Monday, 11 January 2016

'सेल्फी'झम…….

कसलाही सारासार विचार न करता 'सेल्फी' काढण्याच्या नादात जे तरुण-तरुणी जिवावरचा धोका पत्करतात आणि इतरांचा जीव टांगणीला लावतात
त्या सर्व तरुण-तरुणींना उद्देशून    

नव्या युगाचे नवीन चाळे
फोटोसाठी झालेत खुळे
मृत्यू जिथे आवळतो फास
तिथे सुद्धा फोटोचा ध्यास
आत्ममग्नता की कमतरता
सुबत्तेतूनी येत भग्नता ?
छाताडावर ऐहिकतेच्या
चरचरते का कुठे न्यूनता?
सुंदर कपडे, सुंदर केस
लाटांवरती उठतो फेस
मित्रमैत्रिणींच्या रंगांनी
रंगून जातो अवघा देश
नवीन व्याख्या स्वातंत्र्याची
नवीन संथा तरुणाईची
असण्यापेक्षा दिसणे सुंदर
हीच पताका नवविजयाची   
'comment' आणि 'likes' वरती
अवलंबून माझी योग्यता
मीच फसविते मला पदोपदी
धरून आरसा भलतासलता
मोजमाप हे सौंदर्याचे?
का अघोरी आकांक्षांचे?
प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर
हेच ब्रीद आता तरुणांचे
कधी सेल्फीने शोकप्रदर्शन  
कधी दिसे उत्तान आचरण
काय म्हणावे या वेडाला
 वर्खाचे सार्वत्रिक पूजन
जाणीव कोठे? कोठे गाभा?
देखाव्याची नुसती आभा
विचार होई विकार जेव्हा
क्षणात होते मलिन शोभा  
रिती शिदोरी संस्कारांची
भरली झोळी नवमूल्यांची
पायाखाली वाट आखतो
आम्ही विद्रूप सौंदर्याची

Sunday, 10 January 2016

रागाचे कलेवर……….

"राग शिकवता की रागाची प्रेते शिकवता? ज्या रागांची नावे घेण्याचे आजही धाडस होत नाही, असे राग वर्षभरात कसे शिकवून होतात?" हे उद्विग्न पश्न विचारले आहेत गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी. एम ए, एम फिल झालेले विद्यार्थीही शास्त्रीय संगीताचा रियाज कसा करायचा हे प्रश्न विचारतात ही लज्जास्पद गोष्ट आहे. मुळात शाळा, कॉलेज, महाविद्यालये या सर्वच ठिकाणी काय प्रकारचे, काय दर्जाचे शास्त्रीय संगीत  शिकवले जाते यावर या निमित्ताने  एक भलेमोठे प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.        
मुळात आपण शास्त्रीय संगीत का शिकायचे हा विचार किती जण करतात? मला केवळ 'संगीत विशारद', 'संगीत अलंकार' या certificate चा धनी व्हायचे आहे अशी मानसिकता त्यामागे असते का हे प्रत्येकाने तपासून पाहण्याची गरज आहे. उत्तम शास्त्रीय गायक कोणाला व्हायचे आहे आणि उत्तम मार्क मिळवणारा परीक्षार्थी कोणाला व्हायचे आहे हे त्या त्या व्यक्तीच्या सांगीतिक जाणीवेप्रमाणे ठरवले जात असतेच. लिखित ज्ञान आणि मौखिक ज्ञान यात फरक हा असतोच. ज्याप्रमाणे साहित्य हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी हा लेखक होऊ शकत नाही त्याचप्रमाणे संगीत हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी गायक होऊ शकत नाही. ख्यालाचे पाढे गाणारे अनेक असतात पण दुसऱ्याच्या हृदयाला भिडणारे गाणे गाणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. लोकानुरंजनासाठी चमत्कृतीपूर्ण गाणारे ढीगभर असतात परंतु घराण्याच्या प्रवाहाची चौकट न मोडता त्यातील सौंदर्याचे लालित्यपूर्ण दर्शन घडवणारे संख्येने खूपच कमी असतात.          
कोणत्याही प्रकारचे संगीत असो त्यासाठी रियाज हा अपरिहार्य असतो. मी गेली २० वर्षे सुगम संगीत शिकवते आहे. आजमितीला अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत.  गाणं शिकणाऱ्याकडे संयम आणि चिकाटी तर हवीच पण गानसाधनेसाठी द्यावा लागणारा विशिष्ट वेळही हवाच. रियाज नक्की कसा करावा हे सांगणारा गुरुही हवाच. परंतु बदलत्या जीवनमानानुसार वेळ ही गोष्ट दुरापास्त होत चालली आहे. त्यामुळे शिकायची तर इच्छा आहे पण रियाजाला पुरेसा वेळ नाही अशी तक्रार ऐकू येते. शिवाय अनेक सक्रिय माध्यमांमुळे आज आपल्याला येत असलेले गाणे 'show case' करण्याची कोण चढाओढ  लागलेली असते. 'Instant ' हा शब्द अनेकांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होत चालला आहे. काय शिकवलं यापेक्षा किती शिकवलं याला अवास्तव महत्व दिलं जातं. किती महिन्यात गाणं शिकून तयार होता येईल हा प्रश्न अनेक इच्छुकांकडून विचारला जातो. स्पर्धांमध्ये पटकावलेली बक्षिसे हे यांच्या उत्तम गायकीवरील अधिकृत शिक्कामोर्तब असते. शिकणारा प्रदर्शनाच्या आहारी जातो आणि त्याची सांगीतिक वाढ खुंटते.  
शास्त्रीय संगीत हा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला अमुल्य ठेवा आहे. प्रत्येक घराणे वेगळे, त्यांची राग सादरीकरणाची, ख्याल मांडण्याची पद्धत भिन्न असते. अमक्या घराण्याचे गाणे चांगले तमक्या घराण्याचे वाईट असे वादसुद्धा अनेकदा कानावर येतात. ऐकणाऱ्यांचे गट पडतात. शास्त्रीय संगीत केवळ प्रतिष्ठेखातर ऐकणारेही खूप आहेत. आज भीमसेन ऐकला, किशोरी ऐकली, काय गाते राव मालिनी राजूरकर, कशाळकरांचा  गौड सारंग ऐकलाय का?  संजीवचा मधुकंस आणि अश्विनीचा ललत जीवघेणा आहे रे. अशी मतांची कारंजी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी नाहीतर आपण शास्त्रीय संगीताचे केवढे मोठ्ठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी चारचौघांत फवारली जातात. सवाई गंधर्व महोत्सव असो वा राम मराठे महोत्सव असो अनेकांना ते गाढ झोप येण्याचे हमखास ठिकाण वाटते ही अभिमानास्पद गोष्ट आहे काय?          
मारवा-सोहोनी, भूप-देसकार, भिन्न षड्ज-हेमंत या रागांच्या तफावतीच्या सीमारेषा इतक्या धुसर आहेत की एका रागातून दुसऱ्या रागात शिरणे सहज शक्य आहे. यामध्ये रागरसहानीचा मोठा धोका आहे. ह्या सारख्या रागांची मांडणी मोठ्या कौशल्याने करावी लागते. ह्या तफावती गळ्यात उतरवण्यासाठी  अथक परिश्रम घ्यावे लागतात. गळ्यालाही त्या विशिष्ट रागाचे वळण लागावे लागते. बरेच वेळा असं होतं की पेपरवरील थिअरी अचूक असते पण गळ्यातील थिअरी तिच्याशी तादात्म्य पावू शकत नाही. अनेक विद्यार्थी तेवढी तयारी झाली नाही या कारणास्तव ख्याल ताना वगळून गाताना ऐकले आहेत. तयारी नसताना असे अर्धवट गाणे गावेच का असा प्रश्न त्यांना कसा पडत नाही याचेच आश्चर्य वाटते.               
गाणे ही गुरुमुखातून प्रवाहित होणारी गोष्ट आहे. पण शिकवणारा झरा जर मूळचाची नसेल तर शिकणारयाच्या आत पाझरणारे पाणी सुद्धा अभिजात असेल याची ग्वाही कुणालाही देता येणार नाही. गान संस्कारांचा वटवृक्ष फोफावण्यासाठी जसे रियाजाचे खतपाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे उत्तम बियाणे पेरणेही तितकेच आवश्यक आहे. नाहीतर मग अशी रागांची निश्चेष्ट पडलेली कलेवरेच श्रोत्यांना ऐकू येतील.      

Wednesday, 6 January 2016

शाही विवाह सोहळे …….


लग्न सोहळा ही प्रत्येकाची खाजगी बाब असते मान्य. परंतु ज्या व्यक्ती आज देशाच्या राजकारणात, समाजकारणात सक्रिय असून महत्वाची पदे, स्थाने भूषवित  आहेत त्या व्यक्तींनीच या देशातील सामाजिक परिस्थितीचे भान न ठेवता कोट्यावधी रुपये नुसत्या विवाह सोहळ्यावर खर्ची करणे ही दुर्दैवाची गोष्टच म्हणावी लागेल. असे समारंभ नित्यनेमाने संपन्न होत असतात. दुष्काळग्रस्त जनतेच्या, आर्थिक दृष्ट्या कंगाल झालेल्यांच्या जखमांवर मीठ चोळत असतात.      
आपल्या देशात गरीब-श्रीमंतातील दरी इतकी मोठी आहे की अनेकांच्या घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे तर दुसरीकडे फक्त विवाह सोहळ्यावर खर्च करण्यासाठी आर्थिक गंगा दुथडी भरून वाहते आहे. हा एवढा पैसा कुठून येतो हा भाग अलहिदा पण तरीही हा इतका अमाप पैसा एखाद्या विधायक गोष्टीसाठी वळवण्याची मानसिकताच लोप पावली आहे हे मात्र खरे. एकीकडे 'नाम' सारख्या संस्था अनेकांच्या तोंडात अन्नाचे निदान दोन घास पडावेत यासाठी प्रयत्नशील आहेत, दुष्काळात होरपळून गेलेल्यांची घरे सावरावीत म्हणून त्यांना आर्थिक मदत देऊ करत आहेत तर दुसरीकडे आपण जणू या देशाचा भागच नाही, इथल्या आर्थिक परिस्थितीशी आपले काहीच देणेघेणे नाही, येथील जनतेच्या सुखदु:खाशी आपले काहीच सोयरसुतक नाही अशा थाटात हे सोहळे साजरे करून केवळ हौशीखातर आणि लोकांचे डोळे दिपावेत म्हणून कोट्यावधींचा चुराडा केला जातोय.     
विवाह समारंभ साजरे करायला आक्षेप असायचं कारण नाही पण या सोहळ्यावर किती पैसा खर्च करावा हे तारतम्य तरी बाळगाल की नाही? आज कमीत कमी गेली तीन-चार वर्षे तरी मराठवाडा दुष्काळाच्या छायेखाली आहे. शेतकऱ्याचे हाल कुत्रेही खाणार नाही अशी अवस्था आहे. वीज नाही, पाणी नाही, शेतीसाठी अवजारे नाहीत, पाउसपाणी नाही म्हणून पिके नाहीत, मुले-बाळे उपाशी, गुरांना खायला हिरवा चारा नाही, बहुतांश शेतकरी अथपासून  इतिपर्यंत सावकाराच्या कर्जात बुडालेले, उपासमारीने पोटे खपाटीला जाऊन हाडे वर आलेली, पैशाअभावी मुलांचे शिक्षण बंद, साधी आन्हिके उरकण्यासाठीही पाणी नाही अशी बिकट अवस्था, याचा परिणाम म्हणून अनेकांनी गळा आवळणाऱ्या फासाशी सख्य जोडलेले, निसर्गाचं बिघडलेपण आणि अनेक सधनांचे औदासिन्य यामुळे इथले अनेक श्वास अवघडलेले आहेत. 
ज्या जनतेच्या जीवावर आपण राज्य करतो,  ज्यांनी आपल्याला निवडून दिल्यानेच केवळ आज हे महत्वाचे स्थान आपल्याला प्राप्त झाले आहे त्या जनतेच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे शाही विवाह सोहळे पार पाडायचे हे म्हणजे एकप्रकारे त्या जनतेच्या असहायतेवर उपहासणेच नव्हे काय? अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल, अठरापगड प्रांतांचे पदार्थ, पेये आणि त्यावर मनसोक्त ताव मारणारे सगेसोयरे, कोट्यावधी खर्च करून उभारलेली महाल सदृश्य वास्तू, लाखो फुलांच्या कमानी, बिछायती, अलिशान गाड्यांचे ताफे, नखशिखांत सोन्याने मढलेली मंडळी हे कितीही नेत्रसुखद वाटत असले तरी ज्या प्रांतात हा सोहळा संपन्न होतो आहे तेथील बिकट परिस्थिती सोयीस्कररित्या डोळ्याआड करणे असा त्याचा अर्थ होत नाही का?                          
अशा समारंभांना अंत नाही. असे सोहळे होतच असतात. आपण हळहळतो. ज्यांच्या मुखात दोन वेळचे अन्न जात नाही त्या आबालवृद्धांची चेष्टा केल्यासारखे वाटते.  एक प्रश्न मला राहून राहून विचारावासा वाटतो की ज्यांच्यासाठी हा एवढा घाट घातला जातो त्या उत्सवमूर्ती व्यक्तींच्या संवेदनाही तितक्याच बोथट असतात का? इतर आप्तस्वकीय या वारेमाप उधळपट्टीला आक्षेप कसा घेत नाहीत? इतकी भावनाशून्यता यांच्या ठायी असते का? भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे अजिबात भान न ठेवणे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्यांची जराही कदर न करणे एवढाच राजकीय बाणा हे जपतात का? ह्या प्रश्नांचा जर गांभीर्याने विचार करणारा कुणी असता तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती नजरेआड करून त्याने इतरांच्या दु:खावर आपल्या दांभिक ऐश्वर्याचा महाल कधीच उभा केला नसता. उलटपक्षी इतरांच्या कोमेजलेल्या अपेक्षांना आपल्या दातृत्वाचे खतपाणी घालून त्यांच्या स्वप्नांची इमारत त्याने बुलंद केली असती.