ही कथा आहे दोन समदु:खी जीवांची. डॉ. रोहित फडणीस आणि अनुश्री यांची. स्वत:च्या स्वप्नांची म्हणा किंवा महत्वाकांक्षेची पूर्तता करण्यासाठी रोहितची बायको त्याच्यापासून विभक्त होते. परदेशात स्थायिक होते. त्यांना दोन मुले असतात. अनुश्रीच्या नवऱ्याने परक्या बाईशी संधान बांधल्याने तो त्याच्या घरापासून, घरच्यांपासून वेगळा राहत असतो. या गोष्टीला तब्बल चार वर्षे लोटलेली असतात. अनुश्री स्वत:च्या पायावर उभी असते. 'प्रीटी पेटल' नामक तिचे फुलांचे दुकान असते. तिला दोन मुली असतात. तिच्या सासूबाई सुद्धा प्रेमळ असतात. मुख्य म्हणजे तिच्या बाजूने असतात. या रोहित आणि अनुश्रीची मुले एकाच शाळेत शिकत असतात. एकदा खेळ ऐन रंगात आला असता अनुच्या मुलीला खरचटते आणि तिला बँडेज बांधायला तिथे रोहित अवतरतो. गाठ भेट होते. मग नेमकी तिची गाडी त्याच्या हॉस्पिटल समोर येउन बंद पडते. पुन्हा गाठ पडते. दोघांत संवाद होतात. नंतर रोहितच्या वाढदिवसाचे निमित्त होते. फुलांचे बुके पाठवायचे असतात. अनुची बहिण तिची नजर चुकवून रोहितला तिच्या घरी येण्याबद्दल त्याला एक एसएमएस पाठवते. तो येतो. ती सुंदर साडी नेसलेली असते. या भेटीआधीच त्यांच्या नात्याला बहर यायला सुरवात झालेली असते. तो फक्त प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणी नेमका त्याच वेळी अवसानघात होतो. कोणाच्यातरी लग्नाला गेलेल्या तिच्या सासूबाई, दोन मुली आणि तो बाहेरख्याली नवरा घराच्या बंद दरवाज्यातून बिनदिक्कत आत येतात आणि कढत नजरेने दोघांकडे बघतात. ते दोघे चोर असल्यासारखे व गुन्हा केल्यासारखे चरकून उभे राहतात. इथे वाजवलेले पार्श्वसंगीतही खूप अतिरेकी आहे.
अनुच्या सासूबाई आपल्या सुनेच्या या प्रतापामुळे तिच्याशी बोलेनाशा होतात. नवरा उखडतो. (वास्तविक पाहता त्याने उखडण्याचा अधिकार आधीच गमावलेला असतो) ती म्हणजे अनु नुसती आतल्या आत रडते. तिची बहिण तिच्या पाठीशी असूनही ती मौनव्रत असल्यासारखी तोंड उघडत नाही. जवळ जवळ पाऊण सिनेमा तिच्या तोंडाचे हे कुलूप निघालेले नाही. ती तिचे दु:ख अश्रूंबरोबर गिळते. तिच्या सासुला लो बी. पी. होते. अर्थातच त्यांना रोहितच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. तिथे हा उपटसुंभासारखा उगवलेला तिचा नवरा येतो आणि त्याच्या आईला तावातावाने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवतो. अनु दिग्मूढ होते . नाईलाज झाल्यासारखी बघत राहते. तिच्या न बोलण्याने रोहीतही चिडतो. मग यथावकाश अनुची सासू घरी येते. मुलाला तिथे राहण्याचा आग्रह करते. त्याचा बिझनेस उतरणीला लागलेला असतो. तो अनुची सहानुभूती प्राप्त करु पाहतो. कळस म्हणजे एकदम उठून तो तिला स्वत:च्या जवळ ओढतो आणि ती प्रतिकार करत नाही. तिच्या मुली आणि सासूबाई त्याची गाडी रुळावर आल्याचे पाहून आनंदतात. तिकडे रोहितची बायको दिवाळीला घरी येते म्हणजे घटस्फोटीत नवऱ्याच्या घरी! थोडक्यात दोन्ही घरे आनंदित असतात निदान वाटतात. मुलांना आईबाबा एकाच वेळी अनुभवायला मिळतात. .
पण आत काहीतरी बिनसलेलेच राहते. अनुला रोहित हवा असतो पण तिच्यात लढण्याची ताकद नसते किंवा नातेवाईकांना फेस करण्याची ताकद नसते. तुझी लढाई तूच लढली पाहिजेस असे रोहित तिला सांगत असतो. स्वत:च्या मुलाचे वागणे गैर असूनही तिच्या सासूबाई सुनेला परपुरुषाबरोबर पाहिल्यानंतर एकदम अबोलाच धरतात. इतकी चार वर्षे म्हणजे तो नतद्रष्ट मुलगा घरातून निघाल्यापासून त्या सुनेने अगदी स्वत:च्या सुखाचा विचार बाजूला सारून जिवाभावाने सासूचे, मुलींचे केलेले असते. हे त्या सासूला दिसत नाही काय? बरं यात भरीत भर म्हणून अनुचे आईवडीलसुद्धा ती जेव्हा घटस्फोटाचा विषय काढते तेव्हा अगं संसारात चढ-उतार हे यायचेच. शेवटी घर एकसंध राहावं म्हणून घरातील स्त्रीलाच तडजोड ही करावीच लागते असा मौलिक सल्लाही देतात. ती भांबावून, गोंधळून जाते. तिचा रोहितशी लग्न करण्याचा निर्णय बदलते. बहिण याबद्दल जेव्हा तिला विचारते तेव्हा ती शेवटी कसाही असला तरी तो माझा नवरा आहे असे म्हणून तिची आणि प्रेक्षकांची बोलती बंद करून टाकते. व्वा रे पतिव्रता!
अनुचा नवरा ज्या बाईबरोबर चार वर्षे राहत असतो ती बाई एके दिवशी एकाएकी म्हणजे नेमकी दिवाळीला त्यांच्या घराच्या दाराशी येते आणि त्याला धमकावते. त्याआधी अनुच्या वडिलांकडून तिच्या नवऱ्याने तीस एक लाख रुपये लाटलेले असतात. याचे बिंग तिची बहिण फोडते. तरीही अनुच्या सासूबाई मुग गिळून गप्प! अनु थोडीफार वाक्ये मुसमुसून रडत त्याच्या अंगावर फेकते आणि सरळ रोहीतकडे धाव घेते. रोहितच्या बायकोला तिच्या नवऱ्याचे महत्व कळलेले असते पण अंमळ उशीर झालेला असतो. तो प्रेमात पडल्याची कबुली तिला देतो आणि तुला आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे असे त्याला सांगत पण खिन्न मनाने ती काढता पाय घेते. दोन दु:खी जीवांचे अखेरीस मिलन होते आणि प्रेक्षक सुटले असे वाटत असताना ते शेवटचे नाच-गाणे प्रेक्षकांच्या डोळ्यांचा ताबा घेते. एक प्रेम, दोन प्रेम अशी बरीच गिनती करत हे चौघेजण मनमुराद नाचतात. कदाचित या चित्रपटातून सुटल्याचा त्यांनाही आनंद होत असावा.
चित्रपटभर पोटभर रडल्यानंतर या गाण्यात अनुश्री म्हणा किंवा मृणाल आनंद व्यक्त करत, हसतहसत गाणे म्हणताना, नाचताना दिसते. चित्रपटाचा आशय, त्याचा दर्जा याचे शेवटच्या नाचगाण्याशी काहीही सोयरसुतक नाही. कितीही प्रेमं केली तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा अर्थाचे गाणे म्हणत चौघे व इतरही नाचतात. प्रेक्षक सबंध चित्रपटाचे आणि त्या गाण्याचे नाते समजून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करत घरी येउन चित्रपट बघितल्याच्या त्वेषाने तरी किंवा चित्रपट संपल्याच्या आनंदात नाचू शकतात.