नुसते सूर घोटले आणि गाणे जमले असे त्यांच्या रचना गाताना होत नाही. 'या चिमण्यांनो', नीज माझ्या नंदलाला', 'पाण्यातले पहाता', 'जाहल्या काही चुका', 'अगा करुणाकरा', 'भेटी लागे जीवा', 'श्रावणात घननिळा' अशी कोणतीही गाणी घ्या ह्यात 'distinction' मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे क्रमप्राप्त होते. या गाण्यांना हात घालण्याआधी सूर-ताल-लयीचा आपल्या डोक्यावरील हात तपासून पाहणे अत्यावश्यक असते.
त्यांची सुरांची 'permutations आणि combinations' इतकी अनवट असतात की सूर-ताल-लयीची माहिती अपुरी असेल तर अंधाऱ्या गुहेत भरकटण्याची पाळी येऊ शकते. ही सुरांची जीवघेणी मिश्रणे थोडी बहुत गाता आली तरी त्यांच्या रचना अंशाने तरी गाऊ शकल्याचे समाधान मिळते.
'सारेगमप' ह्या सांगीतिक स्पर्धात्मक कार्यक्रमात वयाने लहान असलेल्या ( पण सांगितिक वय मोठे असलेल्या) प्रथमेश लघाटेने 'काळ देहासी' हे गाणे उत्कृष्टरित्या सादर करून पं.हृदयनाथ मंगेशकरांना आश्चर्यमुग्ध केले होते. ह्या गाण्याचे मूळ गायक श्री.सुरेश वाडकर हे आहेत. सुरांचा अनुपमेय साठा त्यांच्या गळ्यात आहे. लय-तालावर मांड आहे. त्यामुळे या गाण्याला त्यांनी अतिशय योग्य असा न्याय दिला आहे याबद्दल कोणाचेही दुमत असायचे कारण नाही.
पण मला खरे कौतुक वाटते ते स्वप्नील बांदोडकर या गुणी गायकाचे! 'अंतर्नाद' या खळे यांच्या रचनांवरील कार्यक्रमात हे गाणे स्वप्नीलने ज्या पद्धतीने सादर केले त्याला तोड नाही. मूळ गाण्यात नसलेल्या सूक्ष्म जागा-हरकती त्याने ज्या खुबीने आणि ताकदीने गायल्या आहेत त्याबद्दल तो नि:संशय प्रशंसेस पात्र आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या तालमीत तयार झालेल्या त्याच्या गळ्यातून हे गाणे सालंकृत होऊन श्रोतृहृदयी उतरले आणि खळे काकांनीही त्याला प्रसन्नपणे दाद दिली. ज्या आनंदाने स्वप्नील लयीचा लुथ्फ घेत गात होता आणि पखवाजावर श्री निलेश परब यांनी त्याला जी तेवढीच उत्कृष्ट साथ केली त्याबद्दल त्या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
ज्याप्रमाणे गांडीव धनुष्य पेलण्यासाठी धनुर्धर अर्जुनासारखे समर्थ बाहू लागतात त्याचप्रमाणे खळे काकांची गाणी पेलण्यासाठी तितकाच समर्थ गळा लागतो. पश्चिमेकडे म्हणजेच मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमणा करणारे स्वप्नीलचे गाणे आहे. ही जन्मांतरीची ठेव त्याने जतन करावी, वाढवावी आणि अशीच गाणी गात श्रोत्यांची हृदये जिंकावीत.
( 'अंतर्नाद' हा जुना कार्यक्रम आहे. मी अनेकवेळा स्वप्नीलचे हे गाणे ऐकले. प्रत्येकवेळी याविषयी लिहीवेसे वाटत होते परंतु ते जमले नाही. म्हणून उशिराने का होईना मी याविषयी लिहायचे ठरवले. माझ्या १५० व्या ब्लॉगच्या निमित्ताने मी हा लेख लिहिते आहे.)
No comments:
Post a Comment