Sunday, 12 October 2014

कोणाचे राज्य येणार?




विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर येउन ठेपल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकांत धुव्वा उडालेले पक्षही नव्या जोमाने प्रचार करत आहेत. जाहिराती, घोषवाक्ये, वचननामे, चर्चा या अगदी शिगेला पोहोचल्या आहेत. सर्वच पक्ष या वेळी सोशल मीडियाचा  जास्तीत जास्त अवलंब करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर युती आणि आघाडी तुटल्याने या वेळची लढत पंचरंगी होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मते विचारली जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी इतकी वर्षे काय केलं याचा हिशेब इतर पक्षांकडून मागितला जातो आहे. त्या त्या पक्षाचे उमेदवार आपापला मतदारसंघ प्रचाराने ढवळून काढत आहेत. जाहिरातींवर वारेमाप पैसा खर्च केला जातो आहे. शिवाय लोकांमध्ये वाटण्यासाठी म्हणून कोट्यावधी रुपयांच्या थैल्या सैल केल्या जात आहेत. दारू-मटणाच्या पार्ट्यांची झोड उठवली जाते आहे. ठिकठिकाणी सभा घेऊन नेत्यांकडून आपल्या पक्षाची ताकद आजमावली जाते आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन होते आहे. प्रचाराच्या सभेत कोणतेही ताळतंत्र न ठेवता दुसऱ्या पक्षाची किंवा नेत्यांची निंदानालस्ती  केली जाते आहे. नेत्यांची लायकी, त्यांची अक्कल चव्हाट्यावर येते आहे. स्वत:च्या पक्षाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी इतरांचे चारित्र्य हनन करण्याचा मार्ग सगळेच पक्ष अवलंबत आहेत.  आम्ही यंव करू नी त्यंव करू ही आश्वासने रोज सामान्यांच्या कानावर आदळत आहेत. प्रत्येक नेता आपापल्या भाषणात शत्रू पक्षातील नेत्याचा खरपूस समाचार घेतो आहे. त्याची लफडी कुलंगडी बाहेर काढतो आहे. विधानसभा निवडणुकांचे हे चित्र विधायक मानावे की विदारक मानावे या संभ्रमात मतदार वावरताना दिसतो आहे. 
रस्त्यावरील प्रचंड खड्डे, डोळ्यांत पाणी आणणारी महागाई, वीज-पाणी टंचाई, शिक्षणाचा व शिक्षण सुविधांचा बोजवारा,  मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेकारी, आर्थिक-सामाजिक  विषमता, रस्त्यावर, रेल्वे रुळांवर होणारे अपघात, कायद्याचे उल्लंघन करून त्यातून सहीसलामत सुटणारे समाजकंटक, कुपोषण, मुक्या प्राण्यांच्या हत्या, तस्करी, भ्रष्टाचार, पोलिसांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच त्यांच्यावर पडणारा कामाचा प्रचंड ताण, सामान्यांना नडून त्यांचे खिसे रिकामे करणारे समाजातील प्रतिष्ठित घटक, चोऱ्या-दरोडे-खून-अपहरण, लाचलुचपत, वाढत्या लोकसंख्येला आळा, परप्रांतीयांचे लोंढे, प्रदूषण, असामाजिक तत्वांचे राष्ट्रावर होणारे आक्रमण,  दुर्बल घटकांचे शोषण या व अशा असंख्य प्रश्नांचे विक्राळ रूप आजमितीला जनतेसमोर उभे आहे. या जीवघेण्या जगण्याच्या शर्यतीत मरण स्वस्त वाटते आहे म्हणून त्याला कवटाळण्याची मानसिकताही वाढत चालली आहे. परिस्थितीला कंटाळून शेतकरी  आत्महत्या करत आहेत, शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून अनेक मुले स्वत:ला संपवीत आहेत,  अतिरिक्त ताण सहन न झाल्याने पोलिस मृत्यूला कवटाळत  आहेत, अनेक केसेस आज कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, बलात्कारित मुलगी म्हातारी होऊन मरण्याआधी तरी  न्याय मिळावा म्हणून कोर्टाच्या निकालाकडे डोळे लावून बसली आहे. 
वरील सर्व  विषयांकडे गांभीर्याने पाहणारा नेता लोकांना हवा आहे. झटापट निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता लोकांना हवा आहे. जाती-वर्ण-वर्ग यांना न जुमानता समाजातील सगळ्या घटकांकडे समान दृष्टीने पाहणारा व त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा नेता लोकांना हवा आहे. मूल्याधारित, तत्वाधारित शिक्षणाची कास धरणारा आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाचा आग्रह धरणारा नेता लोकांना हवा आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारा संवेदनशील नेता लोकांना हवा आहे. लोकांना मरण्यासाठी नव्हे तर आनंदाने, सन्मानाने जगण्यासाठी प्रवृत्त करणारा नेता लोकांना हवा आहे.   
केवळ निवडणुकांपुरती भरमसाट आश्वासने देऊन निवडून आल्यानंतर जनतेचा विश्वासघात करणारा आणि पाच वर्षात स्वत:च्या पुढील सात पिढ्यांचे कल्याण करणारा नेता लोकांना नको आहे. आय-बहिणींची अब्रू सर्रास वेशीवर टांगली जात असताना स्वत:ची असमर्थता दाखवून त्यांना वर्षानुवर्षे कोर्टाचे उंबरठे झिजवण्या शिवाय पर्याय नाही असे मुर्दाड मनाने सांगणारा नेता लोकांना नको आहे.  गरिबांचे भूखंड बळकावून त्यांना बेघर करून जिणे  नको करणारा नेता लोकांना नको आहे. जाती-जमाती वरून दंगे पेटवून जनतेच्या मनात परजाती विषयी विष कालवणारा नेता लोकांना नको आहे. केवळ शहरांचा विकास आणि खेड्यांत अंधार अशा संकुचित विचारांनी पछाडलेला नेता लोकांना नको आहे. 
मनाने सक्षम, विचाराने  प्रगत आणि आचाराने कृतीशील अशा नेतृत्वाची आज या महाराष्ट्राला आत्यंतिक गरज आहे. 
अशा खंबीर नेतृत्वाने या महाराष्ट्राचा कारभार हाती घ्यावा आणि जनतेला नैतिक आधार द्यावा ही  मतदार राजाच्या मनातील इच्छा सुफळ संपूर्ण होऊ दे एवढीच त्या परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना!
  

No comments:

Post a Comment