Friday, 21 November 2014

मतवारे बलमा………

संगीत विदुषी श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्याबद्दल स्वत:ची प्रतिक्रिया पुलंनी अशी दिली की  नाव किशोरी असलं तरी तिचं गाणं प्रौढ आहे. त्याच धर्तीवर मी म्हणेन की सावनी शेंडे हिचं शारीरिक वय तेवढं नसलं तरी तिचं सांगीतिक वय अंमळ जास्तच आहे.    
पेपरसाठी मी संगीत परीक्षणे करत असताना अनेक गवयांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला. आपल्याबरोबर गाण्याविषयी संवाद साधणारा माणूस दोन तंबोऱ्यांच्या मध्ये जाउन बसला की एकदम वेगळाच भासतो. संगीतातील शास्त्रीय लीला इथून पुढे श्रोते ऐकणार असतात. बहुतेक गवई अतिशय गंभीर चेहरा करून, कोणी तोंडे वेडीवाकडी करून, कोणी बघा मी स्वरांचे शिवधनुष्य कसे पेलतोय अशा अविर्भावात विशिष्ट राग सादर करत असतात. श्रोत्यांमध्ये काही कानसेन सोडले तर सर्वसामान्य लोक गाण्याचा निखळ आनंद लुटायला आलेले असतात. शास्त्रीय संगीत हे खूप कठीण आहे, क्लिष्ट आहे, सहजसाध्य नाही अशा प्रकारच्या सूचना अशा गवयांच्या गाण्यातून श्रोत्यांना मिळत असतात. काही गवयांचे गाणे तांत्रिक दृष्ट्या अचूक असते तरीही त्यांत लालित्याचा, रंजकतेचा अभाव दिसून येतो. असे विद्वज्जड, पांडित्यपूर्ण पण अ-प्रासादिक गाणे फक्त ऐकले जाते ते चिरस्मरणीय असत नाही.            
पण सावनीचे गाणे याला अपवाद आहे. सावनीचे गाणे हे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडणारया 
संततधारे सारखे आहे. विलक्षण शांत व संयमित! या गाण्यात मी पहा कशी स्वरचमत्कृती लीलया केली असा पांडित्यपूर्ण अभिनिवेश नाही. हसतमुख चेहऱ्याने स्वत: गाण्याचा आनंद घेत तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न खचितच स्तुत्य आहे. तिच्या गाण्यात लालित्य आणि रंजकता यांचा अतिशय सुंदर मिलाफ आढळतो.     
संगीतातील शिक्षणाचे धडे हे तिने प्रथम तिच्या आजीकडून आणि वडिलांकडून गिरवले आहेत व तद्नंतर तिला शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले आहे. याच शास्त्रीय संगीताच्या मुशीतून आज तिचे गाणे अधिकाधिक परिपक्व झाल्याची ग्वाही आमच्या सारख्या सुरांच्या आहारी गेलेल्या कानांनी दिली आहे.
कोणताही राग किंवा गाणे सौंदर्यपूर्ण रीतीने फुलवण्याची एक विलक्षण हातोटी सावनीला लाभली आहे.  मग तिची 'जाओ सजना , मैं नाहि बोलू' ही मारू बिहाग रागातील स्वरचित बंदिश असो वा 'मतवारे बलमा नैना मिलाके मत जाना' ही ठुमरी सदृश रचना असो वा 'कोई कहियो रे प्रभू आवनकी' ही भक्तिरसपूर्ण रचना असो   अतिशय सहजपणे एखादा राग उलगडण्याचे तिचे कसब प्रशंसनीय आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या आजीवासन संस्थेत तिने गायलेली रागमाला ही निव्वळ अप्रतिम! 'हिंडोल गावत सब, ओडव कल्याण राग' इथपासून आरंभ करून भूप, देस, छायानट,तिलककामोद, शंकरा, श्री, मारवा, पुरिया, मालकंस ई. १९ रागांची गुंफण इतकी सुंदर आणि नेटकी की कानांची भूक भागतच नाही.  
आजच्या वेगाच्या आणि कृत्रिमतेच्या जमान्यात अभिजात संगीत तग धरू शकेल काय अशी भीती मनाला वाटू लागली आहे. पण सावनीचे आश्वासक गाणे या प्रश्नाचे चोख उत्तर आहे. तिच्या श्रोतृवर्गात तरुणाई मोठ्या संख्येने असते हे ऐकल्यानंतर खूप बरे वाटले. असेच तिचे नितळ, पारदर्शक गाणे शास्त्रीय संगीताचा झरा नव्या पिढीच्या मनात प्रवाही करण्यात आणि त्यांना प्रेरणा देण्यात सफल होऊ दे हीच तिच्या संगीतमय वाटचालीला शुभेच्छा!               



No comments:

Post a Comment