झाडांची बेमालूम केलेली कत्तल, वळवलेल्या किंवा बुजवलेल्या नद्या, खाड्या, नष्ट केलेली तिवरे, जागोजागी अवैधपणे बांधलेल्या इमारती अशी कित्येक कारणे एकत्र आली आणि भारतीयांना महाप्रलयाची चुणूक बघायला मिळाली.
लष्करातील जवान आपले प्राण पणाला लावून, अहोरात्र राबून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहेत. कित्येक प्रेतांवर अंत्यसंस्कार करायचे अद्याप बाकी आहेत. केदारनाथ परिसराला दुर्गंधीने वेढलेले आहे. तेथील अनेक गावांवर रोगराईचे सावट पसरलेले आहे अडकलेल्यांना उपासमारीची, जीवघेण्या थंडीची चिंता भेडसावते आहे. आजूबाजूच्या पट्ट्यातील लुटारू, बलात्कारी यांना परिस्थितीच्या खिंडीत अडकलेले असहाय लोक आणि त्यातील महिला ही जणू काही सुवर्णसंधीच वाटते आहे. जे लोक बेपत्ता आहेत त्यांच्या येथील नातेवाईकांना अनेक शंका-कुशंकांनी ग्रासलेले आहे. आपल्या प्रियजनांच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेले अनेक जण आहेत. ज्यांच्या घरातील अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्या मागे राहिलेल्यांना आपल्या आयुष्याचेच निर्माल्य झाल्यासारखे वाटत आहे.
अशा परिस्थितीत वरिष्ठ राजकारणी केवळ हवाई पाहणी करण्यात धन्यता मानत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कोणी राजकारणी पुनर्वसनाचा मुद्दा हाताशी धरून त्याचे सत्तेसाठी भांडवल करू पाहत आहेत. स्थानिक लोकांशी, नेत्यांशी, व्यावसायिकांशी साटेलोटे जमवून तेथील भूखंड गिळंकृत करणाऱ्या राजकारण्यांची बजबजपुरी माजली आहे. मग तिथे मोठाली हॉटेल्स, इमारती उभ्या राहतात. त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी म्हणून मोठमोठ्या वृक्षांची निघृणपणे कत्तल केली जाते, नद्यांचे स्त्रोत वळवले जातात, रान-तिवरे नष्ट केली जातात. पर्यावरणाचा विध्वंस होतो. निसर्गाचा समतोल ढळतो आणि मग अशा प्रकारे निसर्ग मानवाचा घास घेतो.
पण निसर्गाची कत्तल करणारे ह्यात भरडले जात नाहीत तर ह्यात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची आहुती पडते. त्यांच्या आलिशान बंगल्यात बसून निसर्गाचे हे भयाकारी तांडव पाहण्यात हे मश्गुल असतात. एखाद दुसरी मुलाखत दिली जाते तीही ढिम्म चेहऱ्याने! आम्ही ही मदत पाठवली आहे, ही कुमक पाठवली आहे, अमक्या रकमेचा धनादेश पाठवला आहे असे म्हटले कि ह्याची नैतिक जबाबदार जणू संपूनच जाते. निसर्ग संपत्ती, प्राणी संपत्ती, जल-जैविक संपत्ती ह्या सगळ्यावर तर निसर्गाच्या समतोल अवलंबून असतो. ह्यातील कोणत्याही गोष्टीचा साठा नष्ट झाल्यास अथवा जाणूनबुजून नष्ट केल्यास भू-स्खलनाचा धोका अपरिहार्यपणे संभवू शकतो. हा निसर्गाचा प्रकोप संपूर्ण सृष्टीची राखरांगोळी करण्यास पूर्णपणे समर्थ असतो. स्वार्थासाठी, राजकीय मतलबासाठी पोखरलेले डोंगर व त्यावर झालेली ढगफुटी यामुळेच हा प्रलय झाला. फक्त ह्या परिस्थितीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेले सुरक्षित राहिले आणि परमेश्वर चरणी नत व्हायला गेलेले प्रलयाच्या दलदलीत कायमचे गाडले गेले.
आपले पूर्वज आर्य निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करायचे. त्यांच्यासाठी देव हा सगुण स्वरूप नसून अवतीभवती पसरलेला निर्गुण निराकार निसर्ग हा होता. निसर्गाला जर देव मानले तर हल्लीचे सत्ताधारी,व्यावसायिक ह्या देवावरच लोभाची कुऱ्हाड चालवत आहेत आणि तेही अत्यंत बेदरकार,निर्लज्ज वृत्तीने! आणि स्वत:ची खुर्ची शाबूत राहू दे म्हणून देव्हाऱ्यात बसवलेल्या सगुण स्वरूपाला सोने-चांदी-हिऱ्यांनी मढवत आहेत. परंतु हे राजकारण्यांनो एक लक्षात ठेवा, ज्या कोटी लोकांच्या बळावर आज तुम्ही ही सत्ता उपभोगू शकता त्या जनतेच्या प्रक्षोभाला आमंत्रण देऊ नका अन्यथा भयंकर मानवी प्रकोपाला तुम्हाला आज ना उद्या सामोरे जावेच लागेल.