तिला खूप खूप जगायचं होतं . तिच्या मनात भविष्याची सुंदर स्वप्ने होती. तिच्या अवघ्या कुटुंबाचा ती आधारस्तंभ होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिला उत्तम शिक्षण देऊ केले होते. एका छोट्याशा गावातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नोकरी निमित्ताने ती आली. आपल्या मित्रासोबत चित्रपट बघून ती द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि जणू काही एखाद्या सावजावर नेम धरून टपलेला काळच तिच्यावर चालून आला. थोड्या वेळात तिच्या देहावर अनन्वित अत्याचार झाले. न भूतो न भविष्यती असे घाव तिला सोसावे लागले. तिचे असह्य वेदनांनी तडफडणारे शरीर विवस्त्र करून रस्त्यावर फेकले गेले. तिच्याबरोबर त्याचेही ! आजूबाजूच्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या पण त्या दोघांची दखल कुणी घेतली नाही. अखेर मोटरसायकलीवरून आलेल्या तिघांना ती आणि तो दिसले आणि पोलिसांना इन्फोर्म केले गेले. अशा रीतीने त्या दोघांची रवानगी सफदरजंग हॉस्पिटलात झाली.
आज मृत्यूशी चार हात करणारी ती मुलगी 'दामिनी' आपल्यात नाही. अंगावर इतक्या भयंकर जखमांचे ओझे बाळगत तिने तेरा दिवस काढले तरी कसे असा प्रश्न मनाला वारंवार पडतो आहे. दामिनी आशावादी होती. आपल्या वेदनेने ठुसठूसणाऱ्या शरीराला नक्की आराम मिळेल आणि आपण या जीवघेण्या संकटातून बरे होऊ हा विश्वास तिच्या ठायी होता. आतडी जवळजवळ नाहीत, डोक्याला असंख्य जखमा झालेल्या, कंबरेखालच्या भागात असह्य वेदना, अंतर्गत रक्तस्राव, बेशुद्धी अशी देणगी तो महाभयंकर काळच तिला देऊन गेला होता. तरीही जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा 'Mother, I want to live' हा संदेश तिने तिच्या आईला पाठविला. अवघ्या तेवीस वर्षाच्या या दामिनीला ही पराकोटीची वेदना का सहन करायला लागावी? हा प्रश्न मनात अनेक वेळा उठला. नामांकित डॉक्टरसुद्धा तिच्या अंगावरील जखमा बघून हबकून गेले होते आणि तिच्या धैर्याची प्रशंसा करत होते. पण अखेर तिच्या असह्य वेदनांची सांगता झाली. लाखो-करोडो लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचे जळजळीत निखारे ठेऊन ती गेली.
आज तिच्या निमित्ताने भारत देशातील अनेक राज्यांतील कैक लोक अपराध करणाऱ्यांना सज्जड शिक्षा द्या अशी मागणी करण्याच्या हेतूने एकत्र आले. अनेक दिवस, महिने, वर्षे कित्येकांच्या मनात साचलेली उद्विग्नता तिच्या निमित्ताने दारोदार चर्चिली गेली. निदर्शने, घोषणा, मूक मोर्चे अजूनही चालू आहेत आणि चालू राहतील. तिला आणि तिच्या सारख्या अनेकींना न्याय मिळावा यासाठी लोकांचे जथ्थे रस्त्यावर उतरतील. सरकारला जन- भावनांची दाखल घ्यावीच लागेल. अपराध्यांना फासापर्यंत न्यावेच लागेल.
पण एवढे करूनही असे गुन्हे पुन्हा होणारच नाहीत याची कुणी ग्वाही देऊ शकेल काय? किंबहुना या घटनेनंतर लगेचच राजधानीत आणि इतरत्र ठिकाणी अमानुष अत्याचाराच्या घटना घडल्याच! अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती तोपर्यंत घडतच राहतील जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलणार नाही. ही मानसिकता एका दिवसात, एका रात्रीत बदलणार नाही परंतु सातत्याने प्रयत्न केल्यास एक दिवस बदलेल एवढे मात्र निश्चित! माणसाला पैसे कमावण्याची संथा देण्याआधी माणसाला माणूस म्हणून वागण्याची संथा देणे अति आवश्यक आहे असे मला वाटते. नुसते लैंगिक शिक्षण देणे गरजेचे नाही तर वयाशी निगडीत असलेल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे. आपल्या शरीराची वैषयिक भूक भागवण्यासाठी समोर दिसेल त्या स्त्रीला लक्ष्य करणे हे असंस्कृत, कमकुवत, असमतोल मनाचे लक्षण आहे हे मुलांना पटवणे अत्यावश्यक आहे. बाल्यावस्थेतच मुलांना काही मानवी मूल्यांचे जतन करायला सांगणे आवश्यक आहे. घरातील स्त्री रूपांचा मग ती आई असेल, आजी असेल, बहिण असेल, आत्या असेल योग्य तो आदर करणे हे इतर वडीलधाऱ्यांनी शिकवले पाहिजे. पौगंडावस्थेत भरकटणाऱ्या मुलांच्या मनाला संस्कारांचा आणि संयमाचा लगाम घालायला शिकवले गेले पाहिजे. शाळेतही आपल्याबरोबर शिकणाऱ्या वर्गभगिनी बरोबर चांगले वागायला त्या त्या वर्ग-शिक्षकांनी शिकवावयास हवे. समाजातील पुरुषांचा स्त्री-विषयक दृष्टीकोन बदलायला हवा असेल तर त्यासाठी मुलामुलींच्या बाल्यावस्थेपासूनच कंबर कसायला हवी.
एकमेकांना दोष देत राहणे, चर्चा-वितंडवाद करत राहणे, सरकारवर सारखी आगपाखड करत राहणे, मुलींना घराबाहेर न सोडणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे काही चिरस्थायी उपाय नाहीत. त्यापेक्षा मुलांना नैतिक-अनैतिक यातील फरक खुबीने समजावणे, उत्तम आचरणाचे शिक्षण देणे, स्त्री असो वा पुरुष प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक वागवण्यास शिकवणे, दुसऱ्याविषयी चांगले विचार मुलांच्या कोवळ्या मनात रुजतील अशी उदबोधक पुस्तके मुलांना उपलब्ध करून देणे, एकमेकांना मदत करण्याचे बाळकडू मुलांना देणे, मुलांची संगत तपासून पाहणे अशा काही गोष्टी प्रयत्नपूर्वक पालक आणि शिक्षक अशा दोहोंनी केल्यास उद्याची सुसंस्कृत पिढी तयार होईल यात शंका नाही. आपल्या मुलांना घडवण्यात प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. हे सामाजिक अत्याचाराचे मूळ समूळ निपटून टाकण्यासाठी जबाबदारीचा हा विडा आज प्रत्येकानेच उचलण्याची नितांत गरज आहे.