Thursday, 29 May 2014

'नमो' नम:

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि समस्त भारतवासियांच्या आशा पल्लवित झाल्या . या निवडणुकीत जणू काँग्रेस हटाव मोहीम जनतेने हाती घेतली . सर्वांनीच श्रद्धापूर्वक आपापले मत भाजपला नव्हे तर मोदींना बहाल केले . मोदी या व्यक्तीवर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे असा सार्थ विश्वास जवळजवळ प्रत्येक मतदाराला वाटला . 'अब अच्छे दिन आनेवाले है ' हे वाक्य आपल्यासाठीच आहे असे मनोमन प्रत्येकालाच वाटले . गेल्या काही महिन्यांपासून जळी -स्थळी -काष्ठी -पाषाणी 'अब की बार मोदी सरकार ' ही  'tag line' माणसांचे लक्ष वेधून घेत होती . पेपर-मासिके-टी व्ही -इंटरनेट सर्वच माध्यमे मोदी या नावाने व्यापली होती . आपल्याला वाली कोण या लोकांच्या मनातील संभाव्य प्रश्नाचे उत्तर म्हणून फक्त नरेंद्र मोदी हा एकमेव चेहरा समोर दिसत होता आणि काहीसा आश्वासकही भासत होता . त्यांनी केलेली भाषणे,दिलेल्या मुलाखती प्रभावी वाटत होत्या. किमानपक्षी हा माणूस बोलण्यात तरी कणखर आहे, भारताचे नेतृत्व पेलण्यास सक्षम आहे असे वाटू लागले होते.  
मोदींनी शपथविधी सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आपल्या देशाशेजारील राष्ट्र-प्रमुखांना आमंत्रित करून आपापसांत शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी पहिले पाऊल उचलले आणि आपल्या मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवून दिली. मोदींच्या नावाने सेन्सेक्स सुद्धा उसळी मारू लागला. भारतातील प्रत्येक लहान-मोठ्या राज्यांत मोदी नावाची मोठी लाट आली आणि तिच्या रेट्याने इतर पक्ष भुईसपाट झाले. आज त्यांनी दशसुत्री अजेंडा जाहीर केला आहे. त्यात अनेक मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हा अजेंडा स्तुत्य आहे परंतु यात महिला सुरक्षेचा विषय अंतर्भूत नाही हे पाहून काहीसे आश्चर्य वाटले. असो. या सरकारची घडी नीट बसण्यासाठी काही वेळ तर द्यायला हवाच ! जुन्या प्रलंबित, लाल फितीत अडकलेल्या फाइल्स, प्रलंबित योजना या हातावेगळ्या केल्याशिवाय मोदी सरकार पुढे सरकू शकणार नाही. पैशाअभावी पुढे न सरकलेली कंत्राटे, योजना यावर योग्य ते निर्णय घ्यावे लागतील.  
महागाई, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पंचनाम्यात होणारी अक्षम्य दिरंगाई, वाहतुकीच्या समस्या, वाढती लोकसंख्या आणि दिसामाशी वाढणारे परप्रांतीय लोंढे, प्रदूषण, मुली आणि महिलांची सुरक्षितता, बालमजुरी, मुलभुत साधनांची टंचाई, आरोग्य, कुपोषण, शैक्षणिक सुविधा, बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक दरी, दळणवळण, व्यापार, आंतरराष्ट्रीय पत असे अनेक प्रश्न आजमितीला आ वासून उभे आहेत. दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या शत्रूंशी धाडसाने आणि हुशारीने मुकाबला करत त्यांना यशाचे शिखर गाठायचे आहे. जनमानसात विश्वासार्हता संपादन करायची आहे. आपल्या मुकुटातील काट्यांचे भान ठेवायचे आहे. तळागाळातील जनतेला आपलेसे करायचे आहे. गरीब-श्रीमंतातील दरी कमी करायची आहे. अनाचारी,बेताल वृत्तीवर वचक बसवायचा आहे. माणसातील हिंसक प्रवृत्तीला लगाम घालायचा आहे. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आपल्या देशातच तरुणांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. परदेशी चंगळवादापेक्षा त्यांच्यातील कार्यक्षमतेचे आणि स्वच्छतेचे महत्व आपल्या देशातील तरुणांना पटवून देता आले पाहिजे.  
  सुरवातीचे शंभर दिवस मोदी सरकारच्या कसोटीचे असतील. काही लोकांना खूष करण्यासाठी त्यांना अनेकांना नाखूष करावे लागेल. जनहितासाठी ,देशहितासाठी अनेक कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागतील. काही अडसर त्यांना दूर करावे लागतील. भाजीवाले ते उद्योगपती या सामाजिक-आर्थिक स्तरातील सर्वांनाच ते जवळचे वाटण्यासाठी त्यांना काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. मुख्य म्हणजे सतत जनसंपर्कात राहून त्यांना प्रत्येक वयातील आणि स्तरातील नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्याचे निराकरण करावे लागेल. हळूहळू लोकांच्या मनात त्यांचे 'रिपोर्ट कार्ड' तयार  होईल. दिवस-महिने-वर्ष या कार्डात अनुकूल वा प्रतिकूल बदल होत राहतील. पाच वर्षाच्या अखेरीस या रिपोर्ट कार्डाचे प्रत्यंतर मोदी सरकारला येईल.              

पाच वर्षा नंतर मोदी सरकार की इतर कोणत्या पक्षाचे सरकार याचा निर्णय भारतीय जनतेच्या मनात तयार असेल. सध्या मात्र भारतीय जनतेने दिलेला पेपर मनापासून आणि परिश्रम पूर्वक सोडवणे एवढेच मोदी  सरकारच्या हातात आहे.                                        

Monday, 19 May 2014

मिशन 'मातोश्री'

काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आणि आम्हा  'बालमोहन १० वीई' च्या उद्धवच्या वर्गमित्र -मैत्रिणींना त्याला भेटायचं एक छान निमित्त मिळालं. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही भेट नव्हती तर पूर्णपणे अनौपचारिक असा हा मित्रत्वाचा सोहळा होता.      
उद्धवसाठी भेट म्हणून अतिशय सुंदर असा केक आम्ही तयार करून घेतला आणि ताज्या टवटवीत फुलांचा सुरेख गुच्छ देखील मागवला.  ठरल्याप्रमाणे शिवाजीपार्क येथील जिप्सी या सर्वमान्य संकेतस्थळी आम्ही जमलो आणि काही अवधीतच मातोश्रीकडे प्रयाण केले . 

मातोश्रीत जाण्याची माझी तरी ही पहिलीच वेळ होती. मध्यंतरी अनेक वर्षे आम्हा मित्र-मैत्रिणींचा एकमेकांशी संपर्क नव्हता नाहीतर याआधी हा योग नक्कीच आला असता . विशेषकरून शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब असताना आम्हाला तिथे जाता आले असते याची थोडी रुखरुख वाटली.  आजवर बहुतेक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पाय कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जिथे वळले होते त्या शिवसेनेच्या तीर्थस्थानी जाण्याची संधी आम्हाला मिळाली. कलानगरचे वळण आले आणि 'साहेब ' या फुलांनी सजवलेल्या शब्दाने आमचे स्वागत झाले. आम्ही आत शिरलो. जिथे तिथे गस्त घालणारे पोलिस दिसत होते. आमच्या गाड्या मातोश्रीपाशी आल्या. पायउतार होऊन आम्ही जवळजवळ लगेचच त्यांच्या स्वागतकक्षात गेलो. तिथे अगोदरच प्रचंड संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि इतर संबंधित उपस्थित होते. उद्धव यायला जरा वेळ होता. आम्ही आमच्या मित्राच्या घरात हक्काने शिरून यथेच्छ बडबड सुरु केली. आजूबाजूचे लोक कुतूहल मिश्रित नजरेने आमच्या उत्साही ताफ्याकडे पाहत होते. आमच्यावर कोणतेच औपचारिकपणाचे बंधन नव्हते. आम्ही सर्वच जण बिनदिक्कत आपलेच घर असल्यासारखे मोकळेपणाने वावरत होतो. शेजारच्या छोट्या कक्षात आम्हा सर्वांची बसायची व्यवस्था केली आणि आम्ही तिथे जायला वळलो. तेवढ्यात समोरून शिवसेनेतील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच मनोहर जोशी सर आले. मी त्यांना सर म्हणून सरळ हाक मारली आणि आम्ही उद्धवचे वर्गमित्र आहोत असं सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला व त्यांनी आम्हाला बसायला सांगितले. मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय विषयाची कास धरून आम्ही तिथे आलो नसल्याने उद्धव सोबत केवळ निखळ आनंद साजरा करणे एवढाच आम्हा सर्वांचा अंतस्थ हेतू होता.     
        
अतिशय स्वादिष्ट पेढे आणि कोकम सरबताचा आम्ही आस्वाद घेतला. काही वेळाने उद्धव आला. आम्हा अर्वांचे अभिनंदन त्याने स्वीकारले. पण आमच्या कदाचित बरेच तास आधीच येउन ताटकळत बसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तो परत बाहेर गेला. त्याची खरे तर बरीच तारांबळ होत होती. एकीकडे वर्गमित्र भेटल्याचा आनंद वेगळाच होता पण दुसरीकडे पक्षीय जबाबदारी पार पडण्याचे बंधनही होतेच की ! शिवसेनेच्या विजयानंतरची आतषबाजी आम्ही अनुभवत होतो. बाहेर घोषणांचा गजर चालू होता. त्या घोषणात आम्ही आमच्या '१०वी ई' चा गजराही गुंफून टाकला.       
काही वेळाने रश्मी ठाकरे येउन आम्हाला भेटल्या. त्यांनी सुहास्यवदनाने आम्हा सर्वांचे स्वागत केले. त्या जणू आमच्यातल्याच होऊन गेल्या. यामुळे आमचा उरलासुरला संकोच गळून पडला आणि आम्ही जणू आमचे वय विसरून वर्गात असल्यासारखेच वागायला लागलो. नंतर युवराज आदित्य आले आणि त्याच्या बाबांचे अ-राजकीय मित्र-मैत्रिणी पाहून त्यालाही मौज वाटली. त्यानंतर उद्धवच्या हस्ते केक कापण्याचा व तो त्याला भरवण्याचा समारंभ पार पडला.  गप्पा आणि आठवणींत रमून गेलेल्या आमचे पाय निघता निघत नव्हते पण बाहेरची वाढती गर्दी आणि परतायची ओढ यामुळे आम्ही उद्धव-रश्मी आणि आदित्यचा निरोप घेतला.       
इतक्या वर्षांनी झालेली आम्हा वर्गमित्रांची आणि मैत्रिणींची भेट आणि त्या भेटीला मातोश्रीतून मिळालेला निखळ मैत्रीचा दुजोरा ही दौलत मनात साठवत आम्ही आपापल्या घरी परतलो.