Wednesday, 3 July 2013

भाषा तरुणाईची!


भाषा हे इतकं प्रभावी माध्यम आहे की त्याचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम ऐकणाऱ्यावर चटकन होत असतो. घरी पालकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते, शाळेत शिक्षकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते आणि मित्रपरिवारात वापरली जाणारी भाषा ही सर्वस्वी वेगळी असते.    
हल्लीची तरुणाई सभ्यतेशी विसंगत असणारी भाषा अगदी सहज, कसलाही विधिनिषेध न बाळगता वापरत असते. अगदी लहान लहान शाळकरी मुले मित्रांच्या घोळक्यात अतिशय गलिच्छ भाषा लीलया वापरतात. मग त्या घोळक्या शेजारून एखादी बाई चालली असो वा मुलगी त्यांना काहीही फरक पडत नाही. हा अनुभव मला अनेकदा आला आहे. मुले शाळेला किंवा क्लासला जाण्यासाठी रस्त्यावर एकवटतात. मग त्यांच्या गप्पा सुरु होतात. यात एकमेकांना अगदी हीन पातळीवर संबोधले जाते. फार घाणेरड्या स्तरावरील विनोद सांगून दुसऱ्याला हसवले जाते. मी अनेक वेळा दुपारी ट्युशनला जात असताना अशा काही घोळक्यांच्या बाजूने नाईलाजास्तव जावे लागते आणि आपण बहिरे असतो तर किती बरे झाले असते अशी पश्चात्ताप करण्याची पाळी आपल्यावर येते. आपल्या घरीही आपली आई, आपली बहिण आहे हे सोयीस्कररित्या विसरून या मुलांची अर्वाच्च्य बडबड चालू असते. बरे त्यांना असे बोलताना हटकावे तर आपल्याला ते काय ऐकवतील याची मनोमन धास्ती असते कारण ते जी भाषा वापरतात ती ऐकण्याचे धारिष्ट्य आपल्यात औषधालाही नसते.           
आपण मैत्रिणींबरोबर चित्रपट बघायला जातो. उद्देश निव्वळ करमणुकीचा असतो. आपण आनंदी मूडमध्ये असतो. पण समोर जमलेल्या तरुणांचा मूड मात्र काही औरच असतो. ते कुणाला तरी उद्देशून खूप घाणेरडे बोलत असतात. तेही इतक्या मोठ्याने की  आजूबाजूच्या कुणालाही ते सहज ऐकू जावे. आई-बहिणींच्या नावाने ती उधळलेली मुक्ताफळे ऐकताना आत खूप त्रास होत असतो. घरी जाउन आंघोळ करावीशी वाटते. त्यांना खडसावून विचारावेसे वाटते की अरे चांगल्या भाषेत तुम्हाला इतरांशी संवाद साधताच येत नाही का? घरीसुद्धा असेच बोलता का? ह्यांनी सांगितलेल्या विनोदात तर कंबरेखालच्या विनोदांचीच भर असते. या तरुणांचे काय होणार या प्रश्नाचा विचार करत आपण फक्त खंतावत राहतो.             
 ट्रेनमध्ये बायकांच्या डब्यात चढावे तर तिथेही बायकांच्या जिभेवर शिव्या-शापांचे ढीग रचलेले असतात. सीट मिळाली नाही घाल शिव्या, कोणी सरकले नाही घाल शिव्या, कोणी उत्तर दिले नाही घाल शिव्या हे अव्याहत चालू असते. अगदी चांगल्या घरातील वाटणाऱ्या बायका-मुलीही अतिशय घाणेरडे,बहिष्कृत शब्द सहज वापरत असतात. घरच्या मंडळींचा यथास्थित उद्धार केल्याशिवाय जणू या बायकांना चैनच पडत नाही.        
मराठीत भ, झ ने सुरु होणारे आणि इंग्रजीत एफ ने सुरु होणारे शब्द आजच्या युगातील जणू पर्वणीचे शब्द झाले आहेत. हे किळसवाणे शब्द उच्चारले नाहीत तर हा जन्म फुकट जाईल अशी भीती या शब्दांचा वापर करणाऱ्यांना वाटत असावी. प्रत्येक वाक्यागणिक या बीभत्स शब्दांची पेरणी करून ही मुले  संस्कृतीवर, संस्कारांवर नांगर फिरवत असतात. अवेळी कळलेले यातील शिव्यांचे, अश्लाघ्य शब्दांचे अर्थ यांच्यातील निरागस बाल्य पुरते उध्वस्त करून टाकतात. या शब्दांच्या अर्थातून एक किळसवाणी लैंगिक निष्पत्ती होत असते जी मनातील विकृत हेतूंना जन्म देऊ शकते किंवा असे घातक विचार करण्यास उद्युक्त करू शकते.      
तरुणाईच्या मनाला लागलेली ही शाब्दिक कीड वेळीच चांगल्या संवादांची, संस्कारांची फवारणी करून नष्ट केली पाहिजे अन्यथा याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला भोगावे लागतील.