तिच्या वीर मृत्यू नंतर जवळजवळ तीस वर्षांनी तिच्यावर कुणाला तरी चित्रपट काढावासा वाटला. अर्थात हेही नसे थोडके! याबद्दल राम माधवानी यांचे खास आभार. 'मेकिंग ऑफ नीरजा' मध्ये तिच्या आईलाही बघण्याचा योग आला. हा चित्रपट रिलीज झाला पण दुर्दैवाने त्या आज तो बघायला हयात नाहीत. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने हा चित्रपट निश्चितच परिणामकारक केला आहे.
पण अभिनयापेक्षाही इतिहास महत्वाचा आहे. तिची गोष्ट प्रेरणादायी आहे. मॉडेलिंग आणि हवाई सुंदरी या दोन्ही व्यवसायात स्थिरावू पाहणाऱ्या एका साध्या मुलीची ही गोष्ट आहे. नुकतेच पंख फुटलेले फुलपाखरू ज्या उत्सुकतेने भिरभिरत असते त्याच वयाची ही अल्लड नीरजा. तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर मात करून पुढील प्रवासाला आनंदाने आणि उत्कंठेने सज्ज झालेली! तिच्या बोलक्या, पाणीदार डोळ्यांत लुकलुकणारे स्वप्नांचे सोनेरी काजवे. एका नव्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्या उमेदीनिशी कवेत घ्यायला निघालेली नीरजा. आई, बाबा आणि भावांचे उत्कट प्रेम लाभलेली नीरजा.
'Pan Am 73' वर फ्लाईट पर्सर म्हणून नियुक्त होण्याची तिची पहिलीच वेळ. त्यामुळे चेहरा आनंदाने ओतप्रोत भरलेला. तिची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. तिच्याबरोबर तिची सारी स्वप्नेही हवेत उंच विहरत होती. कराची येथे विमान land झाले आणि नाट्यमय, जीवघेण्या प्रसंगांची मालिकाच सुरु झाली. आपले मनसुबे तडीस नेण्यासाठी या विमानातील प्रवाशांना आतंकवाद्यांनी वेठीस धरले. विमान hijack झाले. नीरजला याची कुणकुण लागताच तिने प्रथम विमानचालकांना हा धोक्याचा इशारा दिला. त्यांनी विमानाचा ताबा सोडला आणि विमान हवेत उडाल्यानंतर होऊ शकणारी मोठी दुर्घटना टळली. पण विमानात मात्र दहशतीचे थैमान सुरु झाले. आता हे विमान वैमानिक विरहित झाले होते. बाहेरून लष्कराची कुमक येउन विमानातील प्रवाशांची सुखरूप सुटका होण्याआधीच या अतिरेक्यांना त्यांचा कार्यभाग साधायचा होता. त्यांना अमेरिकनांचे पासपोर्ट हवे होते त्यामुळे या एअर हॉस्टेस करवी सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करायला त्यांनी सुरवात केली. पुढील संकटाची चाहूल निरजाला लागली आणि तिने हेतुपुरस्सर अमेरिकनांचे पासपोर्ट अतिरेक्यांची नजर चुकवून सीटखाली टाकायला सुरवात केली. तिचा उद्देश लक्षात आल्यानंतर इतर एअर हॉस्टेसनी सुद्धा हाच पवित्रा घेतला. वैमानिक नसल्याने नियंत्रण कक्षाशी अतिरेक्यांचा संपर्क होत नव्हता. त्यासाठी त्यांना एका radio engineer ची आवश्यकता होती. पण नीरजाने त्या व्यक्तीस नजरेनेच आपली identity disclose करू नये असे सांगितले. नंतर एका मोक्याच्या क्षणी या engineer ला आपली identity उघड करावी लागली. त्याचा थोडाफार वापर करून घेऊन नंतर त्याचीही हत्या करण्यात आली. तीन लहान मुले या विमानातून प्रवास करत होती. नीरजा जणू या मुलांची पालक बनली. त्यांना प्रेमाने जवळ घेऊन तिने वेळोवेळी धीर दिला. सुटकेची आशा दाखवली. हे भीषण थरारनाट्य सतरा तास चाललं. एकूण ३७९ प्रवाशांपैकी ३५९ प्रवासी सुखरूप बाहेर निघू शकले तेही केवळ नीरजाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच! तिने emergency डोअर open केलं आणि आत चाललेल्या मृत्युच्या तांडवाला प्रवाशांच्या सुटकेने प्रत्युत्तर दिलं. त्या तीन मुलांचा जीव वाचवताना तिला स्वत:चा जीव मात्र वाचवता आला नाही पण अनेकांना तिने पुनर्जन्म दिला. ज्या वीस एक जणांना आपला प्राण गमवावा लागला त्यांतील एक नीरजा होती पण त्या सर्वांपेक्षा ती सर्वस्वी वेगळी होती.
तिच्या मृत्युनंतर एका भाषणात तिची आई म्हणाली, मी एक सर्वसामान्य आई आहे. इतर आयांसारखीच! कुठल्याही संकटाच्या क्षणी फक्त स्वत:चाच विचार कर म्हणून तिला सांगणारी. पण नीरजा मात्र वेगळीच निघाली. तिने इतरांचा विचार आधी केला. तिच्यापुढे भरपूर आयुष्य दोन हात पसरून उभं होतं पण अर्थहिन मोठं आयुष्य जगण्यापेक्षा तिने अर्थपूर्ण छोटं आयुष्य निवडलं. तिच्याबरोबर इतर एअर होस्टेस सुद्धा होत्याच की. पण 'जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए' या सुपरस्टार काका म्हणजेच राजेश खन्नाचा डायलॉग ती खऱ्या अर्थाने जगली. ही उर्मी तिला तिच्यात स्त्रवत असलेल्या मानवतेने, संवेदनशीलतेने दिली. पडद्यावरील हिरोइन सोनम कपूर असली तरी अस्सल हिरोइन नीरजा आहे. तिने एवढ्या छोट्या वयात दाखवलेलं अतुलनीय धैर्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिची शौर्यगाथा आजच्या प्रत्येक तरुण-तरुणीला एक नवा संदेश देत राहील यात शंका नाही.
माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी एक इंजिनियरिंगचा अभ्यास करत असलेला विद्यार्थी येतो. हा चित्रपट बघताना तो खूप रडला. inspire झाला. ही हिरकणी इतकी वर्षे जनसामान्यांच्या नजरेला कशी पडली नाही याचे माझ्या इतकेच त्यालाही आश्चर्य वाटले. तो गमतीने मला म्हणाला, टीचर बॉलीवूड में कोई छिकता है तो news बन जाती है. खोट्या, बनावट हाणामाऱ्या करून, देशप्रेमाचा आव आणून केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्यापलीकडे ज्यांचं इतर काहीही कर्तृत्व नाही अशा अभिनेत्यांना आम्ही वर्षानुवर्षे नुसते डोक्यावर बसवून ठेवतो. त्यांची देवळे काय बांधतो, त्यांच्या पूजा काय करतो. पण अशी लाखातून एखादीच नीरजा येते आणि देव म्हणजे काय याची समक्ष प्रचीती देऊन जाते. नीरजा खऱ्या अर्थाने पूजनीय आहे.
तिच्या या 'आय हेट टियर्स' वाल्या attitude ला माझा सलाम!