Wednesday, 20 February 2013

स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली ज्ञानाची संकल्पना



स्वामीजींना अभिप्रेत असलेले ज्ञान हे पुस्तकाच्या मर्यादित पानांत बंदिस्त नसून माणसाच्या मनातील कोशात उपजत:च साठलेले आहे. त्यांच्या मते कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाचा उगम हा मनाच्या अंतर्गर्भात असतो किंबहुना ज्ञानाची उपलब्धी बाहेरून कधीच होत नाही. माणूस नवीन काही शिकतो म्हणजेच त्याच्या आत्म्यावरील अज्ञानाचे एक पटल तो दूर करतो. एक अमर्यादित स्वरूपाचा असा विश्वकोश माणसाच्या मनात सामावलेला असतो. माणूस ज्ञानापासून वंचित राहतो कारण स्वत:तील ज्ञानाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो. 
सर्व प्रकारच्या शक्ती आणि सर्व प्रकारचे ज्ञान मनुष्याच्या आत वसलेले असते. बाह्यसूचना आणि अंतर्गत ज्ञान यांचा मिलाप होतो आणि चिरंतन ज्ञानाचा आविष्कार होतो जो विश्वव्यापी असतो. बाह्य जगतातील गुरु अंतर्जगतातील गुरूला एक सूचना करतो आणि त्या सूचना आत जतन केलेले ज्ञानाचे समृद्ध भांडार जगापुढे रिते करतात. स्वामीजी उदाहरणादाखल म्हणतात, ज्याप्रमाणे एक आकाराने प्रचंड असलेले आणि अनेक एकर जमीन व्यापणारे वडाचे झाड एका छोट्या बी मध्ये लपलेले असते त्याप्रमाणे मानवी बुद्धीचा प्रचंड आवाका एका पेशीत साठलेला असतो. 
ज्ञानाची कुठलीही शाखा उपशाखा असो, कोणताही मार्ग असो अंतिमत: त्याचा उद्देश माणूस घडवण्याकडे असला पाहिजे. बाहेरून चकचकीत दिसणारी पण आतून काजळी धरलेली वस्तू काय कामाची? प्रत्येक शिक्षणाचा आद्य आणि अंतिम उद्देश हा माणसातील मानवता वर्धिष्णू होण्याकडे असला पाहिजे. मानवाची आत्मिक उन्नती त्यातून साध्य झाली पाहिजे. एक उत्तम व्यक्तित्व घडवण्यासाठी अणुरेणुंचे नेमके काय रसायन लागते ते भौतिकशास्त्राच्या वा रसायनशास्त्राच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकते काय? तत्ववेत्ते आणि संतपुरुष यांत हाच फरक आहे. तत्ववेत्ते त्यांच्या विद्वत्तापूर्ण बोलण्याने  मानवजातीवर प्रभाव टाकतात पण संत त्यांच्या ओजस्वी वाणीतून मानवातील संवेदना जागवण्याची किमया करतात.  
जे ज्ञान इतरांच्या पायाखालच्या वाटा प्रकाशमय करते त्या ज्ञानाचा मूलस्त्रोत हा माणसाच्या मनातच अव्यक्त स्वरुपात असतो. माणूस कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, त्याच्या व्यक्तिमत्वाला सशक्त, सक्षम करणारी असाधारण गोष्ट त्याच्यापाशीच असते. माणसातला माणूस जागवणारा धर्म आपल्याला हवा आहे, उत्तम मानवाला जन्म देणाऱ्या 'थिअरिज' आपल्याला हव्या आहेत, शिक्षणाने सर्वकष समृद्ध झालेला माणूस आपल्याला हवा आहे. पुस्तकी शिक्षणाने साक्षर होता येते, शैक्षणिक कक्षा रुंदावतात हे खरे पण आत्मोन्नती साधता येतेच असे नाही. स्वामीजी म्हणतात, अगदी मुंगीसारख्या  क्षुद्र कीटकापासून ते मानवापर्यंत आत्मा हा एकाच असतो फक्त त्याची आविष्कृती, अभिव्यक्ती निरनिराळी असते.  
प्रामाणिकपणे विश्वजागृती करण्यासाठी झटणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच असतात. वेद, उपनिषदे, गीता पठण करणारे अनेक असतात पण स्वत:च्या वर्तनात रुजवणारे अभावानेच आढळतात. स्वत:च्या देशाचा इतिहास सहजपणे विसरणारी माणसे कोणते गौरवास्पद कार्य करू शकणार बरे? माणूस पुस्तकी शिक्षण घेतो आणि श्रद्धा, उपासना, भक्ती या मानव वंशाच्या मुळाशी असलेल्या तत्वांना दाराच्या उंबरठ्यातच उभे करतो. अनेक युगांचा वारसा लाभलेल्या संस्कृतीवर शिक्षणाचा नांगर फिरवून स्वत:ची पाठ थोपटून घेतो. 
स्वामीजी म्हणतात, हे तरुणांनो जागे व्हा, आपल्या आत्मिक तेजोबलाने आपल्या अवतीभवतीचा परिसर तेजोमय, ज्ञानमय करा. आपल्या शारीरिक क्षमतांना बुद्धीनामक ज्योतीने प्रज्वलित करा. समस्त मानववंशाचा उद्धार करा. धर्माच्या,नीतीच्या, जातीपातीच्या, उच्च-निचतेच्या चुकीच्या कल्पनांचे अवडंबर माजवून मानवजातीच्या जन्माचे उद्दिष्ट असफल करू नका. अंतर्यामीच्या उज्ज्वल प्रेरणांनी आकाशाला गवसणी घाला. धीट व्हा, सावध व्हा, जागृत व्हा, कृती करा, आपल्या डोळ्यांवरील मायेचे पटल  दूर सारून अंतर्ब्रम्हाचे दर्शन घ्या. 

Tuesday, 19 February 2013

फेसबुकवरील काहीसे 'unlike' वाटणारे ................



सुरवातीला मी मोठ्या जोमाने फेसबुकवर माझा account ओपन केला खरा पण काही महिन्यांतच त्यावरील फोटोंच्या अवास्तव सरबत्तीला मी पुरेपूर कंटाळले. एखाद्या 'फेसबुक मित्र-मैत्रिणीचा' प्रामाणिक चेहरा, तिचे वा त्याचे विचार, त्याच्या अंतर्यामी वसलेली एखादी कला पाहण्याऐवजी  सतत त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पाहताना प्रचंड बोअर व्हायला होते. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी,  कोणाचे 'up-dates' घेण्यासाठी म्हणून फेसबुक उघडावे तर ह्या अशा असंख्य फोटोंनी नुसता उच्छाद मांडलेला असतो. 
मित्र-मैत्रिणी भेटले काढा फोटो, पायजमा पार्टी झाली काढा फोटो, हॉटेलात गेलात काढा फोटो, केस कापले काढा फोटो, नवीन कपडे घातलेत काढा फोटो, नऊवारी नेसली काढा फोटो, मुल रांगले काढा फोटो, सहलीला गेलात काढा फोटो. आपल्याकडे निमित्तेही खूप असतात. बारसे,वाढदिवस, मुंज, साखरपुडा, लग्न, पन्नाशी, साठी अव्याहतपणे चालूच असतात. मग ते हसणाऱ्या टोळ्यांचे फोटो डोळ्यांना फेस येईपर्यंत पाहत राहायचे. बरं यातील जेमतेम एक-चतुर्थांश माणसेच आपल्या ओळखीची असतात. त्यामुळे मग कंटाळलेल्या, वैतागलेल्या चेहऱ्याने बाकीचे अनोळखी चेहरे केवळ त्या आपल्या कुणी अबक 'फेसबुक फ्रेंड' खातर सहन करत राहायचे. एकसारखे दुसऱ्याचे 'फोटो सेशन' बघणे म्हणजे आपल्याच अमुल्य वेळेच निव्वळ ऱ्हास असतो. 
आपल्याकडे 'अतिपरिचयात अवज्ञा' अशी एक phrase आहे. हे असे सारखे तेच तेच फोटो बघून काही व्यक्ती उगाचच 'unlike' कराव्याशा वाटायला लागतात. अरे किती फोटो टाकाल ? त्याला काही सुमार? आणि मग त्याखाली पर्सनल कॉमेंट्स! 'What a lovely snap!', 'very very cute photo', 'magic-couple', 'ideal couple', 'रब ने बना दी जोडी ' इत्यादी इत्यादी. काही बायकांचे पौर्वात्य-पाश्चिमात्य वेशभूषेतील 'close-up smile' फोटो. कधी कधी हा अतिरेक पाहून वाटते की इतकी वर्षे ही माणसे नुसती फेसबुक सुरु व्हायची वाटच पाहत होती. फेसबुक आले आणि ह्या माणसांनी लगेचच त्यावर आपला फेसबुक कंडू असा शमवून घ्यायला सुरवात केली. ह्या व्यक्तींना बुद्धी-मन नावाची गोष्ट आहे की इतरांना दाखवण्यासाठी फक्त 'मेक-अप' केलेला स्वत:चा चेहराच आहे असे वाटावे इतपत ही माणसे फोटोंचे रतीब घालत असतात.  
अरे एवढे चांगले माध्यम आहे तर त्यावर काही चांगलेही अपलोड कराल की नाही? नाही म्हणायला काही माणसे  दुसऱ्याचे उसने घेतलेले का होईना पण चार चांगले विचार 'forward' करत असतात. काही अंतर्मुख करायला लावणाऱ्या 'स्टोरीज', व्हीडीओज' शेअर करत असतात. पण ह्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतात.  बाकी नुसते इतरांनी आपल्या दिसण्याची सतत स्तुती करावी यासाठी हपापलेले वाटण्याइतपत आपले फोटो टाकत असतात. त्यामुळेच नवीन फ्रेंड् request accept केली की ती व्यक्ती आणि तिच्या संबंधितांचे फोटो पाहण्याची सक्ती आपल्या डोळ्यांवर आपली इच्छा असो वा नसो होतेच! 
सध्या 'फेसबुक-संन्यास' घेण्याचे विचार माझ्या मनात अधिकाधिक प्रकर्षाने येत आहेत. [ अर्थात फेसबुक निर्माण करताना ज्याने संभाव्य धोक्यांचा विचार करून 'Hide story' चा option निर्माण केला त्या व्यक्तीचे मला या ठिकाणी मनोमन आभार मानावेसे वाटू लागले आहेत .]  

Friday, 1 February 2013

काही व्याख्या .................




शेतकरी : जो वर्षानुवषे लोकांची क्षुधा भागवून स्वत: अन्नान्नदशा भोगतो तो.

देऊळ: जे देवाला त्याचं बाजारीकरण याची देही याची डोळा बघायला लावतं ते.
टी.व्ही.मालिका: ज्या समतोल विचारांच्या स्त्रियांचं दर्शन तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना कधीही घडवून देत नाहीत आणि त्यांचा टी.आर.पी. बिघडवत नाहीत त्या. 
पुरुष: ज्याचं पौरुष स्त्रियांवर हात उगारण्यात आणि तिची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करण्यात खर्ची होतं तो.(याला अपवाद असू शकतात.)
स्त्री: जी अबला, असहाय,अडाणी असण्यात आणि स्वत:ला कमी लेखण्यात अग्रणी असते ती. (याला अपवाद असू शकतात.)
शिक्षण : जे घेतल्यानंतर फक्त साक्षर होता येतं पण सुसंस्कृत होता येत नाही, ज्याच्या जोरावर पैशांचे ढीग बँकेत रचता येतात पण माणुसकीचे खाते उघडता येत नाही ते.
स्पर्धा: ज्यात सहभागी झाल्यानंतर अहंगंड किंवा न्यूनगंड यावाचून अन्य काही पदरात पडत नाहीत त्या.
राजकारण: जे मानवी मूल्यांचा, नैतिकतेचा लगदा केल्याशिवाय खेळता येत नाही ते.
विश्वास: जो शब्दकोशापुरताच राहिला आहे तो. 
नोकरी: जी हवी तेव्हा लाथ मारून ठोकरता येत नाही ती.
रेल्वे: मासिक प्राप्ती करून घेण्यासाठी जिच्या आत आपल्या शरीराचे क्रियाकर्म दररोज करावे लागते ती. 
निसर्ग: ज्याची अवहेलना आपण येत-जाता, घरी-दारी त्याचे नियम मोडून करत असतो तो.
प्राणी: ज्याची संवेदना माणसापेक्षा जास्त जागृत आहे तो.
क्षितीज: जे माणसाने स्वत:साठी हेतू पुरस्सर आखलेले नाही ते.
लोकसंख्या: जी मानवाला दिसामाशी विनाशाच्या गर्तेत नेत चालली आहे ती.
आरोग्य: जे चायनीज गाड्यांवर दिवस-रात्र उपलब्ध असतं ते.
मॉल : माणसांच्या हातात आकर्षक आणि चतुर पद्धतीने पिशव्या कोंबणारी आधुनिक जत्रा.
संगणक: ज्याचा वापर माणसाला चांगल्या आणि वाईट प्रकारे सारखाच करता येतो तो.
घर: ज्यात राहणाऱ्या माणसांपेक्षा वस्तूंचेच मूल्यमापन अधिक होत असते ते. 
अभिनय: ताप आलेल्या मुलाला पाळणाघरात सोडून ऑफिसला जाताना स्त्रीला करावा लागतो तो. 
आयुष्य: जे मोहरलेल्या झाडाऐवजी जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखे वाटते ते.
मुले: ज्यांचे बाल्य , निरागसता अकालीच संपून जाताना दिसते ती.
शाळा: मुठभर यशस्वी विद्यार्थ्यांच्या आधारावर ज्या स्वत:चा ब्रान्ड निर्माण करण्यात गर्क आहेत त्या.
अभिलाषा: जी मरेपर्यंत संपत नाही ती.
चारित्र्य : जे धुळीला मिळाल्यानंतर आपण काय गमावले याचे आकलन होते ते.
पुतळे: ज्यांचे भांडवल करून व त्यावरून वाद उकरून  सत्तेवरची आपली मांड पक्की करता येते ते.
श्रद्धांजली: केवळ दोन मिनिटे शांतता पाळून आणि लगेचच घाईघाईने खाली बसून उपचारार्थ दिली जाते ती.