Wednesday, 28 December 2016

एक आग सी वो दिल में ..............


एक आग सी वो दिल में लगाकर चले गये|
हसते हुए निगाहें झुकाकर चले गये |  किंवा

मेरे आसूओ पे नजर न कर 
मेरा शिकवा सुनके खफा न हो
उसे जिंदगी का भी हक नहीं
जिसे दर्द-ए-इष्क मिला न हो |       किंवा

हर नयी शाम सितारों के दिये जलते है
और मेरे दिल में में कई  गीत मचल जाते है |

या युनूस मलिक यांनी स्वरबद्ध केलेल्या गझला सुमनच्या गळ्यातून अप्रतिम साकारल्या आहेत. वरील तीन गझला फक्त वानगी दाखल आहेत. मराठी भाव-भक्तिगीतांच्या प्रांगणात आणि हिंदी चित्रपटातील मोजकी गाणी ज्या गायिकेच्या नावावर आहेत त्या सुमन कल्याणपूर या गायिकेने या आणि अशा बऱ्याच गझला ज्या ताकदीने गायल्या आहेत त्याला तोडच नाही.
ढाक्यातील मलमलच्या तलम वस्त्राप्रमाणे तलम सूर गळ्यात घेऊन सुमन इथे आली आणि तलत मेहमूद या गायकाने तिच्यातील गायिकेला जोखलं. पुढे तिला अनेक हिंदी,मराठी तसेच इतर भाषांमध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली आणि काही गाणी तिच्या नावावर नोंदली गेली. ना ना करते प्यार, न तुम हमें जानो, दिल एक मंदिर है, अजहून आये बालमा, आजकल तेरे मेरे  प्यार के चर्चे   अशी हिंदी गाणी तसेच कशी करू स्वागता, जेथे सागरा, झिमझिम झरती, केतकीच्या बनी तिथे, देवा दया तुझी की, भक्तीच्या फुलांचा , तुझ्या कांतीसम रक्तपताका, मी चंचल होऊन आले अशी काही मराठी गीते सुमन ने लोकप्रिय केली.   
तिच्या गळ्यातील ताकदीच्या मानाने जी काही गाणी तिच्या वाट्याला आली ती तशी संख्येने कमीच आहेत असे म्हणायला अजिबात हरकत नसावी. ती सतत लताची रिप्लेसमेंट म्हणून ओळखली गेली. तिच्या नावावरील  बरीच गाणी तिच्या आणि लताच्या आवाजातील साधर्म्यामुळे लताच्या नावावर नोंदली गेली. नंतर अनेक वर्षे सुमन या गायनाच्या क्षेत्रापासून दूर निघून गेली.  काही महिन्यांपूर्वी  you tube वर सुमनसुगंध या कार्यक्रमात तिला आपको दिल में बिठा लुं तो चले जाईयेगा हे गाताना ऐकले आणि मनात आठवणी दाटून आल्या.तिच्या नावाला कीर्तीने, प्रसिद्धीने कधी झपाटले नाही. तिचे नाव मोजक्याच कानांना माहित झाले.
युनूस मलिक नावाच्या संगीतकाराने तिच्या गाण्यातील क्षमता ओळखली आणि या गझला गाण्यासाठी तिची निवड केली. बैठकीच्या गझला गाण्यासाठी आवश्यक तो गळ्याचा पोत तिला लाभलेला नसूनही ती त्या अनुपमेय गायली. गझलांमधील दर्द तिने सहीनसही पोहोचवला. सुरांच्या अनवट लड्या तिने सौंदर्याने  नटवल्या. सुरांच्या लोभस सान्निध्यात तिने गझलेचे एक एक वस्त्र रेशमी केले आणि एक वेगळी सुमन या सर्व गझलांमधून भेटत गेली.
आजही अनेकांना सुमन कल्याणपूर या नावाची आणि तिच्या वसलेल्या गायिकेची खरी ओळख पटलेली नाही. पण एकदा या गझला कानावर पडल्या की मग या नावाची आणि त्या गझलांची जन्मभराची ओळख होईल हे नक्की!
तिच्या अलौकिक सुरांचे सान्निध्य असेच आम्हा तुषार्त रसिकांना कायमचे लाभो हीच इच्छा!

Saturday, 24 December 2016

दंगल' च्या निमित्ताने ..........


समस्त पुरुषी मानसिकतेला आव्हान देणारा असा हा चित्रपट आहे. मुली जास्तीत जास्त काय करू शकतात हा अहंगंड जोपासणाऱ्या सो कॉल्ड पुरुषी प्रवृत्तीला या निमित्ताने दिलेलं हे चोख उत्तर आहे. आखाड्यात उतरण्यासाठी मुलगा हवा अशी स्वाभाविक इच्छा असणाऱ्या महावीरसिंग फोगट यांना एकापाठोपाठ एक अशी चार कन्यारत्न होतात आणि तेवढ्यापुरता त्यांचा हिरमोड होतो. पण एका प्रसंगा नंतर आपल्या मुलींच्या रक्तातच पहिलवानकी आहे याचा साक्षात्कार महावीरना  होतो आणि पहिल्या दोन मुलींना आखाड्यात उतरवण्यासाठी महावीर शर्थ करतात. यथावकाश त्यांच्या मुली त्यांच्याकडून कुस्ती आत्मसात करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय संपादन करतात. ही दंगल या चित्रपटाची शौर्यगाथा आहे. या चित्रपटात एक वाक्य असे आहे की "दंगल लढने से पहले डर से लढना जरुरी है". हे वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. ही दंगल मनाच्या आखाड्यातही पूर्ण ताकदीनिशी लढली गेली पाहिजे. शौर्य हे केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवणं प्रत्येक वेळी अपेक्षित नसतं तर ते दैनंदिन आयुष्यातही दाखवता यायला हवं. 
आपण कुठेतरी या पुरुषांपेक्षा कमी आहोत, कमजोर आहोत ही भावना उरीपोटी बाळगून आज वर्षानुवर्षे मुली दुय्यम अथवा कमी महत्वाचं आयुष्य जगत आल्या आहेत. कौटुंबिक स्तरावर चाललेली तुलना सहन करत आल्या आहेत. वडिलांची, नवऱ्याची मारझोड तोंडातून अवाक्षर न काढता सोसत आल्या आहेत. पाशवी अत्याचाराला बळी पडत आल्या आहेत. केवळ  मुलीचा जन्म म्हणून नीतिनियमांचा दाखवलेला बडगा मानत आल्या आहेत.
खाणंपिणं, शिक्षण, सोयीसुविधा, समारंभ, कौटुंबिक सवलती, छंद या आणि अशा सगळ्याच बाबतीत मुलगी असो वा स्त्री तिला काहीनाकाही तडजोड ही करावी लागतेच! लग्नांनंतर मुलीचं अवघं विश्वच जणू बदलून जातं. नवरा किंवा सासरचे विरोध करतात म्हणून मग अनेक मुलींची  शिक्षणं थांबतात, छंद मागे पडतात. पदरी मूल आले की तिला दुसरे जगच उरत नाही. हल्ली हे चित्र कदाचित काही टक्क्यांनी बदलले असले तरी आजमितीलाही अनेक मुली आणि स्त्रिया ही मानसिक घुसमट, मुस्कटदाबी सहन करत आहेत. पूर्वी नुसतीच हक्काची मोलकरीण हवी होती, आज कमाऊ मोलकरीण हवी आहे.  
स्वातंत्र्य ही गोष्ट जणू स्त्रीशी निगडीतच नाही अशा अविर्भावात काही पुरुष वावरत असतात. लग्नाआधी व लग्नानंतर आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य किती स्त्रियांना मिळत याची टक्केवारी बरेच काही सांगू शकेल. कळसूत्री बाहुली म्हणून  स्व-स्त्रीला  वागवणारे अनेक महाभाग आजही अस्तित्वात आहेत. आणि  हे फक्त ग्रामीण भागात नाही तर आधुनिकतेचा वास असणाऱ्या शहरातही आढळून येतंय. 
मुलगी म्हणजे हातावरचा निखारा, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे जीवाला घोर, मुलगी म्हणजे अहोरात्र टांगती तलवार असे एकाहून एक अतिशय फडतूस समज अजूनही लोकांनी मनात बाळगले आहेत. त्यांना सतत  खतपाणी घालत  आले आहेत. कर्व्यांनी स्त्री-शिक्षणाची बीजे यासाठी रोवली होती का? यासाठी सावित्रीबाई फुले यांनी शेणगोळे झेलले होते का? उत्तम शिकलेल्या पण आयुष्यात काहीही साध्य न करता आलेल्या स्त्रिया भरपूर आहेत.परिस्थितीने ग्रासलेल्या व सक्तीने त्रासलेल्या मुली आणि स्त्रिया संख्येने अजिबात कमी नाहीत.  
जशा आपल्या अजोड कर्तृत्वाने तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या पण हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया आहेत तितक्याच केवळ धैर्याचे बाळकडू न मिळाल्याने मनासारखं आयुष्य जगता येत नाही म्हणून नैराश्यापोटी मृत्यूला जवळ करणाऱ्या सुद्धा आहेत. स्त्री आणि पुरुष अशी सरधोपट वर्गवारी करून आणि शारीरिक बळाचा वापर करून मुलीच्या अथवा स्त्रीच्या प्रगतीस खीळ ठोकण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या पुरुषांना जोवर मनाच्या आखाड्यात पराभूत केलं जाणार नाही तोवर ही क्रांती होणे शक्य नाही.     
म्हणूनच ज्या क्षणी मनाच्या मैदानातील ही लढाई मुली व स्त्रिया जिंकतील, त्या क्षणी गीता आणि बबिताची ही शौर्यगाथा खऱ्या अर्थाने पुढे प्रवाहित होईल.        


Sunday, 4 December 2016

रैन का सपना .......


पं संजीव अभ्यंकर . मेवाती घराण्याचे एक तरुण, सशक्त गायक. पं जसराज यांचे  संगीत परंपरेचे दायित्व समर्थपणे पेलणारे आणि जनमानसात या घराण्याचे  गाणे अतिशय कौशल्याने प्रवाहित करणारे. संगीतसाधना करणाऱ्या श्रीमती शोभा अभ्यंकर यांचा हा सुपुत्र वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी व्यासपीठावरून पहिले गाणे गायला आणि व्यासपीठाचे आणि त्याचे नाते अतूट झाले. त्याच्या गाण्याची संमोहिनी रसिकांवर त्यांच्याही नकळत पसरली आणि कान तृप्त होऊनही तृषार्तच राहिले, संजीवना अधिकाधिक ऐकण्यासाठी.
संजीवच्या गाण्यात तंत्र आणि माधुर्य यांचा अभूतपूर्व संगम आहे. गाणं केवळ तंत्राच्या आहारी गेलं तर एकवेळ अचूक होतं पण तेवढंच रुक्षही होतं. पण बुद्धी आणि भावना यांचा सुयोग्य मिलाफ असलेलं गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतं. याच पठडीतील गाणं संजीव यांचं आहे. पं भीमसेन जोशी, पुलं , वसंतराव देशपांडे, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून संजीवचं गाणं वाखाणलं गेलं. 
तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा अतीव मृदू आणि तितकाच गोड आवाज, ताना आणि बोलतानांवरील विलक्षण प्रभुत्व, मुद्रेवरील हसरा आणि शांत भाव आणि आत्मविश्वासाने ठासून भरलेलं भावपूर्ण गाणं हे संजीवच्या यशाचं गमक आहे. खळाळत्या झऱ्याचं सौंदर्य,  सळसळत्या हिरव्यागार पानांचा उत्साह आणि कोवळ्या रेशमी किरणांची ओजस्विता म्हणजे  संजीवचं गाणं. 
ललत रागातील 'रैन का सपना' असो वा मधुकौंस मधील ये ऋत'रुसवे की नाही' असो वा 'शाममुरारी बनवारी गिरिधारी' ही पुरियाधनाश्री रागातील बंदिश असो, एकेक राग हळुवारपणे उलगडत नेण्याचं संजीवचं कसब  निव्वळ लाजबाब! ध्यान लागले रामाचे किंवा यासारखी भक्तिरसाने ओथंबलेली त्यांची कैक गीते अध्यात्म्याच्या गाभ्याला अलवार स्पर्श करतात. तू असतीस तर'' सारखे त्यांनी गायलेले भावगीतंही लक्षणीय. 
जसराजजी संजीवचं गाणं ऐकताक्षणी म्हणाले की हा मागच्या जन्मातील गाणं गातो आहे. एखाद्या गवैय्याची मागील जन्माची ख्वाईश जणू संजीवच्या गळ्यातून पूर्ण होतेय. असेलही. एका आयुष्यात कधीही संपूर्णपणे प्राशन न करता येणारा हा संगीताचा विराट समुद्र आहे. त्यामुळे हे पूर्वजन्मीचे सांगीतिक तरंग आणि  लाटा बरोबर  घेऊनच संजीव याजन्मीच्या किनाऱ्याला लागले असतील कुणी सांगावे. 
 असेच स्वच्छ, नितळ गाणे संजीवनी अव्याहतपणे गात राहावे आणि रसिकश्रोत्यांनी तितक्याच अव्याहतपणे ते हृदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे बंदिस्त करत राहावे अशी ईश्वरी योजना असावी असे प्रकर्षाने वाटते.