शालेय अभ्यासक्रमात भूगोल अभ्यासताना 'भारत हा कृषिप्रधान देश आहे ' हे वाक्य वारंवार वाचनात आलेले मला स्मरते. पण स्वत: अहोरात्र खपून संपूर्ण देशाचे पोट भरणारा हा बळीराजा आज मात्र निष्ठुरतेचा, असंवेदनशीलतेचा फक्त बळी ठरला आहे . जिकडे बघावं तिकडे उजाड , उध्वस्त झालेली शेतं, मरून पडलेली जनावरं, झाडावरून खाली पडून निष्प्राण झालेली फळे, भाज्या, धान्ये दिसत आहेत. शेतकरी कुटुंबाचे विझलेले डोळे मनात कालवाकालव करत आहेत. त्यांना सकाळ-संध्याकाळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे, सावकारी कर्जाचा फास त्यांना सतत भेडसावतो आहे, आता यापुढील आयुष्य काढायचे कसे या विमनस्कतेतून धडाधड गळफास लावले जात आहेत.
हे चित्र कुठल्याही सहृदय माणसाच्या आतड्यास पीळ पडणारे आहे. पण शासन मात्र कोणत्या मातीचे बनले आहे कोण जाणे? ते काही केल्या द्रवत नाही हीच वस्तुस्थिती आहे. नुसते त्या पिडीत भागाचे दौरे करून, फुकटची पाहणी करून काय साध्य झाले आहे आतापर्यंत ? बरे मदत जाहीर करून झाली ती या बळीराजा पर्यंत नक्की कधी पोहोचणार ? नुसत्या कोरड्या आश्वासनांची खैरात करून कुठल्या शेतकऱ्याचे पोट भरणार? बळीराजा, तू अजिबात खचून जाऊ नकोस, आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ही मलमपट्टीची भाषा करणे फारच सोपे आहे परंतु याकरता उचलावी लागणारी ठोस पावले सरकार तिळमात्र ही उचलत नाही हीच सद्यस्थिती आहे उलट चुकीच्या, अवैध पद्धतीने या शेतांचे पंचनामे होत आहेत असे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते.
सध्या जिथेतिथे निवडणुकांचे वादळ घोंघावते आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यात सर्वच राजकीय पक्ष मशगुल आहेत. प्रचाराची राळ उठते आहे. मीच तेवढा कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याची अहमहमिका लागलेली आहे. त्या त्या नेत्याच्या नावाने मंत्र, चालीसा म्हटल्या जात आहेत, कवने-स्तवने यांना उधाण आले आहे , दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणारी उपहासपूर्ण भाषणे हे राजकारण्यांचे शस्त्र झाले आहे , पोस्टर्स, होर्डिंग, जाहीर सभा, इतरांची लफडी-कुलंगडी चव्हाट्यावर आणणे, जाहिरातबाजी यांना नुसता उत आला आहे. आता या सर्व राजकीय रणधुमाळीत बळीराजाच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे किंवा त्याच्या कुटुंबाच्या वाताहतीकडे कोण लक्ष पुरवणार आणि तेही निवडणुकांच्या तोंडावर? प्रत्येक वाहिनी मात्र इमाने इतबारे किती शेतकऱ्यांनी आजपर्यंत मृत्यूला कवटाळले याचे आकडे दाखवायचे काम करते आहे आणि प्रत्येक आकड्यागणिक सरकारच्या निष्क्रियतेचा प्रत्यय येत राहतो आहे.
आम्ही अमुक एक मदत जाहीर केली आहे असे म्हणून शासन यातून आपला पदर सोडवू पाहते आहे. गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, निवडणुका पुढे ढकला, शेतकऱ्याच्या प्रश्नाला अग्रक्रम द्या असे काही मतप्रवाह कानावर आले होते पण बहुधा सरकार दरबारी या कानाने ऐकून त्या कानाने या गोष्टी सोडण्यात आल्या असाव्यात. असेही ऐकिवात आले की कोणी नेते तिथे जाउन काजू-बदाम खात खात पिडीत भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत होते तर कोणी बाटल्या आणि कोंबड्यांचे सप्ते साजरे करित होते. गेंड्याचा अपमान का उगाच करायचा? सरकारची कातडी तर दिसामाशी त्यापेक्षा कित्येक पटीने निगरगट्ट, कोडगी होत चालली आहे. संवेदनाहीन माणसांचे प्रतिनिधित्व करताहेत ही सत्तेत बसून खुर्च्या उबवणारी माणसे! यांना हृदय हा अवयव तरी देवाने दिला आहे का याविषयी शंका निर्माण होते आहे जनतेच्या मनात. आणि यांना देशाचे नेते म्हणून संबोधायचे! का बुवा?
भारताला अग्रेसर करण्याची स्वप्ने दाखवत निवडणुका होतील, सत्तांतरे होतील, विजयाची दुंदुभी वाजेल, वरती काढल्या जातील, गुलालांची, पैशांची अमाप उधळण होईल. पण सामान्य जनतेचे प्रश्न मात्र कायम तसेच आणि तिथेच राहतील. इतक्या वर्षांचा अनुभवही तोच आणि तसाच आहे. एकदा का निवडणुका झाल्या की पुढली पाच एक वर्ष समस्त मतदारांकडे सहज पाठ फिरवता येईल. सत्ताधारी आणि विरोधकांचे शिशुवर्ग तसेच पुढे चालू राहतील. रस्ते, पाणी, वीज, घरे, कचरा, गटारे, भ्रष्टाचार, दैनंदिन प्रवास, महिलांवरील अत्याचार, महागाई , शिक्षण या अशा अनेक मुलभुत समस्या जैसे थेच राहतील आणि अग्रक्रम मिळेल राजकीय कुरघोड्यांना आणि त्या भांडवलावर गब्बर होणाऱ्या इतर घटकांना!
भारत या कृषिप्रधान देशात उपेक्षित राहण्याचा मान सर्वतोपरी बळीराजाला देण्यात येईल. भूगोलाच्या पुस्तकात लिहिलेला मजकूर आपण वाचू , 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' . हे वाक्य वाचताना बळीराजाचा खचलेला, केविलवाणा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येईल आणि आपण या वाक्याला हरकत घेऊन पुढे पुस्ती जोडू - नव्हे 'भारत हा आत्महत्याप्रधान देश आहे'.