Thursday, 4 April 2013

जेनी आणि आजोबा ......


ही कथा आहे जेनी आणि तिचे आजोबा रॉजर डेव्हीस यांची. त्यांच्यातील हळुवार नात्याची. एका अनोख्या मैत्रीची. दु:खातून सुखाप्रत नेणाऱ्या नातेसंबंधांची. 
जेनीला तिचे आई-वडील फारसे आठवतही नाहीत. ती अवघी तीन वर्षांची होती. नाताळचे दिवस होते. सगळ्या वातावरणात एक उत्साह भरलेला होता. जेनीच्या अंगावर नवे कपडे होते. खाण्यापिण्याची रेलचेल होती. सगळे घर सुशोभित केले होते. घराच्या एका कोपऱ्यात ख्रिसमस ट्री होते. घरातील मंडळी म्हणजेच तिचे आजी-आजोबा, आई-वडील खूप आनंदी होते. एका संध्याकाळी तिचे आई-वडील त्यांच्या मित्राकडे पार्टीला गेले. जेनीला त्यांनी त्यांच्याबरोबर नेले नव्हते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता येणार नाहीत शिवाय तिला जागरण होईल म्हणून तिला आजी-आजोबांकडेच राहू दिले. जेनी आजी-आजोबांबरोबर खूप खेळली आणि नंतर थकून झोपली. 
दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली तेव्हा घरात बरीचशी माणसे जमली होती. हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत होती. ती डोळे चोळत आजीपाशी आली तशी 'जेनी माय चाईल्ड ' असे म्हणून आजीने रडत रडत तिला कवटाळले. आजोबांनी तिला जवळ घेत हलक्या आवाजात तिला काहीसे सांगितले. पार्टीहून येताना तिच्या आई-वडिलांच्या गाडीला अपघात झाला आणि तिचे आई-वडील जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने तिच्या घराचे स्वरूप पालटले. आजी अबोल झाली. तिच्या काळजीने आजोबा अस्वस्थ राहू लागले. तिच्या आजीने खाणे-पिणे सोडून दिले. आजोबांनी तिच्या खूप विनवण्या केल्या, आपल्याला आता जेनीसाठी उभे राहायला हवे याची जाणीव करून दिली पण तिच्या आई -वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर आजी पुरती खचून गेली. तिने अंथरूण धरले. ती यातून कधीच सावरली नाही. वर्षभरात जेनी आजीलाही पोरकी झाली. 
त्यानंतरचे काही दिवस खूप वाईट गेले. पण मग एक दिवस तिचे आजोबा उठले. त्यांनी कंबर कसली. घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागले. सकाळी तिच्या आजोबांसमवेत ती बागेतल्या फुलझाडांशी गप्पा मारू लागली. आजोबांबरोबर थोडा थोडा व्यायाम करू लागली. तिच्यासाठी आजोबांनी खूप पुस्तके आणली. परीकथा, साहसकथा, वन्यकथांनी तिचा एकटेपणा दूर केला. पुस्तकांमधील रंगीत चित्रे तिचे मन वेधून घेऊ लागली. तिची शाळा, मित्र-मैत्रिणी यात ती रमून गेली. तिचा पाचवा वाढदिवस खूप थाटामाटात तिच्या आजोबांनी साजरा केला. घर सजवण्यापासून सगळी तयारी आजोबांनी स्वत: केली. पाहुण्यांची, तिच्या मित्र-मैत्रिणींची सरबराई त्यांनी उत्तम रीतीने केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजोबाही सुखावले.  
कालांतराने जेनी मोठी झाली. इतर आठवणी पुसट झाल्या. आजोबाही थोडे थकले होते. पण त्यांचा उत्साह जराही कमी नव्हता. जेनीला काय हवं काय नको ते जातीने बघण्यात त्यांना आनंद व्हायचा. आता वाढत्या वयाप्रमाणे वाचनाचे, बघण्याचे विषय बदलले. तिचे मित्र-मैत्रिणींचे क्षितिजही रुंदावले. आजोबांच्या हातचा pancake, सूप-ब्रेड, ख्रिसमस टर्की आणि काही खास पदार्थ खाण्यासाठी ती नेहमीच आसुसलेली असायची. बरेच वेळा तिच्या दोस्तांची फौज जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्या घरी धडकायची. आजोबा अमाप उत्साहाने निरनिराळे पदार्थ त्यांना मायेने खाऊ घालायचे. त्यांना माहित नसलेल्या गोष्टी सांगून हसवायचे. ते तीन-चार तास कसे जायचे कोणाला कळायचे नाही. मनात खूप आनंद साठवून तिचे दोस्त त्यांच्या घरी परतायचे.  
आज जेनी एका प्रायव्हेट फर्म मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करते. तिची स्वत:ची गाडी आहे, घर आहे आणि तिच्या सोबत तिचे ऐशी वर्षांचे आजोबाही आहेत. तिने अजूनतरी लग्न केलेले नाही. सकाळी आजोबांबरोबर बागेत फिरणे, फुलझाडांशी गप्पा मारणे, त्यांचे हाताचा एखादा स्वादिष्ट पदार्थ खाणे, कामावरून घरी आल्यानंतर दोघांनी मिळून एखादा चांगला सिनेमा बघणे, सुट्टीच्या दिवशी तिच्या गाडीतून हिंडणे, शॉपिंग करणे यात अजिबात खंड पडलेला नाही. 
एका रविवारी घरातील कप्पे लावत असता जेनीला तिने शाळेत असताना लिहिलेला एक निबंध सापडला. तिने आजोबांना हाक मारली. मग तिने आणि आजोबांनी मिळून निबंध वाचायला सुरवात केली. निबंधाचे शीर्षक होते- 'Grandfather-my friend'!  

Tuesday, 5 March 2013

महिला दिना निमित्त -मांडते मी कैफियत ...............

महिला दिना निमित्त 
झाकते स्वत:च्या आत 
देवापुढती मांडते 
स्त्रीमनाची कैफियत .........
बालपणा पासूनच 
स्त्री-देहाची परवड 
वासनेने ओथंबून 
विटंबिती आधारवड ........
गिधाडे वरी फिरती 
कुठे घरी, कुठे दारी 
कळ्या निष्पाप, नाजूक 
खुडती कसे अघोरी........
कसे संस्कार संस्कार 
तोंडाचीच वाफ होते 
शौर्य हेच पिसाटांचे 
भक्ष्य समोर आयते.........
शिक्षित वा अशिक्षित 
 देह नराचा मिळता 
सामर्थ्याचा आविष्कार 
जळी -स्थळी, येता-जाता .......... 
मुले-मुली भेदभाव 
सनातन परंपरा 
त्याने झेपावे आभाळी 
तिला सक्तीचा उंबरा.............
बाप तापट, हेकट 
भाऊ उद्धट, उर्मट 
मानायचा ईश्वर पतीला 
जरी वर्तन नतद्रष्ट.............  
तारुण्याची उर्मी स्त्रीची 
जरा खुलते, फुलते 
डोईपासून  पायाशी 
नजर तिला विटाळते...........

दिसामाशी अत्याचार 
होई मुश्किल जगणे 
लांडग्यांच्या या देशात 
स्वातंत्र्य ही लाजिरवाणे........
 भोवताली जनावरे 
माणूस कुठे दिसेना 
शोषितांच्या दु:खालाही 
पारावार हा राहिना.............
काय करावे देवा रे 
स्त्रीत्वाचे झाले ओझे 
जरी शिक्षित, स्वतंत्र 
शील कसे सांभाळावे?...............
काय म्हणावी ही भूक?
की भस्म्या बळावला?
वयाचा न मुलाहिजा 
घाला कुणीही घातला............ 
वस्त्रहरण हे स्त्रीत्वाचे 
थांबव हे जगन्नाथा 
दुष्टांचे हनन करण्या 
सुदर्शन सोड आता .............
 

Friday, 1 March 2013

प्रेम आणि भाषा .........



मुक्ताने जयेशशी लग्न केलं. ती मराठी, तो गुजराती. त्यांचा प्रेमविवाह होता. कॉलेजमधली चार वर्षांची मैत्री प्रेमात परिवर्तित झाली आणि घरच्यांच्या संमतीने त्याचं शुभमंगल झालं. लग्नानंतरचे नव- नवलाईचे एक वर्ष भुर्रकन उडून गेले. सणवार, शॉपिंग,हॉटेलिंग यात दिवसांचा हिशोब हरवला. सासर-माहेर या हिंदोळ्यावर मुक्ता नुसती झुलत होती. मित्र-मैत्रिणी, गप्पाटप्पा सगळ्याला दिवसरात्र उत येत होता. आपल्यासारखे सुखी आपणच, आपल्या सुखाचा सगळे हेवा करत असतील अशा काहीशा कल्पनेत मुक्ता रममाण झाली होती. जयेशही तिचे सारे लाडकोड पुरवत होता.   
यथावकाश मुक्ताला पोटातल्या बाळाची गोड चाहूल लागली आणि तिच्या सासरचे-माहेरचे नातलग नव्या आगमनाच्या प्रतीक्षेत सुखावून गेले. तिची ओटी, डोहाळजेवण यथासांग पार पडले आणि नववा महिना संपता संपता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला  हेतल, सेजल वगैरे गुजराथी नावांना तिने मोडता घातला आणि आकांक्षा असे मुलीचे नामकरण केले. नाही म्हटले तरी तिच्या सासरच्यांचा थोडाफार हिरमोड झालाच! तिचे मित्र-मैत्रिणी तिला ढोकळाखाऊ असे चिडवत ते आता तिला रुचेनासे झाले. मी सकाळी शिरा, उपमा, पोहे असे महाराष्ट्रीयन पदार्थ खाणेच प्रिफर करते असे ती इतरांना सांगू लागली. हळूहळू तिची आकांक्षा मोठी होत होती. नवे नवे शब्द उच्चारायला शिकत होती. तिच्या कानावर गुजराथी शब्द पडू नयेत याकरता मुक्ता भलतीच सावधानी बाळगत होती. पण एकत्र कुटुंबात ते सर्वस्वी अशक्य होते. 
जयेश तिच्याशी गुजराथीत बोलू लागला की ती तू तिच्याशी इंग्रजीत बोल असे त्याला सांगायची. तू तिच्याशी तुझ्या मातृभाषेत बोलतेस तेव्हा मी कुठे हरकत घेतो असे तो तिला विचारायचा आणि मग पुढचा तास सहज दोघांच्या वादावादीत खर्च व्हायचा. मग अबोला दोन एक दिवस. तिच्या सासरच्या नातेवाईकांनी 'केम छो?' असा प्रश्न तिला विचारला कि ती त्याचे उत्तर मराठीतून द्यायची.आता आकांक्षाचा गुजराथी नाश्ताही तिला पटेनासा झाला होता. गुजराथी घरात राहून ती तिच्या मुलीवर मराठी घरातील संस्कार करू पाहत होती. त्यासाठी स्वतच्या जीवाचे रान करत होती. वेळ मिळेल तेव्हा माहेरी पळत होती.तिच्या समोर मराठी पुस्तकांचा ढीग आणून टाकत होती. पण हा सगळा आटापिटा तिला मराठी विषयी खास प्रेम होते म्हणून नव्हता. एरवी कॉलेज मध्ये तिच्या मराठी मैत्रिणींशी तिने कधीही मराठीतून संवाद साधला नव्हता. ती महाराष्ट्रीयन पदार्थांना नाके मुरडायची. तिला इतर प्रांतातील पदार्थच अधिक प्रिय होते. जयेशशी तोडक्या-मोडक्या गुजराथीत बोलून ती त्याच्यावर इम्प्रेशन पाडायची. तिच्या हातात कधी कोणतेही मराठी पुस्तक ना तिच्या घरच्यांनी पहिले होते तर कधी तिच्या मैत्रिणींनी! 
मग एकाएकी हे मातृभाषा प्रेम कुठून आले? गुजराथी भाषा, पदार्थ, रितीरिवाज का बरे रुचेनासे झाले? सासरच्या घरातील माणसे शत्रुवत वाटू लागली. ती गुजराथीत संवाद साधून आपल्या मुलीला फितवत आहेत असे प्रकर्षाने तिला का बरे वाटू लागले? मराठीचा, मराठी सणांचा,संस्कारांचा,माणसांचा पुळका का बरे तिला येऊ लागला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुक्ता ही एक शिकली-सवरलेली, काहीशा आधुनिक विचारांची मुलगी. आपला प्रेमविवाह आहे तोही एका गुजराथी माणसाशी झाला आहे.याचे पुरेपूर भान तिला होते. आपल्या होणाऱ्या अपत्यावर दोन्ही कुळांचे संस्कार होणार हेही तिला माहित होते. दोन्ही घरांतील चालीरीतींचा प्रभाव आपल्या मुलीवर पडणार हे ती जाणून होती. मग मुलीला वाढवण्यात हे असे आढमुठे धोरण का बरे मुक्ताने स्वीकारावे? 
प्रत्येकालाच आपापल्या मातृभाषेचा अभिमान असतो तसा तो असायलाच हवा. लग्न हा दोन कुटुंबांचा घरोबा, वेगळ्या भाषांचा, विचारांचा घरोबा, रीतीभातींचा मेळ असतो. जर तुम्ही प्रेमविवाह केलात तर याही गोष्टी आनंदाने स्वीकारायलाच हव्यात. अन्यथा यातील एक कुटुंब निश्चितच दुखावले जाऊ शकते. मुक्ताने ही चूक केली. मुलीने फक्त मराठीच शिकावे, बोलावे, मराठी पदार्थच खावेत असा विचित्र हेका धरला आणि सासर-माहेर यांच्यात एक तिढा अकारण उत्पन्न केला. सासरची माणसे तिच्याशी बोलेनाशी झाली. जयेश आणि तिच्यातील वाद शिगेला पोहोचले आणि हे दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत आले. मधल्या मध्ये तिच्या मुलीची होरपळ झाली. आकांक्षाच्या आनंदाला खीळ बसली. पुढे त्यांनी मुलीच्या सुखाखातर समेट केला खरा पण घराच्या चार भिंतीमधले औदासिन्य किती कमी झाले हे सांगणे खूप कठीण आहे. 
असो. प्रेमविवाह करताना या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या प्रांतातील भाषेचा, खाण्याचा,रीतींचा यथोचित सन्मान करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. मग प्रेम करा वा करू नका!

Wednesday, 20 February 2013

स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली ज्ञानाची संकल्पना



स्वामीजींना अभिप्रेत असलेले ज्ञान हे पुस्तकाच्या मर्यादित पानांत बंदिस्त नसून माणसाच्या मनातील कोशात उपजत:च साठलेले आहे. त्यांच्या मते कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाचा उगम हा मनाच्या अंतर्गर्भात असतो किंबहुना ज्ञानाची उपलब्धी बाहेरून कधीच होत नाही. माणूस नवीन काही शिकतो म्हणजेच त्याच्या आत्म्यावरील अज्ञानाचे एक पटल तो दूर करतो. एक अमर्यादित स्वरूपाचा असा विश्वकोश माणसाच्या मनात सामावलेला असतो. माणूस ज्ञानापासून वंचित राहतो कारण स्वत:तील ज्ञानाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो. 
सर्व प्रकारच्या शक्ती आणि सर्व प्रकारचे ज्ञान मनुष्याच्या आत वसलेले असते. बाह्यसूचना आणि अंतर्गत ज्ञान यांचा मिलाप होतो आणि चिरंतन ज्ञानाचा आविष्कार होतो जो विश्वव्यापी असतो. बाह्य जगतातील गुरु अंतर्जगतातील गुरूला एक सूचना करतो आणि त्या सूचना आत जतन केलेले ज्ञानाचे समृद्ध भांडार जगापुढे रिते करतात. स्वामीजी उदाहरणादाखल म्हणतात, ज्याप्रमाणे एक आकाराने प्रचंड असलेले आणि अनेक एकर जमीन व्यापणारे वडाचे झाड एका छोट्या बी मध्ये लपलेले असते त्याप्रमाणे मानवी बुद्धीचा प्रचंड आवाका एका पेशीत साठलेला असतो. 
ज्ञानाची कुठलीही शाखा उपशाखा असो, कोणताही मार्ग असो अंतिमत: त्याचा उद्देश माणूस घडवण्याकडे असला पाहिजे. बाहेरून चकचकीत दिसणारी पण आतून काजळी धरलेली वस्तू काय कामाची? प्रत्येक शिक्षणाचा आद्य आणि अंतिम उद्देश हा माणसातील मानवता वर्धिष्णू होण्याकडे असला पाहिजे. मानवाची आत्मिक उन्नती त्यातून साध्य झाली पाहिजे. एक उत्तम व्यक्तित्व घडवण्यासाठी अणुरेणुंचे नेमके काय रसायन लागते ते भौतिकशास्त्राच्या वा रसायनशास्त्राच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकते काय? तत्ववेत्ते आणि संतपुरुष यांत हाच फरक आहे. तत्ववेत्ते त्यांच्या विद्वत्तापूर्ण बोलण्याने  मानवजातीवर प्रभाव टाकतात पण संत त्यांच्या ओजस्वी वाणीतून मानवातील संवेदना जागवण्याची किमया करतात.  
जे ज्ञान इतरांच्या पायाखालच्या वाटा प्रकाशमय करते त्या ज्ञानाचा मूलस्त्रोत हा माणसाच्या मनातच अव्यक्त स्वरुपात असतो. माणूस कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, त्याच्या व्यक्तिमत्वाला सशक्त, सक्षम करणारी असाधारण गोष्ट त्याच्यापाशीच असते. माणसातला माणूस जागवणारा धर्म आपल्याला हवा आहे, उत्तम मानवाला जन्म देणाऱ्या 'थिअरिज' आपल्याला हव्या आहेत, शिक्षणाने सर्वकष समृद्ध झालेला माणूस आपल्याला हवा आहे. पुस्तकी शिक्षणाने साक्षर होता येते, शैक्षणिक कक्षा रुंदावतात हे खरे पण आत्मोन्नती साधता येतेच असे नाही. स्वामीजी म्हणतात, अगदी मुंगीसारख्या  क्षुद्र कीटकापासून ते मानवापर्यंत आत्मा हा एकाच असतो फक्त त्याची आविष्कृती, अभिव्यक्ती निरनिराळी असते.  
प्रामाणिकपणे विश्वजागृती करण्यासाठी झटणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच असतात. वेद, उपनिषदे, गीता पठण करणारे अनेक असतात पण स्वत:च्या वर्तनात रुजवणारे अभावानेच आढळतात. स्वत:च्या देशाचा इतिहास सहजपणे विसरणारी माणसे कोणते गौरवास्पद कार्य करू शकणार बरे? माणूस पुस्तकी शिक्षण घेतो आणि श्रद्धा, उपासना, भक्ती या मानव वंशाच्या मुळाशी असलेल्या तत्वांना दाराच्या उंबरठ्यातच उभे करतो. अनेक युगांचा वारसा लाभलेल्या संस्कृतीवर शिक्षणाचा नांगर फिरवून स्वत:ची पाठ थोपटून घेतो. 
स्वामीजी म्हणतात, हे तरुणांनो जागे व्हा, आपल्या आत्मिक तेजोबलाने आपल्या अवतीभवतीचा परिसर तेजोमय, ज्ञानमय करा. आपल्या शारीरिक क्षमतांना बुद्धीनामक ज्योतीने प्रज्वलित करा. समस्त मानववंशाचा उद्धार करा. धर्माच्या,नीतीच्या, जातीपातीच्या, उच्च-निचतेच्या चुकीच्या कल्पनांचे अवडंबर माजवून मानवजातीच्या जन्माचे उद्दिष्ट असफल करू नका. अंतर्यामीच्या उज्ज्वल प्रेरणांनी आकाशाला गवसणी घाला. धीट व्हा, सावध व्हा, जागृत व्हा, कृती करा, आपल्या डोळ्यांवरील मायेचे पटल  दूर सारून अंतर्ब्रम्हाचे दर्शन घ्या. 

Tuesday, 19 February 2013

फेसबुकवरील काहीसे 'unlike' वाटणारे ................



सुरवातीला मी मोठ्या जोमाने फेसबुकवर माझा account ओपन केला खरा पण काही महिन्यांतच त्यावरील फोटोंच्या अवास्तव सरबत्तीला मी पुरेपूर कंटाळले. एखाद्या 'फेसबुक मित्र-मैत्रिणीचा' प्रामाणिक चेहरा, तिचे वा त्याचे विचार, त्याच्या अंतर्यामी वसलेली एखादी कला पाहण्याऐवजी  सतत त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पाहताना प्रचंड बोअर व्हायला होते. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी,  कोणाचे 'up-dates' घेण्यासाठी म्हणून फेसबुक उघडावे तर ह्या अशा असंख्य फोटोंनी नुसता उच्छाद मांडलेला असतो. 
मित्र-मैत्रिणी भेटले काढा फोटो, पायजमा पार्टी झाली काढा फोटो, हॉटेलात गेलात काढा फोटो, केस कापले काढा फोटो, नवीन कपडे घातलेत काढा फोटो, नऊवारी नेसली काढा फोटो, मुल रांगले काढा फोटो, सहलीला गेलात काढा फोटो. आपल्याकडे निमित्तेही खूप असतात. बारसे,वाढदिवस, मुंज, साखरपुडा, लग्न, पन्नाशी, साठी अव्याहतपणे चालूच असतात. मग ते हसणाऱ्या टोळ्यांचे फोटो डोळ्यांना फेस येईपर्यंत पाहत राहायचे. बरं यातील जेमतेम एक-चतुर्थांश माणसेच आपल्या ओळखीची असतात. त्यामुळे मग कंटाळलेल्या, वैतागलेल्या चेहऱ्याने बाकीचे अनोळखी चेहरे केवळ त्या आपल्या कुणी अबक 'फेसबुक फ्रेंड' खातर सहन करत राहायचे. एकसारखे दुसऱ्याचे 'फोटो सेशन' बघणे म्हणजे आपल्याच अमुल्य वेळेच निव्वळ ऱ्हास असतो. 
आपल्याकडे 'अतिपरिचयात अवज्ञा' अशी एक phrase आहे. हे असे सारखे तेच तेच फोटो बघून काही व्यक्ती उगाचच 'unlike' कराव्याशा वाटायला लागतात. अरे किती फोटो टाकाल ? त्याला काही सुमार? आणि मग त्याखाली पर्सनल कॉमेंट्स! 'What a lovely snap!', 'very very cute photo', 'magic-couple', 'ideal couple', 'रब ने बना दी जोडी ' इत्यादी इत्यादी. काही बायकांचे पौर्वात्य-पाश्चिमात्य वेशभूषेतील 'close-up smile' फोटो. कधी कधी हा अतिरेक पाहून वाटते की इतकी वर्षे ही माणसे नुसती फेसबुक सुरु व्हायची वाटच पाहत होती. फेसबुक आले आणि ह्या माणसांनी लगेचच त्यावर आपला फेसबुक कंडू असा शमवून घ्यायला सुरवात केली. ह्या व्यक्तींना बुद्धी-मन नावाची गोष्ट आहे की इतरांना दाखवण्यासाठी फक्त 'मेक-अप' केलेला स्वत:चा चेहराच आहे असे वाटावे इतपत ही माणसे फोटोंचे रतीब घालत असतात.  
अरे एवढे चांगले माध्यम आहे तर त्यावर काही चांगलेही अपलोड कराल की नाही? नाही म्हणायला काही माणसे  दुसऱ्याचे उसने घेतलेले का होईना पण चार चांगले विचार 'forward' करत असतात. काही अंतर्मुख करायला लावणाऱ्या 'स्टोरीज', व्हीडीओज' शेअर करत असतात. पण ह्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतात.  बाकी नुसते इतरांनी आपल्या दिसण्याची सतत स्तुती करावी यासाठी हपापलेले वाटण्याइतपत आपले फोटो टाकत असतात. त्यामुळेच नवीन फ्रेंड् request accept केली की ती व्यक्ती आणि तिच्या संबंधितांचे फोटो पाहण्याची सक्ती आपल्या डोळ्यांवर आपली इच्छा असो वा नसो होतेच! 
सध्या 'फेसबुक-संन्यास' घेण्याचे विचार माझ्या मनात अधिकाधिक प्रकर्षाने येत आहेत. [ अर्थात फेसबुक निर्माण करताना ज्याने संभाव्य धोक्यांचा विचार करून 'Hide story' चा option निर्माण केला त्या व्यक्तीचे मला या ठिकाणी मनोमन आभार मानावेसे वाटू लागले आहेत .]  

Friday, 1 February 2013

काही व्याख्या .................




शेतकरी : जो वर्षानुवषे लोकांची क्षुधा भागवून स्वत: अन्नान्नदशा भोगतो तो.

देऊळ: जे देवाला त्याचं बाजारीकरण याची देही याची डोळा बघायला लावतं ते.
टी.व्ही.मालिका: ज्या समतोल विचारांच्या स्त्रियांचं दर्शन तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना कधीही घडवून देत नाहीत आणि त्यांचा टी.आर.पी. बिघडवत नाहीत त्या. 
पुरुष: ज्याचं पौरुष स्त्रियांवर हात उगारण्यात आणि तिची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करण्यात खर्ची होतं तो.(याला अपवाद असू शकतात.)
स्त्री: जी अबला, असहाय,अडाणी असण्यात आणि स्वत:ला कमी लेखण्यात अग्रणी असते ती. (याला अपवाद असू शकतात.)
शिक्षण : जे घेतल्यानंतर फक्त साक्षर होता येतं पण सुसंस्कृत होता येत नाही, ज्याच्या जोरावर पैशांचे ढीग बँकेत रचता येतात पण माणुसकीचे खाते उघडता येत नाही ते.
स्पर्धा: ज्यात सहभागी झाल्यानंतर अहंगंड किंवा न्यूनगंड यावाचून अन्य काही पदरात पडत नाहीत त्या.
राजकारण: जे मानवी मूल्यांचा, नैतिकतेचा लगदा केल्याशिवाय खेळता येत नाही ते.
विश्वास: जो शब्दकोशापुरताच राहिला आहे तो. 
नोकरी: जी हवी तेव्हा लाथ मारून ठोकरता येत नाही ती.
रेल्वे: मासिक प्राप्ती करून घेण्यासाठी जिच्या आत आपल्या शरीराचे क्रियाकर्म दररोज करावे लागते ती. 
निसर्ग: ज्याची अवहेलना आपण येत-जाता, घरी-दारी त्याचे नियम मोडून करत असतो तो.
प्राणी: ज्याची संवेदना माणसापेक्षा जास्त जागृत आहे तो.
क्षितीज: जे माणसाने स्वत:साठी हेतू पुरस्सर आखलेले नाही ते.
लोकसंख्या: जी मानवाला दिसामाशी विनाशाच्या गर्तेत नेत चालली आहे ती.
आरोग्य: जे चायनीज गाड्यांवर दिवस-रात्र उपलब्ध असतं ते.
मॉल : माणसांच्या हातात आकर्षक आणि चतुर पद्धतीने पिशव्या कोंबणारी आधुनिक जत्रा.
संगणक: ज्याचा वापर माणसाला चांगल्या आणि वाईट प्रकारे सारखाच करता येतो तो.
घर: ज्यात राहणाऱ्या माणसांपेक्षा वस्तूंचेच मूल्यमापन अधिक होत असते ते. 
अभिनय: ताप आलेल्या मुलाला पाळणाघरात सोडून ऑफिसला जाताना स्त्रीला करावा लागतो तो. 
आयुष्य: जे मोहरलेल्या झाडाऐवजी जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखे वाटते ते.
मुले: ज्यांचे बाल्य , निरागसता अकालीच संपून जाताना दिसते ती.
शाळा: मुठभर यशस्वी विद्यार्थ्यांच्या आधारावर ज्या स्वत:चा ब्रान्ड निर्माण करण्यात गर्क आहेत त्या.
अभिलाषा: जी मरेपर्यंत संपत नाही ती.
चारित्र्य : जे धुळीला मिळाल्यानंतर आपण काय गमावले याचे आकलन होते ते.
पुतळे: ज्यांचे भांडवल करून व त्यावरून वाद उकरून  सत्तेवरची आपली मांड पक्की करता येते ते.
श्रद्धांजली: केवळ दोन मिनिटे शांतता पाळून आणि लगेचच घाईघाईने खाली बसून उपचारार्थ दिली जाते ती.  








Thursday, 17 January 2013

प्रवास आणि प्रवृत्ती............


या अवाढव्य जगात अनेक जण प्रवास करत असतात. कुणी व्यवसायानिमित्ताने तर कुणी केवळ भ्रमंती म्हणून! काहीजण सहप्रवासी म्हणून चांगले तर काही अजिबात चांगले नसतात. किंबहुना अशांच्या आपल्याबरोबर असण्याने आपल्या चांगल्या आणि आनंदी मूडचे खोबरे व्हायला जराही वेळ लागत नाही. त्यामुळे कुणाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्याबरोबर एकदा तरी लहान-मोठा प्रवास जरूर करावा. 
आम्ही कोकणातून परत येत होतो. एका प्रायव्हेट कारमधून. आमच्या बरोबर नात्यातील काहीजण होते. ड्रायव्हर जवळील सीटवर माझी मोठी मुलगी बसल्या कारणाने नातलगांमधील एक मध्यमवयीन गृहस्थ फारच रुष्ट झाले. ते नुकतेच ड्रायव्हिंग शिकले होते म्हणून मग ड्रायव्हर जवळ बसून त्याला सारख्या सूचना करणे हा त्यांचा फावल्या वेळातील छंद होता. शिवाय फ्रंट सीटवर एक मुलगी बसल्या कारणाने त्यांचा पुरुषी अहं सुद्धा नाही म्हटलं तरी दुखावला गेला होता. या गोष्टीचा राग ते येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर काढत होते. कोणी गाडीला ओव्हरटेक केले किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांची गाडी पुढे हाकली की त्यांची जीभ नको तेवढी सैल होत होती. आपल्या गाडीत जवळ जवळ सगळ्या महिलाच आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला होता अथवा त्यांना त्याची क्षिती नव्हती. त्यामुळे त्यांनी उच्चारलेल्या अपशब्दांमुळे आम्ही सारे अवाक झालो. 
पुढे कोल्हापूर आले. एका हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण जेवणासाठी उतरलो. उपाहारगृह अद्याप बंदच होते. झाले. त्यांचा संताप शिगेला पोहोचला. मुंबईतील हॉटेल्स कशी लवकर उघडतात आणि येथील कशी नाहीत यावर एकांगी चर्चा सुरु झाली. मुळातच प्रवास करताना किमान सहनशीलता अंगी बाळगावी लागते हे सुद्धा त्यांना ठाऊक नसावे याचे मला मनोमन आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने त्या गजाननाच्या कृपेने हॉटेल उघडले आणि जेवण पोटात गेल्यावर त्यांचा पारा आणखीनच वर चढला. मग बेचव जेवणावर निरुपण झाले. आम्ही सगळेजण गाडीत बसलो.
मुंबई पर्यंतचा जवळ जवळ दहा-बारा तासांचा प्रवास होता. त्यामुळे टप्प्या टप्प्याने थांबून, ड्रायव्हरला मध्येच थोडी विश्रांती देणे गरजेचे होते. त्यामुळे आमचा प्रवास सुरक्षित होणार होता. पण दुसऱ्या दिवशीच्या ऑफिसचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसल्या कारणाने त्यांनी ड्रायव्हरला ताकीद दिली की आता कुठे थांबशील तर बघ. त्यावर त्यांच्याच समोर माझ्या धाकट्या लेकीने ड्रायव्हरला सांगितले की आम्हाला अजिबात घाई नाही. तेव्हा तुला जिथे कुठे थांबावेसे वाटेल तिथे तू बिनदिक्कत थांब.आमची परवानगी घ्यायची गरज नाही. झाले. साहेब आणखी चिडले, धुसफुसत राहिले. एव्हाना आमच्याही चांगल्या मूडचे पुरते खोबरे झाले होते. कोणीच कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हते. 
अखेर मजल दरमजल करित वाशीच्या हद्दीत गाडी शिरली. सगळ्यात आधी ठाणे येणार होते म्हणून आम्ही सज्ज झालो. तर कुत्सितपणे हे गृहस्थ म्हणतात कसे, तिसऱ्या मजल्यापर्यंत गाडी न्यायची का? हा प्रश्न ऐकल्यावर माझे तोंड फारच कडू झाले. स्त्री दाक्षिण्य लांबच राहिले. आमचे घर अगोदर येणार म्हणून हा राग होता. 
इतक्या सगळ्या प्रवासात त्या गृहस्थांनी फक्त आपली सोय पहिली होती. अगदी त्या दिवशी सक्काळी लवकर उठण्याचा तगादाही त्यांनी लावला होता. दुसऱ्या दिवशीचे ऑफिस गाठण्यासाठी विचित्रपणे वागून ड्रायव्हरचा आणि आमचा रोष त्यांनी अकारण ओढवून घेतला होता. अर्थात त्याची त्यांना बिलकुल पर्वा नव्हती. यापुढील प्रवासात असला सहप्रवासी अजिबात नको असे तिथल्या तिथेच मी मनात पक्के ठरवून टाकले.