Wednesday, 1 May 2013

सोकावलेले पुरुष आणि सोशिक स्त्रिया ……


वरचढपणाची ही भावना लिंगभेदातून उत्पन्न झालेली आहे. आई-वडिलांकडून संक्रमित होणाऱ्या गुणसुत्रांमुळे एखादी व्यक्ती पुरुष होते किंवा स्त्री होते. पण आपण पुरुष आहोत म्हणजे शक्ती-बुद्धी-सामर्थ्याचा वसा घेऊनच आपण जन्माला आलेले आहोत असा एक अपसमज बऱ्याच पुरुषांमध्ये आढळून येतो. शिवाय अनेक घरातील स्त्रियाच माझा मुलगा, घराण्याचा एकुलता एक वारस, कुलदीपक असे सातत्याने म्हणून त्यांचा अहंगड अकारण पोसत राहतात.  
घरातील स्त्रीवर उठसूट हात उगारणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे बऱ्याच पुरुषांना वाटत असते. फक्त घरातच नाही तर ही श्रेष्ठत्वाची भावना ऑफिसमध्ये , कामकाजाच्या ठिकाणीही आढळून येते. बऱ्याच घरी बाहेर आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधायला स्त्रियांना मज्जाव असतो. त्यांचे काम हे फक्त पाहुण्यांची सरबराई करण्याचे! स्वयंपाकघराचा उंबरठा ही तिची तिच्या घरातील पुरुषांनी आखून दिलेली सीमारेषा. काही मोजक्या घरांत चित्र वेगळे दिसते हे खरे पण याची संख्या मात्र आजमितीला नगण्यच आहे.     
आज परत माझ्या नवऱ्याने मला मारले. हा संवाद अनेकवेळा कामवाल्या बायकांच्या घोळक्यातून ऐकू येतो. या बायकांच्या अंगावर अनेक ठिकाणी माराचे वळ दिसतात. भसाभस दारू प्यायची, बाहेर बायकांशी लफडी करायची आणि घरच्या स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करायचे असा जणू काही या पुरुषांचा शिरस्ताच असतो. यातील अनेक पुरुष बेकार, बेरोजगार असतात  पण केवळ आपल्या पौरुषत्वाच्या पोकळ भांडवलावर बायकांवर अन्याय करत राहतात. या बायका सुद्धा अशा नवऱ्याकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणे हे जणू काही पातकच समजतात.उलट स्वत:च्या अंगावर उमटलेले वळ एखादा दागिना दाखवावा तद्वत इतरांना दाखवत असतात. माझा दादला मला मारतो यात त्यांना धन्यता वाटत असावी.   
मध्यमवर्गात किंवा उच्च मध्यमवर्गात फार काही वेगळी परिस्थिती असते असे नाही पण या बायकांना नवऱ्याचे अन्याय लपवण्याची कला चांगली अवगत असते. नवऱ्याने मारणे किंवा छळणे ही गोष्ट भूषणास्पद नसल्याने त्या खुबीने ती लपवू पाहतात. याचा अतिरेक झाला तरच कुठे अशा गोष्टींची वाच्यता होते. आपण पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणजे स्त्रीवर  अत्याचार करण्याचे जणू लायसेन्स घेऊनच आलो असल्यागत हे पुरुष वागत असतात.  त्यांच्या अहंमन्य वागण्याबद्दल एखाद्या स्त्रीने नाराजी व्यक्त करताच हे पुरुष चवताळतात . त्यांना प्रतिप्रश्न करणाऱ्या स्त्रिया आवडत नाहीत. त्यांच्या अमानवी वागणुकीचा जाब विचारणाऱ्या स्त्रिया त्यांना त्यांच्या मार्गातील काटा वाटतात . आपल्या पुरुषी वर्चस्वाने हे त्यांना दडपू पाहतात.    
आपली स्त्री ही  तर उपभोग्य वस्तू आहेच पण परक्या स्त्रीला सुद्धा आपण या दृष्टीने सहज बघू शकतो या अतिशय घाणेरड्या संभ्रमात पुरुष वावरत असतात. संधी मिळेल तेव्हा, त्या ठिकाणी स्त्रीचा विनयभंग करणे, तिचे मानसिक तसेच शारीरिक शोषण करणे हे 'पुरुष' या शब्दात अध्याहृत असल्याप्रमाणे हे पुरुष वागत असतात. स्त्री ही पुरुषापेक्षा कमीच असते किंवा मुळात ती अबला असते ही समजूत फोफावण्यात पुरुषांइतक्या काही स्त्रियाही अग्रेसर असतात.  नवऱ्याने टाकलेली स्त्री, नवरा नसलेली स्त्री, कुमारिका अशा स्त्रिया पुरुषांची खास टार्गेट्स असतात. अगदी निष्पाप, कोवळ्या मुलींच्या बाबतीतही या पुरुषांची हिडीस, विकृत मनोवृत्ती दिसून येते. शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलीवर अत्याचार करणे हे अशा पुरुषांना पुरुषार्थाचे लक्षण वाटते.      
आज प्रत्येक स्त्रीने हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे की अशा प्रकारच्या पुरुषी मनोवृत्तीला आपण जाणते-अजाणतेपणी खतपाणी तर घातले नाही ना ? आपण त्याच्यापेक्षा जास्त सक्षम नाही हे त्याच्या मनावर ठसवण्यात आपला सिंहाचा तर वाटा नाही ना ? तो आपल्यापेक्षा जास्त सरस, कार्यक्षम आणि कुशल आहे हे आपण आपल्या कृतीने त्याला पटवून देण्यात सारख्या यशस्वी होतो आहोत का? आपले शारीरिक तसेच मानसिक शोषण करण्याचा अग्रहक्क आपण त्याला त्याच्या कृतीचा निषेध न करता बहाल करतो आहोत का ?  आपले त्याच्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असणे हे कारण आपल्यावरील अन्यायाच्या मुळाशी आहे का ?  त्याच्या वडिलोपार्जित घरात राहून आपण त्याच्याशी दोन हात करू शकत नाही ही भावना आपल्या सहन करण्याच्या मुळाशी आहे का ? आपण त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या बरोबरीने कमावणे हे त्याच्या पौरुषाला अपमानास्पद वाटते आहे का ? 
आज समाजात जागोजागी जे अत्याचार चाललेले आपण सतत ऐकतो आहोत, पाहतो आहोत त्याच्या मुळाशी ही लैंगिक श्रेष्ठ-कनिष्ठपणाची मानसिकता आहे. एखादी स्त्री मुळात आपल्या कोणत्याही गोष्टीला प्रतिकार करतेच कशी या प्रश्नामुळे अनेक गुन्हे घडलेले आहेत, घडत आहेत. कारण माघार घेणे, पराभूत होणे, नांगी टाकणे पुरुष जातीला मंजूर नाही. म्हणूनच एखाद्या असहाय मुलीवर, स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाला आपण काहीतरी अद्वितीय पराक्रम गाजवल्यासारखे वाटत असते. स्वत:च्या शीलाचे रक्षण करणाऱ्या किंवा स्वत:साठी न्याय मागणाऱ्या स्त्रीला अनेक अग्निदिव्यातून जावे लागते. कारण पुरुषी अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्याची तिची सक्षम कृती म्हणजे पौरुषत्वाला खुले आव्हान असते. आपल्याला आव्हान देणारी ही कोण य:कश्चित स्त्री ? असा प्रश्न त्यांच्या मनात येतो आणि त्यांचा पुरुषी अहंगंड फणा काढतो.  हाच अहंगंड याच स्त्रीची बरबादी, तिचा दुर्लौकिक, तिची असहायता किंवा तिची परवड बघायला एखाद्या गिधाडासारखा टपलेला असतो. पुरुषाच्या क्रौर्याला, वासनेला, विकृतीला शह देणारी स्त्री यांना कधीच रुचत नाही उलटपक्षी सतत सलते. तिचा काटा काढण्यासाठी हे कोण उत्सुक असतात. पण अशा काही मोजक्या स्त्रिया जेव्हा त्यांच्यावरील संभाव्य हल्ले परतवतात किंवा अन्यायाविरुद्ध कणखरपणे लढून जिंकतात तेव्हा डिवचलेल्या सापांसारखे हे पुरुष फुत्कार टाकत अशा स्त्रीला पुन्हा खिंडीत गाठण्याची वाट बघत राहतात. पण आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याची भाषा बोलत नाहीत.  
'पायातली वहाण पायातच राहू द्यायची' या पुरुषी मानसिकतेला आता छेद देऊन हीच वहाण अशा वृथा पुरुषी अहंगंड जोपासणाऱ्या आणि त्यापायी स्त्रीच्या आयुष्याची वाताहत करणाऱ्यांच्या कानशिलापर्यंत नेता आली पाहिजे.  

No comments:

Post a Comment