Friday, 14 December 2012

ऑफिस आणि कुटुंब ........ एक कसरत




पूर्वीच्या काळी चाकरमानी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतायचे. संध्याकाळी सहानंतर बहुतांश ऑफिसेस ओस पडायची. दुपारी घरचा डबा आणि रात्री घरचे जेवण यामुळे तब्येत उत्तम रहायची. कामाचा अवाजवी ताण नव्हता. रेल्वेने येणे-जाणे आता इतके भीषण नव्हते. एकत्र कुटुंब असल्याने आपल्या मुलांना कोण बघेल याची क्षिती नसायची. सणासुदीला गावी जाण्यासाठी सुटी मिळायची. एकंदरीत घर आणि ऑफिस हे दोन्ही गड व्यवस्थित राखता यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णत: बदलले आहे.  
सकाळी घर सोडायचे. तुडुंब भरलेल्या बसमधून अथवा ट्रेनमधून कसेबसे स्वत:ला गोळा करत ऑफिस गाठायचे. कामाचे ढीग हातावेगळे करत राहायचे. यायच्या वेळेची निश्चिती नाही. काम आणि काम. अवाजवी ताण. वेळ मिळालाच तर काहीतरी पोटात ढकलून भूक भागवायची. वरिष्ठांची बोलणी खायची. मनाविरुद्ध गॉसीप ऐकायच्या. प्रमोशनच्या जीवघेण्या लढाया लढायच्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतरही laptop उघडून ऑफिसचे काम करत बसायचे. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ नाही, त्यांची वास्तपुस्त करायला वेळ नाही. सुट्या आहेत पण घेता येत नाहीत अशी अवस्था! आजकाल जवळ जवळ प्रत्येक घराचे थोड्याबहुत फरकाने हेच चित्र आहे. 
बहुतेक ऑफिसेस वातानुकुलीत असतात. त्यामुळे सतत थंड हवा शरीरात झिरपत राहते. कोवळे ऊन अंगावर घ्यायला कुणाला सवड नसते. बहुतांश ऑफिसमध्ये व्हेंडिंग मशिन्स असतात, म्हणून अनेक जण नुसता सारखा चहा किंवा कॉफी ढोसत राहतात. घरून डबा आणणे काहींना कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून मग जेवणाच्या वेळी शेजारील हॉटेलमधून पदार्थ ऑर्डर केले जातात. जंक फूड खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पोळी-भाजी पेक्षा पिझ्झा खाणे प्रिफर केले जाते नव्हे प्रतिष्ठित समजले जाते. या उलट काहींना ऑर्डर करून खायलाही वेळ नसतो. ते चहा-कॉफी वर वेळ मारून नेतात. शरीराला योग्य ते अन्न वेळच्या वेळी न मिळाल्याने शरीर बंड करून उठतं. मग डोकेदुखी, acidity, बद्धकोष्ठ, मेदधिक्य अशा तक्रारी वाढू लागतात. झोपेचा कोटा पूर्ण न झाल्याने चेहऱ्यावर मरगळ येते, ग्लानी आल्यासारखे वाटते. सतत थंड वातावरणात वावरल्याने सर्दी-खोकला होत राहतो. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रक्तदाबाची पातळी खाली-वर होऊ लागते, stress Diabetes उद्भवू शकतो.  
पैसे भरपूर मिळतात म्हणून खूप जण ओव्हरटाईम करतात. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून असा भरपूर कमावलेला पैसा मग डॉक्टरांच्या औषधांवर रिता करावा लागतो. अव्यवस्थित खाणे-पिणे, अपुरी झोप, अनियमित शेड्युल, व्यायामाचा अभाव आणि कामाचे प्रेशर यामुळे शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढू लागतात. स्वभाव चिडचिडा होऊ लागतो. नवरा-बायको दोघे याच पद्धतीने काम करत असल्यास मुला-बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यांना वेळ अजिबात देता येत नाही. मग याची भरपाई म्हणून एखादी मोठी सुट्टी घेऊन परदेशवारी केली जाते. मुले तात्पुरती खुश होतात. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तेच कंटाळवाणे रुटीन सुरु होते. मुलांना महागडे कपडे, खेळ, खाणे देऊन त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न आई-वडील करत असतात. अधिक पैसे = अधिक सुख हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेले असते. 
मुले शिकतात, मोठी होतात. स्वत:च्या पायावर उभी राहतात आणि बघता बघता  परदेशात भुरकन उडून जातात. कारण तिथे त्यांना बक्कळ पैसा मिळणार असतो. पैसा हेच सर्वस्व हे त्यांच्या पालकांचेच ब्रीदवाक्य असते. उतरत्या वयाचे पालक वरकरणी परदेशी गेलेल्या मुलाच्या कौतुकात रमल्याचे दाखवत असले तरी आपली मुले म्हातारपणी आपल्या जवळ राहणार नाहीत याची खंत त्यांना मनोमन सतावत असते. जेव्हा मुलांना पालकांची खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा पालक उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि जेव्हा वयस्कर मात्या-पित्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज भासते तेव्हा मुले उपलब्ध होऊ शकत नाहीत. अर्थात याला अपवादही काही कुटुंबे असतातच! परंतु आई-वडील आणि मुले यांना एकमेकांचा पुरेसा सहवास न लाभणे, त्यांना एकमेकांशी संवाद साधता न येणे, आनंदात आणि दु:खात एकमेकांचा आधार न मिळणे ही स्थिती खचितच गौरवास्पद नाही.  
माणसाच्या गरजांना अंत नाही. माणसाच्या आकांक्षांना अंत नाही. माणसाच्या अभिलाषांना अंत नाही. पण निव्वळ जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आपण कौटुंबिक सौख्याचा, जिव्हाळ्याचा,आपल्या स्वास्थ्याचा आणि कोमल नात्यांचा अंत तर करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवणे नितांत गरजेचे आहे. 
     

No comments:

Post a Comment