लग्न झालेलं एक जोडपं. उच्चशिक्षित. पदरी एक मूल. तो finance हेड तर ती marketing हेड. उच्चभ्रू वस्तीत त्यांचा स्वत:चा फ्लॅट. यायला जायला स्वत:ची गाडी. घरात सर्व सुखसोयी. त्या दोघांचेही आई-वडील त्यांच्या घराच्या जवळपासच. ऑफिसमधून परत घरी येताना मुलाला तिच्या आईच्या घरून pick up करणे हा तिचा नित्यक्रम!
लौकिकार्थाने सर्व दिसायला छानच. सुखी परिवार वगैरे. पण त्याच्या आत खोलवर कुठेतरी एक ठणकणारी जखम. तिच्या आणि त्याच्या पगाराच्या तफावतीची. आपल्यापेक्षा तिचा पगार जास्त ही वेदना त्याला क्षणोक्षणी विच्छिन्न करणारी. ही भळभळणारी जखम उराशी घेऊन वावरणारा हा आधुनिक अश्वत्थामा! दिसामाशी जास्तच उद्विग्न आणि उध्वस्त होत चाललेला. तिच्या प्रत्येक बोलण्याचा विपर्यास करणारा. मूल ही फक्त तिची जबाबदारी आहे असे मानणारा.
मुलाला शाळेत drop करण्याबाबत आणि नंतर pick करण्याबाबत त्या दोघांत झालेला एक समझोता . एक महिना ही जबाबदारी त्याने घ्यायची तर एक महिना तिने. असे ठरलेले असतानाही एके दिवशी ही जबाबदारी घ्यायला त्याचा नकार. कारण ऑफिसमधील एक्सट्रा workload चे. दिवसरात्र ऑफिसमध्ये खपूनही salary वाढत नाही त्यामुळे तो मनोमन खचलेला, घुसमटलेला. तिच्यापेक्षा माझा पगार ४०००० ने कमी ही त्याची खरी खंत जी तो मित्रापुढे उघड करतो. तिच्याबद्दलचा त्याचा आकस भलताच वाढलेला. आपल्याला मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यावरूनच तिने आपले नामकरण केले आहे असे त्याला पदोपदी वाटत राहते. 'ओ मिस्टर एक लाख दहा हजार' असे ती आपल्याला कुत्सितपणे म्हणत हिणवते आहे असे भास त्याला होतात. मित्राच्या समजावण्याचा त्याच्यावर परिणाम शून्य.
तुझा जॉब माझ्यापेक्षा कसा कमी जोखमीचा, कमी जबाबदारीचा अशी तिला सतत त्याची मुक्ताफळे. एक दोनदा तर तो तिला नोकरी सोडण्याचा आग्रह ही करतो. घराकडे आणि मुलाकडे तुझं सर्वस्वी दुर्लक्ष होतंय असे कारण तो पुढे करतो. तिला मात्र हे विस्कटत चाललेलं घर सावरायचं असतं. तिच्या कोणत्याही बोलण्याचा तो चुकीचा अर्थ काढतोय ते तिला माहित असतं आणि त्यामागचं कारणही तिला ठाऊक असतं. त्याने आपल्यापेक्षा जास्त पगार कमवावा, दुसरी एखादी जास्त पगाराची नोकरी accept करावी असंच तिला वाटत असतं. तो अकारणच inferiority complex ने पछाडला गेलाय हे तिला समजत असतं. ती तिच्या मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं करते. त्याने एक पाऊल पुढे टाकावं मी चार पावले माझ्याबाजूने पुढे टाकीन हे ती तिच्या आईलाही बोलून दाखवते.
या त्यांच्या अहंकाराच्या आपापसातील लढाईत त्यांचं निरागस मूल मात्र कोमेजून जात असतं. त्याच्या मनावर परिणाम व्हायला लागलेला असतो. वेळीच या भांडणांना आवर घातला नाही तर मुलावर विपरीत परिणाम होईल या भीतीने ती व्याकुळ होते. एक दिवस ती ठरवते की बस्स खूप झालं. हा संसार पुरता मोडायच्या आधीच सावरला पाहिजे. ती ठरवते की आज संध्याकाळी त्याच्याशी या विषयावर बोलायचं आणि या सततच्या वादांना कायमचा पूर्णविराम द्यायचा. ती आईला सांगते की आज मी सोनूला घरी आणणार नाही कारण मला ऑफिस मध्ये बरंच काम आहे. तो आज तुझ्याकडेच राहील. आपण आपल्या नवऱ्याशी कधी एकदा बोलतोय आणि परत एकदा आपल्या संसाराची घडी ठाकठीक करतोय असं तिला होतं.
गाडीतून घरी येताना मुलाविषयी आणि एकंदरीतच त्यांची जुजबी चर्चा होते. परंतु सूर मात्र विसंवादाकडेच झुकलेले असतात. हे दोघे घरी येतात. ती समन्वयासाठी पुढे सरसावते. त्याला दोन धीराचे शब्द सांगू लागते. आपल्या वागण्याचा मुलावर होणार परिणाम त्याला पटवून देऊ पहाते. पण तो मात्र वर्षानुवर्षांचा राग मनात ठेऊन असतो. तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त म्हणूनच तू आज वर तोंड करून माझ्याशी बोलते आहेस, मला कमी दर्जाचा दाखवण्यात तुला कसा आसुरी आनंद होतो आहे वगैरे बोलून तिचा उरलासुरला संयम कसा संपेल यासाठी प्रयत्नशील राहतो. सामंजस्याचे वागणे तर सोडाच पण या चर्चेतून काहीच निष्पन्न होऊ शकणार नाही हे तिच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिचाही तोल जातो आणि तीही चार खडे बोल त्याला सुनावण्यासाठी कंबर कसते. दोघांचेही राग शिगेला पोहोचतात. तो पुढचामागचा कसलाही विचार न करता डायनिंग टेबलावर पडलेली सूरी उचलतो आणि क्रोधाच्या परमोच्च अवस्थेत तिच्यावर तिच्यावर सपासप वार करतो. ती जमिनीवर अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते गतप्राण होऊन. यानंतर तो स्वत:ला गॅलरी मधून खाली झोकून देतो. तोही on the spot मरण पावतो.
ही कपोल कल्पित कहाणी नव्हे तर नुकतीच मुंबई सारख्या शहरात घडलेली घटना आहे. ही घटना नुसती हादरवणारी नाही तर तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. अहंकाराचा नाश अपेक्षित असताना स्वत:चाच नाश ओढवून घेणाऱ्या तरुण जोडप्याची आणि त्यांच्या अचानक, एकाएकी निराधार, पोरक्या झालेल्या निष्पाप मुलाची ही गोष्ट आहे.
मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यांतील तफावतीमुळे दोन कधीकाळी एकत्र आलेली मने इतकी दुभंगू कशी शकतात? दुसऱ्याचा जीव घेण्याइतपत त्यांच्यातील एकाची मजल कशी जाऊ शकते? त्यांच्या मुलाचा विचारही त्यांच्यातील नात्याला एकत्र बांधून ठेऊ शकत नाही? आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा वापर अशा पद्धतीने एखादा माणूस कसा काय करू शकतो? आयुष्यात इतकं शिकून, ऐश्वर्य मिळवूनही ही अशांती, अतृप्ती मनात वास्तव्य कसं करू शकते? या आणि अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारी ही घटना आहे.
नवराबायकोमधील ही अशी आर्थिक तुलना संसाराला कशी घातक ठरू शकते . मद्यप्राशन न करताही चढलेली ही एकमेकांतील स्पर्धेची नशा नात्याला असे भीषण वळण देऊ शकते याचे हे ठळक उदाहरण. तुलना आणि स्पर्धा ही हत्यारे माणसाचे या पृथ्वीतलावरील अस्तित्व पुसून टाकण्यास किती सक्षम आहेत याचा हा सबळ पुरावा. या घटनेतून योग्य तो बोध घेता आला तर निदान भविष्यात नेस्तनाबूत होणारे काही संसार तरी वाचू शकतील म्हणून हा लेखन प्रपंच.