Tuesday, 11 September 2012

बायकांनो, तुमच्यातील 'काली' जागवा!

स्थळ दिल्ली शहर. शेजारच्या गाजियाबाद या छोट्या शहरातून लग्न करून दिल्लीला आलेली विवाहिता. सुशिक्षित. कुलीन. संस्कारी. Dentist . दिल्लीसारख्या मोठ्या शहरात स्वत:चे करियर सुरु करण्याची मनीषा बाळगणारी. हसरी. आत्मविश्वासाने अंतर्बाह्य फुललेली. तिला बघायला आलेल्या मुलामध्ये स्वत:चा जीवनसाथी शोधणारी. आई-वडील-भाऊ असे तिचे कुटुंब. तिचे वडील आणि ती स्वत: हुंडा या प्रथेचा कडवा विरोध करणारे.  
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीकडून श्रीमुखात खाण्याचे सौभाग्य प्राप्त झालेली. अशी ही स्मृती विवाहानंतर केवळ काही महिन्यांतच नैराश्याची शिकार होते. मानसोपचार तज्ञाकडे उपचार घेऊ लागते. सुकलेला चेहरा, डोळ्याखाली साचलेली काळी वर्तुळे, आत्मविश्वास हरवलेली देहबोली, मनातील स्वप्नांची झालेली राखरांगोळी ही तिची लग्नानंतरची पुंजी. तिच्या सासरच्या घरात सदैव सत्संगत रमण्याचा देखावा करणारे सासू-सासरे आणि तिच्या देहावर आणि मनावर अनन्वित अत्याचार करणारा तिचा राक्षसी वृत्तीचा पती.  
तिला एक मोठा दीरही असतो जो त्याच्या मेहनतीवर त्याच्या व्यवसायात मोठा झालेला असतो. प्रसंगी त्याने त्याच्या सासरच्यांकडून काही आर्थिक मदत घेतलेली असते. आणि नेमके हेच स्मृतीच्या पतीच्या दु:खाचे मूळ असते. अशाच भरघोस आर्थिक मदतीची अपेक्षा तो स्मृतीच्या वडिलांकडून करत असतो ज्यावर तो त्याच्या व्यवसायाचा डोलारा उभारणार असतो. ज्या वडिलांनी यथाशक्ती खर्च करून आपल्याला वाढवलं, शिकवलं, बौद्धिक दृष्ट्या सक्षम केलं आणि आपल्या लग्नातही ज्यांनी भरपूर खर्च आनंदाने व मुलीचे कल्याण व्हावे या इच्छेने सोसला त्या बापाला आपल्या पतीला आर्थिक मदत करण्यासाठी भरीस पाडावे असे तिला मुळीच वाटत नव्हते. ती 'नाही' या शब्दावर ठाम होती आणि या नाही म्हणण्याची किंमत ती पुरेपूर मोजत होती. दिवसेंदिवस ती नैराश्याच्या खोल गर्तेत रुतत चालली होती. तिच्या करीयरची स्वप्ने कधीच धुळीला मिळाली होती. पतीच्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी ती तत्पर होती पण तिच्या आत साचलेल्या वेदनेचे गांभीर्य त्यांना कधी कळलेच नाही. तिच्या दीनवाण्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या दिवट्याचा संताप कधी आलाच नाही. 
आपल्या भावाला त्याच्या सासरच्यांकडून मिळणारी आर्थिक मदत आपल्याला का मिळू शकत नाही या विचारांनी स्मृतीचा पती सैरभैर झाला होता. किंबहुना अशी भरघोस आर्थिक मदत मिळावी म्हणूनच त्याने लग्नाचा घाट घातला होता. त्याच्या सगळ्या मनसुब्यांवर डॉक्टर स्मृतीने बोळा फिरवला होता आणि म्हणूनच ती त्याच्या क्रोधाला सारखी बळी पडत होती. अधूनमधून वडिलांशी फोनवरून याविषयी संभाषण व्हायचे परंतु त्यांनीही प्रत्यक्ष तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. रडणाऱ्या मुलीचे फोनवरून सांत्वन करण्यापलीकडे ते विशेष काहीच करू शकले नाहीत. तुला मी घरी न्यायला येतो असे त्यांनी कधी म्हटल्यानंतर ती, मी परत येणार नाही एवढेच म्हणायची. दिसामाशी ती झुरत होती, झिजत होती. ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. तिने निमुटपणे ती परिस्थिती स्वीकारली. पतीच्या जाचाला सहन करत राहिली. अखेर एक दिवस सारे काही असह्य झाल्यानंतर तिने गळफास लावून स्वत:ला संपवून टाकले. तिच्या फुलपाखरासारख्या आयुष्याची शोकांतिका झाली. 
हे सगळे 'क्राईम पेट्रोल' मध्ये बघितल्यानंतर मन क्षणभर सुन्न झाले. तिने अन्यायाचा प्रतिकार का केला नाही या विचाराने मन पोखरून टाकले. तिचे स्वत:चं इतकं सुंदर आयुष्य कुठल्यातरी फडतूस आणि अत्यंत हिडीस माणसासाठी असे फुंकून का टाकावे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. का ती माहेरी निघून नाही गेली? का तिने तिचे करियर कोणातरी पती नामक इसमाच्या सांगण्यावरून अर्धवट सोडले? का ती शेवटपर्यंत त्याच्याकडून अकारण शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करत राहिली? तिचे संस्कार, तिचे शिक्षण, तिचा आत्मविश्वास, तिचे सामर्थ्य कुठे लोप पावले? अशा नालायक लोकांसाठी तिने आत्म-बलिदान का केले?  
अशा अनेक स्मृती आज या देशाच्या नव्हे जगाच्या कैक कोनाड्यांत खितपत पडल्या आहेत. निमुटपणे अत्याचार सोसत आहेत. त्यांचे नैराश्य त्यांना अजगरासारखा विळखा घालून बसले आहे. त्यांचा खचलेला आत्मविश्वास त्यांना या मृतप्राय अवस्थेपर्यंत पोहोचवतो आहे. त्यांच्या मनात भावी गळफास तयार होत आहेत. काहीही कारण नसताना स्वत:चे शारीरिक आणि मानसिक शोषण दुसऱ्याला करू देण्याची अशा सर्व स्मृतींची इच्छा ही सर्वार्थाने निदनीय अशीच आहे. 
अशा सर्व स्मृतींना माझे कळकळीचे सांगणे आहे की कुणाच्या तरी विकृत हट्टाखातर स्वत:च्या जीवनाची आहुती देणे हे सर्वस्वी अयोग्य आहे. या पृथ्वीतलावरील आपला जन्म हा हकनाक कुणाचे भक्ष्य होण्यासाठी खचितच नाही. आपल्या आत्मविश्वासाला, आत्म-सन्मानाला चिरडणारा आपला पती नामक इसम आपल्या आयुष्यात राहण्यास अजिबात लायक नाही. 
सर्व दुष्ट प्रवृत्तींचे हनन करण्यासाठी जसा पार्वतीने कालीचा अवतार धारण केला तसेच स्वत:चे सामर्थ्यपूर्ण उग्र रूप समाजातील अशा अप-प्रवृत्तींना दाखवण्याची आज नितांत गरज आहे. अशी 'काली' प्रत्येक स्त्रीत वसलेली असते फक्त तिचे योग्य वेळ येताच प्रकटीकरण होणे अत्यावश्यक आहे. 
तेव्हा समस्त स्त्रियांनो, पुरुषी अत्याचारावर आरूढ होण्यासाठी तुमच्यातील 'काली' जागवा ! 





No comments:

Post a Comment