जे जे पाहिले आणि अनुभवले, त्या क्षणांनी भरलेली ओंजळ लेखणीतून रिती करत वाचकांच्या मनाशी संवाद साधत आले. माझ्या ब्लॉग लेखनाला 10 वर्षे पूर्ण झाली. वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. हीच कृतज्ञता माझ्या लेखनातून अशीच सातत्याने वाचकांशी संवाद साधत राहील ...............
एखाद्या मुलीवर, स्त्रीवर अत्याचार घडतो आणि मग जळी -स्थळी -काष्ठी -पाषाणी त्या घटनेची मीमांसा होते. मुलांच्या, मुलींच्या स्त्रियांच्या, पुरुषांच्या घोळक्यातून याच चर्चा ऐकू येतात. सरकार, पोलिस, कायदा या सर्व घटकांवर आगपाखड सुरु होते. दिवस अतिशय वाईट आलेले आहेत, बाहेर वावरण्याचीही भीती वाटू लागली आहे, या देशाचे काय होणार आहे कुणास ठाऊक, पुढील पिढीचे भवितव्य कठीण आहे वगैरे वगैरे वाक्ये कानी पडत राहतात. प्रश्न उभे राहतात आणि उत्तरे मात्र दुरान्वयानेही दृष्टीपथात येत नाहीत. मुलीवर,स्त्रीवर अत्याचार झाला की आरोपी शोधा आणि तुरुंगात डांबा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करा, वांझोट्या चर्चांचे रान उठवा आणि परत अशा एखाद्या घटनेची सतत चिंता वाहत आलेला दिवस ढकला हेच चित्र कमी-जास्त फरकाने सगळीकडे पाहायला मिळते. पण या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी दडलेली आहे मानसिकता. ती बदलायची तर आहे पण नक्की कोणत्या मार्गाने हे समजत नाही. मुलांच्या-मुलींच्या जडणघडणीसाठी एक विशिष्ट वय असते. घरात आई-वडील तर शाळेत शिक्षक हे मुलांचे मार्गदर्शक असतात. मुलांची प्रेरणास्थाने असतात. आजूबाजूच्या परिस्थितीचे, समाजाचे आघात मुलांच्या कोवळ्या मनांवर होण्याआधीच त्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक या पालकांनी तसेच शिक्षकांनी करणे अत्यावश्यक आहे. या मुलांची किंवा मुलींची ठराविक वैचारिक बैठक पक्की होण्याआधीच त्यांना निकोप मानसिक आरोग्याचे बाळकडू या आदरस्थानांकडून मिळणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या हिंस्त्र, वासना उद्दीपित करणाऱ्या साधनांपासून या मुलांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे नितांत आवश्यक आहे. या जगात पैशापेक्षाही मानवता अधिक महत्वाची आहे हा सु-विचार मुलांच्या मनावर सातत्याने ठसवला जायला हवा. पर्यावरणाची काळजी, मुक्या प्राण्यांबद्दल जिव्हाळा, वृद्धांबद्दल यथोचित आदर, संकटप्रसंगी दुसरयाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, मुलांच्या मनात स्त्री-जातीबद्दल आदर, मुलींच्या मनात समाजात वावरण्याची निर्भयता या गोष्टी शाळेतूनच शिकवल्या जायला हव्यात. ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेता येईल अशा थोर व्यक्तींची जीवनचरित्रे दृक-श्राव्य माध्यमाद्वारे मुलांना दाखवायला हवीत. प्रत्येक मुलाच्या मनात सहिष्णू भाव रुजायला हवा व त्यासाठी घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी आपले सक्रिय योगदान द्यायला हवे. पूर्वी मुले गुरूगृही घडत असत. घर आणि समाज यांपासून ही मुले कैक योजने दूर असत. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या विचारांपासून विचलित करणारी माध्यमे वा प्रलोभने नसायची. गुरुवर्यांच्या नजरेसमोर ही मुले संस्कारित होत असत. त्यामुळे गुरूचा उत्तम प्रभाव या मुलांवर पडत असे. अशी मुले मग मोठी होऊन समाजात मिसळल्यानंतर एक चांगला मानसिक प्रवाह घेऊन वावरायची. त्यांची वैचारिक बैठक गुरूगृही पक्की झालेली असायची. म्हणजे त्यावेळी समाजविघातक कृत्ये व्हायची नाहीत असे नाही परंतु त्याचे प्रमाण मात्र नगण्य असायचे. आज समाजाचे विदारक चित्र आपल्याला दिसते आहे पण ते बदलण्याची गरज किती जणांना मुळापासून वाटते हे महत्वाचे आहे. वडील-मुलगी, काका-पुतणी, मामा-भाची, आजोबा-नात ,भाऊ-बहिण या नात्यांमधील पावित्र्य नष्ट होताना आज दिसते आहे. माणसे हिंस्त्र बनत चालली आहेत. केवळ काही पैशांसाठी समाजातील चांगल्या माणसांना नष्ट करण्याचा घाट घाटला जातो आहे. कृतिशीलता कमी होऊन शिथिलता वाढली आहे. आज माणसांची यंत्रे घराघरातून टाकसाळीचे काम करत आहेत. मुले पालकांच्या अस्तित्वाला, प्रेमाला वंचित होत चालली आहेत. मुलांवर चांगले संस्कार करायला ना पालकांना वेळ आहे ना शाळेतील गुरुजनांना! मुले सुख शोधण्याच्या भरात यंत्रांतून मिळणारे बरे-वाईट ज्ञान त्यांच्या मनात भरून घेत आहेत. चांगले काय, वाईट काय याविषयी मार्गदशन करणारे पैशामागे धावत सुटले आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना अनेक उत्तमोत्तम, उंची साधने खरेदी करून द्यायची आहेत, त्यांना परदेशवारयांना घेऊन जायचे आहे, मुलांना येणारे एकाकीपण, नैराश्य काही यांत्रिक साधनांनी किंवा पर्यटन करायला नेउन घालवायचे आहे. त्यांच्या मूळ गाभ्यावर कोणतेही आवश्यक संस्कार न करता! बाहेरील अनावश्यक खाण्याने मुलांचे शारीरिक आरोग्य ढासळते आहे आणि आवश्यक त्या संस्काराअभावी त्यांचे मानसिक आरोग्यही उतरणीला लागले आहे. स्त्रीत्व आणि पौरुष यांविषयीच्या चुकीच्या व्याख्या समाजमनात बिंबल्या आहेत. या व्याख्या बदलण्याची गरज समाजाला वाटते काय हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. कलियुगात असेच होणार असे अकलेचे तारे तोडणारे महाभागही भरपूर आहेत. गतानुगतिक समजांनी समाज आज अगतिक, हतबल झाला आहे. पण हे चित्र बदलावयाचे असेल तर जात-धर्म-लिंग-वय-प्रांत या घटकांना बाजूला सारून मुळापासून काही करण्याची गरज भासणार आहे. योगक्रिया, आत्मसंयमन याद्वारे मुलांना लहानपणीच मानसिक दृष्ट्या सशक्त,सक्षम करण्याची गरज आहे. चांगल्या,शुध्द विचारांचे बीज मुलांच्या कोवळ्या, संस्कारक्षम मनात रुजवण्याची गरज आहे. आहारानुसार विचार बनतो आणि विचाराप्रमाणे आचार बनतो. म्हणूनच सात्विक, सकस आहार आणि उत्तम विचारांचे खतपाणी घालून मुलांचे आचरण सुयोग्य बनवणे हि तुम्हा-आम्हा सर्व समाजघटकांची सामुहिक जबाबदारी आहे. तर आणि तरच उद्याच्या सुरक्षित समाजाची हमी देता येईल.
वर्तमानपत्र आणि टी. व्हीच्या अनेक वाहिन्यांवर हेडलाईन्स या मथळ्याखाली महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराचे किस्से जवळजवळ दररोज झळकत आहेत. इतक्या पराकोटीच्या उद्वेगजनक घटना राजरोस घडताना शासन आणि कायदयाची अंमलबजावणी करणारे मात्र या विकृत अत्याचारी घटकांना अत्यंत कडक किंवा कठोर शिक्षा सुनावताना दिसत नाहीत किंबहुना त्यांना शिक्षा देण्यातच अक्षम्य दिरंगाई होते आहे ही शरमेची आणि निंदनीय तसेच असमर्थनीय गोष्ट आहे. समाजातील या विकृत घटकांबद्दल समस्त जनमानसात एक प्रक्षोभ आहे. वेळोवेळी निदर्शने, मोर्चे काढून त्याचे प्रकटीकरण झाले आहे. मुंबई असो वा दिल्ली, शहर असो वा खेडे एकूणच लहान मुली, महिला यांच्या सुरक्षित विश्वाला केव्हा टाचणी लागेल आणि त्यांची अब्रू वेशीवर कधी टांगली जाईल याचा नेम नाही. मग अशी बीभत्स घटना घडली की लोकक्षोभाला आवरण्यापुरती आश्वासने द्यायची, त्यांच्या संरक्षणाची पोकळ हमी द्यायची हे धोरण शासनाकडून अव्याहत चालू राहिले आहे. दिल्ली इथे घडलेल्या निर्भयाच्या केसची पुढील प्रगती काय आहे हे कोणी सांगू शकेल का? आरोपी नुसते गजाआड होताना दिसतात पण मुळात त्यांना कोणतीही सज्जड, अद्दल घडवणारी शिक्षा मिळताना दुर्दैवाने दिसत नाही. ते चार भितींमध्ये सरकारचे जावई बनून पाहुणचार घेत असतात. हे स्त्रियांच्या शीलावर घाला घालणारे अशिक्षित, बेकार, बेरोजगार तरुण मस्तपैकी फुकाचे उदरभरण करत असतात. सुनावणी, तारीख, वाद-प्रतिवाद असे कोर्ट-कचेऱ्यांत वापरले जाणारे शब्द लोक कधीतरी वाचतात आणि खटला फक्त चालू असल्याची माहिती समजू शकते पण यापलीकडे जाऊन अशा बलात्कारी आरोपींना प्रत्यक्ष जबरदस्त शिक्षा मिळालेली अजूनतरी दृष्टीपथात यायची आहे. का शासन या आरोपींना कठोर शिक्षा द्यायला असमर्थ आहे? समाजहिताच्या किंवा स्त्री-हिताच्या दृष्टीने असा एखादा कायदा का संमत होऊ शकत नाही? इतरत्र वावरणाऱ्या आणि संधीचा फायदा घेणाऱ्या या प्रकारच्या विकृत वासनांधांना चाप बसावा असे सरकारला खरेच मनापासून वाटत नाही का? निष्पाप बालिका, तरुण मुली, महिला यांनी आज आपल्यावर अतिप्रसंग तर ओढवणार नाही ना या चिंतेतच सदोदित वावरायचे का? आपल्या तीन-चार महिन्यांच्या अजाण बाळावर घरातून की बाहेरून सैतानी घाला येईल या विचारांतच त्या बाळाच्या आईने तिची शक्ती आणि बुद्धी झिजू द्यायची का? एखाद्या मुलीच्या, स्त्रीच्या उध्वस्त होणाऱ्या आयुष्याची शासनाच्या लेखी काहीच किंमत नाही का? तिचे विस्कटलेले आयुष्य आणि तिच्या घरच्यांचा समाजापुढे झालेला मानभंग या बाबी आरोपींना कडक शिक्षा सुनावण्यास अपुऱ्या आहेत का? मुंबईतील केस बाबतही हेच चालले आहे. कधी ते 'fast trak' कोर्ट स्थापन होणार आणि कधी या मुलीला न्याय मिळणार ? त्यात पुन्हा कुणी म्हणतय फाशी द्या, कुणी दयेचा आधार घेऊन म्हणतय फाशी नको. अरे पण मग या आरोपींना कठोर शिक्षा केली नाही तर इतर समाज कंटकांना कसा कायद्याचा धाक बसणार? परत परत घरी-दारी असे अत्याचार होत राहणार आणि आरोपी फक्त गजाआड होत राहणार, तेही सापडले तर ! या प्रश्नांवर संसदेत पुनश्च गदारोळ होत राहणार, रस्त्यावर निषेध मोर्चे काढले जाणार आणि प्रकरण काहीसे जुने झाले की त्यातील हवा निघून जाणार. शासन चौकशी समित्या नेमणार, कडक कारवाईची हमी देत राहणार आणि या आरोपींना सज्जड शिक्षा देत इतर भविष्यातील आरोपींना वचक बसवणारा कायदा जन्माला येण्याआधीच माणुसकीचे आचके देत गतप्राण होणार. निष्फळ, कोणत्याही एका निर्णयाप्रत न येणाऱ्या राजकीय चर्चा रंगणार. शासन आणि कायदा यांचे हेच चित्र जनसामान्यांच्या मनात अधोरेखित होणार. एखादी वाचता येणारी, तिसऱ्या-चौथ्या इयत्तेत शिकणारी मुलगी आईला टी.व्ही. वरील अक्षरे वाचून विचारणार,'आई बलात्कार म्हणजे काय गं ?' तिच्या निष्पाप डोळ्यांना डोळा न भिडवता आई म्हणणार तू अजून लहान आहेस, तुला काय करायच्यात नसत्या गोष्टी? पण तिला लहान राहण्याची मुभा तर या अशा सर्रास रस्तोरती सांडलेल्या अत्याचाऱ्यांनी तर दिली पाहिजे ना? असंख्य निरागस कळ्या, फुले स्वत:च्या कामवासनेपायी निर्दयपणे तुडवणारे हे पिसाट या भूतलावर राहण्याच्या लायकीचे तरी आहेत का ते एकदा शासनाने तपासून पहिले पाहिजे. अनेक थोर संतांचा, महात्म्यांचा आणि विचारवंतांचा वारसा लाभलेल्या या देशात आज विकृत वासनेने आपले वखवखलेले हात-पाय जागोजागी पसरावेत आणि त्यांच्या या बीभत्स कृत्याचा निषेध होण्यापलीकडे काही होऊ नये हे या देशाचे दुर्भाग्यच! शिकून सवरून,पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचे हात बळकट करणाऱ्या स्त्रीवर पुन्हा घरातील चार भिंतींच्या आत घाबरून,असुरक्षित होऊन बसायची पाळी येऊ नये एवढीच मनोमन इच्छा आहे.
आज आपण एकविसाव्या शतकात आहोत ही वस्तुस्थिती असली तरीही आपल्यापैकी कित्येकांची मने किंवा त्यांचे विचार प्रतिगामित्वाकडेच झुकणारे आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. अंधश्रद्धेचा विळखा निव्वळ ग्रामीण भागापुरताच सीमित नसून अनेक शिक्षित, शहरी माणसेही या अघोरी प्रथांना कवटाळताना आजही आपल्याला दिसतात. अफाट पैसा हवा आहे बाबाकडे जा, अपत्यप्राप्ती होत नाही मंत्रतंत्र कर, दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे आहे मंतरलेला धागा किंवा ताईत बांध असे अनेक उपाय आपल्या अवतीभवती पसरलेले बांधव राजरोस करत असतात. घरात कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत पण अशा वेळेस भोंदू बाबांचा, त्यांच्या तांत्रिक शक्तींचा आधार घेतला जातो. कर्वे-फुले यांसारखे थोर पुरुष नुसते पुरुषांनीच नाही तर या देशातील स्त्रीनेही शिक्षित व्हावे म्हणून झटले, सावित्रीबाई फुलेही त्यांच्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. त्यांनी समाजाचा, सनातन्यांचा अपरिमित रोष सहन केला पण बहुजनांना शिक्षित करण्याचा आपला लढा आमरण चालू ठेवला. आज त्यांचा वारसा सांगणारे आपण शिक्षित झालेले आपले मन बासनात गुंडाळून किती सहजतेने या बुवा-बाबांच्या चरणी अर्पण करतो ही खरोखरीच निंदनीय बाब आहे. रोज वर्तमानपत्रातून अशा कितीतरी बातम्या आपल्या दृष्टीस पडत असतात. काविळीवर योग्य ती वैद्यकीय उपाययोजना न करता मंत्रतंत्राचा अवलंब केल्याने सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू किंवा तुला लवकरच अपत्यप्राप्ती होईल असे सांगून एखाद्या बाबाने स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवून तिची फसवणूक केली. या बातम्यांतून कुणीच कसलाही बोध घेत नाही ही अनाकलनीय गोष्ट आहे. देवाला किंवा देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बालकाचा किंवा कुमारिकेचा बळी देणे किंवा मुक्या जनावराचा बळी देणे अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, ताईत हे उपाय केल्यानंतर खरोखरीच जर माणसांचे सर्व प्रश्न सुटले असते तर वैद्यकशास्त्र अस्तित्वातच आलं नसतं, मानसोपचार तज्ञांची गरज भासली नसली, शालेय शिक्षण रद्दबातल झालं असतं. अठरा वर्षे अनेक राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवून डॉ. दाभोलकरांना जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून घेण्यात अपयश आलं ही सगळ्या भारतवासियांसाठी खाली मान घालायला लावणारी बाब नाही का? कुणाकुणाचे हितसंबंध, राजकीय स्वार्थ यात गुंतले असल्या कारणाने हे विधेयक राजकीय पटावरून पुढे सरकवले जाण्यास असमर्थ ठरले आहे. अनेक चर्चा, वाद-वितंडवाद होऊनही या विधेयकाभोवती अनेक अंधश्रद्धांचा जीवघेणा विळखा पडलेला आहे. हवेतून उदी काढणे, ताईत काढणे किंवा अनेक वस्तू काढणे ही निव्वळ हातचलाखी आहे , या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही हे सप्रमाण सिध्द करून दाखवले गेले तरीही या भस्म-विभूती-मंतरलेले धागे मानवी मनाचा कब्जा सोडत नाहीत हे पाहून लाज वाटते. आज अशा अनेक बुवा-बाबांनी जादूच्या, हातचलाखीच्या बळावर जनमानसातील त्यांचं स्थान पक्कं केलं आहे. अध्यात्म्याच फक्त आवरण आहे पण आत मात्र सैतानाचा वावर आहे. तरुण मुली, स्त्रिया या अशा बाबांना सहज फशी पडतात, त्यांच्या अज्ञानाचा, निरागसतेचा फायदा ही मंडळी उठवतात. अनेक पुरुषही या बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. या बुवा-बाबां मध्येही श्रेण्या असतात. त्याप्रमाणे त्यांना शिष्यगण मिळतात, देणग्या मिळतात, त्यांची पब्लिसिटी होत राहते, हे महागड्या गाड्या, विमानांतून प्रवास करतात, गुबगुबीत मलमलचे गालिचे यांच्या पायांखाली अंथरले जातात, अत्यंत महाग भेटवस्तू या बाबांना भक्तगणांकडून अर्पण केल्या जातात. चार-दोन प्रभावी प्रवचने ठोकली की यांच्या कार्याचा सर्वत्र उदोउदो होतो. . आज डॉ. दाभोलकरांचे चाहते आणि वारसदार सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांची शिकवण, त्यांचे विचार , त्यांचे संघटना कौशल्य आज समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. अंधश्रद्धेची पुटे समाजमनावरून कायमची पुसू पाहणाऱ्या आणि त्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पुरोगामित्वाचा लढा आज मोठ्या संख्येने पुढे नेण्याची गरज आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनीच या लढ्यात सहभागी व्हायला हवे तरच समाज-परिवर्तनाची आशा बाळगता येईल. सत्तेवरील आणि सत्तेच्या विरोधात बसलेल्या सर्व घटकांनी आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला सारून या परिवर्तनाची कास धरली पाहिजे नाहीतर ही अंधश्रद्धेची काळरात्र कधीच संपणार नाही आणि मानवाच्या सर्वकष प्रगतीला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही.