आहे याचा साक्षात्कार महावीरना होतो आणि पहिल्या दोन मुलींना आखाड्यात उतरवण्यासाठी महावीर शर्थ करतात. यथावकाश त्यांच्या मुली त्यांच्याकडून कुस्ती आत्मसात करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय संपादन करतात. ही दंगल या चित्रपटाची शौर्यगाथा आहे. या चित्रपटात एक वाक्य असे आहे की "दंगल लढने से पहले डर से लढना जरुरी है". हे वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. ही दंगल मनाच्या आखाड्यातही पूर्ण ताकदीनिशी लढली गेली पाहिजे. शौर्य हे केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवणं प्रत्येक वेळी अपेक्षित नसतं तर ते दैनंदिन आयुष्यातही दाखवता यायला हवं.
आपण कुठेतरी या पुरुषांपेक्षा कमी आहोत, कमजोर आहोत ही भावना उरीपोटी बाळगून आज वर्षानुवर्षे मुली दुय्यम अथवा कमी महत्वाचं आयुष्य जगत आल्या आहेत. कौटुंबिक स्तरावर चाललेली तुलना सहन करत आल्या आहेत. वडिलांची, नवऱ्याची मारझोड तोंडातून अवाक्षर न काढता सोसत आल्या आहेत. पाशवी अत्याचाराला बळी पडत आल्या आहेत. केवळ मुलीचा जन्म म्हणून नीतिनियमांचा दाखवलेला बडगा मानत आल्या आहेत.
खाणंपिणं, शिक्षण, सोयीसुविधा, समारंभ, कौटुंबिक सवलती, छंद या आणि अशा सगळ्याच बाबतीत मुलगी असो वा स्त्री तिला काहीनाकाही तडजोड ही करावी लागतेच! लग्नांनंतर मुलीचं अवघं विश्वच जणू बदलून जातं. नवरा किंवा सासरचे विरोध करतात म्हणून मग अनेक मुलींची शिक्षणं थांबतात, छंद मागे पडतात. पदरी मूल आले की तिला दुसरे जगच उरत नाही. हल्ली हे चित्र कदाचित काही टक्क्यांनी बदलले असले तरी आजमितीलाही अनेक मुली आणि स्त्रिया ही मानसिक घुसमट, मुस्कटदाबी सहन करत आहेत. पूर्वी नुसतीच हक्काची मोलकरीण हवी होती, आज कमाऊ मोलकरीण हवी आहे.
स्वातंत्र्य ही गोष्ट जणू स्त्रीशी निगडीतच नाही अशा अविर्भावात काही पुरुष वावरत असतात. लग्नाआधी व लग्नानंतर आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य किती स्त्रियांना मिळत याची टक्केवारी बरेच काही सांगू शकेल. कळसूत्री बाहुली म्हणून स्व-स्त्रीला वागवणारे अनेक महाभाग आजही अस्तित्वात आहेत. आणि हे फक्त ग्रामीण भागात नाही तर आधुनिकतेचा वास असणाऱ्या शहरातही आढळून येतंय.
मुलगी म्हणजे हातावरचा निखारा, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे जीवाला घोर, मुलगी म्हणजे अहोरात्र टांगती तलवार असे एकाहून एक अतिशय फडतूस समज अजूनही लोकांनी मनात बाळगले आहेत. त्यांना सतत खतपाणी घालत आले आहेत. कर्व्यांनी स्त्री-शिक्षणाची बीजे यासाठी रोवली होती का? यासाठी सावित्रीबाई फुले यांनी शेणगोळे झेलले होते का? उत्तम शिकलेल्या पण आयुष्यात काहीही साध्य न करता आलेल्या स्त्रिया भरपूर आहेत.परिस्थितीने ग्रासलेल्या व सक्तीने त्रासलेल्या मुली आणि स्त्रिया संख्येने अजिबात कमी नाहीत.
जशा आपल्या अजोड कर्तृत्वाने तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या पण हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया आहेत तितक्याच केवळ धैर्याचे बाळकडू न मिळाल्याने मनासारखं आयुष्य जगता येत नाही म्हणून नैराश्यापोटी मृत्यूला जवळ करणाऱ्या सुद्धा आहेत. स्त्री आणि पुरुष अशी सरधोपट वर्गवारी करून आणि शारीरिक बळाचा वापर करून मुलीच्या अथवा स्त्रीच्या प्रगतीस खीळ ठोकण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या पुरुषांना जोवर मनाच्या आखाड्यात पराभूत केलं जाणार नाही तोवर ही क्रांती होणे शक्य नाही.
म्हणूनच ज्या क्षणी मनाच्या मैदानातील ही लढाई मुली व स्त्रिया जिंकतील, त्या क्षणी गीता आणि बबिताची ही शौर्यगाथा खऱ्या अर्थाने पुढे प्रवाहित होईल.
No comments:
Post a Comment