Tuesday, 7 May 2013

आय नो ………


काही व्यक्ती या विश्वातील प्रत्येक लहानसहान घटना आपल्या परिचयाची आहे अशा वृत्तीने वागत असतात. त्यांचा परवलीचा एकाच शब्द असतो 'आय नो' म्हणजे मला माहित आहे, मला ज्ञात आहे. कोणत्याही पेपरातून छापून आलेली हर एक गोष्ट यांना कशी माहित असते? स्वत:ची नोकरी, व्यवसाय अथवा विद्यार्थीदशेत असल्यास शाळा किंवा कॉलेज या गोष्टींना सुट्टी देऊन ह्या व्यक्ती दिवसाचे चोवीस तास फक्त आणि फक्त वर्तमानपत्रेच वाचत बसतात की काय अशी शंका यावी इतपत हे महाभाग 'आय नो' हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात.      
काही गोष्टी यांच्या परिचयाच्या असतील किंवा यांच्या कानावर आल्या असतील पण म्हणून प्रत्येक गोष्ट कशी यांना माहित असेल? अंजली तेंडूलकर ही सचिन तेंडूलकरची बायको आहे किंवा हृतिक रोशनला सहा बोटे आहेत किंवा शाहरुख खान आपल्या बायकोपेक्षा सिगारेटीवर जास्त प्रेम करतो किंवा जयाने रेखाकडे संसदेत टाकलेला जळजळीत कटाक्ष किंवा मनमोहन सिंग यांची बारमाही तटस्थता किंवा सोन्याचा भाव उतरला या गोष्टी 'आय नो' काय 'वुई नो' या वर्गात मोडतात पण म्हणून सोनियाच्या घरातील मांजरी व्याली या बातमीला राखी 'आय नो' असे का म्हणाली हे मला आजतागायत उलगडलेले नाही. ( या व्यक्ती अनुक्रमे सोनिया गांधी आणि राखी गुलजार किंवा राखी सावंत नव्हेत हे कृपया लक्षात घ्यावे)   
मला तर वाटते की ह्या व्यक्ती जन्मल्या जन्मल्या रडण्याऐवजी 'आय नो' हेच म्हणत असाव्यात. आता किनई बाळा तुझी आई तुला दुदू पाजणार आहे असं नुसतं कोणी म्हणायचा अवकाश की हुंकाराऐवजी 'आय नो' लोकांच्या कानावर पडत असेल. दिन्याला ब्याण्णव टक्के मिळाले हे कोणीही न सांगताच अर्णवला कसे कळले? फोनवरून जेव्हा आलोकने त्याला ही बातमी दिली तेव्हा तो लगेच म्हणाला 'आय नो'. आलोकने शंका येउन विचारले, तुला आधीच माहित होते ? कसे काय? रिझल्ट तर आत्ता लागला. यावर अर्णवचे उत्तर असे होते, अरे दिन्याने सॉलिड अभ्यास केला होता. तेव्हाच मी समजून चुकलो की हा नव्वदी पार करणार.      
अदिती साडी खरेदीला आईबरोबर दुकानात शिरली . तिथे तिला तिची जुनी मैत्रीण वृषाली भेटली. अदिती म्हणाली, माझ्या ताईचे लग्न ठरले आहे. वृषाली म्हणाली, 'आय नो'. अदिती आश्चर्याने म्हणाली, अगं तुला कशी कळली ही बातमी ? यावर वृषाली म्हणाली, अगं तुला साड्यांच्या दुकानात आईबरोबर शिरताना पहिले आणि माझ्या लगेच लक्षात आले. ग्रेट, अदिती म्हणाली.     
या 'आय नो' वर्गातील लोकांना बाजारभाव, सेन्सेक्समधील चढ-उतार, शिक्षकांच्या-व्यापाऱ्यांच्या मागण्या, वकिली डावपेच, राजकीय कुस्त्या, खून-दरोडे-बलात्कार सत्र , सुपरस्टार लोकांची इंगिते, हिट-फ्लॉप सिनेमा-नाटके, खाद्य-पर्यटन या विषयीचे ज्ञान म्हणजे थोडक्यात काय सगळे सगळे ठाऊक असते. त्यामुळे अय्या, बाप रे, खरं की काय, कित्ती कित्ती छान वगैरे प्रतिक्रिया यांना कधी देताच येत नाहीत. सगळ्या बातम्यांवर यांची आपली एकच प्रतिक्रिया 'आय नो'.        
या 'आय नो' वाल्यांची मदत घेऊन खालील प्रश्न सोडविता येतील का? कारण यांना सगळ्याचीच उत्तरे आधीच ठाऊक असतात. दुष्काळाचे निवारण कसे करता येईल ? यावर्षी पाऊस कसा पडेल? देशाचा पुढील पंतप्रधान कोण होईल? सैफ-करीना यांना अपत्यप्राप्ती कधी होईल? अंबानी बंधूंचे संबंध कधी सुधारतील? मराठी मालिका कधी वास्तवदर्शी होतील? पर्यावरणातील प्रदूषण कसे कमी करता येईल? 
एकदा राजू आपल्या दोन कुत्र्यांना घेऊन फिरायला बाहेर पडला. समोरून त्याचा एकेकाळचा 'आय नो'वाला मित्र  रवि येत होता. काय म्हणतोस ? कसा आहेस ? अशा काही जुजबी गप्पा झाल्यावर काहीतरी नवीन माहिती देण्याच्या उद्देशाने राजू रविला म्हणाला , माझ्या या दोन पठ्ठ्यांना रोज एक किलो चिकन लागतं. 'आय नो' , रवि म्हणाला. राजू हिरमुसला. तुला याबद्दल कशी काय माहिती आहे? तुझ्याकडे पण कुत्री आहेत का? नाही. माझ्याकडे एक मांजरी आहे. ती रोज साधारण अर्धा किलो पर्यंत चिकन खाऊ शकते त्यावरून मी अंदाज लावला. तेव्हापासून राजू रोज वेगळ्या रस्त्यावरून जातो .         

Monday, 6 May 2013

सुट्टीतील वेळेचा सदुपयोग ……


सुट्टी आणि अभ्यास याच मुळी परस्परविरोधी अशा गोष्टी आहेत.  परंतु अभ्यास या शब्दाचा नेहमी केवळ शालेय अभ्यास असाच अर्थ घेतला जातो जो इथे अभिप्रेत नाही. आम्हाला बालमोहन शाळेत असताना दिवाळी , नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास दिला जायचा. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले लोक, संशोधने ,प्राणी,पक्षी,फुले-झाडे या आणि अशा इतर गोष्टींबद्दल सचित्र माहिती, थोडे पाढे, अगदी थोडी गणिते, छोटेखानी निबंध अशा स्वरूपाचा अभ्यास असायचा. परंतु खरी मजा यायची ती वही सजवताना! गोल्डन किंवा सिल्व्हर पेपरचे कव्हर किंवा दुसरा एखादा रंगीत पेपर आणि त्यावर पारदर्षी जिलेटीन पेपरचे कव्हर यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या वह्या सुंदर दिसायच्या. शिवाय रंगीत पेन्सिली,स्केजपेन वापरून सुशोभित केलेली अक्षरे आणि त्याभोवतीची नक्षी पाहताना खूप छान वाटायचे. वह्यांतील अभ्यास आणि त्यावरील सजावट पाहून आम्हाला नंबर दिले जायचे व बक्षीसही! त्यामुळे प्रत्येकजण आपली वही उत्तम होण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा.          
मुळात अभ्यास आणि कला यांच्या समन्वयातून एखादी उत्तम गोष्ट घडू, आकारू शकते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची कला आणि कला जोपासण्यासाठी केला जाणारा अभ्यास या दोन्ही गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडायला हव्यात नव्हे त्या त्यांनी आत्मसात करायला हव्यात. आजकाल सर्वसाधारणपणे सुट्टी लागली की मुले वेगवेगळ्या छंदवर्गात जाताना दिसतात. पण तिथे ती आई-वडिलांच्या हट्टाखातर ढकलली गेलेली असतात की त्यांच्या व्यक्तिगत आवडीपायी जातात हे तपासणे गरजेचे आहे. निरनिराळे बैठे आणि मैदानी खेळ, थोडा स्व-अभ्यास आणि एखादी आवडीची कला यांचा सुरेख मिलाफ साधून सुट्टी उत्तम तऱ्हेने व्यतीत होऊ शकते. संगणकाद्वारेही अनेक गोष्टी शिकता येतात.    
आपल्याला आवडत नसलेल्या एखाद्या विषयासंबंधित काही पुस्तके वाचल्यास त्या त्या विषयाची आवड उत्पन्न व्हायला मदत होऊ शकते.  रोज थोडे पाढे लिहून काढल्याने पाढे पाठ करण्यास सोपे जातात. आपल्याला कठीण वाटत असलेला एखादा विषय आपण त्या विषयातील एखाद्या जाणकाराच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. कचरा म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंपासून काही उपयुक्त गोष्टी बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम स्टिक्स, बांगड्या, पेयाचे टीन्स यापासून पेन stand  तयार करता येतात. रिकामे सेल्स , काड्यापेटी यापासूनही वस्तू बनवता येतात. वापरल्या गेलेल्या सीडी पासून फोटो आल्बम, wall hanging तयार करता येऊ शकते. रिकाम्या खोक्यांपासून पेपराच्या डेकोरेटिव्ह पिशव्या तयार करता येतात. कल्पकता असेल तर आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक टाकाऊ गोष्टी आपण उपयुक्त गोष्टीत परिवर्तित करू शकतो.          
मुलांना सुट्टी असली तरी त्यांच्या पालकांना सुट्टी असतेच असे नाही. त्यामुळे मग त्यांचा बराचसा वेळ पालकांच्या अनुपस्थितीत जातो. सारखे व्हिडीओ गेम खेळणे, कार्टून बघणे, पिक्चर टाकणे हे काही क्षणापुरतेच मनोरंजन असते पण त्याने मुलांच्या सृजनशीलतेला,कल्पकतेला, बुद्धीला, अंगभूत कौशल्याला काहीच खाद्य मिळत नाही. मित्र जमवून कोल्ड ड्रिंक्स पिणे, वेफर किंवा चिप्स खात खात टी. व्ही. बघणे हे आरोग्याला हानिकारक असते. याउलट सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत खेळणे अथवा फिरणे हा त्याला उत्तम पर्याय असू शकतो.       
अभ्यास करणे म्हणजे एखादा विषय समजून घेणे, त्यातील खुबी आत्मसात करणे, त्याविषयी मनन करणे असा असतो. मग तो विषय मुलांच्या शालेय अभ्यासक्रमा बाहेरील सुद्धा असू शकतो. आईला स्वयंपाकात मदत करणे, बाजारहाट करणे, भाज्यांचे,फळांचे,धान्याचे भाव समजून घेणे, घरातील एखादी नादुरुस्त वस्तू रिपेअर करणे, कपडे स्वत: धुणे व त्यांना इस्त्री करणे, साफसफाई करणे ही कामे मुलांनी स्वत:हून, कोणताही कमीपणा न बाळगता केल्यास पालकांना तर मदत होतेच पण शिवास मुलांचे व्हावहारज्ञान पक्के व्हायला मदत होते.  
गेलेला वेळ पुन्हा कधीही परतून कोणाच्याच आयुष्यात येत नाही. मग हाच वेळ चांगल्या गोष्टींसाठी, छंदांसाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वळवता आला तर भविष्यातील वेळ मुलांवर कधीही पश्चात्तापाची पाळी आणणार नाही.    

Saturday, 4 May 2013

वो भारत देश है मेरा ?

पूर्वी भारत देशाची शान सार्थ करणारं दिवंगत पृथ्वीराज कपूरवर चित्रित झालेलं एक गाणं 'छायागीत' या कार्यक्रमात अनेक वेळा ऐकलं जायचं. ते गाणं होतं, '  जहाँ डाल डाल पर सोनेकी चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा'. या गाण्यात भारत देशाविषयी अभिमान वाटण्याजोग्या अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या. आता पृथ्वीराज कपूर, ते गाणं आणि त्यात दाखवली गेलेली भारताची शान इतिहासजमा झाली आहे.   
सद्यस्थितीत भारत देशात चाललेल्या कोणत्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगायचा? सध्याच्या भारत देशाचे  ' जहाँ नाके नाके पे बलात्कारी डाले है अपना डेरा, वो भारत देश है मेरा' असे दु:खद वर्णन करायची पाळी येथील नागरिकांवर आलेली आहे. व्यासांनी रचलेल्या महाभारताचा पदोपदी नको तेवढा प्रत्यय येतो आहे. महाभारतात एक दु:शासन होता आता जागोजागी, गल्लोगल्ली,बोळाबोळांत ,नाक्यानाक्यावर असे खंडीभर दु:शासन कोणताही मुलाहिजा न बाळगता कोणत्याही वयातील मुलींच्या आणि महिलांच्या पदराला बिनदिक्कत हात घालत आहेत. सुनसान गल्ली, अंधारा रस्ता आणि एकटीदुकटी स्त्री या तीन गोष्टी कोणत्याही स्त्रीचे शील तिच्यापासून हरवून घेण्यास समर्थ आहेत. रात्रीची वेळ, ट्रेन, बस किंवा इतर काही वाहने स्त्रीची अब्रू तिच्यापासून हिरावून गेण्यास समर्थ आहेत. यावर उपाय काय तर मुलीने किंवा स्त्रीने बाहेर जाणे टाळावे. गेलीच तर बरोबर एखादा पुरुष असावा. म्हणजे एकट्या पुरुषानेही मार खाण्याची किंवा प्रसंगी जीव गमावण्याची तयारी ठेवावी. व्यवसायानिमित्त एखाद्या स्त्रीला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असेल किंवा ती शिफ्टमध्ये काम करत असेल तर अशा गैरप्रकारांना बळी पडण्याची तिने मानसिक तयारी करून ठेवावी.   
भारताची राजधानी बलात्कारांच्या आकडेवारीच्या बाबतीत अग्रेसर आहेच. पण इतरही अनेक ठिकाणी जणू पेव फुटल्यासारखे बलात्कार होतच आहेत.  मोर्चे, निदर्शने, आक्रोश, संताप, उपोषण कोणत्याही मार्गांनी सत्ताधारी जराही मुळापासून हलत नाहीत. ते समित्या बसवतात, अहवाल सादर करतात, चर्चा करतात पण एखाद्या वांझेसारखे त्यातून कोणतेही ठोस उपाय, निर्बंध, कडक कायदे प्रसवत नाहीत. पोलिस, रिपोर्ट्स, कोर्ट-कचेऱ्या, जबान्या, आरोप-प्रत्यारोप,वकिली पवित्रे, टेबलाखालील पाकिटांचे वजन, कायद्याची चौकट ई. च्या योग्य वा अयोग्य रसायनातून पिडीत मुलीचे वा स्त्रीचे बरे अथवा वाईट भवितव्य ठरते.       
 दुष्काळग्रस्तांसाठी जमा झालेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही ही व्यथा सांगणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्यंत हिडीस उपाय ऐकण्याची पाळी राज्यातील एका जबाबदार व्यक्तीमुळे येते.  अनधिकृतरित्या भूखंड हडपणारे  आणि राजरोस लाच घेणारे शासनातील महत्वाची पदे भूषवतात. याशिवाय ऐन परीक्षेच्या वेळी होणारे अक्षम्य घोटाळे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे अपरिमित नुकसान, निराशेपोटी मुलांनी केलेल्या आत्महत्या, राज्यातील पोलिसदलावर पडणारा अतिरिक्त ताण, त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन, महागाईने मोडलेले सामान्य माणसांचे कंबरडे,  मुंबई सारख्या शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे,  जागोजागी उखडलेले रस्ते, अनेक ठिकाणी साचलेला कचरा त्यातून पसरणारी दुर्गंधी व रोगराई , अनेक हॉस्पिटलांची झालेली दुरवस्था, यांतील कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा?  नाईलाजास्तव धक्के खात सकाळी ट्रेनमध्ये आपला देह कोंबून संध्याकाळी त्याच जीवघेण्या गर्दीतून सहीसलामत बाहेर आल्याबद्दल अभिमान बाळगायचा की पचापचा थुंकून ट्रेनच्या दरवाज्यांवर चित्रकलेची प्रात्यक्षिके करून दाखवल्याबद्दल सदरहूंचा  अभिमान बाळगायचा? बसच्या कंडक्टर - ड्रायव्हरच्या प्रवाशांचा खास उर्मट शब्दांत पाणउतारा करणाऱ्या बोलीचा अभिमान बाळगायचा की गटारे उघडी ठेवून त्यात चिमुरड्यांचा बळी देऊ पाहणाऱ्या बेपर्वा पालिका कर्मचाऱ्यांचा अभिमान बाळगायचा? आम्ही तुमच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर अवतरलेले परमेश्वराचे अवतार आहोत असे सांगून भोळ्या जनतेला, बाया -बापड्यांना ठकवून करोडोंची पुंजी जमवणाऱ्या सिद्धबाबा नामक महाभागांचा अभिमान बाळगायचा की आपली अवैध मार्गाने जमवलेली माया स्विस बँकेत ठेवून आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही असे अत्यंत निर्ढावलेपणाने छाती पिटीत सांगणाऱ्या राजकारण्यांचा अभिमान बाळगायचा?  पादचाऱ्यांना पदोपदी डॉक्टरांकडे पाठवणाऱ्या उचकटलेल्या रस्त्यांचा अभिमान बाळगायचा की माणसांच्या तोंडचे पाणी आणि घरातील वीज गायब करून उपासमार आणि अंधाराचे साम्राज्य पसरवणाऱ्या अधिकारी वर्गाबद्दल अभिमान बाळगायचा? 
आमच्या मनातील भारत वेगळा आहे. आमची भूमी सुजलाम सुफलाम आहे. इथे वर्णभेद,जातीभेद यांना थारा नाही. इथे अन्न-धान्याचा तुटवडा नाही. इथे बेकारी, बेरोजगारी नाही. इथे अन्यायाला कडक शासन आहे. इथे भ्रष्टाचारी माणसांना हद्दपारीची शिक्षा आहे. इथे आयाबहिणींची अब्रू लुटणाऱ्या गिधाडांना मरणप्राय शासन आहे. इथे स्वच्छता, स्वास्थ्य, आरोग्य या गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे. इथे समाजकंटकांना जगण्याची मुभा नाही. इथे प्रदुषणाला पूर्णविराम आहे. या देशात वीज आणि पाणी मुबलक आहे. इथे श्रद्धेचा, शिक्षणाचा बाजार मांडलेला नाही. इथे माणूस माणसाचा आणि निसर्गाचा आदर करतो आहे.                 
 या मनोराज्यातील शिवधनुष्याला प्रयत्नांची प्रत्यंचा लावण्यासाठी आपण सारे भारतवासी कटिबद्ध आहोत असे वाटण्याइतपत तरी आपण जागे आहोत का? 

Wednesday, 1 May 2013

सोकावलेले पुरुष आणि सोशिक स्त्रिया ……


वरचढपणाची ही भावना लिंगभेदातून उत्पन्न झालेली आहे. आई-वडिलांकडून संक्रमित होणाऱ्या गुणसुत्रांमुळे एखादी व्यक्ती पुरुष होते किंवा स्त्री होते. पण आपण पुरुष आहोत म्हणजे शक्ती-बुद्धी-सामर्थ्याचा वसा घेऊनच आपण जन्माला आलेले आहोत असा एक अपसमज बऱ्याच पुरुषांमध्ये आढळून येतो. शिवाय अनेक घरातील स्त्रियाच माझा मुलगा, घराण्याचा एकुलता एक वारस, कुलदीपक असे सातत्याने म्हणून त्यांचा अहंगड अकारण पोसत राहतात.  
घरातील स्त्रीवर उठसूट हात उगारणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे बऱ्याच पुरुषांना वाटत असते. फक्त घरातच नाही तर ही श्रेष्ठत्वाची भावना ऑफिसमध्ये , कामकाजाच्या ठिकाणीही आढळून येते. बऱ्याच घरी बाहेर आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधायला स्त्रियांना मज्जाव असतो. त्यांचे काम हे फक्त पाहुण्यांची सरबराई करण्याचे! स्वयंपाकघराचा उंबरठा ही तिची तिच्या घरातील पुरुषांनी आखून दिलेली सीमारेषा. काही मोजक्या घरांत चित्र वेगळे दिसते हे खरे पण याची संख्या मात्र आजमितीला नगण्यच आहे.     
आज परत माझ्या नवऱ्याने मला मारले. हा संवाद अनेकवेळा कामवाल्या बायकांच्या घोळक्यातून ऐकू येतो. या बायकांच्या अंगावर अनेक ठिकाणी माराचे वळ दिसतात. भसाभस दारू प्यायची, बाहेर बायकांशी लफडी करायची आणि घरच्या स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करायचे असा जणू काही या पुरुषांचा शिरस्ताच असतो. यातील अनेक पुरुष बेकार, बेरोजगार असतात  पण केवळ आपल्या पौरुषत्वाच्या पोकळ भांडवलावर बायकांवर अन्याय करत राहतात. या बायका सुद्धा अशा नवऱ्याकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणे हे जणू काही पातकच समजतात.उलट स्वत:च्या अंगावर उमटलेले वळ एखादा दागिना दाखवावा तद्वत इतरांना दाखवत असतात. माझा दादला मला मारतो यात त्यांना धन्यता वाटत असावी.   
मध्यमवर्गात किंवा उच्च मध्यमवर्गात फार काही वेगळी परिस्थिती असते असे नाही पण या बायकांना नवऱ्याचे अन्याय लपवण्याची कला चांगली अवगत असते. नवऱ्याने मारणे किंवा छळणे ही गोष्ट भूषणास्पद नसल्याने त्या खुबीने ती लपवू पाहतात. याचा अतिरेक झाला तरच कुठे अशा गोष्टींची वाच्यता होते. आपण पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणजे स्त्रीवर  अत्याचार करण्याचे जणू लायसेन्स घेऊनच आलो असल्यागत हे पुरुष वागत असतात.  त्यांच्या अहंमन्य वागण्याबद्दल एखाद्या स्त्रीने नाराजी व्यक्त करताच हे पुरुष चवताळतात . त्यांना प्रतिप्रश्न करणाऱ्या स्त्रिया आवडत नाहीत. त्यांच्या अमानवी वागणुकीचा जाब विचारणाऱ्या स्त्रिया त्यांना त्यांच्या मार्गातील काटा वाटतात . आपल्या पुरुषी वर्चस्वाने हे त्यांना दडपू पाहतात.    
आपली स्त्री ही  तर उपभोग्य वस्तू आहेच पण परक्या स्त्रीला सुद्धा आपण या दृष्टीने सहज बघू शकतो या अतिशय घाणेरड्या संभ्रमात पुरुष वावरत असतात. संधी मिळेल तेव्हा, त्या ठिकाणी स्त्रीचा विनयभंग करणे, तिचे मानसिक तसेच शारीरिक शोषण करणे हे 'पुरुष' या शब्दात अध्याहृत असल्याप्रमाणे हे पुरुष वागत असतात. स्त्री ही पुरुषापेक्षा कमीच असते किंवा मुळात ती अबला असते ही समजूत फोफावण्यात पुरुषांइतक्या काही स्त्रियाही अग्रेसर असतात.  नवऱ्याने टाकलेली स्त्री, नवरा नसलेली स्त्री, कुमारिका अशा स्त्रिया पुरुषांची खास टार्गेट्स असतात. अगदी निष्पाप, कोवळ्या मुलींच्या बाबतीतही या पुरुषांची हिडीस, विकृत मनोवृत्ती दिसून येते. शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलीवर अत्याचार करणे हे अशा पुरुषांना पुरुषार्थाचे लक्षण वाटते.      
आज प्रत्येक स्त्रीने हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे की अशा प्रकारच्या पुरुषी मनोवृत्तीला आपण जाणते-अजाणतेपणी खतपाणी तर घातले नाही ना ? आपण त्याच्यापेक्षा जास्त सक्षम नाही हे त्याच्या मनावर ठसवण्यात आपला सिंहाचा तर वाटा नाही ना ? तो आपल्यापेक्षा जास्त सरस, कार्यक्षम आणि कुशल आहे हे आपण आपल्या कृतीने त्याला पटवून देण्यात सारख्या यशस्वी होतो आहोत का? आपले शारीरिक तसेच मानसिक शोषण करण्याचा अग्रहक्क आपण त्याला त्याच्या कृतीचा निषेध न करता बहाल करतो आहोत का ?  आपले त्याच्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असणे हे कारण आपल्यावरील अन्यायाच्या मुळाशी आहे का ?  त्याच्या वडिलोपार्जित घरात राहून आपण त्याच्याशी दोन हात करू शकत नाही ही भावना आपल्या सहन करण्याच्या मुळाशी आहे का ? आपण त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या बरोबरीने कमावणे हे त्याच्या पौरुषाला अपमानास्पद वाटते आहे का ? 
आज समाजात जागोजागी जे अत्याचार चाललेले आपण सतत ऐकतो आहोत, पाहतो आहोत त्याच्या मुळाशी ही लैंगिक श्रेष्ठ-कनिष्ठपणाची मानसिकता आहे. एखादी स्त्री मुळात आपल्या कोणत्याही गोष्टीला प्रतिकार करतेच कशी या प्रश्नामुळे अनेक गुन्हे घडलेले आहेत, घडत आहेत. कारण माघार घेणे, पराभूत होणे, नांगी टाकणे पुरुष जातीला मंजूर नाही. म्हणूनच एखाद्या असहाय मुलीवर, स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाला आपण काहीतरी अद्वितीय पराक्रम गाजवल्यासारखे वाटत असते. स्वत:च्या शीलाचे रक्षण करणाऱ्या किंवा स्वत:साठी न्याय मागणाऱ्या स्त्रीला अनेक अग्निदिव्यातून जावे लागते. कारण पुरुषी अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्याची तिची सक्षम कृती म्हणजे पौरुषत्वाला खुले आव्हान असते. आपल्याला आव्हान देणारी ही कोण य:कश्चित स्त्री ? असा प्रश्न त्यांच्या मनात येतो आणि त्यांचा पुरुषी अहंगंड फणा काढतो.  हाच अहंगंड याच स्त्रीची बरबादी, तिचा दुर्लौकिक, तिची असहायता किंवा तिची परवड बघायला एखाद्या गिधाडासारखा टपलेला असतो. पुरुषाच्या क्रौर्याला, वासनेला, विकृतीला शह देणारी स्त्री यांना कधीच रुचत नाही उलटपक्षी सतत सलते. तिचा काटा काढण्यासाठी हे कोण उत्सुक असतात. पण अशा काही मोजक्या स्त्रिया जेव्हा त्यांच्यावरील संभाव्य हल्ले परतवतात किंवा अन्यायाविरुद्ध कणखरपणे लढून जिंकतात तेव्हा डिवचलेल्या सापांसारखे हे पुरुष फुत्कार टाकत अशा स्त्रीला पुन्हा खिंडीत गाठण्याची वाट बघत राहतात. पण आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याची भाषा बोलत नाहीत.  
'पायातली वहाण पायातच राहू द्यायची' या पुरुषी मानसिकतेला आता छेद देऊन हीच वहाण अशा वृथा पुरुषी अहंगंड जोपासणाऱ्या आणि त्यापायी स्त्रीच्या आयुष्याची वाताहत करणाऱ्यांच्या कानशिलापर्यंत नेता आली पाहिजे.