Monday, 20 February 2017

निवडणुका आणि आम्ही .......


हल्ली वर्तमानपत्र घरी आलं की मी एकदम शब्दकोडे सोडवायला घेते . सुरवातीची पाने skip करावीशी वाटतात. नवीन काय असतं त्यात? एकमेकांवर शाब्दिक लत्ताप्रहार, उपहासाच्या कोपरखळ्या , टोमण्यांचे गुद्दे, वैचारिक आणि नैतिक घसरगुंड्या! यात मतदारांसाठी आश्चर्य करावे असे काहीच नसते. मनपाच्या सत्तेवर असलेला पक्ष आपण गेल्या पाच वर्षात जी काही कामे केली (त्यांच्या लेखी ) त्याची उजळणी पुन्हा पुन्हा मतदारांसमोर करतो आणि विरोधी पक्ष सत्तेवर बसलेल्या पक्षाने कसे काहीच काम केले नाही याचे पाढे वाचतो. यावेळेस आम्हाला निवडून दिलेत तर पुढील पाच वर्षात या शहराचा संपूर्ण कायापालट करू असे आश्वासन सर्व  विरोधी पक्ष अजीजीने देत असतात .
मतदाराला या सर्व राजकीय धुमश्चक्रीतून काय मिळते? काहीही नाही. रस्त्यावरचे खड्डे त्याच्या राशीला जे अहोरात्र होते ते निवडणूक झाल्यावरही तसेच राहणार असतात. खरं सांगू का या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणाऱ्या गोष्टींचा मग आपल्याला लळाच लागतो. खड्डेविरहित असा रस्ता हा रस्ता तरी कसा म्हणायचा? आपण पायी अथवा वाहनातून जात असताना दुतर्फा खोदकाम चालू नसेल, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबा होत नसेल, वाहनचालकांचा एकमेकांशी मायबापांचा उद्धार करणारा अतिपरिचित संवाद होत नसेल तर विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं. हे शहर आपलंच आहे का याची शंका मनोमन येते. शिवाय खड्ड्यात उलटलेली वाहने आणि त्याभोवती घोंघावणारी गर्दी हेही एक ओळखीचे लक्षण असते. आता सांगा या रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवले गेले आणि ते परत कधीही कोणत्याही कामासाठी वेळी-अवेळी उकरले गेले नाहीत व त्यामुळे पुढचे प्रसंग आपसूकच टळले गेले तर आपल्याला आपल्या लाडक्या शहराची खूण कशी पटणार? पावसाळ्यात या अशा सार्वत्रिक असलेल्या खड्ड्यात आणि उघड्या गटारात पाणी साचून साचून त्यात मुले-माणसे आणि वाहने आडवी झाली नाहीत तर हे शहर आपल्याला परकं नाही का  वाटणार? अगोदरच अतिशय अरुंद असलेल्या रस्त्यांवर फ्लायओव्हर बांधण्याचे कंत्राट घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची जबरदस्त कोंडी करणे आणि पादचाऱ्यांच्या सहनशीलतेला आव्हान देणे हा ही नित्याचाच भाग आहे ना? वाहनांच्या भोंग्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि धुरामुळे श्वसनाला होणारी हानी या काय टाळता येण्याजोग्या गोष्टी आहेत का? रस्त्याच्या नाक्यावर टेहळणी करणारे रोडरोमिओ ही काय समाजसुधारणा झाल्याची पावती आहे का? सार्वजनिक वाहनांत बसल्यानंतर मुली आणि बायकांचा धक्के मारून विनयभंग करणारे , अडीनडीला मुजोरपणे वागून नागरिकांचे जिणे कठीण करणारे वाहनचालक ही काय गौरवास्पद गोष्ट आहे का?
रस्त्यावर पान खाऊन आणि न खाता पचापच थुंकणारे, प्लॅस्टिक च्या पिशव्या, बाटल्या, कागद अशा अनेक वस्तू इतस्ततः: फेकणारे, रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यात बिनदिक्कत शौचविधी करणारे, उद्यानात, बाकांवर, फुटपाथवर कोणतीही भीडभाड न बाळगता प्रणयाराधन करणारे, भकाभक सिगारेट ओढणारे, दारू पिऊन कोठेही आडवे झालेले, विमानाच्या वेगात बाईक पळवणारे, ट्रॅफिक चे नियम धाब्यावर बसवणारे, मोबाईल वर संभाषण करता करताच गाड्या हाकणारे असे सर्व जिथे सुखनैव नांदतात त्याच शहरात आपणही अनेक वर्षे वास्तव्याला आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे की खेदजनक बाब आहे हे माझ्या बालमनाला पडलेले एक कोडे आहे.याला आळा घालण्याची जबाबदारी कोणाची हे कोणीच सांगत नाही. वरील कृत्यांचे समूळ उच्चाटन करणे हे मनपाच्या अखत्यारीत येते की नाही? वर उल्लेखिलेल्या गोष्टी शिक्षेस पात्र आहेत की नाही आणि असल्या तर अशा सर्व कृत्यांचे जनक असलेल्या महाभागांना शिक्षा केली जाते की नाही? की नुसत्याच मुठी गरम करून यांची शिक्षा माफ केली जाते का?      
रस्त्यावर पडलेला कचरा हे डोळ्यांसाठी एक सर्वपरिचित असे लक्षण आहे. घंटागाड्या येतात, तेवढ्यापुरते कचऱ्याचे ढीग उचलले जातात पण पुनश्च तेवढाच  कचरा रस्त्यावर ठिकठिकाणी साचतो, त्या उकिरड्यावर उंदीर, कुत्रे, गुरे मोकाट वावरतात. सॅनिटरी टॉवेल्स, फुकट गेलेले अन्न, भाजी-फळांच्या साली, मासळीचे अवशेषअशा असंख्य गोष्टी रोगराईला आव्हान देत रोज रस्त्यावर पडून असतात. येणारेजाणारे नाक मुठीत धरून, कासावीस होऊन तिथून रोजची येजा करतच असतात. अनारोग्याला आमंत्रण देणाऱ्या या घाणीकडे मनपा किती गांभीर्याने बघते?   
हाऊसिंग योजना, करसवलती, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक, कचरा, सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा, क्रीडा,पर्यावरण रस्ते, आपत्कालीन व्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर आज सांगोपांग चर्चा होणे आणि त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होणे हेच जनतेला अभिप्रेत आहे. नुसते बाह्यरूपाने शहर सुंदर करून आतली कुरूपता तशीच झाकून ठेवणे याला विकास म्हणायचा का? म्हणजे देहावर सुंदर कपडे आणि आत अनेक रोगांनी पोखरलेलं शरीर याला सुदृढता म्हटल्यासारखेच आहे. 
दुसऱ्याला म्हणजेच दुसऱ्या पक्षाला हीन लेखून आपल्या पक्षाचा मोठेपणा येनकेनप्रकारे सिद्ध करणे हा बहुतांश सगळ्या पक्षांचा कार्यक्रम आहे. दुसरी रेघ छोटी करून आपली रेघ मोठी आहे हे भासवण्याचाच हा प्रकार आहे. पण यासाठी आपली रेघ प्रयत्नपूर्वक, कसोशीने आणि सातत्याने, सन्मार्गाने कशी मोठी होईल यासाठी कटिबद्ध राहण्याची कोणाचीच तयारी नाही. निवडणूक होईतोवरच मतदार हा 'राजा' आहे नंतर मात्र त्याच्यासाठी दैनंदिन जीवन ही एक सजा आहे.