Sunday, 16 November 2014

विनोदाचे आणि माणुसकीचे आगर- पुलं

शालेय पुस्तकातून पुलं डोकावले आणि कायमचे मनामध्ये शिरले. माझ्या बाबांचे ते गुरु. माझे बाबा हरी भोपटकर orient हायस्कूलचे विद्यार्थी. तिथे पुलं आणि सुनिताताई सारखे प्रतिभावान शिक्षक बाबांना लाभले. माझे बाबा उत्तम पेटी वाजवायचे. बाबांकडून पुलं विषयी खूप ऐकले होते त्यामुळे माझे बालसुलभ कुतूहलही जागे झाले होते. पुलं खूप हसवतात ही गोष्ट सगळ्याच परिचितांकडून मनावर कोरली गेली होती.          
पुढे मी कविता करायला लागले. तसा लिखाणाचा वारसा बऱ्यापैकी घरातूनच मिळाला होता. माझी आत्या शरयू भोपटकर ही लेखिका होती तसेच ऑफिस सांभाळून इतर वेळ आधी रंगायतन व नंतर आविष्कार या संस्थेच्या नाटकांसाठी ती देत होती.
तू असाच यावास आणि अशा काही निवडक कविता मी पुलंच्या अभिप्रायार्थ पोस्टाने पाठवल्या.  आधी मी बाबांनाच म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी त्यांना पत्र  टाका. पण त्यांनी सरळ नकार दिला. मला त्यांचं वागणं पटलं नाही पण काय करणार?  मग बाबांचाच संदर्भ देऊन मी माझं पहिलंवहिलं पत्र पाठवलं. मी खूपच excited होते. त्यांच्या उत्तराची चातकासारखी वात पाहत होते. पण बरेच दिवस गेले आणि माझी आशा मावळत चालली. वाटायचं ते कुठे मी कुठे? आणि बाबा तरी त्यांना कसे आठवणार? कारण त्या गोष्टीला बरीच वर्षे लोटली होती. एव्हाना माझे लग्नही झाले होते. १९८१ सालची गोष्ट.         
आणि एके दिवशी अचानक माझ्या नावचं अंतर्देशीय पत्र आलं.  त्यावरील पुलंचं नाव आणि पत्ता मी बघितला आणि मला अक्षरश: आकाश ठेंगणं झालं. मी पत्र उघडलं आणि कमालीच्या आतुरतेने वाचू लागले. आश्चर्य म्हणजे माझे बाबा त्यांना अगदी व्यवस्थित आठवत होते. बाबांनी बसवलेल्या संगीतिका आणि त्यांच्या पेटीवादनाचं पुलंनी कौतुक केलं होतं एवढंच नव्हे तर हरीमुळे तुला जो वारसा मिळाला आहे जो चांगल्या प्रकारे जोपास असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. माझ्या कवितांविषयी पुलंनी सविस्तर लिहिलं होतं. कविता कशी लिहावी व कशी लिहू नये याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं. ज्या कविता वृत्तात चुकल्या होत्या त्या लिहिताना काय खबरदारी घेतली पाहिजे हेही सांगितलं आणि तू असाच यावास ही माझी कविता त्यांना मनापासून आवडली हे सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. (त्यामुळे १९९५ साली प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचं नाव मी 'तू असाच यावास ' हेच ठेवलं.) माझा तर कितीतरी वेळ पुलंनी  आपल्याला पत्र लिहिलं आहे आणि तेही एवढं सविस्तर यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्या पत्राची आणि त्यातील मजकुराची पारायणे झाली. त्या दिवसांत माझे पाय जमिनीपासून थोडे वर उचलले गेले होते.           
त्यानंतर कवितेचं नक्की स्वरूप काय अशा आशयाचं पत्र मी त्यांना टाकलं. पहिलं पत्र येउन सुद्धा या पत्राच्या उत्तराबद्दल मी जर साशंकच होते. मनात म्हणतही होते, त्यांना दिवसाकाठी अशा लाखो वाचकांची पत्रे येत असणार. ते कुणाकुणाला लिहित बसतील? मला एकदा लिहिलं त्यांनी पत्र म्हणजे परत थोडेच लिहितील? त्यांना काय तेवढंच काम आहे का? पण मग असं वाटायचं की नक्की उत्तर येईल. आणि यथावकाश उत्तर आलं कवितेचं स्वरूप अतिशय उत्कृष्ट रीतीने उलगडून दाखवणारं. मी खूप आनंदले. प्रोत्साहित झाले.  
नंतर काही निमित्ताने अशा पाच-सहा पत्रांची आमची देवाणघेवाण झाली. मध्यंतरी घरात वाचनालय सुरु करावे असे मनात आले होते परंतु त्यासाठी समर्पक असे नाव सुचत नव्हते. तेव्हा पुलंना पत्र टाकले आणि त्यांनी 'पसाय' हे नाव द्यावे असे सुचवले. पुढे मात्र तो वाचनालयाचा माझा बेत बारगळला. पुढे काही वर्षांनी पुण्याच्या स. ह. देशपांडे यांचे मला पत्र आले. पुलंचा  पत्रव्यवहार चाळत असताना त्यांना माझी काही पत्रे त्यात सापडली. त्यातील कवितेचं नक्की स्वरूप काय हे माझं पत्र त्यांना मिळालं परंतु त्यावरील पुलंच्या उत्तराचं पत्र त्यांना हवं होतं. मी ते पाठवून दिलं आणि पुलंच्या  ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या अमृतसिद्धी ग्रंथात ते समाविष्ट झालं. ही माझ्यासाठी नि:संशय गौरवाची गोष्ट आहे.            
त्यांना भेटावेसे खूप वाटायचे पण तशी संधी कधी मिळाली नाही. मी ठाण्याला राहायला आल्यानंतर श्रीमती विजया जोशी यांचेकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यासाठी काही वेळेस जायचे. त्यांचा एन सी पी ए ला गायनाचा कार्यक्रम होता. आम्ही शिष्यमंडळीही ऐकायला जाणार होतो. तेथील हॉलमध्ये आम्ही  प्रवेश करते झालो. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. माझी नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. एवढ्यात मला पुलं आणि सुनीताताई मागील खुर्च्यांवर बसलेले दिसले. मी पुढचामागचा विचार न करता धावले आणि प्रथम त्या उभयतांच्या पाया पडले. नंतर मी त्यांना माझे नाव आणि त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल सांगितले. दोघे खूप छान बोलले. लगेचच announcement झाली आणि मी पुढे जाउन खुर्चीवर स्थानापन्न झाले. गाणे संपल्यावर मी मागे वळून बघितले पण ते दिसले नाहीत. मागाहून कळले की पुलंची तब्येत ठीक नव्हती. अनपेक्षितपणे  आपले आराध्यदैवत असे भेटल्याने माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर मात्र मी पुढे कधीच त्यांना भेटू शकले नाही. त्यांच्या दुखण्याची, आजाराची बातमी ऐकली की मन खिन्न व्हायचे.    
आज पुलं नाहीत आणि सुनीताताई सुद्धा नाहीत. त्यांच्या विनोदाइतकाच त्यांच्यातील माणुसकीचा झरा खूप निर्मळ आणि सच्चा होता. अहंगंड त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या पत्रातून मला सदैव त्यांच्यातील एक प्रेमळ,स्नेहपूर्ण,प्रोत्साहन देणारा मार्गदर्शकच जाणवला. हा माझा २०० वा ब्लॉग आहे. माझ्या कवितेला ज्यांनी पहिलंवहिलं मार्गदर्शन केलं आणि लेखनाचा व गाण्याचा वारसा जपण्याचा ज्यांनी मला मोलाचा सल्ला दिला त्या पुलंना माझा हा ब्लॉग मी कृतज्ञ भावनेने समर्पित करते आहे.              
       
  

Thursday, 13 November 2014

पुढील राजकीय पेपर सोडवा ……


अ खालील गाण्यांच्या ओळी नेमक्या कोणत्या पक्षाला उद्देशून आहेत ते सांगा
१) दोस्त दोस्त ना राहा
२) फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
३) टिकटिक वाजते डोक्यात
४) तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा
५) बनाके क्यों बिगाडा रे
६) जाने कहाँ गए वो दिन
७) आसूँ भरी है ये जीवनकी राहें
८) मैं  इधर जाऊँ या उधर जाऊँ
९) तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना
१०) परदे के पिछे क्या है


ब  कारणे  द्या 
१) पूर्वी कमळ सूर्याकडे बघून फुलायचे पण अलीकडे ते घड्याळाकडे बघत फुलते
२) इंजिन चालू झाले पण अल्पावधीतच बाकीच्या डब्यांपासून ते तोडले गेले
३) अभिमानाने हात वर करणाऱ्यांनाच लोकांनी हात दाखवला
४) दुसऱ्यांवर अचूक नेम साधणारे यावेळेस स्वत:च्याच वाग्बाणांनी घायाळ झाले
५) धनुष्यबाण व कमळ या जोडीने आणि घड्याळ व हात या जोडीने एकाच वेळी एकमेकांशी घटस्फोट घेतला


क असे कोण म्हणाले ते सकारण सांगा
१) हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी
२) आम्ही एक वेळ अविवाहित राहू पण NCP चा पाठींबा कदापि घेणार नाही
३) तुम्ही फक्त एकदाच माझ्या हातात राज्य सोपवून बघा  


ड  कंसातील सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा
१) मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी - (इथे मुंगी कोण व सूर्य कोण ते सांगा )
२) क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ( इथे वादा, कसम  व इरादा या शब्दांचे राजकीय अर्थ स्पष्ट करा)
३) सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है ( ही वैद्यकीय लक्षणे कोणत्या पक्षाची आहेत ते ओळखा )
४) श्रीरंगा कमलाकांता हरी पदराते सोड ( येथे कमलाकांता आणि हरी हे शब्द कोणाला उद्देशून वापरले आहेत ते सांगा )
५) हम और तुम तुम और हम खुश है यू आज मिलके ( यातील हम आणि तुम कोण आहेत ते स्पष्ट करा )


ई  फरक विशद करून फायदे व तोटे सांगा
     आवाजी मतदान व गुप्त मतदान


फ पुढील गाण्यांच्या ओळींपैकी एका ओळीचे अर्थासहित स्पष्टीकरण द्या
१) कभी खुद पे कभी हालात पे रोना आया   
                            किंवा
२) प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यू लागता है डर

Wednesday, 12 November 2014

सत्तेसाठी काहीही …………

विधानसभेत काल घडलेल्या सबंध नाट्याचा मला पुनरुच्चार करायचा नाही परंतु या कृतीमुळे भाजप सरकारची राज्यातील विश्वासार्हता निश्चितच लयास गेली आहे.   
सुशिक्षित,सुजाण ,सुज्ञ असा मतदार ( नोटांची चळत पाहून आपली मते न विकणारा आणि कोणत्याही पक्षाला बांधील नसणारा ) काहीएक विचार करून आपले मत अमुक एका पक्षाच्या पारड्यात टाकत असतो. त्या त्या पक्षातील मुख्य चेहऱ्याकडे आणि त्याच्या आजवरच्या राजकीय कर्तृत्वाकडे पाहून हे बहुमुल्य मत मतदार देत असतात. कॉंग्रेस -राष्ट्रवादीने त्यांच्या राजकीय कर्तृत्वाने जनमानसात जो अविश्वास निर्माण केला त्यांची परिणती म्हणून यावेळेस मतदार राजाची पावले भाजप सरकारच्या दिशेने आपसूकच वळली.   
हे नवीन सरकार तरी नागरिकांच्या हिताचे व त्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर व्हावे असे काहीतरी करेल या विश्वासापोटीच हि नवी सोयरिक जनता जुळवू पाहत होती. भाजप सरकार मोठ्या संख्येने राज्यात आले खरे पण जनतेने या पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजप नंतर दुसरा मोठा  पक्ष म्हणून शिवसेनेला जनमान्यता मिळाली. आता भाजप आणि शिवसेना मिळून या राज्याचा नवा संसार थाटतील  असे जनतेला वाटत असतानाच त्या पक्षांतर्गत मानापमानाची नाटके रंगली आणि भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला.    
ज्या राष्ट्रवादीला 'भ्रष्ट्वादी ' आणि NCP म्हणजे 'naturally corrupt party' म्हणून कुत्सितपणे भाजप हिणवत राहिली आणि ज्या भाजपने सत्तेवर येताच अशा भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये  टाकू अशा वल्गना केल्या त्याच भाजपची आज राष्ट्रवादी पक्षाबाबतची भूमिका संदिग्ध व संशयास्पद असावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आम्ही विश्वास दर्शक ठरावाची सगळी प्रक्रिया कायदेशीर रित्याच पार पाडली असा भाजप आज कितीही ठणाणा करून सांगत असली तरी ते कितपत खरं आहे हे त्यांनाही माहित आहे आणि सुज्ञ जनतेलाही ते आता ज्ञात झाले आहे.  

ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा.उल्हास बापट यांनी काल सांगितले की त्यांनी तांत्रिक बाबी जुळवून आनत्या खऱ्या परंतु जे काही काल विधानसभेत घडले ते नैतिकतेला धरून तर नव्हतेच शिवाय यात लोकशाहीचे सर्व संकेत भाजपने झुगारून दिले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री.पी .बी .सावंत  यांनी विश्वास दर्शक ठरावाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बेकायदेशीर असे संबोधले आहे.    
विधानसभेच्या अध्यक्षपदी श्री. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कॉंग्रेस व शिवसेनेने शस्त्रे खाली ठेवून या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पुढचे काम भाजपच्या दृष्टीने अत्यंत सोपे झाले. वास्तविक पाहता विधानसभेचा अध्यक्ष हा नि:पक्षपाती असायला हवा पण सत्तेच्या मोहापायी काय वैध नि काय अवैध याचा सारासार विचार आणि  विवेक कोणालाच राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते आहे.  
या सगळ्या प्रक्रियेत भाजपने १४५ चा बहुमताचा आकडा गाठला आहे असे कुठेच सिध्द झालेले नाही. पण भाजपचे प्रवक्ते तर जोरजोरात सांगत आहेत की आम्ही बहुमत सिद्ध केले. पण ते नक्की कसे हे तुम्हाला मत दिलेल्या जनतेला तरी समजण्याचा हक्क आहे की नाही?
राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा जाहीर केला आहे, आम्ही थोडाच त्यांच्याकडे मागितला होता असे एकीकडे सारखे म्हणत राहायचे आणि शिवसेने बरोबर अजूनही आमची चर्चा सुरु आहे असे म्हणत संभ्रमावस्था निर्माण करायची अशी खेळी भाजपने सुरवाती पासूनच आरंभली आहे. राष्ट्रवादीचा पाठींबा न मिळता भाजपचे बहुमत कसे सिद्ध झाले हे एकदा जनतेला तरी कळू दे.  काँग्रेस -शिवसेनेचे मतविभाजन मागण्याचे 'timing' चुकले अशी तांत्रिक बाब पुढे करून भाजपने आवाजी मतदानाने  विश्वास दर्शक ठराव पारित करून घेतला आहे हे न समजण्या इतकी जनता दुधखुळी नाही.      

यापुढे सत्ता स्थापनेसाठी आसुसलेले इतर पक्ष सुद्धा याच तांत्रिक '(अ)-नीतीचा ' अवलंब आपल्या फायद्यासाठी करून घेतील हे निश्चित आहे. असा नवा 'आदर्श' प्रस्थापित करण्याचे श्रेय भाजपला द्यायलाच हवे.   
या महाराष्ट्र देशातील सर्वसामान्य मतदार भलेही या तांत्रिक बाबींशी अवगत नसेल परंतु अशा बनवाबनवीच्या आयुधाने व राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर तरलेले सरकार 'विश्वासार्ह' नाही हे खचितच त्याच्या मनामध्ये आजपासून अधोरेखित करेल.        

Tuesday, 11 November 2014

जनहित म्हणजे काय असतं रे भाऊ ?

राजकारणात अगदी नव्याने दाखल झालेला गंप्या नव्या नवरीच्या नवलाईने मोठमोठ्या नेत्यांकडे विस्मयाने पाहत होता. त्यांचे हातवारे, लकबी, बोलण्याची ढब बारकाईने निरखित होता. त्याला काही गोष्टी समजत होत्या  तर काही गोष्टींचा उलगडा काही केल्या होत नव्हता. त्याने राजकारणाच्या क्षेत्रात त्याच्याहून एक पाउल पुढे असणाऱ्या भाऊ म्हस्केला विचारले, ते मोठे पुढारी लोक त्यांच्या भाषणात सारखे जनहित जनहित म्हणत असतात. हे जनहित म्हणजे नक्की काय रे भाऊ? भाऊ गंप्याला सिनियर असल्याने त्याच्यापुढे जरा टेचात वावरत होता.  तो म्हणाला, अरे आमचे साहेब म्हणतात की एक किलो राजकारणात शंभर ग्रॅम जनहित मिसळावे लागते. गंप्या काहीच न समजल्याने तोंडाचा चंबू करून म्हणाला, ते कशाला? भाऊ उत्तरला, अरे मग जनता कशाला निवडून देईल आपल्याला.         
या उत्तराने गंप्याचे फारसे समाधान झाले नाही. पण इतर अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंघावत होते. आपल्याला कोणी विचारलं की राजकारणात का आलात तर काय सांगायचं भाऊ? अरे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो असं सांगायचं, भाऊने एकदम तयार उत्तर दिलं. कोणते प्रश्न? गंप्याने पुढला बॉल टाकला.  हेच म्हणजे रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याचे साचलेले ढीग, वाहतुकीचा खोळंबा, परप्रांतीयांचे लोंढे, वीज-पाणी टंचाई, अल्प दरात घरे, भेडसावणारी महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, तृतीयपंथीयांच्या  समस्या, शिक्षणाचे वाढते ओझे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांचे शोषण, रोगराई वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न आपण कसे सोडवायचे रे भाऊ ?  गंप्या प्रश्नांची ही लांबलचक यादी ऐकून अगदी काकुळतीला आला. हे प्रश्न आपण सोडवायचे असे मी म्हटले का? भाऊने  विचारले. अरे पण त्याचा अर्थ तोच होतो ना ? गंप्याचा जीव कासावीस झाला. गंप्याला आईने वैतागून जाउन त्याच्या पेकाटात मारलेली लाथ आठवली. एवढा घोडा झालाय पण काम करायचं नाव घेत नाही. काय रे ए मुडद्या, जन्मभर लोळायचा वसा घेतला आहेस का? आम्ही तुला यापुढे पोसणार नाही. बाहेर जा आणि काम शोध. आईच्या या सारख्या  धोशामुळे गंप्या कंटाळला आणि भाऊसमोर त्याने आपली व्यथा मांडली.   
भाऊ क्षणाचाही विलंब न लावता गंप्याला म्हणाला, अरे तू राजकारणात सक्रिय हो. म्हणजे काय करू? म्हणजे politics मध्ये admission घे. हे वाक्य मात्र गंप्याला कळले आणि त्याने ताबडतोबीने admission घेऊन टाकली. कसलाही फॉर्म आणि पैसे न भरता आपल्याला admission मिळाली याचेच त्याला कौतुक वाटले. पण पुढे काय याचे उत्तर फक्त भाऊवर अवलंबून होते. मी साहेबांकडे तुझ्यासाठी शब्द टाकला आणि ते लगेच हो म्हणाले. आपल्या शब्दाला वजन आहे गंप्या. काय कळलं weight weight, भाऊने पेपरवेट हातात धरून तो पेपरच्या गठ्ठ्यावर ठेवला. गंप्या एखाद्या सिनेमातील हिरोकडे  पाहावं तसं भाऊकडे आदराने पाहू लागला.   
भाऊंची मुलाखत घ्यायला एक पत्रकार आला होता पक्षाच्या ऑफिसमध्ये. काय म्हणतीय राजकारणातील प्रगती? पत्रकाराने ऑफ द रेकॉर्ड विचारले. साहेबांची कृपा आहे, भाऊ उत्तरला.  मुलाखत सुरु झाली. आपल्या पक्षाचं निश्चित धोरण काय आहे ते सांगू शकाल? पक्षाचं धोरण साहेब ठरवतात. आम्ही  पालन करतो. अहो पण आता जो प्रसंग घडला त्या बाबतीतील आपल्या पक्षाची भूमिका जरा स्पष्ट करता का? कालच ह्या प्रसंगा विषयीची आपल्या पक्षाची भूमिका आमच्या साहेबांनी स्पष्ट केली आहे. तीच आमची भूमिका.  आपला पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे असे इतर पक्षाचे लोक आरोप करत आहेत. लाचारी साहेबांच्या रक्तात नाही त्यामुळे ती आमच्याही रक्तात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अखेरीस आपला निर्णय काय झालाय ते सांगता का?  जो निर्णय साहेबांचा तोच आमचा. अहो ते ठीक आहे पण म्हणजे नक्की निर्णय काय? ते योग्य वेळेस आमचे साहेब जाहीर करतील. काळजी नसावी.           
पत्रकार काहीच थांग न लागल्याने खिन्न मनाने परतला.  काय गंप्या कशी झाली माझी मुलाखत? भाउने जिंकल्याच्या अविर्भावात विचारले. एकदम बेस्ट भाऊ. मग तयारीला लाग. तुलाही उद्या अशी उत्तरे देण्याचा सराव करावा लागेल. हो हो नक्की, गंप्या म्हणाला.       
घरी गेल्यावर गंप्याला आईने विचारलं, काय रे इतक्या रात्रीपर्यंत कसलं काम करतोस? गंप्या उत्तरला, साहेब आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही काम करतो.                   

Friday, 7 November 2014

स्वच्छता अभियान - प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य


आपल्या देशातील नागरिक विशेषत: युवा पिढी पाश्चात्यांच्या अनेक सवयींचे, वागण्याचे, त्यांच्या खास लकबींचे अनुकरण करण्यात धन्यता मानते. त्या देशांतील हिरो-हिरोईन्स , बिझनेसमन, मॉडेल्स  यांना आदर्श मानले जाते. त्या देशांना भेट देऊन परतणारे भारतीय तेथील गोडवे गाताना थकत नाहीत. त्या देशांत कोणकोणत्या गोष्टींची  उपलब्धता आहे आणि आपल्या इथे कुठल्या गोष्टींची सदैव चणचण आहे याचा उहापोह हे लोक सविस्तर करू शकतात. पण एवढे असूनही पाश्चात्य देशांतील स्वच्छतेचे, शिस्तीचे, कामसू पणाचे अनुकरण करताना कोणीच दिसत नाही. असे का हा प्रश्न अशा वेळी विचारावासा वाटतो. 
यावेळेस म्हणून मग आयुष्यात कधी हातात झाडू घेतला नसेल अशा भारतीय तारे आणि तारकांना लोकांनी  रस्ता झाडताना बघितले. आमचे अनुकरण करता ना मग असेही करा हाच संदेश यातून भारतातील नागरिकांना मिळाला.        
आपल्याकडे  रोगराई फैलावल्यावर स्वच्छता करा अशी तंबी दिली जाते.  एरवी पावलापावलावर, नाक्यानाक्यावर, जवळजवळ प्रत्येक  गल्लीबोळात साचलेल्या कचऱ्याचे ढीग आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात पण त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. जाहीर सभा घेतल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना लोकांना सांगावे लागते की  इथून जाताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पेपर, खाऊची पाकिटे वा इतर केरकचरा उचला, इथे टाकू नका. अजूनही या देशातील नागरिकाला ही स्वत:ची जबाबदारी वाटत नाही काय?  अनेक सरकारी हॉस्पिटल्सच्या  आवारात वा आजूबाजूला उभंही  राहवत नाही इतकी अस्वच्छता बोकाळलेली असते. त्यामुळे अनेक प्रकारची दुर्गंधीही पसरते.  अनेक इमारतींच्या अंतर्भागात, रस्त्यावर, वाहनांमध्ये, जिथे शक्य असेल तिथे कुठेही पानाच्या तांबड्या भडक पिचकाऱ्यांची रांगोळी दृष्टीस पडते. या व्यतिरिक्त माणसे  कसलाही विधिनिषेध न बाळगता कुठेही थुंकत असतात वा विधी करत असतात.          
मुंबईची 'लाइफलाइन' असे ज्या लोकलचे वर्णन केले जाते, त्या लोकलच्या आतील व बाहेरील दृश्य सकाळच्या वेळी अवर्णनीय असते. बायका, पुरुष,मुले  मुली लोकलला घाण करण्याची हक्काची जागा समजत असावेत. निवडलेल्या भाज्या, फळांच्या साली, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, रिकाम्या झालेल्या बाटल्या या व अशा अनेक गोष्टी रोजच्या रोज लोकलला बिनदिक्कत बहाल करत असतात. याशिवाय काही त्याज्य, दुर्गंधीयुक्त गोष्टीही नजरेला, नाकाला छळत राहतात. लोकलच्या आतील भिंती या तर बीभत्स चित्रे आणि मजकूर लिहिण्याकरता जणू  सरकारने जनतेला आंदण दिल्या आहेत असेच वाटत राहते. ज्या वाहनातून आपण प्रवास करतो आहोत ते वाहन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच कशी?           
पावसाळा असो वा नसो ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली दिसून येतात. हे पाणी नक्की येते कुठून तेही समजत नाही. या पाण्यात मग कचरा पडतो, कुजतो आणि आजूबाजूला दुर्गंधी पसरायला सुरवात होते. अनेक लोक या रस्त्यावर नेहमीच येत जात असतात पण या गोष्टीची दखल किती लोक गांभीर्याने घेतात? शेवाळलेली डबकी, रिकाम्या जागा पाहून त्यावर टाकलेला कचरा, रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या भिकाऱ्यांनी माजवलेली अस्वच्छता, सांडलेल्या पानाच्या पिचकाऱ्या, शेवाळलेले दुर्लक्षित तलाव, पडझड झालेल्या इमारतींचा कचरा वा घाण करण्यासाठी  होत असलेला वापर, रस्त्यावर पसरलेला नासका-कुजका भाजीपाला, रस्त्याच्या कडेला लावलेल्या अन्नपदार्थांच्या गाड्यांतून शेवटी टाकला जाणारा कचरा, ज्या गोष्टींची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावायला हवी अशा सार्वजनिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या गोष्टी, विखुरलेले अन्न-धान्य, मांसाहार करून टाकलेला उरलासुरला कचरा या व अशा असंख्य गोष्टी, गणपती विसर्जनानंतर समुद्रात, नद्यांत, तलावात होणारी घाण, शिवाय नाले, कारखान्यातून समुद्रात सोडलेली विषारी केमिकल्स याही गोष्टी पर्यावरण संवर्धक आहेत का?  आपली वैयक्तिक जबाबदारी यात काहीच नाही का?                
 ज्याप्रमाणे नुसता वरून मेकअप करून उपयोग नाही तर अंतर्गत स्वच्छता होणे आत्यंतिक गरजेचे आहे त्याचप्रमाणे शहरे नुसती अद्ययावत करून काय उपयोग, शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छता जाणीवपूर्वक व्हायला हवी. ही  शिस्त प्रत्येकाने स्वत:ला लावून घेतली तर कोणत्याही पंतप्रधानांना  लोकांना कचरा उचला हे सांगण्याची वेळच येणार नाही. भारत अत्याधुनिक तर हवाच पण तो सर्वप्रथम स्वच्छ हवा. अशा  स्वच्छ देशांत राहणाऱ्या जनतेचे स्वच्छ प्रतिबिंब मग जगाच्या पटलावरही दिसल्याशिवाय राहणार नाही.    

Monday, 3 November 2014

अल्पमतातील सरकार, अंतर्गत दुही, समस्यांचा डोंगर आणि बरेच काही ………….


नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात वानखेडेच्या प्रांगणात संपन्न झाला. अनेक रथी -महारथींची वर्णी या सोहळ्यात लागली. महाराष्ट्राला अनंत आर्थिक समस्यांनी घेरले असता हा एवढा अनाठायी खर्च करण्याची काय आवश्यकता होती अशा अर्थाच्या अनेक  प्रतिक्रिया  समाजमनातून उठल्या. हौसेला मोल नसते हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.   
यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचा सपाटा सगळ्याच प्रसारमाध्यमांनी लावला. या मुलाखतींतून फडणवीस यांचा एक  सच्चा, प्रांजळ, कामावर निष्ठा असलेला चेहरा प्रत्ययास आला. 'मी धूर्त किंवा कपटी राजकारणी नाही' हे त्यांनी पुन्हा पुन्हा ठासून सांगितले. जनहिताचे निर्णय घेण्यास मी कधीही मागेपुढे पाहणार नाही हेही त्यांनी सांगून महाराष्ट्राला आश्वासित केले. त्यामुळे पुढील काही वर्षे सरकारी पातळीवरील स्वच्छ राज्यकारभार लोकांना अनुभवता येईल असे वाटते आहे.      
परंतु भाजप मध्ये मंत्रीपदासाठी चाललेली रस्सीखेच सगळ्यांनाच माहित आहे. ब्राम्हण, बहुजन, ओबीसी, मराठा हा जातीयवाद उफाळून आला आहे. माझ्या जातीने हा एवढा घसघशीत विजय मिळवून दिला हे सांगण्याची नव्हे तर हाय कमांड च्या गळी उतरवण्याची चढाओढ लागली आहे. भाजप मधील अंतर्गत दुही 'असा आमच्यात कोणताही अंतर्गत कलह नाही'  असे वारंवार सांगून लपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.      
जनतेने निवडून दिलेले पण अल्पमतातील सरकार 'आम्ही निश्चितपणे स्थिर सरकार तुम्हाला देऊ' अशी ग्वाही जनतेला देते आहे. सुशासन आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारला प्रथम विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांचे संबंध नको तितके ताणले गेले आहेत. दोन्ही पक्ष अहंकाराचे फुत्कार टाकण्यात मग्न आहेत. राष्ट्रवादी पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारांचा खडा टाकून या दोन पक्षांची गम्मत बघतो आहे. त्यात आपली अनेक राजकीय लफडी-कुलंगडी झाकता आली तर असा धूर्त पवित्राही आहे. काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्यासाठी फिल्डिंग लावून बसली आहे. अपक्षांच्या मागण्या जोर धरताहेत. आम्हाला मंत्रिपदे मिळाली नाहीत तर बघून घेऊ असेही काही पक्षाचे नेते उघड उघड धमकावत आहेत.          
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे राजकीय कर्तृत्व पणाला लागणार यात शंका नाही. त्यांच्या समोर अनेक चांगल्या योजना असू शकतील परंतु या चांगल्या योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरवताना त्यांना प्रयत्नांचे पहाड फोडावे लागणार आहेत. सर्वप्रथम आपली 'विकेट' त्यांना वाचवावी लागणार आहे. त्यांची विकेट काढण्यासाठी टपून बसलेल्या अनेक राजकीय बोलर्सना त्यांना सफाईने टोलवावे लागणार आहे. जनहिताची कामे करण्याची फडणवीस यांची इच्छा आहे हे ऐकून जनता जरी सुखावली असली तरी राजकारणात राहून फक्त स्व-हिताचीच कामे करणाऱ्यांना त्यांचा हा मानस नक्कीच बोचत असणार. ते फडणवीस यांना आपल्या परीने जेरीस आणतील यात शंकाच नाही.      
मतदान करून जनतेनेच ही परिस्थिती निर्माण केली आहे.  त्यामुळे येत्या पाच वर्षात कोणाकोणाच्या खेळी रंगतील, कोणाचे उच्चाटन होईल, कोणाची सरशी होईल, महाराष्ट्रातील जनतेच्या पदरात कोणती सुखे वा दु:खे पडतील, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त होईल काय, शोषित,दुर्बल घटकांना न्याय मिळेल काय, आर्थिक व सामाजिक विषमता अरुंद होईल काय या किंवा अशा अनेक प्रश्नांचे भवितव्य केवळ सिंहासनावर आरूढ झालेल्या सरकारच्या हाती नाही तर त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या इतर राजकीय सोबत्यांच्या हातीही आहे हे कटू सत्य आहे.        

Sunday, 12 October 2014

कोणाचे राज्य येणार?




विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर येउन ठेपल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकांत धुव्वा उडालेले पक्षही नव्या जोमाने प्रचार करत आहेत. जाहिराती, घोषवाक्ये, वचननामे, चर्चा या अगदी शिगेला पोहोचल्या आहेत. सर्वच पक्ष या वेळी सोशल मीडियाचा  जास्तीत जास्त अवलंब करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर युती आणि आघाडी तुटल्याने या वेळची लढत पंचरंगी होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मते विचारली जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी इतकी वर्षे काय केलं याचा हिशेब इतर पक्षांकडून मागितला जातो आहे. त्या त्या पक्षाचे उमेदवार आपापला मतदारसंघ प्रचाराने ढवळून काढत आहेत. जाहिरातींवर वारेमाप पैसा खर्च केला जातो आहे. शिवाय लोकांमध्ये वाटण्यासाठी म्हणून कोट्यावधी रुपयांच्या थैल्या सैल केल्या जात आहेत. दारू-मटणाच्या पार्ट्यांची झोड उठवली जाते आहे. ठिकठिकाणी सभा घेऊन नेत्यांकडून आपल्या पक्षाची ताकद आजमावली जाते आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन होते आहे. प्रचाराच्या सभेत कोणतेही ताळतंत्र न ठेवता दुसऱ्या पक्षाची किंवा नेत्यांची निंदानालस्ती  केली जाते आहे. नेत्यांची लायकी, त्यांची अक्कल चव्हाट्यावर येते आहे. स्वत:च्या पक्षाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी इतरांचे चारित्र्य हनन करण्याचा मार्ग सगळेच पक्ष अवलंबत आहेत.  आम्ही यंव करू नी त्यंव करू ही आश्वासने रोज सामान्यांच्या कानावर आदळत आहेत. प्रत्येक नेता आपापल्या भाषणात शत्रू पक्षातील नेत्याचा खरपूस समाचार घेतो आहे. त्याची लफडी कुलंगडी बाहेर काढतो आहे. विधानसभा निवडणुकांचे हे चित्र विधायक मानावे की विदारक मानावे या संभ्रमात मतदार वावरताना दिसतो आहे. 
रस्त्यावरील प्रचंड खड्डे, डोळ्यांत पाणी आणणारी महागाई, वीज-पाणी टंचाई, शिक्षणाचा व शिक्षण सुविधांचा बोजवारा,  मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेकारी, आर्थिक-सामाजिक  विषमता, रस्त्यावर, रेल्वे रुळांवर होणारे अपघात, कायद्याचे उल्लंघन करून त्यातून सहीसलामत सुटणारे समाजकंटक, कुपोषण, मुक्या प्राण्यांच्या हत्या, तस्करी, भ्रष्टाचार, पोलिसांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच त्यांच्यावर पडणारा कामाचा प्रचंड ताण, सामान्यांना नडून त्यांचे खिसे रिकामे करणारे समाजातील प्रतिष्ठित घटक, चोऱ्या-दरोडे-खून-अपहरण, लाचलुचपत, वाढत्या लोकसंख्येला आळा, परप्रांतीयांचे लोंढे, प्रदूषण, असामाजिक तत्वांचे राष्ट्रावर होणारे आक्रमण,  दुर्बल घटकांचे शोषण या व अशा असंख्य प्रश्नांचे विक्राळ रूप आजमितीला जनतेसमोर उभे आहे. या जीवघेण्या जगण्याच्या शर्यतीत मरण स्वस्त वाटते आहे म्हणून त्याला कवटाळण्याची मानसिकताही वाढत चालली आहे. परिस्थितीला कंटाळून शेतकरी  आत्महत्या करत आहेत, शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून अनेक मुले स्वत:ला संपवीत आहेत,  अतिरिक्त ताण सहन न झाल्याने पोलिस मृत्यूला कवटाळत  आहेत, अनेक केसेस आज कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, बलात्कारित मुलगी म्हातारी होऊन मरण्याआधी तरी  न्याय मिळावा म्हणून कोर्टाच्या निकालाकडे डोळे लावून बसली आहे. 
वरील सर्व  विषयांकडे गांभीर्याने पाहणारा नेता लोकांना हवा आहे. झटापट निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता लोकांना हवा आहे. जाती-वर्ण-वर्ग यांना न जुमानता समाजातील सगळ्या घटकांकडे समान दृष्टीने पाहणारा व त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा नेता लोकांना हवा आहे. मूल्याधारित, तत्वाधारित शिक्षणाची कास धरणारा आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाचा आग्रह धरणारा नेता लोकांना हवा आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारा संवेदनशील नेता लोकांना हवा आहे. लोकांना मरण्यासाठी नव्हे तर आनंदाने, सन्मानाने जगण्यासाठी प्रवृत्त करणारा नेता लोकांना हवा आहे.   
केवळ निवडणुकांपुरती भरमसाट आश्वासने देऊन निवडून आल्यानंतर जनतेचा विश्वासघात करणारा आणि पाच वर्षात स्वत:च्या पुढील सात पिढ्यांचे कल्याण करणारा नेता लोकांना नको आहे. आय-बहिणींची अब्रू सर्रास वेशीवर टांगली जात असताना स्वत:ची असमर्थता दाखवून त्यांना वर्षानुवर्षे कोर्टाचे उंबरठे झिजवण्या शिवाय पर्याय नाही असे मुर्दाड मनाने सांगणारा नेता लोकांना नको आहे.  गरिबांचे भूखंड बळकावून त्यांना बेघर करून जिणे  नको करणारा नेता लोकांना नको आहे. जाती-जमाती वरून दंगे पेटवून जनतेच्या मनात परजाती विषयी विष कालवणारा नेता लोकांना नको आहे. केवळ शहरांचा विकास आणि खेड्यांत अंधार अशा संकुचित विचारांनी पछाडलेला नेता लोकांना नको आहे. 
मनाने सक्षम, विचाराने  प्रगत आणि आचाराने कृतीशील अशा नेतृत्वाची आज या महाराष्ट्राला आत्यंतिक गरज आहे. 
अशा खंबीर नेतृत्वाने या महाराष्ट्राचा कारभार हाती घ्यावा आणि जनतेला नैतिक आधार द्यावा ही  मतदार राजाच्या मनातील इच्छा सुफळ संपूर्ण होऊ दे एवढीच त्या परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना!