
विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर येउन ठेपल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकांत धुव्वा उडालेले पक्षही नव्या जोमाने प्रचार करत आहेत. जाहिराती, घोषवाक्ये, वचननामे, चर्चा या अगदी शिगेला पोहोचल्या आहेत. सर्वच पक्ष या वेळी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त अवलंब करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर युती आणि आघाडी तुटल्याने या वेळची लढत पंचरंगी होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मते विचारली जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी इतकी वर्षे काय केलं याचा हिशेब इतर पक्षांकडून मागितला जातो आहे. त्या त्या पक्षाचे उमेदवार आपापला मतदारसंघ प्रचाराने ढवळून काढत आहेत. जाहिरातींवर वारेमाप पैसा खर्च केला जातो आहे. शिवाय लोकांमध्ये वाटण्यासाठी म्हणून कोट्यावधी रुपयांच्या थैल्या सैल केल्या जात आहेत. दारू-मटणाच्या पार्ट्यांची झोड उठवली जाते आहे. ठिकठिकाणी सभा घेऊन नेत्यांकडून आपल्या पक्षाची ताकद आजमावली जाते आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन होते आहे. प्रचाराच्या सभेत कोणतेही ताळतंत्र न ठेवता दुसऱ्या पक्षाची किंवा नेत्यांची निंदानालस्ती केली जाते आहे. नेत्यांची लायकी, त्यांची अक्कल चव्हाट्यावर येते आहे. स्वत:च्या पक्षाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी इतरांचे चारित्र्य हनन करण्याचा मार्ग सगळेच पक्ष अवलंबत आहेत. आम्ही यंव करू नी त्यंव करू ही आश्वासने रोज सामान्यांच्या कानावर आदळत आहेत. प्रत्येक नेता आपापल्या भाषणात शत्रू पक्षातील नेत्याचा खरपूस समाचार घेतो आहे. त्याची लफडी कुलंगडी बाहेर काढतो आहे. विधानसभा निवडणुकांचे हे चित्र विधायक मानावे की विदारक मानावे या संभ्रमात मतदार वावरताना दिसतो आहे.
रस्त्यावरील प्रचंड खड्डे, डोळ्यांत पाणी आणणारी महागाई, वीज-पाणी टंचाई, शिक्षणाचा व शिक्षण सुविधांचा बोजवारा, मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेकारी, आर्थिक-सामाजिक विषमता, रस्त्यावर, रेल्वे रुळांवर होणारे अपघात, कायद्याचे उल्लंघन करून त्यातून सहीसलामत सुटणारे समाजकंटक, कुपोषण, मुक्या प्राण्यांच्या हत्या, तस्करी, भ्रष्टाचार, पोलिसांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच त्यांच्यावर पडणारा कामाचा प्रचंड ताण, सामान्यांना नडून त्यांचे खिसे रिकामे करणारे समाजातील प्रतिष्ठित घटक, चोऱ्या-दरोडे-खून-अपहरण, लाचलुचपत, वाढत्या लोकसंख्येला आळा, परप्रांतीयांचे लोंढे, प्रदूषण, असामाजिक तत्वांचे राष्ट्रावर होणारे आक्रमण, दुर्बल घटकांचे शोषण या व अशा असंख्य प्रश्नांचे विक्राळ रूप आजमितीला जनतेसमोर उभे आहे. या जीवघेण्या जगण्याच्या शर्यतीत मरण स्वस्त वाटते आहे म्हणून त्याला कवटाळण्याची मानसिकताही वाढत चालली आहे. परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत, शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून अनेक मुले स्वत:ला संपवीत आहेत, अतिरिक्त ताण सहन न झाल्याने पोलिस मृत्यूला कवटाळत आहेत, अनेक केसेस आज कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, बलात्कारित मुलगी म्हातारी होऊन मरण्याआधी तरी न्याय मिळावा म्हणून कोर्टाच्या निकालाकडे डोळे लावून बसली आहे.
वरील सर्व विषयांकडे गांभीर्याने पाहणारा नेता लोकांना हवा आहे. झटापट निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता लोकांना हवा आहे. जाती-वर्ण-वर्ग यांना न जुमानता समाजातील सगळ्या घटकांकडे समान दृष्टीने पाहणारा व त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा नेता लोकांना हवा आहे. मूल्याधारित, तत्वाधारित शिक्षणाची कास धरणारा आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाचा आग्रह धरणारा नेता लोकांना हवा आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारा संवेदनशील नेता लोकांना हवा आहे. लोकांना मरण्यासाठी नव्हे तर आनंदाने, सन्मानाने जगण्यासाठी प्रवृत्त करणारा नेता लोकांना हवा आहे.
केवळ निवडणुकांपुरती भरमसाट आश्वासने देऊन निवडून आल्यानंतर जनतेचा विश्वासघात करणारा आणि पाच वर्षात स्वत:च्या पुढील सात पिढ्यांचे कल्याण करणारा नेता लोकांना नको आहे. आय-बहिणींची अब्रू सर्रास वेशीवर टांगली जात असताना स्वत:ची असमर्थता दाखवून त्यांना वर्षानुवर्षे कोर्टाचे उंबरठे झिजवण्या शिवाय पर्याय नाही असे मुर्दाड मनाने सांगणारा नेता लोकांना नको आहे. गरिबांचे भूखंड बळकावून त्यांना बेघर करून जिणे नको करणारा नेता लोकांना नको आहे. जाती-जमाती वरून दंगे पेटवून जनतेच्या मनात परजाती विषयी विष कालवणारा नेता लोकांना नको आहे. केवळ शहरांचा विकास आणि खेड्यांत अंधार अशा संकुचित विचारांनी पछाडलेला नेता लोकांना नको आहे.
मनाने सक्षम, विचाराने प्रगत आणि आचाराने कृतीशील अशा नेतृत्वाची आज या महाराष्ट्राला आत्यंतिक गरज आहे.
अशा खंबीर नेतृत्वाने या महाराष्ट्राचा कारभार हाती घ्यावा आणि जनतेला नैतिक आधार द्यावा ही मतदार राजाच्या मनातील इच्छा सुफळ संपूर्ण होऊ दे एवढीच त्या परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना!
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि समस्त भारतवासियांच्या आशा पल्लवित झाल्या . या निवडणुकीत जणू काँग्रेस हटाव मोहीम जनतेने हाती घेतली . सर्वांनीच श्रद्धापूर्वक आपापले मत भाजपला नव्हे तर मोदींना बहाल केले . मोदी या व्यक्तीवर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे असा सार्थ विश्वास जवळजवळ प्रत्येक मतदाराला वाटला . 'अब अच्छे दिन आनेवाले है ' हे वाक्य आपल्यासाठीच आहे असे मनोमन प्रत्येकालाच वाटले . गेल्या काही महिन्यांपासून जळी -स्थळी -काष्ठी -पाषाणी 'अब की बार मोदी सरकार ' ही 'tag line' माणसांचे लक्ष वेधून घेत होती . पेपर-मासिके-टी व्ही -इंटरनेट सर्वच माध्यमे मोदी या नावाने व्यापली होती . आपल्याला वाली कोण या लोकांच्या मनातील संभाव्य प्रश्नाचे उत्तर म्हणून फक्त नरेंद्र मोदी हा एकमेव चेहरा समोर दिसत होता आणि काहीसा आश्वासकही भासत होता . त्यांनी केलेली भाषणे,दिलेल्या मुलाखती प्रभावी वाटत होत्या. किमानपक्षी हा माणूस बोलण्यात तरी कणखर आहे, भारताचे नेतृत्व पेलण्यास सक्षम आहे असे वाटू लागले होते.
मोदींनी शपथविधी सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आपल्या देशाशेजारील राष्ट्र-प्रमुखांना आमंत्रित करून आपापसांत शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी पहिले पाऊल उचलले आणि आपल्या मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवून दिली. मोदींच्या नावाने सेन्सेक्स सुद्धा उसळी मारू लागला. भारतातील प्रत्येक लहान-मोठ्या राज्यांत मोदी नावाची मोठी लाट आली आणि तिच्या रेट्याने इतर पक्ष भुईसपाट झाले. आज त्यांनी दशसुत्री अजेंडा जाहीर केला आहे. त्यात अनेक मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हा अजेंडा स्तुत्य आहे परंतु यात महिला सुरक्षेचा विषय अंतर्भूत नाही हे पाहून काहीसे आश्चर्य वाटले. असो. या सरकारची घडी नीट बसण्यासाठी काही वेळ तर द्यायला हवाच ! जुन्या प्रलंबित, लाल फितीत अडकलेल्या फाइल्स, प्रलंबित योजना या हातावेगळ्या केल्याशिवाय मोदी सरकार पुढे सरकू शकणार नाही. पैशाअभावी पुढे न सरकलेली कंत्राटे, योजना यावर योग्य ते निर्णय घ्यावे लागतील.
महागाई, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पंचनाम्यात होणारी अक्षम्य दिरंगाई, वाहतुकीच्या समस्या, वाढती लोकसंख्या आणि दिसामाशी वाढणारे परप्रांतीय लोंढे, प्रदूषण, मुली आणि महिलांची सुरक्षितता, बालमजुरी, मुलभुत साधनांची टंचाई, आरोग्य, कुपोषण, शैक्षणिक सुविधा, बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक दरी, दळणवळण, व्यापार, आंतरराष्ट्रीय पत असे अनेक प्रश्न आजमितीला आ वासून उभे आहेत. दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या शत्रूंशी धाडसाने आणि हुशारीने मुकाबला करत त्यांना यशाचे शिखर गाठायचे आहे. जनमानसात विश्वासार्हता संपादन करायची आहे. आपल्या मुकुटातील काट्यांचे भान ठेवायचे आहे. तळागाळातील जनतेला आपलेसे करायचे आहे. गरीब-श्रीमंतातील दरी कमी करायची आहे. अनाचारी,बेताल वृत्तीवर वचक बसवायचा आहे. माणसातील हिंसक प्रवृत्तीला लगाम घालायचा आहे. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आपल्या देशातच तरुणांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. परदेशी चंगळवादापेक्षा त्यांच्यातील कार्यक्षमतेचे आणि स्वच्छतेचे महत्व आपल्या देशातील तरुणांना पटवून देता आले पाहिजे.
सुरवातीचे शंभर दिवस मोदी सरकारच्या कसोटीचे असतील. काही लोकांना खूष करण्यासाठी त्यांना अनेकांना नाखूष करावे लागेल. जनहितासाठी ,देशहितासाठी अनेक कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागतील. काही अडसर त्यांना दूर करावे लागतील. भाजीवाले ते उद्योगपती या सामाजिक-आर्थिक स्तरातील सर्वांनाच ते जवळचे वाटण्यासाठी त्यांना काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. मुख्य म्हणजे सतत जनसंपर्कात राहून त्यांना प्रत्येक वयातील आणि स्तरातील नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्याचे निराकरण करावे लागेल. हळूहळू लोकांच्या मनात त्यांचे 'रिपोर्ट कार्ड' तयार होईल. दिवस-महिने-वर्ष या कार्डात अनुकूल वा प्रतिकूल बदल होत राहतील. पाच वर्षाच्या अखेरीस या रिपोर्ट कार्डाचे प्रत्यंतर मोदी सरकारला येईल.
पाच वर्षा नंतर मोदी सरकार की इतर कोणत्या पक्षाचे सरकार याचा निर्णय भारतीय जनतेच्या मनात तयार असेल. सध्या मात्र भारतीय जनतेने दिलेला पेपर मनापासून आणि परिश्रम पूर्वक सोडवणे एवढेच मोदी सरकारच्या हातात आहे.
काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आणि आम्हा 'बालमोहन १० वीई' च्या उद्धवच्या वर्गमित्र -मैत्रिणींना त्याला भेटायचं एक छान निमित्त मिळालं. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही भेट नव्हती तर पूर्णपणे अनौपचारिक असा हा मित्रत्वाचा सोहळा होता.
उद्धवसाठी भेट म्हणून अतिशय सुंदर असा केक आम्ही तयार करून घेतला आणि ताज्या टवटवीत फुलांचा सुरेख गुच्छ देखील मागवला. ठरल्याप्रमाणे शिवाजीपार्क येथील जिप्सी या सर्वमान्य संकेतस्थळी आम्ही जमलो आणि काही अवधीतच मातोश्रीकडे प्रयाण केले .

मातोश्रीत जाण्याची माझी तरी ही पहिलीच वेळ होती. मध्यंतरी अनेक वर्षे आम्हा मित्र-मैत्रिणींचा एकमेकांशी संपर्क नव्हता नाहीतर याआधी हा योग नक्कीच आला असता . विशेषकरून शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब असताना आम्हाला तिथे जाता आले असते याची थोडी रुखरुख वाटली. आजवर बहुतेक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पाय कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जिथे वळले होते त्या शिवसेनेच्या तीर्थस्थानी जाण्याची संधी आम्हाला मिळाली. कलानगरचे वळण आले आणि 'साहेब ' या फुलांनी सजवलेल्या शब्दाने आमचे स्वागत झाले. आम्ही आत शिरलो. जिथे तिथे गस्त घालणारे पोलिस दिसत होते. आमच्या गाड्या मातोश्रीपाशी आल्या. पायउतार होऊन आम्ही जवळजवळ लगेचच त्यांच्या स्वागतकक्षात गेलो. तिथे अगोदरच प्रचंड संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि इतर संबंधित उपस्थित होते. उद्धव यायला जरा वेळ होता. आम्ही आमच्या मित्राच्या घरात हक्काने शिरून यथेच्छ बडबड सुरु केली. आजूबाजूचे लोक कुतूहल मिश्रित नजरेने आमच्या उत्साही ताफ्याकडे पाहत होते. आमच्यावर कोणतेच औपचारिकपणाचे बंधन नव्हते. आम्ही सर्वच जण बिनदिक्कत आपलेच घर असल्यासारखे मोकळेपणाने वावरत होतो. शेजारच्या छोट्या कक्षात आम्हा सर्वांची बसायची व्यवस्था केली आणि आम्ही तिथे जायला वळलो. तेवढ्यात समोरून शिवसेनेतील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच मनोहर जोशी सर आले. मी त्यांना सर म्हणून सरळ हाक मारली आणि आम्ही उद्धवचे वर्गमित्र आहोत असं सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला व त्यांनी आम्हाला बसायला सांगितले. मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय विषयाची कास धरून आम्ही तिथे आलो नसल्याने उद्धव सोबत केवळ निखळ आनंद साजरा करणे एवढाच आम्हा सर्वांचा अंतस्थ हेतू होता.

अतिशय स्वादिष्ट पेढे आणि कोकम सरबताचा आम्ही आस्वाद घेतला. काही वेळाने उद्धव आला. आम्हा अर्वांचे अभिनंदन त्याने स्वीकारले. पण आमच्या कदाचित बरेच तास आधीच येउन ताटकळत बसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तो परत बाहेर गेला. त्याची खरे तर बरीच तारांबळ होत होती. एकीकडे वर्गमित्र भेटल्याचा आनंद वेगळाच होता पण दुसरीकडे पक्षीय जबाबदारी पार पडण्याचे बंधनही होतेच की ! शिवसेनेच्या विजयानंतरची आतषबाजी आम्ही अनुभवत होतो. बाहेर घोषणांचा गजर चालू होता. त्या घोषणात आम्ही आमच्या '१०वी ई' चा गजराही गुंफून टाकला.
काही वेळाने रश्मी ठाकरे येउन आम्हाला भेटल्या. त्यांनी सुहास्यवदनाने आम्हा सर्वांचे स्वागत केले. त्या जणू आमच्यातल्याच होऊन गेल्या. यामुळे आमचा उरलासुरला संकोच गळून पडला आणि आम्ही जणू आमचे वय विसरून वर्गात असल्यासारखेच वागायला लागलो. नंतर युवराज आदित्य आले आणि त्याच्या बाबांचे अ-राजकीय मित्र-मैत्रिणी पाहून त्यालाही मौज वाटली. त्यानंतर उद्धवच्या हस्ते केक कापण्याचा व तो त्याला भरवण्याचा समारंभ पार पडला. गप्पा आणि आठवणींत रमून गेलेल्या आमचे पाय निघता निघत नव्हते पण बाहेरची वाढती गर्दी आणि परतायची ओढ यामुळे आम्ही उद्धव-रश्मी आणि आदित्यचा निरोप घेतला.
इतक्या वर्षांनी झालेली आम्हा वर्गमित्रांची आणि मैत्रिणींची भेट आणि त्या भेटीला मातोश्रीतून मिळालेला निखळ मैत्रीचा दुजोरा ही दौलत मनात साठवत आम्ही आपापल्या घरी परतलो.
गारपिटीने त्रस्त झालेला बळीराजा विलक्षण नैराश्यापोटी आत्महत्या करत सुटलाय आणि त्याच्या मागे राहिलेले विस्कटलेले कुटुंब छाती पिटत आक्रोश करते आहे हे दृश्य मला वाटतं की आपण सगळ्यांनीच अनेकवार पुन्हा पुन्हा अनेक वाहिन्यांवर पहिले आहे , अजूनही पाहत आहोत आणि डोळ्यांच्या कडेला जमा झालेले अश्रू हळूच टिपून घेतो आहोत. आता त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाचे काय होणार हा अस्वस्थ करणारा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात कित्येक दिवस घोळत राहणार यात शंका नाही.
शालेय अभ्यासक्रमात भूगोल अभ्यासताना 'भारत हा कृषिप्रधान देश आहे ' हे वाक्य वारंवार वाचनात आलेले मला स्मरते. पण स्वत: अहोरात्र खपून संपूर्ण देशाचे पोट भरणारा हा बळीराजा आज मात्र निष्ठुरतेचा, असंवेदनशीलतेचा फक्त बळी ठरला आहे . जिकडे बघावं तिकडे उजाड , उध्वस्त झालेली शेतं, मरून पडलेली जनावरं, झाडावरून खाली पडून निष्प्राण झालेली फळे, भाज्या, धान्ये दिसत आहेत. शेतकरी कुटुंबाचे विझलेले डोळे मनात कालवाकालव करत आहेत. त्यांना सकाळ-संध्याकाळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे, सावकारी कर्जाचा फास त्यांना सतत भेडसावतो आहे, आता यापुढील आयुष्य काढायचे कसे या विमनस्कतेतून धडाधड गळफास लावले जात आहेत.
हे चित्र कुठल्याही सहृदय माणसाच्या आतड्यास पीळ पडणारे आहे. पण शासन मात्र कोणत्या मातीचे बनले आहे कोण जाणे? ते काही केल्या द्रवत नाही हीच वस्तुस्थिती आहे. नुसते त्या पिडीत भागाचे दौरे करून, फुकटची पाहणी करून काय साध्य झाले आहे आतापर्यंत ? बरे मदत जाहीर करून झाली ती या बळीराजा पर्यंत नक्की कधी पोहोचणार ? नुसत्या कोरड्या आश्वासनांची खैरात करून कुठल्या शेतकऱ्याचे पोट भरणार? बळीराजा, तू अजिबात खचून जाऊ नकोस, आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ही मलमपट्टीची भाषा करणे फारच सोपे आहे परंतु याकरता उचलावी लागणारी ठोस पावले सरकार तिळमात्र ही उचलत नाही हीच सद्यस्थिती आहे उलट चुकीच्या, अवैध पद्धतीने या शेतांचे पंचनामे होत आहेत असे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते.
सध्या जिथेतिथे निवडणुकांचे वादळ घोंघावते आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यात सर्वच राजकीय पक्ष मशगुल आहेत. प्रचाराची राळ उठते आहे. मीच तेवढा कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याची अहमहमिका लागलेली आहे. त्या त्या नेत्याच्या नावाने मंत्र, चालीसा म्हटल्या जात आहेत, कवने-स्तवने यांना उधाण आले आहे , दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणारी उपहासपूर्ण भाषणे हे राजकारण्यांचे शस्त्र झाले आहे , पोस्टर्स, होर्डिंग, जाहीर सभा, इतरांची लफडी-कुलंगडी चव्हाट्यावर आणणे, जाहिरातबाजी यांना नुसता उत आला आहे. आता या सर्व राजकीय रणधुमाळीत बळीराजाच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे किंवा त्याच्या कुटुंबाच्या वाताहतीकडे कोण लक्ष पुरवणार आणि तेही निवडणुकांच्या तोंडावर? प्रत्येक वाहिनी मात्र इमाने इतबारे किती शेतकऱ्यांनी आजपर्यंत मृत्यूला कवटाळले याचे आकडे दाखवायचे काम करते आहे आणि प्रत्येक आकड्यागणिक सरकारच्या निष्क्रियतेचा प्रत्यय येत राहतो आहे.
आम्ही अमुक एक मदत जाहीर केली आहे असे म्हणून शासन यातून आपला पदर सोडवू पाहते आहे. गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, निवडणुका पुढे ढकला, शेतकऱ्याच्या प्रश्नाला अग्रक्रम द्या असे काही मतप्रवाह कानावर आले होते पण बहुधा सरकार दरबारी या कानाने ऐकून त्या कानाने या गोष्टी सोडण्यात आल्या असाव्यात. असेही ऐकिवात आले की कोणी नेते तिथे जाउन काजू-बदाम खात खात पिडीत भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत होते तर कोणी बाटल्या आणि कोंबड्यांचे सप्ते साजरे करित होते. गेंड्याचा अपमान का उगाच करायचा? सरकारची कातडी तर दिसामाशी त्यापेक्षा कित्येक पटीने निगरगट्ट, कोडगी होत चालली आहे. संवेदनाहीन माणसांचे प्रतिनिधित्व करताहेत ही सत्तेत बसून खुर्च्या उबवणारी माणसे! यांना हृदय हा अवयव तरी देवाने दिला आहे का याविषयी शंका निर्माण होते आहे जनतेच्या मनात. आणि यांना देशाचे नेते म्हणून संबोधायचे! का बुवा?
भारताला अग्रेसर करण्याची स्वप्ने दाखवत निवडणुका होतील, सत्तांतरे होतील, विजयाची दुंदुभी वाजेल, वरती काढल्या जातील, गुलालांची, पैशांची अमाप उधळण होईल. पण सामान्य जनतेचे प्रश्न मात्र कायम तसेच आणि तिथेच राहतील. इतक्या वर्षांचा अनुभवही तोच आणि तसाच आहे. एकदा का निवडणुका झाल्या की पुढली पाच एक वर्ष समस्त मतदारांकडे सहज पाठ फिरवता येईल. सत्ताधारी आणि विरोधकांचे शिशुवर्ग तसेच पुढे चालू राहतील. रस्ते, पाणी, वीज, घरे, कचरा, गटारे, भ्रष्टाचार, दैनंदिन प्रवास, महिलांवरील अत्याचार, महागाई , शिक्षण या अशा अनेक मुलभुत समस्या जैसे थेच राहतील आणि अग्रक्रम मिळेल राजकीय कुरघोड्यांना आणि त्या भांडवलावर गब्बर होणाऱ्या इतर घटकांना!
भारत या कृषिप्रधान देशात उपेक्षित राहण्याचा मान सर्वतोपरी बळीराजाला देण्यात येईल. भूगोलाच्या पुस्तकात लिहिलेला मजकूर आपण वाचू , 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' . हे वाक्य वाचताना बळीराजाचा खचलेला, केविलवाणा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येईल आणि आपण या वाक्याला हरकत घेऊन पुढे पुस्ती जोडू - नव्हे 'भारत हा आत्महत्याप्रधान देश आहे'.
काही दिवसांपूर्वीच मी बाजारातून नवीन 'android' खरेदी केला. स्मार्ट फोन हे आज्ञाधारक असावेतच अशा अपेक्षेनेच मी तो घेतला होता. इतर कोणी नाही तर या आपल्या मालकीच्या फोनने तरी आपलं म्हणणं ऐकावं अशी माफक अपेक्षा होती. सुरवातीला काही दिवस तो आज्ञाधारकपणे वागल्याने सुखाचे गेले
निरनिराळे गेम्स, फोटोज, गाणी, व्हीडिओज, लाइव्ह wallpapers, chats मजा येत होती. जे हवं ते क्लिक करून नव्हे नुसते टच करून मी मिळवत होते.
पण मग एक दिवस या फोनच्या अंगात आले. त्याला पुरेशी इलेक्ट्रिसिटी खाऊ घालूनही तो माझं काहीच ऐकेनासा झाला. नवा wallpaper डाऊनलोड कर म्हणून सांगितलं तर जुनाच wallpaper तो मला वारंवार दाखवू लागला. त्याला बहुधा 'जुनं ते सोनं' या म्हणीची आठवण येत असावी. त्यानंतर मी बुद्धीबळ खेळण्याचा प्रयास केला तर माझी महत्वाची मूव्ह चालली असताना याने एकदम डोळ्यांसमोर अंधार केला. मी शूटिंग बबल्स खेळताना तो मला मनाप्रमाणे शूट करू देईना. म्हणजे समोर आरोपी हात वर करून शरणागती पत्करून उभा आणि त्याचवेळेस पोलिसाच्या हातातली बंदूक घरंगळून खाली पडावी असा काहीसा सीन निर्माण झाला होता. त्यामुळे या खेळातही मलाच शरणागती पत्करावी लागली.
मी स्वत: संगीत शिक्षिका आहे. मला नुसता गळा 'अपडेट ' करून चालत नाही तर कानही अपडेट करावा लागतो. म्हणूनच मी वेगवेगळ्या शास्त्रीय गायक/ गायिकांची गाणी सातत्याने ऐकत असते. एखादा आवडीचा राग निवडून त्यातील बंदिश आवडत्या गायकाकडून ऐकावी म्हणून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फोनने नन्नाचा पाढा आळवण सुरु केलं. माझ्या आनंदाचं परिवर्तन घोर निराशेत झालं. आता काय करावं म्हणजे हा आपलं म्हणणं ऐकेल या प्रश्नाने माझं डोकं पुरतं पिंजून काढलं. माझी एक मैत्रीण म्हणाली म्हणून त्याला मी लटक्या रागाने चापट्या सुद्धा मारून पहिल्या . पण ज्याचं नाव ते! तो बहुतेक सुधारण्या पलीकडे गेला होता. त्याला न ऐकण्याचे जणू डोहाळेच लागले होते.
माझा सगळा राग त्याच्यावर निघूनही तो 'झपूर्झा' स्थितीतच होता. तुला मी ज्या सूचना देते त्या कशा कळत कशा नाहीत. तुझी बुद्धी राजकारणी लोकांसारखी नेमकी कुठे चरायला गेली आहे वगैरे प्रश्नांचा भडीमार लोकप्रिय वाहिनी वरील प्रसिध्द संचालकासारखा हातवारे करून केला तरीही माझा फोन केवळ स्थितप्रज्ञाची अवस्था दर्शवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एकही आठी , एकही सुरकुती नव्हती, त्याच्या भुवया ही वक्राकार नव्हत्या. थोडक्यात निर्बुद्ध आणि गेंड्याची कातडी पांघरलेले महाभाग जसे दिसतात तसाच तो मला वाटत होता. मला काय वाटते आहे याची त्याला जराही फिकीर नव्हती. एवढे पैसे खर्चून विकत घेतलेला हा गुणी , चपळ आणि स्मार्ट असे विशेषण असलेला फोन चक्क मला बधत नव्हता.
मी तुझे बिघडलेले डोके वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विडा मी तत्क्षणी उचलला. जाण्यायेण्यावर काही पैसे खर्च करून त्याचे डोके एकदाचे तपासून घेतले, त्याच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या आजारावर तात्पुरती का होईना उपाययोजना केली आणि त्याच्या वठणीवर आल्याची हमी मिळताच आनंदाने घरी परतले.
महागाई, निवडणुका , whats app, परीक्षा असे सगळेच तोंडावर असताना मला ऐनवेळी तोंडघशी पाडणारा हा फोन आता प्रेमाने किंवा धाकाने माझ्या आज्ञेत राहील यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. जय android !
शाळेतून १९७६ साली 'पास आउट ' झाल्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी जेव्हा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो तो सोहळा केवळ अपूर्व आणि शब्दातीत होता. एका डोळ्यात हसू आणि दुसरया डोळ्यात आसू अशी अवस्था बहुतेकांची झाली होती. अय्या असा आनंदोद्गार काढून एकमेकींना मिठी मारण्यातील सुख काय असतं ते आम्ही अनुभवलं. संपूर्ण कार्यक्रम अतिशय हृद्य झाला. प्रत्येकालाच जणू हरवलेलं बाल्य परत गवसलं होतं आणि आपल्या मुठीत ते आठवणींचे अमूल्य मोती साठवण्याचा जो तो प्रयास करत होता.
महर्षी दादासाहेब रेग्यांनी नावारूपाला आणलेली बालमोहन शाळा , त्यांचे 'बाळांनो 'असे मन हेलावून टाकणारे अतीव जिव्हाळ्याचे शब्द, 'अंतर मम विकसित करी हे परात्परा' ही पारंपारिक प्रार्थना असे अनेक क्षण आम्ही सर्वांनी पुन्हा एकवार लहान होत अनुभवले. डोळ्यांत साचणारे पाणी महत्प्रयासाने परतवायचा प्रयत्न माझ्यासारख्या अनेकांनी केला असेल.
आमच्या गिंडे बाई, सावे सर, वयाचे नव्वदी पार केलेले गायनाचे जोशी सर आणि आम्हा सर्वांचा वर्गमित्र आणि आज शिवसेना या पक्षाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर वाहणारा उद्धव ठाकरे या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. आमच्या 'ई ' तुकडीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयीची कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
ज्या आमच्या वर्गमित्रांनी अपार मेहनत घेऊन, आपल्या वर्गमित्र किंवा मैत्रिणींचा ठावठिकाणा शोधून हा सोहळा घडवून आणला त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. फोनाफोनी झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली तेव्हा एकेकाला किंवा एकेकीला भेटताना फार मजा आली. किती बदलला आहेस तू / बदलली आहेस तू, तू तेव्हा होतास/होतीस , तसाच /तश्शीच आहेस तू असे शब्द जिथून तिथून कानावर येऊ लागले. मग काय करतेस / काय करतोस इथपासून तुला किती मुलं इथपर्यंत गाडी आली. मग शाळेत असताना हुशार कोण, ढब्बू कोण , शांत कोण, टवाळ कोण याची चर्चा सुरु झाली.
आमच्या गुरुवर्यांचा सन्मान करण्यात आला, काही दिवंगत विद्यार्थी आणि गुरुजनांना भावांजली वाहण्यात आली. जे कुणी या सोहळ्यात काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नाहीत किंवा काही जणांचा थांगच लागला नाही अशांची यावेळी प्रकर्षाने आठवण झाली.
गप्पा, गाणी, नाच असा मनसोक्त धांगडधिंगा करून आम्ही आमचे वय विसरून अगदी शाळेत असल्यासारखे वागलो. उद्धवच्या शब्दांत 'पदार्थ विज्ञान ' सुद्धा छान जमून आले होते. आता थोड्याच वेळात एकमेकांचा निरोप घ्यायचा ही जाणीव मन हळवं करून गेली. मग पुढच्या वेळी कधी आणि कुठे भेटायचे याचे बेत आम्ही आखायला लागलो. सहलीला जाऊया अशीही टूम निघाली. सहा महिन्यातून एकदा की वर्षातून एकदा याचा विचारविनिमय सुरु झाला आणि अजूनही त्याला पूर्णविराम मिळालेला नाही. बघू पुनर्भेटीचा प्रत्यक्ष योग कधी येतोय ते !
आपला प्रपंच, मुले, कौटुंबिक जबाबदाऱ्या, दुखलं-खुपलं, कर्तव्ये, आपण भूषवत असलेले मानाचे हुद्दे या सर्व तपशिलांना तात्पुरते विसरण्याची ताकद शाळा नामक संजीवकात आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या प्रेरणादायी शिक्षकांत आहे यात कोणाचेच दुमत असायचे कारणच नाही.
शाळेमधले मित्र भेटले
पाय वयाचे मागे फिरले
चिंचा -बोरे, कैरया -पेरू
टपरी बुवाची शोधित बसले
वार्षिक सण अन प्रभातफेऱ्या
पाय चिमुकले हिंडून आले
गप्पा -टप्पा, मस्ती -गाणी
सहलीमध्ये हरवून बसले
नाटक -अंकामधले अंतर
कोड जिभेचे पुरवित आले
वडा -समोसा , इडली -चटणी
नाकाशी खमंग दरवळले
श्लोक -सुभाषित, कविता -गोष्टी
आठवणींचे मोती झाले
निबंध स्पर्धा, पठण -नाटके
विजयाचे सर गळ्यात आले
दिवाळी-नाताळाचे बक्षीस
उर्मी जयाची निर्मित आले
मूल्ये -संस्कारांची पखरण
नाती मनांची सांधित आले
अभ्यासाचे होई न ओझे
बाल्य न कोणी असे खुरडले
शिक्षण होते नव्हता धंदा
झाली न अभिमानाची शकले
आज सोहळा हा भाग्याचा
आनंदे मन भरून आले
पाऊलवाटेवर शाळेच्या
क्षण सोन्याचे वेचित आले