Monday, 29 October 2012

आधुनिक उखाणे.........

कालमानाप्रमाणे जुने विचार, जुनी संस्कृती, जुन्या परंपरा आता कालबाह्य होत चालल्या आहेत. जिथे तिथे आधुनिकतेचे फॅड बोकाळले आहे. झगमगाटाचा, झटपट श्रीमंतीचा सोस दिसामाशी वाढतो आहे.  या पार्श्वभूमीवर नव्या, आधुनिक विचारांची ओळख करून देणारे पुढील उखाणे.,,,,,,,,,,,,  


स्टीलचे ताट त्यात चांदीची वाटी 
आज ह्याच्या तर उद्या त्याच्या पाठी  

गाजराचा हलवा, शेवयांची खीर
तू गरीब म्हणून सात पावले मागे फिर................

श्रीखंडात चारोळी, दुधात केशर 
उगाच का घ्यायचे मी लग्नाचे प्रेशर............

उंची कपडे, परफ्युम, श्रीमंती थाट
म्हणून तर लग्नाचा घाटलाय घाट ..........

मूव्ही, पॉप टेट्स  सीसीडी, पिझ्झा हट 
वडिलांनी लावलीय नुसती लग्नाची कटकट ...............

जिरेसाळ भात त्यावर लोणकढे तूप
मला बाई आवडते मशरूम सूप................ 

नवी कोरी गाडी आणि देखणा छोकरा
महिन्याकाठी गाठते मी नवीन बकरा...........

घरीदारी लग्नाचे वाजताहेत पडघम
माझ्या मनात पळण्याचे विचार आहेत जानम.......... 

कमावलेली बॉडी आणि सेक्सी स्टाईल 
कधी दिसेल मला माझा हिरो साहिल............

दिव्यादिव्यांनी उजळला कोपरा
Date, Long-drive बेत आता फिक्स करा............ 

समर्थ म्हणाले, 'शुभमंगल सावधान'
नको करूया लग्न राखू त्यांचा मान.............

रोयालचा पेंट आणि वाघबकरी चहा
कांदेपोहे खा आणि मुलगी पहा...................

गोडात गोड पाकातले चिरोटे 
असे कसे निपजले आपलेच कारटे?...........

ज्याचा असेल गाडी-बंगल्याचा व्याप 
तोच होईल माझ्या बाळाचा बाप...........

चॉकलेट कुकी आणि आईसक्रीम, डोनट 
श्रीमंत होण्याचा शोधूया 'shortcut'...............

माधुरीच्या साड्या आणि सलमानचे नखरे
आई-वडील करतील माझ्या स्वप्नांचे खोबरे..........

Blackberry, iPad, laptop, notebook
नवरा माझा असावा नामवंत 'cook'...........

उंची सूट, फाइव्ह स्टार, फंकी ज्वेलरी 
तोच असेल माझ्या स्वप्नांचा मानकरी.................. 

ताटाभोवती काढली महिरप नक्षीदार 
 पगार असावा रग्गड, दिसणे जरी सुमार.................

अंगणात माझ्या दरवळतो पारिजात
परदेशी वरासाठी केली मी यातायात ..................

सनई-चौघडे, फटाके, वरात 
इतर 'दारात', MBA 'घरात'...........


हॉलिडे डेस्टीनेशन, हनिमून, lingerie 
Attractive package - Thomas Cook/Strawberry...........   




Friday, 19 October 2012

टाळ-मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे ............

शालान्त परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जसे 'D'- group चे म्हणजेच 'higher difficulty level' असलेले प्रश्न असतात तसेच ज्येष्ठ संगीतकार कै.श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेले 'काळ देहासी आला खाऊ' हे गाणे आहे. लयकारीवर उत्तम प्रभुत्व असल्याखेरीज हे गाणे पेलता येणे सर्वस्वी अशक्य आहे. तशा खळ्यांच्या बहुतांश रचना या संगीत शिकणाऱ्यासाठी किंवा संगीत शिकलेल्यांसाठीही 'D'- group च्या category मध्येच जमा असतात.
नुसते सूर घोटले आणि गाणे जमले असे त्यांच्या रचना गाताना होत नाही. 'या चिमण्यांनो', नीज माझ्या नंदलाला', 'पाण्यातले पहाता', 'जाहल्या काही चुका', 'अगा करुणाकरा', 'भेटी लागे जीवा', 'श्रावणात घननिळा' अशी कोणतीही गाणी घ्या ह्यात 'distinction' मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे क्रमप्राप्त होते. या गाण्यांना हात घालण्याआधी  सूर-ताल-लयीचा आपल्या डोक्यावरील हात तपासून पाहणे अत्यावश्यक असते. 
त्यांची सुरांची 'permutations आणि combinations' इतकी अनवट असतात की सूर-ताल-लयीची माहिती अपुरी असेल तर अंधाऱ्या गुहेत भरकटण्याची पाळी येऊ शकते. ही सुरांची जीवघेणी मिश्रणे थोडी बहुत गाता आली तरी त्यांच्या रचना अंशाने तरी गाऊ शकल्याचे समाधान मिळते.  
'सारेगमप' ह्या सांगीतिक स्पर्धात्मक कार्यक्रमात वयाने लहान असलेल्या ( पण सांगितिक वय मोठे असलेल्या) प्रथमेश लघाटेने  'काळ देहासी' हे गाणे उत्कृष्टरित्या सादर करून पं.हृदयनाथ मंगेशकरांना आश्चर्यमुग्ध केले होते. ह्या गाण्याचे मूळ गायक श्री.सुरेश वाडकर हे आहेत. सुरांचा अनुपमेय साठा त्यांच्या गळ्यात आहे. लय-तालावर मांड आहे. त्यामुळे या गाण्याला त्यांनी अतिशय योग्य असा न्याय दिला आहे याबद्दल कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. 
पण मला खरे कौतुक वाटते ते स्वप्नील बांदोडकर या गुणी गायकाचे! 'अंतर्नाद' या खळे यांच्या रचनांवरील कार्यक्रमात हे गाणे स्वप्नीलने ज्या पद्धतीने सादर केले त्याला तोड नाही. मूळ गाण्यात नसलेल्या सूक्ष्म जागा-हरकती त्याने ज्या खुबीने आणि ताकदीने गायल्या आहेत त्याबद्दल तो नि:संशय प्रशंसेस पात्र आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या तालमीत तयार झालेल्या त्याच्या गळ्यातून हे गाणे सालंकृत होऊन श्रोतृहृदयी उतरले आणि खळे काकांनीही त्याला प्रसन्नपणे दाद दिली. ज्या आनंदाने स्वप्नील लयीचा लुथ्फ घेत गात होता आणि पखवाजावर श्री निलेश परब यांनी त्याला जी तेवढीच उत्कृष्ट साथ केली त्याबद्दल त्या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.  
ज्याप्रमाणे गांडीव धनुष्य पेलण्यासाठी धनुर्धर अर्जुनासारखे समर्थ बाहू लागतात त्याचप्रमाणे खळे काकांची गाणी पेलण्यासाठी तितकाच समर्थ गळा लागतो. पश्चिमेकडे म्हणजेच मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमणा करणारे स्वप्नीलचे गाणे आहे. ही जन्मांतरीची ठेव त्याने जतन करावी, वाढवावी आणि अशीच गाणी गात श्रोत्यांची हृदये जिंकावीत. 
( 'अंतर्नाद' हा   जुना कार्यक्रम आहे. मी अनेकवेळा स्वप्नीलचे हे गाणे ऐकले. प्रत्येकवेळी याविषयी लिहीवेसे वाटत होते परंतु ते जमले नाही. म्हणून उशिराने का होईना मी याविषयी लिहायचे ठरवले. माझ्या १५० व्या ब्लॉगच्या निमित्ताने मी हा लेख लिहिते आहे.) 


Thursday, 18 October 2012

प्रणाम (कविता)



जगातील साऱ्या सुंदरतेला आणि साऱ्या गलिच्छतेला माझा प्रणाम 
जगातील साऱ्या सुबुद्धतेला आणि साऱ्या निर्बुद्धतेला माझा प्रणाम 
लताच्या अलौकिक स्वराला माझा प्रणाम 
लाचार जोडलेल्या करालाही माझा प्रणाम
रवीशंकरच्या सतारीवर लीलया फिरणाऱ्या बोटांना माझा प्रणाम
एका हातातून दुसऱ्या हातात लीलया सरकणाऱ्या नोटांनाही माझा प्रणाम 
नेपोलियनच्या शौर्याला माझा प्रणाम
हिटलरच्या क्रौर्यालाही माझा प्रणाम
तेंडुलकरच्या खेळाला माझा प्रणाम
राजकारण्यांच्या खेळालाही माझा प्रणाम
नाटकांवर पोट भरणाऱ्यांना प्रणाम
पोटासाठी नाटके करणाऱ्यांनाही प्रणाम
कर्णाच्या दातृत्वाला माझा प्रणाम
वांझोट्या मातृत्वालाही माझा प्रणाम
पुलंच्या विद्वत्तेला माझा प्रणाम
निर्बुद्धांहाती आलेल्या सत्तेलाही माझा प्रणाम
सागराच्या खळखळण्याला माझा प्रणाम
गांडूळाच्या वळवळण्यालाही माझा प्रणाम
निखालस सत्याला माझा प्रणाम
पोलिसी हप्त्यालाही माझा प्रणाम
सुबक दिमाखदार ऐश्वर्याला माझा प्रणाम
ओंगळ नागव्या दारिद्य्रालाही माझा प्रणाम
सुजाण सकस समंजसपणाला माझा प्रणाम
 निरस, निकस अनभिज्ञतेलाही माझा प्रणाम 
प्रणाम! प्रणाम! प्रणाम! त्रिवार प्रणाम!
माणसातला माणूस जिवंत ठेवणाऱ्या 
प्रत्येक भाबड्या आशावादाला माझा प्रणाम!

  

Wednesday, 17 October 2012

इंग्लिश विंग्लिश - एक नितांत सुंदर चित्रपट

अशक्यकोटीतील गोष्टी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, लाखो-करोडो रुपयांचा चुराडा करून चांगल्या वाहनांचे क्रियाकर्म करणारे, मनोरंजनाच्या गोंडस नावाखाली अत्यंत टुकार आणि खालच्या दर्जाचे विनोद दाखवणारे चित्रपट पुन्हा पुन्हा जन्माला येतच असतात परंतु अशा चित्रपटांतील कथानकात 'जीव' नावाची वस्तूच नसते. या अशा चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर नव्याने बॉक्स ऑफिसवर झळकलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट असे कोणतेही नेत्रदीपक खेळ न करताही प्रेक्षकांची मने काबीज करण्यात यशस्वी झाला आहे. 
हा स्त्री-प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मध्यमवयीन स्त्रीची आहे. ज्या स्त्रीचे संपूर्ण विश्व हे तिच्या पतीराजांभोवती आणि मुलांभोवती फिरत असते. स्त्रीला कमी समजणे हा भारतातील राष्ट्रीय छंद आहे असे मानण्यास हरकत नसावी. काही स्त्रियाही आपल्या अज्ञानपूर्ण वागणुकीने हा समज फोफावण्यासाठी हातभार लावीत असतात. तर अशा कुटुंबातील या गृहिणीचा एकमेव छंद असतो म्हणा किंवा तिला आवड असते म्हणा ती लाडू बनविण्याची! घराच्या घरी लाडूंचे उत्पादन करून ते घरोघरी विकणे हा तिचा गृहोद्योग असतो. या गृहिणीची कमतरता कोणती असेल तर ती म्हणजे सफाईदार इंग्लिश न बोलता येणे.या तिच्यातील उणीवेमुळे अनेकदा ती घरच्यांच्या विनोदाचा, चेष्टेचा विषय ठरते. तिच्या अडाणीपणाला, इंग्रजीच्या अज्ञानाला नवरा हसतो आणि मुलेही हसतात. तिच्या मुलीला आईला शाळेत नेण्याची लाज वाटते. अशा या गृहिणीला एकटीला कारणपरत्वे न्यूयॉर्कला जावे लागते आणि सुरवातीला तेथील वातावरणाला घाबरलेली, बुजलेली ती काही दिवसांनी मोकळी होते. काही कडवट अनुभव पचवत ती स्वत:ला सिद्ध करते आणि घरच्यांच्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय होते.  
विषय स्त्री-प्रधान, या चित्रपटाची दिग्दर्शिका सुद्धा एक स्त्रीच आहे. अतिशय संवेदनशील पद्धतीने या चित्रपटाची हाताळणी झालेली आहे. शशी गोडबोले नावाच्या एका मध्यमवर्गीय, अत्यंत साधे आयुष्य जगणाऱ्या या स्त्रीचा हा प्रवास अतिशय प्रशंसनीयरित्या गौरी शिंदे यांनी दाखविला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्रीदेवीनेही या भूमिकेला यथोचित न्याय दिला आहे. तिचा या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' मधील वावर आणि तिच्या साध्या पण सुंदर साड्या ही या चित्रपटाची सौदर्यस्थळे आहेत. चित्रपटातील सर्वांची कामे अत्यंत चोख आहेत. कोठेही 'लुपहोल्स' जाणवत नाहीत. आपल्या आईला इतर आयांसारखे इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तिला कमी लेखणे, तिचा राग करणे, तिचा आदर न करणे इ. गोष्टी हृदयाला भिडतात. नवीन नवीन इंग्लिश शब्द शिकताना, वाक्ये जुळवताना, ऐकताना हळूहळू शशीचा आत्मविश्वास दुणावू लागतो आणि तिच्या भाचीच्या लग्न-समारंभात एक छोटेखानी परंतु अतिशय हृद्य असे भाषण करते. पतीचे प्रेम मिळूनही ज्या आदराला ती आतापर्यंत मुकलेली असते तो आदर, ते कौतुक ती अखेर पतीच्या डोळ्यांत पाहते आणि इथे चित्रपट संपतो.  
अगदी छोट्या छोट्या 'फ्रेम्स' मधूनही मानवी स्वभाव वैशिष्ट्ये दाखवण्याचे गौरीचे कसब वाखाणण्यासारखे आहे. कोणतेही भव्य-दिव्य सेट्स न वापरता, अंगावर येणारे श्रीमंती थाट न दाखवता अगदी साधेपणाने या विषयाची मांडणी केली गेली आहे. अनेक वर्षांनी एक निखळ चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान माझ्या मनाला मिळाले. याबद्दल या चित्रपटाच्या अस्तित्वासाठी  कारण ठरलेल्या प्रत्येकाचेच मनापासून आभार!  प्रत्येकाने आवर्जून पाहावा आणि त्यापासून बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे यात शंका नाही.