लताचा आवाज ही कालमानाच्या अथवा वयाच्या संकल्पनेत बसणारी गोष्टच नव्हे. निर्गुण, निराकार शक्तिसारखा तिचा आवाज हा सर्वव्यापी आहे. आजवर अनेकांनी लताविषयी भरभरून लिहिले आहे. तिला आकंठ ऐकले आहे. तरीही तिच्याविषयी खूप काही लिहावेसे, बोलावेसे वाटते. तिचा मंजुळ, नितळ, अनुपमेय स्वर कानात साठवण्यासाठी मन आपसूक आतुर होते. तिच्या स्वरातील अध्यात्म पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहते.
तिच्या शरीराला वयाची मर्यादा असली तरी तिचा आवाज हा चिरंजीव, चिरंतन आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तिचा आवाज हे एक मूर्तिमंत चैतन्य आहे. विरहात पोळलेल्या प्रेमीजनांसाठी तिचा आवाज हे एक मृदुल मलम आहे. भक्तिरसात बुडालेल्यांसाठी तिचा आवाज ही एक योगसाधना आहे. इतका चतुरस्त्र आवाका असलेला हा अलौकिक स्वर आज अजून एका वर्षाने वृद्धिंगत होतो आहे.
लता हा कानसेनांच्या हृदयात फुलणारा बारमाही वसंत आहे. इथे शिशिराची पानगळ औषधालाही नाही.
किती संगीतकारांसाठी लता गायली? किती संगीतकार तिच्या आवाजातील सौदर्य सर्वदूर पसरवण्यासाठी जन्माला आले? सांगणे मुश्कील आहे. ती जीव ओतून गायली. रात्रीचा दिवस करून गायली. एका चहाच्या कपावर तिने अनेक गाण्यांचे सौदर्य सशक्तपणे तोलून धरले. पोटाला बसणारे चिमटे तिच्या गाण्याला अधिकाधिक परिपक्व, सक्षम आणि दृढ करत गेले. 'पिकोलो' जातीच्या तिच्या आवाजाने अवघ्या दुनियेलाच भ्रमिष्ट केले. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तिच्या आवाजाचे सान्निध्य रसिकाला सुखावू लागले. संसार तापाने शिणलेल्या, श्रमलेल्या लाखो-करोडो जनतेसाठी तिचा आवाज ही एक हमखास दवा झाली.
तिला कधीच अहोजाहो करावेसे वाटत नाही. तिच्या बाबतीत लौकिक उपचार पाळावेसे वाटत नाहीत. तिने आपल्या कानाद्वारे हृदयाचा कप्पा कधीच काबीज करून त्यात कायमची वसाहत केली आहे. आता जी व्यक्ती इतकी जवळची आहे तिला संबोधताना अहोजाहो काय करायचे? ती आमचे आदरस्थान आहे यात शंका नाही पण तिला आदरार्थी संबोधून आम्हाला तिला परके करायचे नाही. तिचा खडीसाखरेसारखा गोड आवाज सदैव आमच्या भोवती रुंजी घालत राहतो. तिची छोटीशी मूर्ती, दुसऱ्या खांद्यावरून ओढून घेतलेला पदर, तिचे आदबशीर, सौजन्यपूर्ण वागणे, तिच्या डोळ्यांतील मिश्कील छटा, तिचे चांदणहास्य हे सगळे अंत:करणात अनेक वर्षांपासून साठलेले आहे.
कै.कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात भरारी मारण्याआधीच लताच्या आवाजाने गगनाला गवसणी घातली आहे. अशी विश्वव्याप्त गोष्ट ही प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात नेहमीच निष्ठापूर्वक पूजली जाते. तिच्या 'मीरा भजनांनी' अनेकदा अतींद्रिय अनुभूती दिलेली आहे. ही एका अंशीही अतिशयोक्ती नाही. तिच्या प्रेमागीतांवर अनेक प्रेमींनी आपले सूर जुळवले आहेत. तिच्या 'जा रे जा रे उड जा रे पंछी' या गाण्याने अनेक विरहीजनांची हृदये विद्ध झाली आहेत. तिच्या 'ओ सजना बरखा बहार आयी' या गीतातील गोडवा आजही रत्तीभरही कमी झालेला नाही. 'रैना बीती जाये', 'बैय्या ना धरो', 'ये जिंदगी उसी की है', 'मोहे पनघट पे', 'जाग दर्दे इश्क जाग', जिया लागे ना', 'मनमोहना बडे झुठे', 'सावरे सावरे' या आणि अशा असंख्य गाण्यांची आपण जन्मोजन्मीची गुलामी पत्करलेली आहे.
संत तुकारामांच्या अभंगातील आर्त लता आपल्याला अंतर्मुख करून गेली आहे. 'भेटी लागे जीवा', 'कमोदिनी काय जाणे', अगा करुणाकरा' ही लताची साद शब्दातीत आहे. तसेच 'पैल तोगे काऊ कोकताहे', 'ओम नमोजी आद्या, 'घनु वाजे घुणघुणा' हे ज्ञानेश्वारांचे लताने गायलेले अभंग ही भक्तीरसाचे सेवन करणाऱ्यांसाठी एक आनंदपर्वणी आहे. 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' हा अभंग ऐकताना त्या सगुण स्वरूपपलीकडील अगाध सौदर्याची प्रचीती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही.
मदन मोहनने तिच्याकडून गाऊन घेतलेल्या गझलांमधील लुथ्फ ठायी ठायी जाणवत राहतो. 'आपकी नजरोने समझा', 'है इसिमे प्यारकी आबरू, 'यु हसरतों के दाग' या आणि अशा कैक गझला आपल्या मनावर आजही गारुड करून आहेत. अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, नौशाद, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, एस.डी, आर.डी बर्मन, जयदेव, मदन मोहन, सज्जाद, सी.रामचंद्र अशा अनेक संगीतकारांनी लताच्या आवाजात आपल्या रचना अजरामर केल्या किंवा अशा अलौकिक प्रतिभावंत संगीतकारांच्या रचनांतून लता आपल्या काळजात कायमची रुतली आहे.
तिच्या विषयी किती लिहावं हेच समजत नाही. लता हा एक अजोड ग्रंथ आहे जो कधीच आत्मसात झालेला आहे. पण आपल्या श्रावणशक्तीनुसार तिला कितीही ग्रहण केली तरी ती दशांगुळे उरतेच! हेच तिच्या आवाजाचे खरे मर्म आहे.

अशा या श्रोत्यांच्या कानाला भरभरून तृप्त करणाऱ्या अनमोल आवाजातील माधुर्य कधीही लुप्त न होवो हीच लताच्या वाढदिवशी त्या जगनियंत्याच्या चरणी प्रार्थना!