आपली अशी जगावेगळी आवड किंवा नावड जोपासताना ह्यांची छाती विलक्षण उन्नत होत असावी. एकदा एक ओळखीचे गृहस्थ मला रस्त्यात भेटले. आम्ही बोलत असताना बाजूने एक आम्बेवाला हापोssss स असा पुकारा करत गेला. त्या गृह्स्थांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. काय वैताग आणतात हो हे आंबेवाले? एका जागी स्वस्थ बसा. ज्यांना आंबे घ्यायचे ते घेतील. उगीच हापोssss स, हापोssss स कशाला ओरडत राहायचे? मी सांगतो निशाताई, ह्यांच्यावर बंदीच घालायला पाहिजे. मला त्यांच्या त्राग्याचे नक्की कारण कळले नाही. अहो जाऊ दे हो. पण बाजारात आंबे यायला लागले आहेत याची ही नांदी आहे. आम्ही सगळे आंबा शौकीन आहोत. मी फक्त एवढेच म्हटले आणि त्या गृहस्थांचा चेहरा कारले प्यायल्यासारखा कडू झाला. आंब्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. ते गृहस्थ तिरीमिरीत निघून गेले आणि आंब्याचा राग करणारे हे गृहस्थ मला त्यांच्या नावडत्या माणसांच्या यादीत गणून गेले कारण नंतर ज्या ज्या वेळी मी त्यांना दिसत असे त्या वेळी ते रस्ता बदलत.
एकदा लायब्ररीतून येताना आमच्या सोसायटीतील एक वयस्कर बाई भेटल्या. काय वाचताय? त्यांनी आत्मीयतेने विचारले. अर्थातच पु.ल. मी उत्तरले. त्यांच्या हातात एक चांगले जाडजूड पुस्तक होते. एक ऐकाल? यापुढे असं काही वाचू नका. बाबा कदम वाचत जा. आयुष्य रोमांचकारी वाटेल. मला माझं आयुष्य रोमांचकारी वाटण्यापेक्षा दर्जेदार वाटायला हवे आहे म्हणून मी पु.ल. वाचते. मी ताड्कन उत्तरले. त्या बाई नाक मुरडत फणकाऱ्याने निघून गेल्या. नंतर कधी दिसल्याच नाहीत. बहुधा त्यांनी लायब्ररी बदलली असावी.
एक गृहस्थ नित्यनेमाने त्यांची कुत्री घेऊन संध्याकाळी हिंडायला निघत. मी थोडी लांबूनच त्यांना भेटले. इकडच्या तिकडच्या चारदोन गोष्टी बोलल्यानंतर मी त्यांना सहज म्हटले, अहो ते बघा आपल्या जवळ नवीन आईस्क्रीम पार्लर उघडले आहे. माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचा त्या गृहस्थांना बराच त्रास झाला असावा. आमची कुत्री देखील आईस्क्रीमला तोंड लावत नाहीत ते म्हणाले आणि माझ्या आ वासलेल्या तोंडाची यत्किंचितही दाखल न घेता ते गृहस्थ भराभर कुत्र्यांना ओढत निघून गेले.
लताचा अद्वितीय सूर हे तर माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. मुळात लताचा स्वर आणि गोडवा ही द्विरुक्ती आहे. हापूस जास्त गोड की लताचा स्वर जास्त गोड हे सांगणे दहाव्वीच्या पेपरातील 'डी' ग्रुप प्रश्नापेक्षाही अवघड काम आहे. त्यापेक्षा हापूस आंबा म्हणजे 'सिझनल लता' आणि लता म्हणजे 'बारमाही हापूस' ही व्याख्या जास्त सोयीस्कर आहे. तर अशा बहुतेक सर्वांच्या तनामनात रुजलेल्या लताला नाके मुरडणारीही माणसे आहेत. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' हे गाणे मी लतापेक्षा जास्त चांगले गायले असते असे सांगणारी व्यक्ती एकेकाळी माझ्या परिचयाची होती असे मी सखेद इथे नमूद करते. 'इतना क्यों आप लता को सुनते हो'? असा प्रश्न विचारून आपल्या आनंदी राहण्याचा मूलमंत्र नासवणारी मंडळी आहेत.
प्रत्येकाला मते आहेत , आवडीनिवडी आहेत मान्य. पण अढळ श्रद्धास्थाने असलेल्या आणि जास्तीत जास्त सरासरी असलेल्या आवडीच्या संदर्भात इतकी पराकोटीची तीव्र नावड असलेली माणसे आपल्या अवतीभवती क्षणोक्षणी वावरत आहेत असे अनुभवास आले की गुबगुबीत उशीमधून टाचणी टोचल्यासारखे वाटत राहते.
No comments:
Post a Comment