मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आपला हात भविष्य समजून घेण्यासाठी ज्योतिषापुढे पसरत भाजपच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. याच्या निषेधार्थ जवळजवळ सर्व channels नी आपापला आवाज उठवला. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. वास्तविक पाहता अनेक दिग्गज राजकारणी, उद्योगपती, अभिनेते आणि समाजातील इतर प्रतिष्ठित यांची ज्योतिषांकडे व्यवस्थित उठबस असते. अनेकांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात गंडेदोरे, बोटांत अंगठ्या असतात आणि हे आपण पाहिलेले असते. फक्त या गोष्टींचा जाहीर बोलबाला होत नाही. या 'activities' अत्यंत गुप्तपणे होत असतात. स्मृती इराणींनी एवढे चातुर्य दाखवले असते तर आज त्यांच्यावर असे टीकेचे अस्त्र सोडण्याची संधी channels ना मिळाली नसती. पण त्या आपल्याबरोबर सगळा लवाजमा घेऊन गेल्या आणि मिडियाला आयतेच खाद्य मिळाले. आता हे त्यांनी हेतुपुरस्सर केले असेल तर माहित नाही किंवा हा 'attention seeking' चा ही प्रकार असू शकेल.
मंत्र्यांना खाजगी जीवन नसते. त्यांना हे मंत्रिपद अपघाताने मिळाले. त्यांनी वेळेचा अपव्यय केला. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्हच आहे. ज्योतिषाला हात दाखवून त्या आजच्या तरुण पिढीसमोर नक्की कोणता आदर्श ठेवू पाहत आहेत? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या गेल्या. त्यांचे या संदर्भातील फोटो सुद्धा प्रसारित झाले. त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल रान उठवून झालं. मात्र त्यानंतर channels वर 'फलज्योतिष' हे शास्त्र की थोतांड आहे ही जी चर्चा सुरु झाली ती पूर्णपणे अप्रस्तुत होती.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी सीमारेषा आहे. जो कर्तृत्ववान आहे तो सुद्धा श्रद्धाळू असू शकतोच की! श्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे. कोणाची श्रद्धा परमेश्वरावर, कोणाची महंत लोकांवर तर कोणाची ज्योतिषावर. ही एक अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. मी अनेक डॉक्टर सुद्धा बुवा-बाबांच्या चरणी लीन झालेले बघितले आहेत. ज्यांचे कर्तृत्व अगोदरच सिध्द झाले आहे व तेही सार्वजनिक रित्या त्यांना ज्योतिषांची गरजच काय असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. मनगटातील कर्तृत्व आणि दैववाद यांची सांगड कशासाठी घालायची? अनेक ज्योतिष्यांनी कालच्या चर्चेत अतिशय सावध भूमिका घेतली होती. कोणाचे चूक किंवा कोणाचे बरोबर, कोण योग्य व कोण अयोग्य हे ठरवण्याचा नैतिक अधिकार दुसऱ्याला नाही जोपर्यंत तो दखलपात्र गुन्हा नाही. देव मुळी नाहीच आहे असे म्हणून तुम्ही मंदिरे उभारण्यासाठी हरकत घेऊ शकता का? मी नास्तिक आहे म्हणून दुसऱ्यानेही नास्तिकच असावे हा आग्रह कितपत रास्त आहे? ज्याप्रमाणे देव आहे असे अत्यंत ठामपणे सांगणारे आहेत तसेच देव अस्तित्वातच नाही असे छाती पिटून सांगणारेही आहेत. ज्योतिष हे एक सन्माननीय शास्त्र आहे असे म्हणणारे आहेत तसे ज्योतिषाचे शास्त्रीयत्व अमान्य करणारे सुद्धा ढीगभर आहेत. याचे कारण प्रत्येक माणूस आणि त्याची मानसिकता ही इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळी असते आणि यापुढेही असणार आहे.
अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत की कर्तृत्व असूनही त्या व्यक्तींना यश प्राप्त झालेले नाही. कारणे काहीही असोत. आपल्या शेतात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने असंख्य वेळा काढला गेला आणि जातोय. तो शेतकरी कुठे प्रयत्नात कमी पडला? परंतु त्याच्या मनगटातील कर्तृत्व सिध्द करून दाखवण्याची संधी मात्र निसर्गाने हिरावून घेतली. आज शिकून सवरून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला जगाच्या पाठीवर निघालेल्या अनेक तरुणांना अपयशाला सामोरे जायला लागतेय. बेकारी, बेरोजगारी यांचा सामना करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक आसन्नमरण अवस्थेत असलेले वयोवृध्द रुग्ण नको झालेला जीव मरण येत नाही म्हणून कसेबसे जगवत आहेत तर दुसरीकडे तरणेताठे अपघाती किंवा अचानक मृत्यूला कवटाळत आहेत. या गोष्टींचे 'logical calculation' काय असू शकेल? अंदाज, तर्क या गोष्टी जर अ-शास्त्रीय ठरवल्या तर मग ज्या तर्काच्या, अनुमानाच्या आधारे पोलिस गुन्हेगार लोकांपर्यंत पोहोचतात ती सुसंगतताही मोडीत काढायला लागेल.
मी घरातून यावेळी बाहेर पडू का? इतपत ज्योतिषाच्या आधीन व्हायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. प्रत्येक माणसाला उपजत विवेकबुद्धी किंवा सद्सद विवेक हा असतोच. त्याचा वापर त्याने केला नाही तर तो त्याचा दोष आहे. माझ्यावर आज मंत्रीपदाची मोठी जबाबदारी आहे. मी जाहीररीत्या ज्योतिषाकडे गेले तर त्याचे समाजात आणि राजकारणात काय पडसाद उमटतील ह्या गोष्टीचा विचार स्मृती इराणी यांनी करायला हवा होता. त्यांच्या विवेकशून्यतेला शास्त्र कसे जबाबदार?
एकीकडे आपला 'TRP' वाढवण्यासाठी पेपर आणि वाहिन्यांमधून भविष्यकथनाचे कार्यक्रम करायचे व दैनंदिन भविष्य छापायचे आणि दुसरीकडे याच शास्त्राची 'TRP' वाढावा या दृष्टीकोनातून संभावना करायची हे दुटप्पी धोरण किती योग्य आहे याचा विचार करण्याची आज आत्यंतिक गरज आहे.
संगीत विदुषी श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्याबद्दल स्वत:ची प्रतिक्रिया पुलंनी अशी दिली की नाव किशोरी असलं तरी तिचं गाणं प्रौढ आहे. त्याच धर्तीवर मी म्हणेन की सावनी शेंडे हिचं शारीरिक वय तेवढं नसलं तरी तिचं सांगीतिक वय अंमळ जास्तच आहे.
पेपरसाठी मी संगीत परीक्षणे करत असताना अनेक गवयांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला. आपल्याबरोबर गाण्याविषयी संवाद साधणारा माणूस दोन तंबोऱ्यांच्या मध्ये जाउन बसला की एकदम वेगळाच भासतो. संगीतातील शास्त्रीय लीला इथून पुढे श्रोते ऐकणार असतात. बहुतेक गवई अतिशय गंभीर चेहरा करून, कोणी तोंडे वेडीवाकडी करून, कोणी बघा मी स्वरांचे शिवधनुष्य कसे पेलतोय अशा अविर्भावात विशिष्ट राग सादर करत असतात. श्रोत्यांमध्ये काही कानसेन सोडले तर सर्वसामान्य लोक गाण्याचा निखळ आनंद लुटायला आलेले असतात. शास्त्रीय संगीत हे खूप कठीण आहे, क्लिष्ट आहे, सहजसाध्य नाही अशा प्रकारच्या सूचना अशा गवयांच्या गाण्यातून श्रोत्यांना मिळत असतात. काही गवयांचे गाणे तांत्रिक दृष्ट्या अचूक असते तरीही त्यांत लालित्याचा, रंजकतेचा अभाव दिसून येतो. असे विद्वज्जड, पांडित्यपूर्ण पण अ-प्रासादिक गाणे फक्त ऐकले जाते ते चिरस्मरणीय असत नाही.
पण सावनीचे गाणे याला अपवाद आहे. सावनीचे गाणे हे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडणारया
संततधारे सारखे आहे. विलक्षण शांत व संयमित! या गाण्यात मी पहा कशी स्वरचमत्कृती लीलया केली असा पांडित्यपूर्ण अभिनिवेश नाही. हसतमुख चेहऱ्याने स्वत: गाण्याचा आनंद घेत तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न खचितच स्तुत्य आहे. तिच्या गाण्यात लालित्य आणि रंजकता यांचा अतिशय सुंदर मिलाफ आढळतो.
संगीतातील शिक्षणाचे धडे हे तिने प्रथम तिच्या आजीकडून आणि वडिलांकडून गिरवले आहेत व तद्नंतर तिला शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले आहे. याच शास्त्रीय संगीताच्या मुशीतून आज तिचे गाणे अधिकाधिक परिपक्व झाल्याची ग्वाही आमच्या सारख्या सुरांच्या आहारी गेलेल्या कानांनी दिली आहे.
कोणताही राग किंवा गाणे सौंदर्यपूर्ण रीतीने फुलवण्याची एक विलक्षण हातोटी सावनीला लाभली आहे. मग तिची 'जाओ सजना , मैं नाहि बोलू' ही मारू बिहाग रागातील स्वरचित बंदिश असो वा 'मतवारे बलमा नैना मिलाके मत जाना' ही ठुमरी सदृश रचना असो वा 'कोई कहियो रे प्रभू आवनकी' ही भक्तिरसपूर्ण रचना असो अतिशय सहजपणे एखादा राग उलगडण्याचे तिचे कसब प्रशंसनीय आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या आजीवासन संस्थेत तिने गायलेली रागमाला ही निव्वळ अप्रतिम! 'हिंडोल गावत सब, ओडव कल्याण राग' इथपासून आरंभ करून भूप, देस, छायानट,तिलककामोद, शंकरा, श्री, मारवा, पुरिया, मालकंस ई. १९ रागांची गुंफण इतकी सुंदर आणि नेटकी की कानांची भूक भागतच नाही.
आजच्या वेगाच्या आणि कृत्रिमतेच्या जमान्यात अभिजात संगीत तग धरू शकेल काय अशी भीती मनाला वाटू लागली आहे. पण सावनीचे आश्वासक गाणे या प्रश्नाचे चोख उत्तर आहे. तिच्या श्रोतृवर्गात तरुणाई मोठ्या संख्येने असते हे ऐकल्यानंतर खूप बरे वाटले. असेच तिचे नितळ, पारदर्शक गाणे शास्त्रीय संगीताचा झरा नव्या पिढीच्या मनात प्रवाही करण्यात आणि त्यांना प्रेरणा देण्यात सफल होऊ दे हीच तिच्या संगीतमय वाटचालीला शुभेच्छा!
भाजपने विश्वासदर्शक ठराव आपल्या बाजूने पारित करून घेतला खरा परंतु त्यानंतर मात्र आपल्याला कोणकोणत्या दिव्व्यांना सामोरे जावे लागणार आहे याची खरी कल्पना त्यांना आली होती का? आज विश्वासार्हतेच त्यांचं अस्त्र दुबळं आहे. किंबहुना विधानसभेत त्यादिवशी घडलेल्या अभूतपूर्व नाट्याने जनमानसात त्यांची प्रतिमा सत्ता काबीज करण्यासाठी काहीही करणारे अशीच उमटली आहे.
पवारांचा पॉवर प्ले सुरु झाला आहे. आधी बिनशर्त पाठींबा व आता एखादा निर्णय चुकीचा (राष्ट्रवादीच्या दृष्टीने) ठरल्यास विचार करावा लागेल या पद्धतीचे भाष्य सुरु झाले आहे. राज्यातील सुज्ञांना याचा नक्की अर्थबोध झाला आहे. भाजपला झाला आहे का हा खरा प्रश्न आहे.
कॉंग्रेसच्या एका प्रवक्त्याच्या मते मुळातच हे सरकार रीतसर बनलेलं नाही. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. हे 'illlegitimate' सरकार आहे. त्यामुळे मोठमोठाले निर्णय घेऊन योजना राबवण्याचा त्यांना कायदेशीर आणि नैतिक अधिकार नाही. मनसे या पक्षाचे सर्वेसर्वा हेही काल म्हणाले की त्या दिवशी विधानसभेच्या आत नक्की काय झालं ते कोणाला तरी कळलं का? बहुतेक सर्व पक्ष (भाजप सोडून) संभ्रमावस्थेत वावरत आहेत. कोणाचा कोणाला पाठींबा आहे तेच कळेनासे झाले आहे. भाजप एकीकडे राष्ट्रवादीचा पाठींबा आम्हाला नको, तो त्यांनी काढून घ्यावा असेही म्हणायला धजावत नाही. त्याचवेळी आमची दारे आमच्या नैसर्गिक मित्रासाठी सदैव उघडी आहेत असे सांगून शिवसेनेपुढे सत्तेची ( न मिळणारी ) गाजरे नाचवीत आहेत. या सर्वांवर कडी म्हणजे मुख्यमंत्र्यांना या सरकार अस्थिरतेच्या संदर्भात काहीही विचारले असता ते छातीठोकपणे सांगतात की आमचे बहुमत सिद्ध झाले आहे आणि आम्ही पाच वर्षे सत्तेवर राहणार आहोत. हा विश्वास मात्र नक्की कुणाच्या भरवशावर आहे हे गुपित मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.
मराठवाड्यात भीषण दुष्काळाने अनेक शेतकऱ्यांना ग्रासल्याने त्यांना मृत्यूचा मार्ग सोपा वाटतो आहे. घरचे पशुधन अन्नानदशेने मरू नये म्हणून त्यांनी बाजारात मातीमोल भावाने विकायला काढले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक दिलासा देणे हे सत्तारूढ पक्षाचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी केंद्र सरकारकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.आज अंधश्रद्धांचा विळखा या देशाला करकचून पडला आहे. वाटेल ते अघोरी उपाय, प्रथा आज त्या त्या प्रतिगामी समाजात घट्ट रुतून बसल्या आहेत. अशा अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्याची अतीव गरज आहे व यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आधी साक्षर व नंतर सुशिक्षित होणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही विशेष मोहीम सरकारकडून राबवण्याची गरज आहे. आरक्षणाचे मुद्दे हे ही परत परत डोकी वर काढणारच आहेत. त्यांना कायदेशीर रित्या आरक्षण न मिळवून दिल्यास सरकारवर त्यांची खप्पामर्जी ओढवणार आहे यात शंका नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काही कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. स्वच्छता अभियानाप्रमाणे गावागावात पिण्याचे पाणी आणि मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी समाजात त्याविषयीची जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी खास शिबिरांचे आयोजन सरकारने करणे आवश्यक आहे. विजेचा अतिरिक्त व अनाश्यक वापर टाळला ( उदा. अनावश्यक रोषणाई) तर इतर ठिकाणीही विजेचे दुर्भिक्ष्य भासणार नाही याविषयीची सजगता लोकांत निर्माण होण्यासाठी काही उपक्रम सरकारने हाती घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शालेय स्तरावर सरकारतर्फे काही योजना आखणे गरजेचे आहे. ही फक्त काही मोजक्या विषयांची यादी आहे. असे अनेक विषय आज चिंतेचे ठरत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेने आज अनेकांचे बळी घेतले आहेत तर अनेकांचे जीवघेणे अपघात झाले आहेत. या समस्येचे लगोलग निराकरण होणे गरजेचे आहे.
उदाहणादाखल वर उद्धृत केलेल्या व अशा अनेक प्रश्नांकडे सरकारला पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असेल तर प्रथम सरकारला स्थिरता येणे गरजेचे आहे. यालाही गोंजारायचे नि त्यालाही चुचकारायचे हे धोरण जे सरकारने सत्तेसाठी अवलंबले आहे ते निषेधार्ह आहे. जर राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा सरकारच्या निर्णयात दखलअंदाजी करून त्यांचा स्वार्थ साधणार असेल तर त्यांना रीतसर दूर करून शिवसेनेच्या मदतीने हे सरकार चालवणे यावाचून आजतरी सरकारला गत्यंतर नाही. परंतु शिवसेनेला मंत्रिपदेही नाकारायची आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवायची हे दुटप्पी धोरण भाजप पुढचे प्रश्न अधिक जटील करेल. यापैकी काहीच शक्य नसेल तर स्वाभिमान शिल्लक ठेवून राजीनामा देणे आणि पुनश्च जनतेची विश्वासार्हता संपादन करणे एवढे तरी सत्तारूढ पक्षाने करावे ही ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या मनातील इच्छा आहे.
शालेय पुस्तकातून पुलं डोकावले आणि कायमचे मनामध्ये शिरले. माझ्या बाबांचे ते गुरु. माझे बाबा हरी भोपटकर orient हायस्कूलचे विद्यार्थी. तिथे पुलं आणि सुनिताताई सारखे प्रतिभावान शिक्षक बाबांना लाभले. माझे बाबा उत्तम पेटी वाजवायचे. बाबांकडून पुलं विषयी खूप ऐकले होते त्यामुळे माझे बालसुलभ कुतूहलही जागे झाले होते. पुलं खूप हसवतात ही गोष्ट सगळ्याच परिचितांकडून मनावर कोरली गेली होती.
पुढे मी कविता करायला लागले. तसा लिखाणाचा वारसा बऱ्यापैकी घरातूनच मिळाला होता. माझी आत्या शरयू भोपटकर ही लेखिका होती तसेच ऑफिस सांभाळून इतर वेळ आधी रंगायतन व नंतर आविष्कार या संस्थेच्या नाटकांसाठी ती देत होती.
तू असाच यावास आणि अशा काही निवडक कविता मी पुलंच्या अभिप्रायार्थ पोस्टाने पाठवल्या. आधी मी बाबांनाच म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी त्यांना पत्र टाका. पण त्यांनी सरळ नकार दिला. मला त्यांचं वागणं पटलं नाही पण काय करणार? मग बाबांचाच संदर्भ देऊन मी माझं पहिलंवहिलं पत्र पाठवलं. मी खूपच excited होते. त्यांच्या उत्तराची चातकासारखी वात पाहत होते. पण बरेच दिवस गेले आणि माझी आशा मावळत चालली. वाटायचं ते कुठे मी कुठे? आणि बाबा तरी त्यांना कसे आठवणार? कारण त्या गोष्टीला बरीच वर्षे लोटली होती. एव्हाना माझे लग्नही झाले होते. १९८१ सालची गोष्ट.
आणि एके दिवशी अचानक माझ्या नावचं अंतर्देशीय पत्र आलं. त्यावरील पुलंचं नाव आणि पत्ता मी बघितला आणि मला अक्षरश: आकाश ठेंगणं झालं. मी पत्र उघडलं आणि कमालीच्या आतुरतेने वाचू लागले. आश्चर्य म्हणजे माझे बाबा त्यांना अगदी व्यवस्थित आठवत होते. बाबांनी बसवलेल्या संगीतिका आणि त्यांच्या पेटीवादनाचं पुलंनी कौतुक केलं होतं एवढंच नव्हे तर हरीमुळे तुला जो वारसा मिळाला आहे जो चांगल्या प्रकारे जोपास असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. माझ्या कवितांविषयी पुलंनी सविस्तर लिहिलं होतं. कविता कशी लिहावी व कशी लिहू नये याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं. ज्या कविता वृत्तात चुकल्या होत्या त्या लिहिताना काय खबरदारी घेतली पाहिजे हेही सांगितलं आणि तू असाच यावास ही माझी कविता त्यांना मनापासून आवडली हे सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. (त्यामुळे १९९५ साली प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचं नाव मी 'तू असाच यावास ' हेच ठेवलं.) माझा तर कितीतरी वेळ पुलंनी आपल्याला पत्र लिहिलं आहे आणि तेही एवढं सविस्तर यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्या पत्राची आणि त्यातील मजकुराची पारायणे झाली. त्या दिवसांत माझे पाय जमिनीपासून थोडे वर उचलले गेले होते.
त्यानंतर कवितेचं नक्की स्वरूप काय अशा आशयाचं पत्र मी त्यांना टाकलं. पहिलं पत्र येउन सुद्धा या पत्राच्या उत्तराबद्दल मी जर साशंकच होते. मनात म्हणतही होते, त्यांना दिवसाकाठी अशा लाखो वाचकांची पत्रे येत असणार. ते कुणाकुणाला लिहित बसतील? मला एकदा लिहिलं त्यांनी पत्र म्हणजे परत थोडेच लिहितील? त्यांना काय तेवढंच काम आहे का? पण मग असं वाटायचं की नक्की उत्तर येईल. आणि यथावकाश उत्तर आलं कवितेचं स्वरूप अतिशय उत्कृष्ट रीतीने उलगडून दाखवणारं. मी खूप आनंदले. प्रोत्साहित झाले.
नंतर काही निमित्ताने अशा पाच-सहा पत्रांची आमची देवाणघेवाण झाली. मध्यंतरी घरात वाचनालय सुरु करावे असे मनात आले होते परंतु त्यासाठी समर्पक असे नाव सुचत नव्हते. तेव्हा पुलंना पत्र टाकले आणि त्यांनी 'पसाय' हे नाव द्यावे असे सुचवले. पुढे मात्र तो वाचनालयाचा माझा बेत बारगळला. पुढे काही वर्षांनी पुण्याच्या स. ह. देशपांडे यांचे मला पत्र आले. पुलंचा पत्रव्यवहार चाळत असताना त्यांना माझी काही पत्रे त्यात सापडली. त्यातील कवितेचं नक्की स्वरूप काय हे माझं पत्र त्यांना मिळालं परंतु त्यावरील पुलंच्या उत्तराचं पत्र त्यांना हवं होतं. मी ते पाठवून दिलं आणि पुलंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या अमृतसिद्धी ग्रंथात ते समाविष्ट झालं. ही माझ्यासाठी नि:संशय गौरवाची गोष्ट आहे.
त्यांना भेटावेसे खूप वाटायचे पण तशी संधी कधी मिळाली नाही. मी ठाण्याला राहायला आल्यानंतर श्रीमती विजया जोशी यांचेकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यासाठी काही वेळेस जायचे. त्यांचा एन सी पी ए ला गायनाचा कार्यक्रम होता. आम्ही शिष्यमंडळीही ऐकायला जाणार होतो. तेथील हॉलमध्ये आम्ही प्रवेश करते झालो. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. माझी नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. एवढ्यात मला पुलं आणि सुनीताताई मागील खुर्च्यांवर बसलेले दिसले. मी पुढचामागचा विचार न करता धावले आणि प्रथम त्या उभयतांच्या पाया पडले. नंतर मी त्यांना माझे नाव आणि त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल सांगितले. दोघे खूप छान बोलले. लगेचच announcement झाली आणि मी पुढे जाउन खुर्चीवर स्थानापन्न झाले. गाणे संपल्यावर मी मागे वळून बघितले पण ते दिसले नाहीत. मागाहून कळले की पुलंची तब्येत ठीक नव्हती. अनपेक्षितपणे आपले आराध्यदैवत असे भेटल्याने माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर मात्र मी पुढे कधीच त्यांना भेटू शकले नाही. त्यांच्या दुखण्याची, आजाराची बातमी ऐकली की मन खिन्न व्हायचे.
आज पुलं नाहीत आणि सुनीताताई सुद्धा नाहीत. त्यांच्या विनोदाइतकाच त्यांच्यातील माणुसकीचा झरा खूप निर्मळ आणि सच्चा होता. अहंगंड त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या पत्रातून मला सदैव त्यांच्यातील एक प्रेमळ,स्नेहपूर्ण,प्रोत्साहन देणारा मार्गदर्शकच जाणवला. हा माझा २०० वा ब्लॉग आहे. माझ्या कवितेला ज्यांनी पहिलंवहिलं मार्गदर्शन केलं आणि लेखनाचा व गाण्याचा वारसा जपण्याचा ज्यांनी मला मोलाचा सल्ला दिला त्या पुलंना माझा हा ब्लॉग मी कृतज्ञ भावनेने समर्पित करते आहे.
अ खालील गाण्यांच्या ओळी नेमक्या कोणत्या पक्षाला उद्देशून आहेत ते सांगा
१) दोस्त दोस्त ना राहा
२) फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
३) टिकटिक वाजते डोक्यात
४) तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा
५) बनाके क्यों बिगाडा रे
६) जाने कहाँ गए वो दिन
७) आसूँ भरी है ये जीवनकी राहें
८) मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ
९) तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना
१०) परदे के पिछे क्या है
ब कारणे द्या
१) पूर्वी कमळ सूर्याकडे बघून फुलायचे पण अलीकडे ते घड्याळाकडे बघत फुलते
२) इंजिन चालू झाले पण अल्पावधीतच बाकीच्या डब्यांपासून ते तोडले गेले
३) अभिमानाने हात वर करणाऱ्यांनाच लोकांनी हात दाखवला
४) दुसऱ्यांवर अचूक नेम साधणारे यावेळेस स्वत:च्याच वाग्बाणांनी घायाळ झाले
५) धनुष्यबाण व कमळ या जोडीने आणि घड्याळ व हात या जोडीने एकाच वेळी एकमेकांशी घटस्फोट घेतला
क असे कोण म्हणाले ते सकारण सांगा
१) हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी
२) आम्ही एक वेळ अविवाहित राहू पण NCP चा पाठींबा कदापि घेणार नाही
३) तुम्ही फक्त एकदाच माझ्या हातात राज्य सोपवून बघा
ड कंसातील सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा
१) मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी - (इथे मुंगी कोण व सूर्य कोण ते सांगा )
२) क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ( इथे वादा, कसम व इरादा या शब्दांचे राजकीय अर्थ स्पष्ट करा)
३) सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है ( ही वैद्यकीय लक्षणे कोणत्या पक्षाची आहेत ते ओळखा )
४) श्रीरंगा कमलाकांता हरी पदराते सोड ( येथे कमलाकांता आणि हरी हे शब्द कोणाला उद्देशून वापरले आहेत ते सांगा )
५) हम और तुम तुम और हम खुश है यू आज मिलके ( यातील हम आणि तुम कोण आहेत ते स्पष्ट करा )
ई फरक विशद करून फायदे व तोटे सांगा
आवाजी मतदान व गुप्त मतदान
फ पुढील गाण्यांच्या ओळींपैकी एका ओळीचे अर्थासहित स्पष्टीकरण द्या
१) कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
किंवा
२) प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यू लागता है डर
विधानसभेत काल घडलेल्या सबंध नाट्याचा मला पुनरुच्चार करायचा नाही परंतु या कृतीमुळे भाजप सरकारची राज्यातील विश्वासार्हता निश्चितच लयास गेली आहे.
सुशिक्षित,सुजाण ,सुज्ञ असा मतदार ( नोटांची चळत पाहून आपली मते न विकणारा आणि कोणत्याही पक्षाला बांधील नसणारा ) काहीएक विचार करून आपले मत अमुक एका पक्षाच्या पारड्यात टाकत असतो. त्या त्या पक्षातील मुख्य चेहऱ्याकडे आणि त्याच्या आजवरच्या राजकीय कर्तृत्वाकडे पाहून हे बहुमुल्य मत मतदार देत असतात. कॉंग्रेस -राष्ट्रवादीने त्यांच्या राजकीय कर्तृत्वाने जनमानसात जो अविश्वास निर्माण केला त्यांची परिणती म्हणून यावेळेस मतदार राजाची पावले भाजप सरकारच्या दिशेने आपसूकच वळली.
हे नवीन सरकार तरी नागरिकांच्या हिताचे व त्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर व्हावे असे काहीतरी करेल या विश्वासापोटीच हि नवी सोयरिक जनता जुळवू पाहत होती. भाजप सरकार मोठ्या संख्येने राज्यात आले खरे पण जनतेने या पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजप नंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला जनमान्यता मिळाली. आता भाजप आणि शिवसेना मिळून या राज्याचा नवा संसार थाटतील असे जनतेला वाटत असतानाच त्या पक्षांतर्गत मानापमानाची नाटके रंगली आणि भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला.
ज्या राष्ट्रवादीला 'भ्रष्ट्वादी ' आणि NCP म्हणजे 'naturally corrupt party' म्हणून कुत्सितपणे भाजप हिणवत राहिली आणि ज्या भाजपने सत्तेवर येताच अशा भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकू अशा वल्गना केल्या त्याच भाजपची आज राष्ट्रवादी पक्षाबाबतची भूमिका संदिग्ध व संशयास्पद असावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आम्ही विश्वास दर्शक ठरावाची सगळी प्रक्रिया कायदेशीर रित्याच पार पाडली असा भाजप आज कितीही ठणाणा करून सांगत असली तरी ते कितपत खरं आहे हे त्यांनाही माहित आहे आणि सुज्ञ जनतेलाही ते आता ज्ञात झाले आहे.
ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा.उल्हास बापट यांनी काल सांगितले की त्यांनी तांत्रिक बाबी जुळवून आनत्या खऱ्या परंतु जे काही काल विधानसभेत घडले ते नैतिकतेला धरून तर नव्हतेच शिवाय यात लोकशाहीचे सर्व संकेत भाजपने झुगारून दिले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री.पी .बी .सावंत यांनी विश्वास दर्शक ठरावाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बेकायदेशीर असे संबोधले आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदी श्री. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कॉंग्रेस व शिवसेनेने शस्त्रे खाली ठेवून या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पुढचे काम भाजपच्या दृष्टीने अत्यंत सोपे झाले. वास्तविक पाहता विधानसभेचा अध्यक्ष हा नि:पक्षपाती असायला हवा पण सत्तेच्या मोहापायी काय वैध नि काय अवैध याचा सारासार विचार आणि विवेक कोणालाच राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते आहे.
या सगळ्या प्रक्रियेत भाजपने १४५ चा बहुमताचा आकडा गाठला आहे असे कुठेच सिध्द झालेले नाही. पण भाजपचे प्रवक्ते तर जोरजोरात सांगत आहेत की आम्ही बहुमत सिद्ध केले. पण ते नक्की कसे हे तुम्हाला मत दिलेल्या जनतेला तरी समजण्याचा हक्क आहे की नाही?
राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा जाहीर केला आहे, आम्ही थोडाच त्यांच्याकडे मागितला होता असे एकीकडे सारखे म्हणत राहायचे आणि शिवसेने बरोबर अजूनही आमची चर्चा सुरु आहे असे म्हणत संभ्रमावस्था निर्माण करायची अशी खेळी भाजपने सुरवाती पासूनच आरंभली आहे. राष्ट्रवादीचा पाठींबा न मिळता भाजपचे बहुमत कसे सिद्ध झाले हे एकदा जनतेला तरी कळू दे. काँग्रेस -शिवसेनेचे मतविभाजन मागण्याचे 'timing' चुकले अशी तांत्रिक बाब पुढे करून भाजपने आवाजी मतदानाने विश्वास दर्शक ठराव पारित करून घेतला आहे हे न समजण्या इतकी जनता दुधखुळी नाही.
यापुढे सत्ता स्थापनेसाठी आसुसलेले इतर पक्ष सुद्धा याच तांत्रिक '(अ)-नीतीचा ' अवलंब आपल्या फायद्यासाठी करून घेतील हे निश्चित आहे. असा नवा 'आदर्श' प्रस्थापित करण्याचे श्रेय भाजपला द्यायलाच हवे.
या महाराष्ट्र देशातील सर्वसामान्य मतदार भलेही या तांत्रिक बाबींशी अवगत नसेल परंतु अशा बनवाबनवीच्या आयुधाने व राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर तरलेले सरकार 'विश्वासार्ह' नाही हे खचितच त्याच्या मनामध्ये आजपासून अधोरेखित करेल.
राजकारणात अगदी नव्याने दाखल झालेला गंप्या नव्या नवरीच्या नवलाईने मोठमोठ्या नेत्यांकडे विस्मयाने पाहत होता. त्यांचे हातवारे, लकबी, बोलण्याची ढब बारकाईने निरखित होता. त्याला काही गोष्टी समजत होत्या तर काही गोष्टींचा उलगडा काही केल्या होत नव्हता. त्याने राजकारणाच्या क्षेत्रात त्याच्याहून एक पाउल पुढे असणाऱ्या भाऊ म्हस्केला विचारले, ते मोठे पुढारी लोक त्यांच्या भाषणात सारखे जनहित जनहित म्हणत असतात. हे जनहित म्हणजे नक्की काय रे भाऊ? भाऊ गंप्याला सिनियर असल्याने त्याच्यापुढे जरा टेचात वावरत होता. तो म्हणाला, अरे आमचे साहेब म्हणतात की एक किलो राजकारणात शंभर ग्रॅम जनहित मिसळावे लागते. गंप्या काहीच न समजल्याने तोंडाचा चंबू करून म्हणाला, ते कशाला? भाऊ उत्तरला, अरे मग जनता कशाला निवडून देईल आपल्याला.
या उत्तराने गंप्याचे फारसे समाधान झाले नाही. पण इतर अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंघावत होते. आपल्याला कोणी विचारलं की राजकारणात का आलात तर काय सांगायचं भाऊ? अरे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो असं सांगायचं, भाऊने एकदम तयार उत्तर दिलं. कोणते प्रश्न? गंप्याने पुढला बॉल टाकला. हेच म्हणजे रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याचे साचलेले ढीग, वाहतुकीचा खोळंबा, परप्रांतीयांचे लोंढे, वीज-पाणी टंचाई, अल्प दरात घरे, भेडसावणारी महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, तृतीयपंथीयांच्या समस्या, शिक्षणाचे वाढते ओझे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांचे शोषण, रोगराई वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न आपण कसे सोडवायचे रे भाऊ ? गंप्या प्रश्नांची ही लांबलचक यादी ऐकून अगदी काकुळतीला आला. हे प्रश्न आपण सोडवायचे असे मी म्हटले का? भाऊने विचारले. अरे पण त्याचा अर्थ तोच होतो ना ? गंप्याचा जीव कासावीस झाला. गंप्याला आईने वैतागून जाउन त्याच्या पेकाटात मारलेली लाथ आठवली. एवढा घोडा झालाय पण काम करायचं नाव घेत नाही. काय रे ए मुडद्या, जन्मभर लोळायचा वसा घेतला आहेस का? आम्ही तुला यापुढे पोसणार नाही. बाहेर जा आणि काम शोध. आईच्या या सारख्या धोशामुळे गंप्या कंटाळला आणि भाऊसमोर त्याने आपली व्यथा मांडली.
भाऊ क्षणाचाही विलंब न लावता गंप्याला म्हणाला, अरे तू राजकारणात सक्रिय हो. म्हणजे काय करू? म्हणजे politics मध्ये admission घे. हे वाक्य मात्र गंप्याला कळले आणि त्याने ताबडतोबीने admission घेऊन टाकली. कसलाही फॉर्म आणि पैसे न भरता आपल्याला admission मिळाली याचेच त्याला कौतुक वाटले. पण पुढे काय याचे उत्तर फक्त भाऊवर अवलंबून होते. मी साहेबांकडे तुझ्यासाठी शब्द टाकला आणि ते लगेच हो म्हणाले. आपल्या शब्दाला वजन आहे गंप्या. काय कळलं weight weight, भाऊने पेपरवेट हातात धरून तो पेपरच्या गठ्ठ्यावर ठेवला. गंप्या एखाद्या सिनेमातील हिरोकडे पाहावं तसं भाऊकडे आदराने पाहू लागला.
भाऊंची मुलाखत घ्यायला एक पत्रकार आला होता पक्षाच्या ऑफिसमध्ये. काय म्हणतीय राजकारणातील प्रगती? पत्रकाराने ऑफ द रेकॉर्ड विचारले. साहेबांची कृपा आहे, भाऊ उत्तरला. मुलाखत सुरु झाली. आपल्या पक्षाचं निश्चित धोरण काय आहे ते सांगू शकाल? पक्षाचं धोरण साहेब ठरवतात. आम्ही पालन करतो. अहो पण आता जो प्रसंग घडला त्या बाबतीतील आपल्या पक्षाची भूमिका जरा स्पष्ट करता का? कालच ह्या प्रसंगा विषयीची आपल्या पक्षाची भूमिका आमच्या साहेबांनी स्पष्ट केली आहे. तीच आमची भूमिका. आपला पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे असे इतर पक्षाचे लोक आरोप करत आहेत. लाचारी साहेबांच्या रक्तात नाही त्यामुळे ती आमच्याही रक्तात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अखेरीस आपला निर्णय काय झालाय ते सांगता का? जो निर्णय साहेबांचा तोच आमचा. अहो ते ठीक आहे पण म्हणजे नक्की निर्णय काय? ते योग्य वेळेस आमचे साहेब जाहीर करतील. काळजी नसावी.
पत्रकार काहीच थांग न लागल्याने खिन्न मनाने परतला. काय गंप्या कशी झाली माझी मुलाखत? भाउने जिंकल्याच्या अविर्भावात विचारले. एकदम बेस्ट भाऊ. मग तयारीला लाग. तुलाही उद्या अशी उत्तरे देण्याचा सराव करावा लागेल. हो हो नक्की, गंप्या म्हणाला.
घरी गेल्यावर गंप्याला आईने विचारलं, काय रे इतक्या रात्रीपर्यंत कसलं काम करतोस? गंप्या उत्तरला, साहेब आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही काम करतो.
आपल्या देशातील नागरिक विशेषत: युवा पिढी पाश्चात्यांच्या अनेक सवयींचे, वागण्याचे, त्यांच्या खास लकबींचे अनुकरण करण्यात धन्यता मानते. त्या देशांतील हिरो-हिरोईन्स , बिझनेसमन, मॉडेल्स यांना आदर्श मानले जाते. त्या देशांना भेट देऊन परतणारे भारतीय तेथील गोडवे गाताना थकत नाहीत. त्या देशांत कोणकोणत्या गोष्टींची उपलब्धता आहे आणि आपल्या इथे कुठल्या गोष्टींची सदैव चणचण आहे याचा उहापोह हे लोक सविस्तर करू शकतात. पण एवढे असूनही पाश्चात्य देशांतील स्वच्छतेचे, शिस्तीचे, कामसू पणाचे अनुकरण करताना कोणीच दिसत नाही. असे का हा प्रश्न अशा वेळी विचारावासा वाटतो.
यावेळेस म्हणून मग आयुष्यात कधी हातात झाडू घेतला नसेल अशा भारतीय तारे आणि तारकांना लोकांनी रस्ता झाडताना बघितले. आमचे अनुकरण करता ना मग असेही करा हाच संदेश यातून भारतातील नागरिकांना मिळाला.
आपल्याकडे रोगराई फैलावल्यावर स्वच्छता करा अशी तंबी दिली जाते. एरवी पावलापावलावर, नाक्यानाक्यावर, जवळजवळ प्रत्येक गल्लीबोळात साचलेल्या कचऱ्याचे ढीग आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात पण त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. जाहीर सभा घेतल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना लोकांना सांगावे लागते की इथून जाताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पेपर, खाऊची पाकिटे वा इतर केरकचरा उचला, इथे टाकू नका. अजूनही या देशातील नागरिकाला ही स्वत:ची जबाबदारी वाटत नाही काय? अनेक सरकारी हॉस्पिटल्सच्या आवारात वा आजूबाजूला उभंही राहवत नाही इतकी अस्वच्छता बोकाळलेली असते. त्यामुळे अनेक प्रकारची दुर्गंधीही पसरते. अनेक इमारतींच्या अंतर्भागात, रस्त्यावर, वाहनांमध्ये, जिथे शक्य असेल तिथे कुठेही पानाच्या तांबड्या भडक पिचकाऱ्यांची रांगोळी दृष्टीस पडते. या व्यतिरिक्त माणसे कसलाही विधिनिषेध न बाळगता कुठेही थुंकत असतात वा विधी करत असतात.
मुंबईची 'लाइफलाइन' असे ज्या लोकलचे वर्णन केले जाते, त्या लोकलच्या आतील व बाहेरील दृश्य सकाळच्या वेळी अवर्णनीय असते. बायका, पुरुष,मुले मुली लोकलला घाण करण्याची हक्काची जागा समजत असावेत. निवडलेल्या भाज्या, फळांच्या साली, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, रिकाम्या झालेल्या बाटल्या या व अशा अनेक गोष्टी रोजच्या रोज लोकलला बिनदिक्कत बहाल करत असतात. याशिवाय काही त्याज्य, दुर्गंधीयुक्त गोष्टीही नजरेला, नाकाला छळत राहतात. लोकलच्या आतील भिंती या तर बीभत्स चित्रे आणि मजकूर लिहिण्याकरता जणू सरकारने जनतेला आंदण दिल्या आहेत असेच वाटत राहते. ज्या वाहनातून आपण प्रवास करतो आहोत ते वाहन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच कशी?
पावसाळा असो वा नसो ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली दिसून येतात. हे पाणी नक्की येते कुठून तेही समजत नाही. या पाण्यात मग कचरा पडतो, कुजतो आणि आजूबाजूला दुर्गंधी पसरायला सुरवात होते. अनेक लोक या रस्त्यावर नेहमीच येत जात असतात पण या गोष्टीची दखल किती लोक गांभीर्याने घेतात? शेवाळलेली डबकी, रिकाम्या जागा पाहून त्यावर टाकलेला कचरा, रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या भिकाऱ्यांनी माजवलेली अस्वच्छता, सांडलेल्या पानाच्या पिचकाऱ्या, शेवाळलेले दुर्लक्षित तलाव, पडझड झालेल्या इमारतींचा कचरा वा घाण करण्यासाठी होत असलेला वापर, रस्त्यावर पसरलेला नासका-कुजका भाजीपाला, रस्त्याच्या कडेला लावलेल्या अन्नपदार्थांच्या गाड्यांतून शेवटी टाकला जाणारा कचरा, ज्या गोष्टींची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावायला हवी अशा सार्वजनिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या गोष्टी, विखुरलेले अन्न-धान्य, मांसाहार करून टाकलेला उरलासुरला कचरा या व अशा असंख्य गोष्टी, गणपती विसर्जनानंतर समुद्रात, नद्यांत, तलावात होणारी घाण, शिवाय नाले, कारखान्यातून समुद्रात सोडलेली विषारी केमिकल्स याही गोष्टी पर्यावरण संवर्धक आहेत का? आपली वैयक्तिक जबाबदारी यात काहीच नाही का?
ज्याप्रमाणे नुसता वरून मेकअप करून उपयोग नाही तर अंतर्गत स्वच्छता होणे आत्यंतिक गरजेचे आहे त्याचप्रमाणे शहरे नुसती अद्ययावत करून काय उपयोग, शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छता जाणीवपूर्वक व्हायला हवी. ही शिस्त प्रत्येकाने स्वत:ला लावून घेतली तर कोणत्याही पंतप्रधानांना लोकांना कचरा उचला हे सांगण्याची वेळच येणार नाही. भारत अत्याधुनिक तर हवाच पण तो सर्वप्रथम स्वच्छ हवा. अशा स्वच्छ देशांत राहणाऱ्या जनतेचे स्वच्छ प्रतिबिंब मग जगाच्या पटलावरही दिसल्याशिवाय राहणार नाही.
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात वानखेडेच्या प्रांगणात संपन्न झाला. अनेक रथी -महारथींची वर्णी या सोहळ्यात लागली. महाराष्ट्राला अनंत आर्थिक समस्यांनी घेरले असता हा एवढा अनाठायी खर्च करण्याची काय आवश्यकता होती अशा अर्थाच्या अनेक प्रतिक्रिया समाजमनातून उठल्या. हौसेला मोल नसते हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचा सपाटा सगळ्याच प्रसारमाध्यमांनी लावला. या मुलाखतींतून फडणवीस यांचा एक सच्चा, प्रांजळ, कामावर निष्ठा असलेला चेहरा प्रत्ययास आला. 'मी धूर्त किंवा कपटी राजकारणी नाही' हे त्यांनी पुन्हा पुन्हा ठासून सांगितले. जनहिताचे निर्णय घेण्यास मी कधीही मागेपुढे पाहणार नाही हेही त्यांनी सांगून महाराष्ट्राला आश्वासित केले. त्यामुळे पुढील काही वर्षे सरकारी पातळीवरील स्वच्छ राज्यकारभार लोकांना अनुभवता येईल असे वाटते आहे.
परंतु भाजप मध्ये मंत्रीपदासाठी चाललेली रस्सीखेच सगळ्यांनाच माहित आहे. ब्राम्हण, बहुजन, ओबीसी, मराठा हा जातीयवाद उफाळून आला आहे. माझ्या जातीने हा एवढा घसघशीत विजय मिळवून दिला हे सांगण्याची नव्हे तर हाय कमांड च्या गळी उतरवण्याची चढाओढ लागली आहे. भाजप मधील अंतर्गत दुही 'असा आमच्यात कोणताही अंतर्गत कलह नाही' असे वारंवार सांगून लपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
जनतेने निवडून दिलेले पण अल्पमतातील सरकार 'आम्ही निश्चितपणे स्थिर सरकार तुम्हाला देऊ' अशी ग्वाही जनतेला देते आहे. सुशासन आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारला प्रथम विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांचे संबंध नको तितके ताणले गेले आहेत. दोन्ही पक्ष अहंकाराचे फुत्कार टाकण्यात मग्न आहेत. राष्ट्रवादी पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारांचा खडा टाकून या दोन पक्षांची गम्मत बघतो आहे. त्यात आपली अनेक राजकीय लफडी-कुलंगडी झाकता आली तर असा धूर्त पवित्राही आहे. काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्यासाठी फिल्डिंग लावून बसली आहे. अपक्षांच्या मागण्या जोर धरताहेत. आम्हाला मंत्रिपदे मिळाली नाहीत तर बघून घेऊ असेही काही पक्षाचे नेते उघड उघड धमकावत आहेत.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे राजकीय कर्तृत्व पणाला लागणार यात शंका नाही. त्यांच्या समोर अनेक चांगल्या योजना असू शकतील परंतु या चांगल्या योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरवताना त्यांना प्रयत्नांचे पहाड फोडावे लागणार आहेत. सर्वप्रथम आपली 'विकेट' त्यांना वाचवावी लागणार आहे. त्यांची विकेट काढण्यासाठी टपून बसलेल्या अनेक राजकीय बोलर्सना त्यांना सफाईने टोलवावे लागणार आहे. जनहिताची कामे करण्याची फडणवीस यांची इच्छा आहे हे ऐकून जनता जरी सुखावली असली तरी राजकारणात राहून फक्त स्व-हिताचीच कामे करणाऱ्यांना त्यांचा हा मानस नक्कीच बोचत असणार. ते फडणवीस यांना आपल्या परीने जेरीस आणतील यात शंकाच नाही.
मतदान करून जनतेनेच ही परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात कोणाकोणाच्या खेळी रंगतील, कोणाचे उच्चाटन होईल, कोणाची सरशी होईल, महाराष्ट्रातील जनतेच्या पदरात कोणती सुखे वा दु:खे पडतील, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त होईल काय, शोषित,दुर्बल घटकांना न्याय मिळेल काय, आर्थिक व सामाजिक विषमता अरुंद होईल काय या किंवा अशा अनेक प्रश्नांचे भवितव्य केवळ सिंहासनावर आरूढ झालेल्या सरकारच्या हाती नाही तर त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या इतर राजकीय सोबत्यांच्या हातीही आहे हे कटू सत्य आहे.