मुळात मी पाळीव प्राण्यांची शौकीन नाही. मला प्राणी पाहायला आवडतात पण दुरूनच! कुत्री-मांजरी हे सर्रास घरात वावरणारे प्राणी. माझ्या लहानपणी माझ्या मनात कुत्र्यांविषयी प्रचंड भीती होती. रस्त्यावरून चालताना गल्लीतली कुत्री एकाएकी भुंकायला लागली की मी माझ्या बाबांचा हात खूप घट्ट धरत असे. जणू काय ही सर्व कुत्री आता माझ्यावर चाल करून येणार आहेत असा माझा एकूण अविर्भाव असायचा. माझे बाबा कुत्र्यांना गोंजारायचे, त्यांचे लाड करायचे पण माझी आत्या मात्र गल्लीच्या दुसऱ्या टोकाला एक जरी कुत्रं दिसलं की 'हायपर' व्हायची. माझ्या बाबांचे मित्र विजय खातू यांच्याकडे चार-पाच कुत्री होती. गणपतीला त्यांच्याकडे आवर्जून बोलावणे असायचे. मी खूप टाळाटाळ करायची पण बाबांपुढे माझे काही चालायचे नाही. त्याच्या घरी गेल्यावर आधी श्वान-दर्शन आणि मग गणपती-दर्शन! गणपती भोवतीची त्यांनी केलेली सुंदर आरास मी कधीच नीट पाहू शकले नाही कारण सगळे लक्ष त्या कुत्र्यांकडे असायचे. ती कोणत्याही कारणाने भुंकू लागली की मला धडधडायला लागायचे. या कारणामुळे कुत्रा या प्राण्यापासून मी सदैव चार हात लांबच राहिले.
कालमानाप्रमाणे माझे वय वाढले तरीही घरच्या किंवा दारच्या कुत्र्यांची भीती तशीच अबाधित राहिली. समोरून कुत्रं दिसलं की माझा रस्ता बदलत असे. कुत्रांच्या वेगवेगळ्या जातीबद्दलही मला जराही औत्सुक्य नसे. माझ्या सुरतेच्या आत्याचे घर हे कुत्र्या-मांजरांना आंदण दिल्यासारखेच होते. कुठल्या ना कुठल्यातरी प्राण्याचा तिच्या घरात हमखास वावर! तिच्या घरातील कुत्र्यांच्या सवयींविषयी ती भरभरून बोलत असे. त्यांचे अमाप लाड ती करत असे. प्रसंगी त्यांना औषधोपचारही ती करायची. तिच्या घरी तिची लाडकी लंगडी कुत्री तिच्या बेडवर ऐसपैस पहुडलेली आणि आत्या मात्र खाली गादी घालून झोपलेली असे दृश्य अनेकदा दिसायचे. त्यावरून आम्ही तिची भरपूर चेष्टाही करायचो. पण तेव्हाही मला या प्राण्याचे कधीच आकर्षण वाटले नाही.
मात्र पांडू माझ्या आयुष्यात आला आणि मी बदलले. हा माझ्या घरचा पाळीव कुत्रा नव्हे तर आम्ही राहतो त्या इमारतीच्या जवळ वावरणारा, एका पायाने किंचित अधू असलेला कुत्रा. पावसाळ्यात याचे बस्तान आमच्या इमारतीतच असते. Labrador जातीचा हा फिकट चहाच्या रंगाचा कुत्रा अत्यंत लोभस आणि निरुपद्रवी आहे. त्याच्या भित्र्या,भोळ्या आणि बावळट स्वभावामुळे आम्ही ( मी आणि माझ्या लेकींनी) त्याचे नामकरण 'पांडू' असे केले. हा तसा एरवी शांतच असतो म्हणजे इतर कुत्र्यांसारखे सतत भुंकणे, एखाद्याच्या अंगावर जाणे, एखाद्याच्या हातात पिशवी दिसली की त्याच्यामागे जात हुंगणे ही कुत्र्याच्या जातीला शोभणारी सत्कृत्ये तो करत नाही. तो शांत एका कोपऱ्यात पडून असतो. त्याच्याकडून त्याच्या भाई-बंधुंच्याही काही अपेक्षा नसाव्यात. मात्र कधीतरी एकदम अवसान आल्यासारखा उठून कोणाच्यातरी मागे धावत जातो आणि मी ही तुमच्यासारखाच एक नॉर्मल कुत्रा आहे असे त्याच्या बांधवांना सांगण्याचा प्रयत्न तो करतो. आपापली कुत्री घेऊन हिंडायला येणारे बहुतेक करून रस्त्यावरील कुत्र्यांची टार्गेट्स असतात. त्या पाळीव कुत्र्यांवर ही समस्त रस्त्यावरील कुत्री नुसत्या भुंकण्याच्या फैरी झाडत असतात. तो सगळा सोहळाच अवर्णनीय असतो. पण या सगळ्या गोंधळात पांडू मात्र विलक्षण अलिप्त असतो नव्हे तसा तो राहू शकतो. कधी कधी वाटत की हा पांडू म्हणजे कुत्र्यांच्या जातीला कलंक आहे. भुंकणे नाही, बागडणे नाही, कचऱ्यात तोंड घालणे नाही, आल्या-गेल्याला घाबरवणे नाही. मी बरा आणि माझे अलिप्त राहणे बरे या भूमिकेतून जणू तो वावरत असतो.
पांडूचे चापल्य आणि कुत्र्याच्या जातीला जन्माला आल्याचे सार्थक फक्त एकाच बाबतीत दिसून येते. दर रविवारी जेव्हा आमच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या सावंत काकांच्या मागे तो ज्या पद्धतीने वारा प्यायल्यासारखा जातो त्यावरून त्याच्यात कुत्रा नामक जातीचा थोडा तरी अंश आहे याची प्रचीती येते. त्यांच्या त्या मासळी-चिकन-मटण या गोष्टींनी भरलेल्या पिशव्या पहिल्या की पांडू फॉर्मात येतो. त्याची रविवारची तरतूद झालेली असते. एकदा चुकून रविवारी मी त्याच्यासाठी सामिष नसलेले अन्न घेऊन आले तेव्हा त्याने माझ्याकडे ढुंकूनही पहिले नाही. तो सरळ सावंत काकांच्या घराच्या दिशेने चालता झाला. थोडक्यात त्याला रविवार नक्की कळत असावा अशी माझी खात्री आहे. तो गोडघाशा आहे. प्लास्टिकच्या पिशवीतून दिलेले खायचे पदार्थ त्याला आवडत नाहीत. प्लास्टिकच्या बाउलमधून दिलेले पदार्थ तो प्रिफर करतो. पदार्थ जरी समोर असला तरी आधी माझ्याकडून लाड करून घेतल्यानंतरच तो अन्न खातो. माझ्या भावना त्याच्यासाठी महत्वाच्या असाव्यात.
त्याचे भोकरासारखे काळेभोर आर्जवी डोळे बघितले की मी विरघळून जाते. त्याच्याशी (मराठीतच) खूप बोलते. त्याला भाषा कळली नाही तरी लहरी (vibrations) कळत असाव्यात. त्याला आन्जारते-गोंजारते. तोही शेपटी हलवून आणि चारी पाय वर घेऊन माझ्या बोलण्याला प्रतिसाद देतो. काही कारणाने कधी त्याला खायला मिळाले नाही की माझ्या हृदयात कालवाकालव होते. माझ्याकडून त्याचे आवडते असे काही स्पेशल खायला मिळाले की तोही खूष असतो. मात्र रविवार सोडून. रविवार खऱ्या अर्थाने साजरे करणारे सावंत काका त्याला त्या दिवशी जास्त जवळचे वाटतात.
मला श्वान-संप्रदायाविषयी कुतूहलाने विचार करायला भाग पाडणारा पांडू आज माझ्या प्रेमाचे एक अविभाज्य अंग होऊन बसला आहे.
(टीप: वरील फोटो पांडूचा नाही. मला तो फोटो काढून देत नाही. त्याच्यासमोर मोबाईल धरल्यास तो तोंड फिरवतो. त्यामुळे साधारण त्याच्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याचा फोटो मी नाईलाजास्तव वर घातला आहे.)
No comments:
Post a Comment