Sunday, 25 November 2012

वेडेपणा .........



आयुष्यात एकदातरी वेडेपणा करावा 
आभाळभर चांदण्यांना हात लावून यावा 
नायगारयाच्या धबधब्यात हात धुवून घ्यावा 
आयफेलवरून एक पाय सहज खाली टाकावा 
गरुडाबरोबर उडण्याचा करार करावा 
सापाला पाठीमागून हळूच विळखा घालावा 
हृतिक रोशन समवेत पदन्यास करवा 
माधुरीचा हात एकदा अलवार हातात घ्यावा 
हिमालय हाताच्या मुठीत धरावा 
माध्यान्हीला 'मालकंस' गाऊन बघावा 
ओल्या मातीचा गंध कुपीत जपावा 
हरणांचा पाठलाग लीलया करावा 
ढगांचा कापूस दोन्ही हातांनी पिंजावा 
मावळता सूर्यरंग ओंजळीत घ्यावा 
सचिन, सौरव संगे 'ब्रेकफास्ट' करावा 
स्टेफी बरोबर गेमचा 'advantage' घ्यावा 
दूधसागर बशीने पिऊन टाकावा 
झाडांचा हिरवा वर्ख पांघरून घ्यावा 
वेडेपणाचा कळस असाच गाठावा 
अभ्यंतरी असू द्यावा अमृताचा ठेवा ...........

Friday, 23 November 2012

फोटोशॉप २- एक कल्पक खेळ .............

मागील फोटोशॉपवरील ब्लॉगमध्ये आपण 'Animation' द्वारा अचल चित्रांना विविध प्रकारे गतिमान स्वरूप कसे देता येऊ शकते या विषयीचा अभ्यास केला होता. या प्रकरणातही त्याच प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत. माझ्या प्रस्तुत विषयाच्या पहिल्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मी याच विषयावरील दुसरा ब्लॉग लिहित आहे. 

वरील दृश्यात कारंज्यातील पाण्याला 'Animation' द्वारा गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे पाणी वाहते असल्याचा आभास मी निर्माण केला आहे.  ह्यात पाण्याचा फवारा 'सिलेक्ट' करून त्याचे रंगही बदलता येणे शक्य आहे. 

वरील चित्रात अंड्यापासून ते पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराच्या अवस्था दिसत आहेत. शालेय अभ्यासक्रमात अशा चलत प्रतिमांचा वापर करून मुलांना शास्त्रीय संकल्पना अधिक सोप्या रीतीने समजावून दिल्या जाऊ शकतात. 


वरील चित्रात जलचर प्राणी अर्थात मासे आणि कासव दृश्यमान झाले आहेत. पैकी मासे गतिमान आहेत. ते एकमेकांशी संवाद साधत आहेत. ह्यात कासवाला 'सिलेक्ट' करून त्यालाही गतिमान करता येणे शक्य आहे. जेणेकरून पाण्याखालील जीवसृष्टीतील हालचालीचा आभास निर्माण करता येऊ शकेल. 

वरील चित्रात अंगठीतील खड्याचे रंग बदलत आहेत. जेवढे रंग हवे आहेत तेवढे 'Layers' निर्माण करून प्रत्येक 'Layer' साठी आपल्या आवडीचा रंग वापरावा. बाकीचे काहीही बदलण्याची आवश्यकता नाही. 

वरील चित्रात 'Magnifying Glass' वेगवेगळ्या राज्यांवर सरकते आहे व ती ती राज्ये (States) 'Highlight' करीत आहे. या चित्राद्वारे मुलांनाही या देशातील आणि अवघ्या जगातील वेगवेगळ्या देश-प्रदेशांची माहिती घेणे खचितच आवडेल. भौगोलिक अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या चलत स्लाईड्स द्वारा आकलनास उत्तम मदत होऊ शकेल असे मला वाटते. 


Wednesday, 21 November 2012

क्षणभंगुर परि ऐसे जीवन ..........

उणापुरा तीस वर्षाचा तरुण काही एक दृश्य स्वरूपाचे कारण नसताना अचानक काही सेकंदात होत्याचा नव्हता होतो आणि समस्त जीवित जातीच्या क्षणभंगुरतेवर शिक्कामोर्तब होते.आदल्या दिवशी नातेवाईकांच्या, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात मनसोक्त गप्पा मारणारा तरुण एकदम एकाएकी 'Pulmonary Cardiac Arrest' चा बळी ठरतो यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. तेही ऐन दिवाळीच्या दिवसांत आणि पाडव्याच्या दिवशी. लग्नाला जेमतेम दोन वर्षे पुरी होतात न होतात तोच बायकोला पाडव्याच्या दिवशी एवढी भीषण ओवाळणी मिळावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास! सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला आपला मुलगा, घरी-दारी आनंदाची उधळण करणारा आपला मुलगा, नियमित व्यायाम करणारा आपला मुलगा असा अचानक कसा गेला हे न पेलणारे आणि न सुटणारे कोडे घेऊनच आता वडील उर्वरित आयुष्य जगणार. तर नऊ मास पोटात वाढवून, संगोपन करून, सगळे लाड-कोड पुरवलेला  आपला मुलगा या जगातूनच निघून गेला या जाणीवेने माउली आजन्म अश्रू ढाळत राहणार. तिची व्यथा तर इतरांच्या जाणिवांच्या कक्षेत न बसणारी. ती अंतर्यामी उध्वस्त झालेली. ज्याला आपला मानला , नातिचरामी म्हणत ज्याच्या सोबतीने अग्नीभोवती सात फेरे घेतले, ज्याच्या साथीने आयुष्य सुंदर होण्याची स्वप्ने बघितली आणि ज्याचा हात प्रगाढ विश्वासाने हातात घेतला तो आपला हात सोडून न परतीच्या वाटेवर निघून गेला हा नुसता विचारही तिला भयानक ग्रासणारा. त्याच्या फक्त आठवणींवर आपले यापुढील आयुष्य कंठायचे ही तिच्या मनाला पदोपदी विदीर्ण करणारी जाणीव आणि आता सुख-दु:खाच्या वाटेवर यापुढे आपल्या सोबत तो नाही ही मनातील अंधार अधिक गहिरा करणारी जाणीव घेऊन तिने जगायचे नव्हे स्वत:ला जगवत ठेवायचे. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी चार दिवसांपुरते. काही दिवसांनी आपापल्या व्यापात व्यस्त होणारे.  
 कसलेही व्यसन नसलेला माणूस एकाएकी दगावतो आणि वर्षानुवर्षे व्यसनांच्या आधीन असलेली माणसे क्वालिटी नसलेले जीवन जगत राहतात. धुम्रपान केल्याने कर्करोग होतो अशी भीती असते पण म्हणून प्रत्येक धुम्रपान करणारा कर्करोगाला बळी पडत नाही किंबहुना अनेक वर्षे जगतोही! व्यसने न केल्याबद्दलच्या शिक्षा मात्र अनेक लोक भोगत राहतात. निर्व्यसनी, मिताहारी, नियमितपणे जगणारा कुणी कधीही होत्याचा नव्हता होऊ शकतो. निर्व्यसनी आयुष्य अधिक नियमित आयुष्य म्हणजे प्रदीर्घ आयुष्य असे आयुष्याचे समीकरण खात्रीपूर्वक मांडता येत नाही. अपघात होऊ नये म्हणून आपण गाडी कितीही सावधपणे आणि नियमांचे उल्लंघन न करता चालवली तरी समोरून येणारे वाहन तुम्हाला तेवढेच सुरक्षित आयुष्य बहाल करेलच याची हमी देता येणे सर्वथैव अशक्य आहे. शंभर फुट दरीत कोसळलेल्या बसमधील एखादे लहानगे मूल शरीरावर कुठेही साधा ओरखडाही न येता जिवंत राहते आणि घराच्या घरी पेपर वाचताना माणसाचा अंत होतो. कोणत्याही शास्त्रीय मिमांसेच्या पलीकडील या गोष्टी आहेत. गतकाळात माणसाला हृदयविकाराचा झटका आला होता का तसेच आता आला आहे का हे 'ECG' या साधना मार्फत समजू शकते परंतु  ECG काढून बाहेर येताच माणूस दगावतो ही घटना सगळ्या वैद्यकीय शास्त्राची पाळेमुळे हादरवते. 
हे सगळे पहिले, ऐकले की जीवनाच्या क्षणभंगुरतेची प्रचीती येते. आपल्या योजना आणि 'त्याच्या' योजना नेहमीच 'coincide' होतात असे नाही. मनात रचलेले बेत आणि 'त्याचे' बेत यांची गोड युती होतेच असे नाही. आपल्या ललाटरेखेचे सामर्थ्य तोकडे ठरते. आपली संकुचित जाणीव त्या सर्वेश्वराच्या व्याप्तीला ओळखू शकत नाही. भविष्यात आपल्यापुढे कोणते फासे तो 'सर्वात्मक' टाकणार आहे आणि त्यात आपली पट तरुन जाण्याची शाश्वती किती हे गणित अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच पैसा-अडका, दागिने, स्थावर-जंगम, मानमरातब, प्रतिष्ठा, खानदान या गोष्टी जरी मनुष्याला प्राप्य असल्या तरी ती जीवन समाप्त करणारी निर्णायक 'उल्का' कधी कशी आणि कोणावर कोसळेल याचा थांग लावणे ही समस्त मानवजातीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे हे आस्तिक-नास्तिक, प्रगत-अप्रगत, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू-सामान्य अशा प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.     

Sunday, 11 November 2012

आली दिवाळी दिवाळी ............

घराघरांतून साफसफाई सुरु झाली, बेसनाचे खमंग वास दरवळू लागले की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. वेगवेगळ्या तऱ्हेचे कंदील, पणत्या यांनी रस्त्यावरील दुकाने सजू लागतात. वर्षभरात या देशात कितीही अप्रिय घटना घडल्या असू देत, दिवाळीची चाहूल लागताच घरी-दारी उत्साहाला उधाण येते. माणूस गरीब असो वा श्रीमंत, दिवाळीची खरेदी करण्यासाठी तो बाहेर पडतोच पडतो. 
पूर्वी दिवाळी आली की घराघरातून ठिपक्याच्या कागदाची, रांगोळीची, गेरूची देवाणघेवाण सुरु व्हायची. घरातील पोरसोरांपासून ते वयस्कर मंडळी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असायची. चकलीचे सोरे, चकत्या, शंकरपाळ्याचे कातणे घरोघरी फिरवले जायचे. आज कोणाकडे कोणता फराळ केला जाणार आहे याची माहिती इतरांना असायची. रंगीबेरंगी आकाशकंदील, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या तसेच ग्लासातील दिवे यांनी चाळी, बिल्डिंगा  सुशोभित व्हायच्या. पाहुणे  येणार म्हणून खास पदार्थ केले जायचे, भेटवस्तू  तयार ठेवल्या जायच्या. नरक चतुर्दशीला घरोघरी दुष्ट शक्तींचा नाश करणारी प्रतीकात्मक चिबुडे फोडली जायची. त्यानंतर लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज सारे काही यथासांग पार पडायचे.       
आजचे दिवाळीचे स्वरूप बरेच बदलले आहे. आज दिवाळीला बरीच घरे अंधारात असतात. कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेरगावी जातात. घरोघरी फराळ होतोच असे नाही. विकतचा फराळ आणला जातो. ठिपक्यांच्या रांगोळी ऐवजी साच्याची रांगोळी काढण्याकडे बायकांचा कल असतो. कंदिलाविना,  पणत्यांशिवाय  घरे भकास वाटतात. घरातील वर्दळ, पै -पाहुणे, बायकांची लगबग, पोरांचे फटाके लावणे यापासून आपण लांब जातो आहे असे वाटू लागते. ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून आंघोळ करणे, नवे कोरे कपडे घालणे, देव-दर्शन घेणे, वडीलधारयांच्या  पाया पडणे, फटाके आणि फराळ यांचा आस्वाद घेणे कालबाह्य होत चालले आहे की काय असे वाटू लागते.  
आता दिवाळी आली की भव्य मॉल सजू लागतात. लोकही खरेदी करण्यासाठी मॉल अधिक प्रिफर करतात. मॉलमधील ऑफरनुसार स्वस्तातील गोष्टी मिळवण्यासाठी लोकांची एकच झुंबडगर्दी उडते. आयता फराळ, आयत्या भेटवस्तू, आकर्षक कपडे  यांनी मॉल फुलतात. ओवाळणीची ताटेसुद्धा रेडीमेड मिळतात. काही वेळेस आपापल्या सोयीनुसार पुढे-मागे  भाऊबीज साजरी केली जाते.  आजकाल बहिणींकडून भावांनाही महागड्या भेटी दिल्या जातात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना बड्या हॉटेलमध्ये दिवाळी निमित्ताने खास मेजवान्या दिल्या जातात. 
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांवर गदा आली ही चांगलीच गोष्ट आहे  पूर्वी फटाके भरपूर वाजायचे तेव्हा प्रदूषणाची कोणी पर्वा केली नाही पण आजकाल प्रदूषणाच्या नावाखाली काही घरात मुलांना फटाके वाजवू देत नाहीत. शोभेचे फटाकेही उडवू देत नाहीत. काही मुलांना फराळ घरी करता येतो हेही ठाऊक नसते. आपली संस्कृती टिकवणे आपल्याच हातात असते. ज्या गोष्टी वाईट किंवा हानिकारक आहेत त्या जरूर त्याज्य ठरवाव्यात परंतु चांगल्या गोष्टींचे जतनही जरूर करावे. माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या गोष्टी आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने जर माणसे एकत्र येत असतील, आनंदाची,सौख्याची देवाणघेवाण करत असतील तर तो धागा तरी घट्ट पकडून तरी माणसाला एकमेकांच्या साथीने पुढची वाटचाल नक्कीच सुकर करता येईल अन्यथा रोज झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात कोणत्याही आनंदाचे निमित्त माणसाला एकमेकाच्या जवळ आणू शकणार नाही अगदी दिवाळीही!