भारतातील एक दाम्पत्य जे अमेरिकेत स्थायिक असतं ते भारतात येतं. येथील वातावरणाने म्हणा किंवा गर्दीने की आणखी कोणत्या तरी कारणाने तिचे डोके दुखू लागते. ती नेहमी घेत असलेली व तिच्या सवयीची डोकेदुखीची गोळी येथील केमिस्टकडे उपलब्ध नसते म्हणून तो केमिस्ट तिला एक पर्यायी गोळी देतो. या विशिष्ट गोळीबद्दल त्या दोघांनाही माहिती नसते. केवळ केमिस्ट हमी देतो यास्तव कोणत्याही डॉक्टरचा वैद्यकीय सल्ला न घेता तो गोळी घेते.
त्यांच्या येथील घरी मित्रमैत्रिणी जमा होतात. या आधीच त्या घेतलेल्या गोळीचा काहीसा परिणाम म्हणून तिच्या हातावर पुरळ उठून खाज येत असते. त्यावर उपाय म्हणून तिचा नवरा कसलेसे मलम लावतो. घरी पाहुण्यांच्या गराड्यातही ती अस्वस्थच असते. तो समारंभ कसाबसा निभावतो. त्या रात्रीही तिला अंगावर ठिकठिकाणी पुरळ उठून विलक्षण खाज येते.
दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना डॉक्टरांकडे जावेच लागते. साधी Allergic reaction आहे असे सांगून ते डॉक्टर काही विशेष करावयास नको असे खात्रीपूर्वक सांगतात. पण तिच्या शरीरात चाललेल्या भयंकर घडामोडींची सुतरामही कल्पना या डॉक्टरांना येत नाही. ती परत घरी येते. तिच्या गळयाकडील भाग थोडा सूजट वाटू लागतो. डोके जड झाल्यासारखे वाटते. ताप येतो. तो काही खास व्यावसायिक कारणानिमित्त तिच्या परवानगीने बाहेरगावी जातो आणि इथे तिची परिस्थिती गंभीर होते. तिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते जे डॉक्टर तिला ट्रीट करत असतात ते तिला स्टेरोईडचा ओव्हरडोस देतात. परिणामी तिची तब्येत अधिक खालावते. तो तिला बघून हवालदिल होतो. नर्स कडून डॉक्टरांचा नंबर जबरदस्तीने घेतो आणि त्यांच्याशी बोलल्यावर त्याला कळते की डॉक्टर बाहेरगावी आहेत. तिला दुसऱ्या नामांकित हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केले जाते. तिथे दोन डॉक्टर तिला ट्रीट करतात. तिला 'TEN' म्हणजेच 'Toxic Epidermal Necrolysis' झाल्याचे सिद्ध होते. त्याच्या बाहेरगावी असलेल्या डॉक्टर मित्राकडून त्याला कळते की या अवस्थेत रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या होणे खूप गरजेचे असते. तो डॉक्टरांना परोपरीने सांगतो पण त्याचे म्हणणे डॉक्टर उडवून लावतात. तिला 'IV ड्रीप ' सुद्धा लावलेली नसते जी 'Toxic fluid ' शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. स्टेरोईड मात्र चालूच असते. तिची रोग प्रतिकारक क्षमता कमी कमी होत जाते. त्यात तिला न्युमोनिया होतो. तिच्या शरीरात विष भिनते आणि शेवटी ' Sepsis' ने तिचा मृत्यू होतो.
तिला डोकेदुखीची गोळी आपणच घ्यायला लावल्याचा तिच्या नवऱ्याला भयंकर पश्चात्ताप होतो. पण त्याचबरोबर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बायकोचा मृत्यू झाल्याची त्याची खात्री पटते. तो या सर्व डॉक्टर विरुद्ध मेडिकल कौन्सिलकडे दाद मागतो. कित्येक महिन्यांनी तो त्याचे म्हणणे मेडिकल कौन्सिलला पटवून देण्यात जरी यशस्वी झाला तरी केवळ तीन महिन्यांची सस्पेन्शन ऑर्डर त्या अपराधी डॉक्टरविरुद्ध निघते. त्याचे समाधान होत नाही. तो त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी अजूनही प्रयत्नशील असल्याचे कळते आणि ही मनाला विषण्ण करणारी घटना इथेच संपते.
घटना संपली तरी मनावर उमटलेले तिचे उदास पडसाद सहजासहजी पुसले जाणार नाहीत या घटनेने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे . डॉक्टरांना काही गोष्टी सुचल्याच नाहीत का? रक्तातील ' Toxicity' तपासण्यासाठी रक्ताची चाचणी वारंवार करावी लागते हे ज्ञान त्यांना नव्हते का? मग तरीही या चाचण्या का केल्या गेल्या नाहीत? 'IV ड्रीप' का लावली गेली नाही ज्या द्वारे रुग्णाच्या शरीरातील 'Toxic Fluid' फ्लश आउट होण्यास मदत झाली असती. एवढ्या गंभीर अवस्थेत रुग्णाला सोडून डॉक्टर स्वत:ची नैतिक जबाबदारी झुगारून देऊन बाहेरगावी कसे काय जाऊ शकले? स्टेरोईडचा ओव्हरडोस का दिला गेला? त्याच्या परिणामांची क्षिती डॉक्टरांना नव्हती का? हे तमाम वैद्यकीय व्यावसायिक स्वत:चे ज्ञान 'अपडेट' करण्याचा प्रयत्नच करत नाहीत का? एखाद्या विशिष्ट किंवा दुर्मिळ आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आटापिटा यांना करावासा वाटत नाही का? सुशिक्षित असलेल्या या दाम्पत्याने कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता ती गोळी कशी घेतली? केमिस्टनेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळी घ्या असे का नाही सुचविले?
ती आता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे परत कधीही न येण्यासाठी. पण इतर काहींच्या पायाखाली हीच वाट न येण्यासाठी समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या तुम्हा-आम्हाला सजग राहणे अपरिहार्य आहे आणि समाजाचे आधारस्तंभ असलेल्या डॉक्टरांना आपल्या बोथटलेल्या माणुसकीला आणि नोटांच्या जंजाळात हरवलेल्या ज्ञानकक्षेला पुनश्च तपासून पाहणे क्रमप्राप्त आहे.
No comments:
Post a Comment