Tuesday, 19 April 2016

गेले करायचे राहूनी ……


एका आजींना मी पेटी वाजवायला शिकवते. असह्य गुडघेदुखीमुळे  त्या जास्त हिंडू फिरू शकत नाहीत. त्यामुळे घरच्या घरी मन रिझवण्यासाठी त्यांनी हा पेटी शिकण्याचा निर्णय घेतला. वयोमानाप्रमाणे बोटे हवी तशी चालत नाहीत, गोष्टी पाठ करण्यात अडचणी येतात पण आजींचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. त्या जिद्दीने सराव करत असतात. त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आले की ऐन उमेदीत त्यांना गाणं, पेटी शिकण्याची खूप इच्छा होती पण कौटुंबिक जबाबदाऱ्या इतक्या होत्या की त्यामुळे त्यांना स्वत:च्या इच्छांची पूर्तता करता आली नाही. परिस्थिती सामान्य त्यामुळे नोकर-चाकर परवडण्यासारखे नव्हते. लग्न झाल्यावर स्वयंपाकाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. कुटुंब मोठे, यजमान, सासूबाई, पाच नणंदा, दोन दीर अशा सर्वांची पोटापाण्याची व्यवस्था आजींनी बघायची. रोजच्या रोज घरी अनेकांची उठबस, सणासुदीला पाव्हणेरावळे अशा सगळ्यांची सरबराई करताना त्यांच्या नाकी नऊ यायचे. पण इलाज नव्हता. एवढे करून उरल्यासुरल्या अन्नावर त्यांची बोळवण व्हायची. सासू, नणंदा महाखट. त्या हरप्रकारे त्यांना त्रास द्यायच्या. रोज पोळ्यांचे ढीग त्या हातावेगळे करायच्या तेही उभे राहून. माझी गुडघेदुखी म्हणजे त्यावेळच्या कामांनी मला दिलेली देणगीच आहे. आजी आता हसत हसत सांगत होत्या.                            
त्या आजींची ही कथा ऐकता ऐकता मला माझ्या आजीची कथा आठवली. बरीचशी मिळतीजुळती. सोवळे नेसणे, सगळ्यांसाठी निगुतीने स्वयंपाक करणे, सोवळे सोडणे, घरातले  लुगडे नेसणे, आजोबांचा ओरडा खाणे, आल्यागेल्याची सरबराई करणे या तिच्या daily activities होत्या. तिला काही छंद वगैरे होते का मला माहित नाही. तसं बघायला गेलं तर आपल्या संस्कृतीत कष्ट, त्याग , अवहेलना, कुतरओढ, सोसणे हे शब्द स्त्रियांच्या भाग्याशी अचूक जोडलेले असतात. आपल्या मनातील इच्छा, भावना , आकांक्षा मारून इतरांसाठी राब राब राबणे यालाच स्त्री जन्म म्हणतात. अशी स्वत:च्या इच्छा प्रयत्नपूर्वक बाजूला सारून इतरांसाठी खस्ता खाणारी स्त्री मग मूर्तिमंत त्यागाचे प्रतीक मानली जाते. अनेकांच्या घरी अशा त्यागमूर्ती स्त्रियांच्या कथा प्रसृत होतात जेणेकरून त्यांच्या घरातील स्त्रिया यापासून योग्य तो बोध घेतील.                   
एक मुलगा आपल्या गुडघेदुखीने हैराण झालेल्या, काठीचा आधार घेत पावले टाकणाऱ्या आईला सांगत होता, अगं अमेरिकेतल्या ८४ वर्षाच्या स्त्रिया बघ कशा फ्रेश दिसतात, क्लब मध्ये जातात, रमीचे डाव टाकतात, ड्रिंक घेतात, डान्स करतात मैत्रिणींसोबत हसतात-खिदळतात, ड्राईव्ह करतात, त्यांचं life enjoy करतात नाहीतर आपल्याकडच्या बायका, त्यांच्या चूल-मूल प्रवृत्तीतून त्या बाहेरच पडत नाहीत. कधी होणार हे परिवर्तन? आई म्हणाली, काय सांगू रे बाबा , आमची पिढी तर कामं करता करता, इतरांसाठी खपता खपता संपून गेली, आता हे झिजलेले गुडघे घेऊन मी कुठे डान्स करायला जाऊ? दिवसागणिक झालेल्या अपमानाने, माहेरच्या सततच्या उद्धाराने माझ्या अनेक रात्री नासवल्या, त्या अनेक रात्रींची काजळी माझ्या डोळ्यांखाली अजूनही आहे, मला हसता-खिदळता येणार नाही, मला माझ्या मनातील आवड जपता येणार नाही याची पुरेपूर काळजी माझ्या सासरच्यांनी घेतली आणि त्यात तुझ्या बाबांचाही मोलाचा वाटा होता. पण जे मला मिळाले नाही ते मी माझ्या सुनांना मिळावे यासाठी नक्की प्रयत्न करीन. पण तुम्ही मात्र त्यांच्या मार्गातील धोंडे होऊ नका . डोळ्यांत साचलेले पाणी परतवत आईने मुलाला कळकळीने सांगितले.   
खरंच आजमितीला तरी ही परिस्थिती बदलली आहे असे म्हणण्याला काही वाव आहे का?  आज घरदार,  स्वयंपाक आणि ऑफिस या multiple जबाबदारीत स्त्री जास्तच अडकली आहे का? संपूर्ण दिवसात आपल्या वाट्याला हक्काचे असे दोन-तीन तास सुद्धा येऊ नयेत जे आपल्याला आपल्या मनासारखे व्यतीत करता येतील? तर मग ही शोकांतिकाच म्हणायला लागेल. वास्तविक पाहता हे छंद, या कला माणसाला जगण्याचे बळ देतात, प्रेरणा देतात, आपल्या मनातील तारुण्य टिकवण्यासाठी ह्या गोष्टी म्हणजे एक संजीवनीच असते. आपण व्यक्त होण्याची ही सशक्त माध्यमे आहेत. कोणी कोणत्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करायचे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य! पण आयुष्य ओढणे आणि ते जगणे यात मोठा फरक आहे. अर्थात शिकल्या-सवरलेल्या बायकाही त्यांचे आयुष्य by choice ओढत असतील तर त्यांचे काहीही होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात चिखल पेरायचा की इंद्रधनुष्याचे रंग चितारायचे हे जिने-तिने ठरवावे.
आपले आई-वडील धड-धाकट, हिंडते-फिरते असताना सुद्धा जी मुले त्यांच्या matrimony profile मध्ये आई-वडिलांची मनोभावे सेवा करणारी आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या हसतमुखाने सांभाळणारी (म्हणजे थोडक्यात स्वत:च्या आवडीनिवडी बाजूला ठेऊन आपल्या आयुष्याचं भजं करून घेणारी )  अशीच मुलगी पाहिजे असं लिहितात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते आणि या त्यांच्या आग्रहाला बळी पडून मुली जेव्हा बोहल्यावर चढतात तेव्हा त्यांना विचारावेसे वाटते की तुला इंद्रधनुष्यापेक्षा चिखल एवढा जवळचा का वाटतो गं? अर्थात निवडीचे स्वातंत्र्य ज्याचे त्याचे आहे. 

कशा राहतील आपल्याकडील स्त्रिया फ्रेश? त्या तर तिशी-चाळीशीतच साठीच्या वाटायला लागतात. अवेळीच कोमेजून जातात. ठणकणाऱ्या गुडघ्यांशी त्यांची लवकरच सोयरिक जमते. आपल्याला सतत सांगितले जाते, दुसऱ्याचे मन जपा, कोणाला दुखवू नका पण आपल्या स्वत:च्या मनाला आपण आयुष्यभर शिक्षा देत राहतो त्याचे काय? सूर्य मावळतीची वेळ आली की हे मन हळूच आपल्यापाशी कुजबुजत म्हणतं, गेले करायचे राहूनी!              

No comments:

Post a Comment