“Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.”
―
Mahatma Gandhi
Happiness is not something ready made. It comes from your own actions.”
―
Dalai Lama XIV
सुखाची परिभाषा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. दोन वेळा अन्नाची भ्रांत असलेल्यास एक वडापावही सुखप्राप्ती करून देऊ शकतो तर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेल्या भागात अर्धा बादली पाणी आंघोळीसाठी मिळणे ही सुखाची परमावधी होऊ शकते. इथे सुख हे साधनांशी म्हणजेच वडापाव किंवा पाणी ह्या गोष्टींशी निगडीत आहे. परंतु भौतिक सुखाची सर्व साधने उपलब्ध असूनही माणसे सुखप्राप्तीच्या शोधात फिरताना दिसतात. अनेक वैध वा अवैध मार्गांनी आपली सुखाची झोळी कशी भरेल या शोधार्थ अनेकजण भटकत असतात. वास्तविक पाहता सुख,आनंद,शांती ह्या खऱ्या तर माणसाच्या सहज(natural ) प्रवृत्ती आहेत. परंतु शिक्षण,हुद्दा, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा,स्थावर जंगम इस्टेट,गाड्या या संपादित (acquired ) गोष्टींच्या मांदियाळीत त्या कुठेतरी
वळचणीला पडल्या आहेत.
घरीदारी ऐश्वर्यलोलुप जीवन जगणारा माणूस जेव्हा ती आत रिक्त राहिलेली सुखाची-समाधानाची-आनंदाची पोकळी भरण्यासाठी बाहेर उपाय शोधत राहतो तेव्हा सुख हे कोणत्याही बाह्य किंवा जड साधनांशी निगडीत नाही हे प्रत्ययास येते.
आईवडील मुलाला म्हणतात तू येत्या परीक्षेत इतके मार्क मिळव म्हणजे आम्हाला आनंद होईल. परीक्षा देणाऱ्या मुलाला वाटते की उत्तम मार्क मिळवणे का एकच आपल्या आईवडिलांना सुखी करण्याचा मार्ग आहे. मग मुलाला आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील की नाही या विवंचनेत आईवडील आपली दिनचर्या व्यतीत करतात आणि आपण उत्तम अभ्यास केला तरी आईवडिलांच्या अपेक्षा पुऱ्या करून त्यांना आनंद देऊ शकू का या तणावात मुलाचे दिवस जातात. वाशी येथे राहणारी जिया एक अतिशय अभ्यासू,प्रामाणिक मुलगी. वर्गात बहुधा दुसरी वा तिसरी येणारी. चित्रकलेत कमालीचा हात ! दहाव्वीचे वर्ष त्यामुळे घरीदारी फक्त अभ्यासाच्याच परवचा आणि अभ्यासाचेच श्लोक. धनुर्धर अर्जुनापेक्षाही लक्ष अभ्यासावर जास्तच एकाग्र करावे यासाठी पालकांचा व शिक्षकांचा प्रचंड आटापिटा. जिया शाळा,कोचिंग क्लास आणि चित्रकला या सर्वांचा समतोल नीट सांभाळत असते. तिला प्रिलिम्स मध्ये ८९.७० % मिळतात. हातात मार्कशीट येताक्षणी ती विलक्षण कासावीस होते. आईवडिलांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळतात. ती त्याच मानसिक अवस्थेत घरी येते. आतल्या खोलीत जाऊन आपल्या छंदातून ताण हलका करू पाहते. वडील घरी आल्यावर आधी कमी मार्क मिळाल्यामुळे रणकंदन होते. पण मग फायनलला ८९ च्या विरुध्द म्हणजे ९८ मिळवीन असे मला प्रॉमिस कर असे वडील आज्ञार्थी प्रेमळपणे सांगतात. जिया कसेबसे प्रॉमिस करते. ती या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा पुढचा शैक्षणिक प्रवास तिच्या आईवडिलांनी अगोदरच आखलेला असतो. शिक्षणाचा तो टप्पा गाठल्यानंतरच ते सुखाने श्वास घेऊ शकणार असतात. शाळेतील,क्लासमधील शिक्षकांकडून 'Exam is like a war. Either you win or you loose. So fight.' असा मोलाचा सल्ला दिला जातो. जियाला तर आपण प्रत्येक क्षणी रणांगणावर आहोत असे वाटू लागते. ती हतबल होते, मनोमन निराश होते. आपण आईवडिलांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही अशी तिची खात्री होते आणि ती एक निर्णय घेते. मित्राकडे पार्टीला गेलेले आईवडील घरी परततात तेव्हा त्यांना पलंगावर पडलेले जियाचे निष्प्राण शरीर दिसते आणि काही महिन्यांपूर्वी घरात नांदणारे सुख कापरासारखे केव्हाच उडून गेलेले असते.
अ नामक इसम नवी कोरी करकरीत मारुती गाडी खरेदी करतो. मनासारखा रंग, आतील सोयी, मऊ गुबगुबीत उशा त्याला मनोमन सुखावतात. तो त्या गाडीतून फिरायला बाहेर पडतो. सुखाची, आनंदाची चव चाखत प्रवास सुरु असतो. एके ठिकाणी सिग्नलला गाडी थांबते. सहज अ चे लक्ष शेजारी जाते. त्याच्या गाडीच्या शेजारी अलिशान, जास्त गतिमान, तरलपणे रस्ता कापणारी, अद्ययावत, जास्त capacity असलेली मर्सिडीज उभी असते. त्या मर्सिडीजचा चालक अ च्या गाडीकडे काहीशा तुच्छतेने पाहतो. आता अ ची सुखाची संकल्पना पूर्णपणे जमीनदोस्त होते. त्याला आपली गाडी मर्सिडीज पुढे अगदी क्षुल्लक वाटू लागते. काही क्षणांपूर्वीचा त्याचा हसरा चेहरा आता पूर्णपणे म्लान होतो. त्याच्या सुखाच्या व्याख्येलाच छेद जातो.
ऋतु आहुजा गिफ्ट म्हणून मिळालेल्या साडीकडे पुन्हा पुन्हा पाहते. या साडीचा रंग, पोत तिला खूप आवडलेला असतो. तिच्या अंदाजाने ती साडी कमीत कमी तीन-चार हजाराची असणार असते. इतकी सुंदर साडी नेसून परवाच्या नीलम अरोराच्या पार्टीला आपल्याला जाता येईल म्हणून ती मनोमन खूष होते. तिला सुखाच्या हिंदोळ्यावर असल्यासारखे वाटते. एवढ्यात तिच्याकडे तिची एक मैत्रीण येते. ऋतु तिला अगदी कौतुकाने ती साडी दाखवते. ती साडी बघताच मैत्रीण उद्गारते, 'अगं अशी साडी परवाच मी एका प्रदर्शनात पहिली. पाचशे रुपयांना मिळत होती.' ऋतु चा सगळा आनंद मावळतो. सुख विरघळून जातं. कारण तिची सुखाची कल्पना त्या साडीच्या किमतीशी निगडीत असते.
सुखाचा विचार हा जरी साधनांमुळे निर्माण झाला असला तरी कोणतीही जड वा निर्जीव साधने सुख निर्माण करू शकत नाहीत. नाहीतर या साधनांनी सर्वांना सारखंच सुख दिलं असतं. एखाद्याला आवडलेली वस्तू दुसऱ्याला आवडतेच असे नाही पण ती दुसऱ्याला आवडली नाही म्हणून सुख देण्याच्या दृष्टीने तिचे मूल्य कमी झाले असे समजणे ही वैचारिक अपरिपक्वता आहे.
इतरांच्या यशापयशावर आपले सुख वा आपला आनंद अवलंबून ठेवणे हे असमंजस वृत्तीचे निदर्शक आहे. सुख वा आनंद हा ज्याचा त्याचा वैचारिक गाभा आहे. सुख अथवा दु:ख हे विचारांतूनच निर्माण होत असतं. भोवती वावरत असलेली माणसे त्यांच्याकडे असलेली माहिती आपल्याकडे प्रवाहित करतात आणि या मिळालेल्या अनुकूल वा प्रतिकूल माहितीच्या आधारे आपले विचार जन्म घेतात. इतरांच्या सुखाचे संदर्भ हे आपल्या सुखाच्या संदर्भापेक्षा वेगळे आहेत परंतु आपले सुखाचे संदर्भ आपल्यासाठी अमुल्य आहेत हे ज्याला वेळीच कळते तो सर्वार्थाने सुखी होतो.
“It is not in the stars to hold our destiny but in ourselves.”
―
William Shakespeare
"The only person you are destined to become is the person you decide to be.”
―
Ralph Waldo Emerson
आपल्याकडे फार वर्षांपासून दोन समज समांतर चालत आलेले आहेत. एक म्हणजे 'या जगात जे काही घडते ते केवळ त्या विधात्याच्या मर्जीनुसार', आणि दुसरा समज असे सांगतो की ' जसे आपण पेरतो तसे उगवते,
( as you sow, so shall you reap) आपण हे दोन्ही समज आजमितीलाही उराशी बाळगून आहोत. पहिल्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी त्या जगनियंत्याची! दुसऱ्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आपली. कारण जे कर्म आपण केले आहे तेच आज आपल्या दैवाच्या रुपात समोर येउन ठाकले आहे. यावर थोडे चितन केले तर असा निष्कर्ष सहज काढता येईल की हे दोन्ही समज किंवा दोन्ही विचारप्रवाह एकत्र work out होऊ शकत नाहीत. एकतर पहिला समज तरी खरा असू शकतो किंवा दुसरा. बहुतांश लोकांना पहिला समज जास्त सोयीस्कर वाटू शकतो कारण काहीही घडल्यास 'त्याची' जबाबदारी म्हणून हात झटकता येऊ शकतात. दुसरा समज जास्त तर्कशुध्द वाटत असेल तर त्यानुसार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या बऱ्या -वाईट गोष्टींची जबाबदारी वा श्रेय फक्त आपलेच असू शकते.
आपण पेरलेले बीज काय दर्जाचे (quality ) आहे यावर त्याला येणारे फळ अवलंबून असते. साधा तांदूळ पेरला तर बासमती उगवू शकत नाही. इथे बीज पेरणे म्हणजे विचारांचे बीज पेरणे. भिंतीवर फेकलेला बॉल जेव्हा rebound होऊन परत येतो तेव्हा त्याचे फूल न होता तो त्याच स्वरुपात येतो. इथे बॉल हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह विचारांचे द्योतक असेल तर त्याच दर्जाचे,प्रतीचे विचार परावर्तीत होऊन आपल्याकडे येतात. शब्दांपेक्षा विचारांमध्ये जास्त शक्ती असते. बरेच वेळा एखाद्या व्यक्तीसमोर शब्द चांगले बोलले जातात परंतु मनातील विचार मात्र त्या शब्दांशी विसंगत असू शकतात. म्हणजे वेष्टन चांगलं पण आतील वस्तू हीन दर्जाची असा प्रकार असू शकतो. शब्दांना चांदीचा वर्ख कितीही चढवला तरी आपल्या मनातील विचार energy च्या स्वरुपात त्या माणसापर्यंत पोहोचतातच. आपल्या वरवरच्या वाक्चातुर्यामुळे आपण या विचारांच्या energy चा दर्जा बदलू शकत नाही. परिणामी त्याच विचारांनी भारलेली उर्जा (energy ) आपल्याकडे परतून येते आणि यालाच आपण नशीब असे संबोधतो.
वैचारिक बैठक >विचार >शब्द >कृती >साचा >व्यक्तिमत्व असा हा एकंदर प्रवास असतो. अमुक एक विचार करणं, विशिष्ट शब्द उच्चारणं,त्याप्रमाणे कृती अथवा आचरण करणं हा एखाद्याच्या सवयीचा भाग होतो आणि मग यातूनच एक व्यक्तिमत्व आकाराला येतं. परंतु आपले व्यक्तिमत्व ही आपली निवड (choice ) असते. कारण यासाठी लागणारे raw material म्हणजेच वैचारिक बैठक (belief system ), विचार (thoughts ), शब्द (words ), कृती (action ) आणि साचा (pattern ) आपलेच असते. ज्या प्रकारचे विचार त्या प्रकारची उर्जा सभोवताली प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या -वाईट घटनांचे निर्माते आपणच असतो. हे एकदा मनोमन स्वीकारल्या नंतर आपल्या सत्कृत्यांची अथवा दुष्कृत्यांची जबाबदारी त्या परमेश्वराची साहजिकच राहत नाही.
आज भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा यासाठी अनेकजण हट्ट धरून बसले आहेत. कोर्टातही गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली जाते. गीतेच्या तत्वज्ञानाचा उहापोह आजवर अनेक प्रकांड पंडितांनी केला आहे. पण यातील 'जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला त्याला पुनश्च जन्म निश्चित
आहे ' या भगवान श्रीकृष्णांच्या तत्वज्ञानावर खरोखर किती जणांचा विश्वास आहे? या जगात प्रत्येकाला फक्त एकदाच जन्म मिळतो असे गृहीत धरले तर मग प्रत्येकाचे आयुष्य इतके वेगळे कसे? एकाच घरातील भावंडाचे नशीब एवढे वेगळे कसे ? कुणी महालात तर कुणी झोपडीत, कुणी राव तर कुणी रंक,कुणी आस्तिक तर कुणी नास्तिक, कुणी संत तर कुणी राक्षसी प्रवृत्तीचे, कुणी सुखी तर कुणी दु:खी, कुणी शरीराने धडधाकट तर कुणी अपंग अशा असंख्य तफावती कशा? परमेश्वराला जर दयेचा,करुणेचा सागर मानले तर तो या तफावती कशा निर्माण करू शकेल? आपली सर्व लेकरे सुखी व आबाद रहावीत असेच त्याला वाटेल ना ? कर्मयोगाची महती सांगणारे भगवान श्रीकृष्ण, रामकृष्ण, विवेकानंद हे चुकीचे आहेत का?
पण स्वत:वर जबाबदारी घेतली तर आपले दैव बदलण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच येउन पडेल या भीतीने म्हणा आज कुठे काही खुट्ट झाले की माणसे वर बोट दाखवून मोकळी होतात. आज माणसे ही हृदय, मन असलेली संवेदनाशील व्यक्ती न राहता केवळ पैसे कमावण्याचे साधन होऊन राहिली आहेत. एवढे श्रम करून आणि वारेमाप पैसे कमावूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कधी सुखशांती विलसताना दिसत नाही. जो तो फक्त अधिकाधिक पैसे आणि त्या पैशांनी मिळणारी भौतिक सुखे कमावण्याच्या नादात मग्न असतो. पैशाने अन्न मिळू शकेल पण पोटाला भूक असेल तर त्याचा उपयोग. पैशाने उत्तम प्रतीची मखमलीची बिछायत मिळेल पण त्यावर निद्रा आली तर तरच त्याचे महत्व. सर्व भौतिक वस्तू ही सुखाची साधने आहेत पण ते अंतिम सुख नव्हे. आणि म्हणूनच सगळे राजवैभव उपभोगूनही मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या अतृप्त राहिलेला राजकुमार सिद्धार्थ सर्वसंगपरित्याग करून चिरंतन शांतीच्या शोधात निघाला आणि त्यातूनच गौतम बुद्धांचा जन्म झाला.
आज आजूबाजूची परिस्थिती जी बाजारू,हिंसक,विध्वंसक,विकृत,आपमतलबी होताना दिसते आहे ती अनेक सामुहिक विचारांचा परिपाक आहे. परिस्थिती बदलायची असेल तर आज आपले विचार बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुखाचे आभास निर्माण करणाऱ्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा खरे सुख कशात आहे हे जाणून घेतले तर आयुष्य सुसह्य होण्याला मदत होईल. मुख्य म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीवर आपला इलाज नसला तरी आज चांगले विचार व त्यानुसार आचार केला तर आपल्या सगळ्यांचेच भविष्य उज्ज्वल असेल हे सांगायला कोणत्याही तथाकथित ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही.
मार्क ट्वेनचा तुलनेसंदर्भातील विचार पहा, ' “Comparison is the death of joy.”
Shenon Alder यांचे या संदर्भातील सूचक वाक्य पहा, “The battle you are going through is not fueled by the words or actions of others; it is fueled by the mind that gives it importance.”
प्रत्यक्षात मात्र या तुलनेची प्रचीती आपणा सर्वांना जळीस्थळी येत असते. या संदर्भातील एक सत्य घटना मी इथे नमूद करू इच्छिते जी अनेकांसाठी 'eye opener' ठरू शकेल.
दिल्लीत अ आणि ब ही दोन कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होती. अ घरातील मुलीशी ब घरातील मुलाची सतत तुलना केली जायची. आणि ही तुलना करणारी दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द त्या मुलाची आई होती. तिने बघ किती छान मार्क मिळवले नाहीतर तू. सगळेजण बघ तिचे किती कौतुक करताहेत, आपल्या गल्लीतही ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाली आहे. मला तुझे कौतुक करायची आणि ऐकायची अशी संधी कधी मिळणार आहे कोणास ठाऊक? त्या मुलाच्या कानावर ही मुक्ताफळे पडणे हे नित्याचेच झाले होते. प्रथम प्रथम तो आईच्या या उपहासपूर्ण बोलण्याने आतल्या आत निराश व्हायचा, खच्ची व्हायचा, न्यूनगंडाने त्याला पुरेपूर घेरले होते. पण मग जसजसे दिवस,महिने आणि वर्षे उलटली तेव्हा या न्यूनगंडाची जागा संताप, द्वेष आणि कमालीचा तिरस्कार या भावनांनी घेतली. ती मुलगी घरी आली की तो तिच्याशी अवाक्षर ही न बोलता निघून जायचा. रस्त्यात ती दिसली की फूटपाथ बदलायचा. परंतु त्याच्या या वृत्तीचा अर्थ मात्र त्या मुलीला कधी उमगलाच नाही. कारण त्यांच्या घरातील या प्रकारच्या तणावाबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. त्याचा हा विक्षिप्तपणा तिच्या लक्षात आल्यावरही तिने त्याला काहीही विचारले नाही व त्याच्या वागण्याकडे कानाडोळा केला. यथावकाश तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिला मुंबईला नोकरी मिळाली. appointment letter हातात पडताच तिच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शेजारी सुद्धा ही बातमी गेलीच. झाले. त्या मुलाच्या आईने त्या मुलाला टोमणे मारले, त्याचा उद्धार केला आणि तिच्या तुलनेत तो कसा क्षुद्र आहे ते जाणवून दिले. तो मुलगा आतून संतापाने,द्वेषाने,तिरस्काराने खदखदत होता. आता त्याला त्याच्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची होती. काहीएक योजना त्याच्या मनात आकार घेऊ लागली. ती मुलगी नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईला निघाली. सोबत तिचे वडील होते. आपल्या मनात नव्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवत ती मुलगी दादर स्टेशनवर उतरली आणि तिच्या खांद्यावर कुणीतरी थोपटले म्हणून तिने मागे वळून पहिले आणि डोळ्यांचे पाते लावते न लावते तोच तिच्या चेहऱ्यावर कुणीतरी acid टाकले आणि तिच्या चेहऱ्याबरोबर तिची स्वप्नेही जाळून खाक झाली. तिच्या वडिलांच्या दृष्टीने हा सगळाच प्रकार अनाकलनीय असाच होता. तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले परंतु जवळजवळ आठवड्या भरातच तिने या जगाचा निरोप घेतला. तपासाअंती कळून आले की त्या शेजारच्या मुलानेच सूड भावनेपोटी हे कृत्य केले होते. त्याने पोलिसांना सांगितले कि त्या मुलीशी माझे काहीच वैमनस्य नव्हते पण आईच्या सततच्या तुलनेला कंटाळून मनाच्या प्रचंड वाईट अवस्थेत मी हे केले. त्याच्या आईला हे ऐकून जबर मानसिक धक्का बसला. दोन्ही कुटुंबातील एकी या एका घटनेने नष्ट तर झालीच शिवाय मानसिक दृष्ट्या दोन्ही कुटुंबेही उध्वस्त झाली.
जन्माला आलेले प्रत्येक मुल हे जसे काही शारीरिक संस्कार घेऊन जन्माला येत असते तसे काही मानसिक,भावनिक आणि कार्मिक संस्कार घेऊन जन्माला येत असते. त्यामुळेच प्रत्येकजण हा दुसऱ्या पेक्षा वेगळा असतो परंतु कमी किंवा जास्त नसतो. एका मुलामध्ये असलेली एखादी विशेषता दुसऱ्या मुलात असतेच असे नाही पण त्याच्यात काही खास गुण असू शकतो जो इतरांत नसतो. पण घरीदारी लहानपणापासूनच आपल्याला एकाच फूटपट्टीने मापले जाते. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेव, त्याचे काहीतरी गुण घे असे सांगितले जाते म्हणजे थोडक्यात इतरांचे अनुकरण कर पण स्वत:तील विशेषत्वाला किंवा सत्वाला मारून टाक असेच अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते. हे कितपत योग्य आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
या तुलनेपायी अनेक मुले आज शालेय जीवनातील निर्भेळ आनंदाला वंचित होतात. मुलांमधील सुप्त गुणांचा योग्य विकास होत नाही परिणामी अशी मुले मनोमन खुरटतात तरी किंवा बंडखोर अथवा विकृत होतात. त्यांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीवर तुलनेची गदा येते आणि फुले उमलण्याआधीच कोमेजून जातात. अनेक पालकांना वाटते की तुलना केली म्हणजे तरी आपले पाल्य सुधारेल पण त्यांना हे कळत नाही की अशी सततची तुलना करून आपण आपल्या मुलाला भावनिक दृष्ट्या कमकुवत करतो आहोत. त्याला निराशेच्या गर्तेत ढकलतो आहोत. त्याच्या मनातून येणारी उजेडाची तिरीप आपण या सततच्या तुलनेने कायमची विझवतो आहोत.
प्रत्येक मुलाला जन्मत:च एक सुंदर देणं लाभलेलं असतं ते म्हणजे विचारांचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच. त्याला जर पालकांनी प्रोत्साहनाच खतपाणी घातलं व त्या विचारांचा सन्मान केला तरच रोप सर्वार्थाने बहरेल नाहीतर सततच्या तुलनेच्या घणाघाती फावड्याने अकालीच कुस्करून जाईल.
आपण शिक्षण नक्की कशासाठी घेतो याचा बहुधा आज बहुतांश लोकांना विसर पडत चालला आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. स्वत: शिक्षित होऊन स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला त्याचा उपयोग करून देता येत असेल तरच त्या शिकण्याला काही अर्थ आहे. केवळ उद्याच्या अवास्तव ' pay package' कडे लक्ष ठेऊन त्या दिशेने व त्या उद्देशाने शिकणारा विद्यार्थी आज शाळा घडवत आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
पहिल्या पाचात येणारे विद्यार्थी हे शाळेचे 'brand ambassador' समजले जातात. या विद्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव केवळ उज्ज्वल होणार नसते तर यामुळे अनेक grants, donations मिळण्याचा मार्ग सुकर होणार असतो. यांच्या शैक्षणिक प्रगतीवर शाळा आपल्या उत्कर्षाचे इमले बांधत असतात. अशा रेस मध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळांचा शैक्षणिक जुगार चालू असतो. हे आजच्या बऱ्याच शाळांचे चित्र आहे.
बरं शाळांना किती दोष देणार? काल आस्था अगरवाल हिचा channels वर interview काय दाखवला, IIT चे फोन अव्याहत खणाणू लागले. तिला जर facebook ने २.५ कोटी चे pay package ऑफर केले आहे तर भविष्यात माझ्या मुलाला किंवा मुलीलाही ते मिळू शकते या विचारांनी पालकांचा एवढा ताबा घेतला की आता सहावी-सातवीतच त्यांना IIT चे कोचिंग मिळू शकेल काय याचा विचार करण्यात आता त्यांचे अनेक दिवस अन रात्री जातील.
मुलांच्या पाठीवरील ओझे आणि मनावरील स्पर्धात्मक अभ्यासाचा ताण कमी करावा असे आज अनेक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञ सांगत आहेत. कोवळ्या वयात लादलेल्या अपेक्षांची पूर्तता करताना निर्माण होणारा अंतर्गत तणाव अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आहे. हे माहित असूनही परिस्थिती आणि अपरिहार्यता या सबबी पुढे करून शाळा आणि पालक आपापल्या महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर अविरत लादत असतात.
आता थोडा तर्कशुध्द रीतीने काही गोष्टींचा विचार करायला हवा. IIT तज्ञांच्या मते, एकूण सीट्स १०००० आणि पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ ते ६. ५ लाख. म्हणजे IIT मध्ये प्रवेश मिळेल याची संभवनीयता अर्थात probability किती? त्यात आस्थाने ज्या शाखेचे शिक्षण घेतल्याने तिला हे यश प्राप्त झाले त्या शाखेच्या किती सीट्स? शिवाय तिला मिळालेले pay package हे तसे दुर्मिळ कोटीतले त्यामुळे ही शक्यता सुद्धा इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत तशी धूसरच नव्हे काय? तरीही आपापल्या पाल्याला नेमके त्याच शाखेचे IIT मधील शिक्षण मिळावे यासाठी पालकांची ही तडफड पहिली की वाटते खरेच हि यांनी जन्माला घातलेली मुले आहेत की पैसे generate करण्याच्या संस्था आहेत?
आज इंजिनियरिंग चे शिक्षण घेऊन विद्यार्थी फायनान्स ला जातात हा त्या घेतलेल्या शिक्षणाचा व्यय नाही का? आज 'research &development' ला न जाण्याचे नक्की कारण काय? या बाबतच्या शैक्षणिक सुधारणा करण्याबाबत सरकार पुरेसे गंभीर आहे का? मुळात अशा प्रकारच्या फक्त पैसा हे अंतिम लक्ष्य ठेवून त्यानुसार केवळ त्याच प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ करणाऱ्या शिक्षण संस्था तितक्याच दोषी नाहीत का?
या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता आपली आपणच शोधायची आहेत. मुलांचा फक्त शैक्षणिक बुद्ध्यांक वाढवून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक संपुष्टात आणणारे हे शिक्षण समाजमान्य कसे होऊ शकते? आपण उद्याचे उत्तम नागरिक तयार करतो आहोत की operating machines हा विचार करण्याची वेळ येउन ठेपली आहे इतके हे वास्तव भयानक आहे. प्रेम, समानूभूती, दया, आदर, अनुकंपा,विवेक, संयम, शांती अशा काही मानवी मूल्यांच्या खुणा जतन करणारे शिक्षण यापुढे मिळणार आहे की धाप लागेपर्यंत जीवघेणे धावा आणि जमेल तितकी माया ओरबाडा असा संदेश घरीदारी दिला जाणार आहे? मुलांच्या वैयक्तिक आवडीनिवडीला तिलांजली दिली जाऊन यावर काळाची गरज या सबबीखाली फक्त अमाप पैसा असलेले व्यवसायच त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे?
शिक्षण हवे ते माणसाला दुसऱ्या माणसाशी वैचारिक दृष्ट्या जोडण्यासाठी. पण आज बाहेरील प्रचंड ताण निर्माण करणाऱ्या स्पर्धांमुळे माणूस माणसापासून तुटत चाललाय. इर्षा, द्वेष,असूया, हाव, आर्थिक ताकद, अहंकार असे सगळे अवगुण जिथेतिथे तणासारखे माजले आहेत, फोफावत आहेत. या सगळ्यात चिरडले जाते आहे, कोमेजले जाते आहे ते बालमन. 'बाल्य' हा शब्दच कालबाह्य होत चाललाय. तू खूप मोठा हो म्हणजे खूप पैसे कमव असा त्यामागील अर्थ आहे.
जन्म आणि मृत्यू या टोकांमधील प्रवास सहज,सुंदर व निखळ आनंदाचा व्हावा यासाठी जीवन असतं. सुदृढ मन आणि सुदृढ शरीर घेऊन आपण मार्गक्रमणा केली तर आपोआप हा प्रवास अधिक छान, रमणीय होतो. आपल्या आवडीनुसार आपण या जीवनप्रवासात रंग भरू शकतो. त्याला योग्य तो आकार देऊ शकतो. आयुष्य एकदाच मिळते व ते अनमोल असते असे वाचले आणि अनेकदा ऐकलेले सुद्धा असते मग अशा आयुष्यात रंग भरून ते सुरम्य करण्यासाठी कुंचला सुद्धा आपल्याच हातात हवा ना? आपल्याला मिळालेले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे की त्याची किल्ली इतरांच्या हातात द्यावी हा निर्णय ज्याने त्याने घ्यावा.
आपली मुले ही आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची साधने नसून, त्या स्वत: पूर्ण विचार करून निर्णय घेणाऱ्या सक्षम व्यक्ती आहेत हे आज पालकांनी मनोमन समजण्याची गरज आहे. त्याचबरोबर पैसा हा जरी अपरिहार्य असला तरी आनंदाचा आणि सुखाचा तो एकमेव मापदंड नाही हेही लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
काही वर्षांपूर्वी एका ट्रकच्या मागील बाजूला मी हा सुविचार वाचला होता. त्या ट्रक मालकाला हा सु-विचार कसा सुचला असेल याचा त्यानंतर मी विचार करत होते. आपण अनेकजण असे विचार येताजाता वाचत असतो खरे परंतु तो विचार आत्मसात करून, त्यावर मनन करून तो आचरणात आणणारे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात.
आज प्रत्येकानेच स्वत:चे विचार पुनश्च तपासून पाहण्याची गरज आहे. अशा विचारांचा स्त्रोत अथवा मूळ बदलण्याची गरज आहे. कारण प्रत्यक्ष चोरी करण्या आधी ती चोरी विचारांत झालेली असते. समाजविघातक कृत्ये घडण्याआधी ती करणाऱ्यांच्या मनात घडलेली असतात. मनात विचार येणं, ते बोलून दाखवणं आणि त्याप्रमाणे योजनाबद्ध कृती घडणं हे आज आपण सर्रास बाहेर अनुभवत असतो. जळीस्थळी याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना आलेला असतो. सगळी माणसे अशी गैर कृत्ये करत नसली तरी आपल्या विचारांना बरेच वेळा योग्य दिशा देऊ शकत नाहीत.
अनेक वेळा माणसे इतरांचे विचार बदलण्याचा खटाटोप करतात. त्याने असे वागले पाहिजे, तिने असे वागता कामा नये असे मतप्रदर्शन वारंवार करतात. परंतु हीच माणसे स्वत:चे विचार बदलण्याचा विचारही मनात आणत नाहीत. आपण इतरांना बदलू शकत नाही हे प्रत्येकाने मनात अधोरेखित करण्याची गरज आहे. दुसऱ्याचे विचार माझ्या नियंत्रणात नाहीत पण माझे विचार माझ्या नियंत्रणात असू शकतात या वास्तवाचा स्वीकार माणसे करताना दिसत नाहीत. एकाच कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार जर सारखे असते तर मग कौटुंबिक वाद हे उद्भवलेच नसते. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाचे विचार जर परस्परांशी जुळले असते तर समाजात एकोपा,शांतता नांदली असती.
परंतु असे घडत नाही याचे कारण प्रत्येकाच्या विचारांची बैठक वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती तिच्याबरोबर निराळे 'संस्कार' घेऊन आलेली असते. प्रत्येकाचे एक logic असते त्यानुसार ती व्यक्ती वागते, आचरण करते. ते त्या व्यक्तीच्या दृष्टीने योग्य असते म्हणूनच ती करत असते. तिचे वर्तन चूक की बरोबर ही बाब सर्वस्वी वेगळी पण तिच्या वागण्यावर किंवा विचारांवर आपले नियंत्रण असू शकत नाही. समोरची व्यक्ती सिगारेट ओढते हे आपल्याला गैर वाटून आपण त्या व्यक्तीच्या तोंडातील सिगारेट हिसकावून फेकली तर आपल्या अशा कृत्याने तिची सिगारेट ओढण्याची सवय नष्ट होईल का याचा विचार आपण करायला हवा. आपण अशा व्यक्तीपासून दूर राहण्याचा विचार जरूर करू शकतो कारण त्या व्यक्तीच्या विचार किंवा आचारावर आपले नियंत्रण असू शकत नाही.
काही वेळा परिस्थिती अशी येते की माणसे हतबल होतात. समजा सकाळच्या वेळी आपली गाडी traffic मध्ये बराच वेळ अडकली आहे. आपल्याला ऑफिसला पोहोचायला उशीर होणार हे उघड आहे. आपल्यासारखीच इतरही अनेक माणसे त्यांच्या वाहनांमध्ये खोळंबली आहेत. अशा वेळी प्रामुख्याने आपल्या मनात काय काय विचार येतात. 'आजच उशीर व्हायचा होता, माझी महत्वाची मिटिंग आहे, काय कटकट आहे या traffic ची, आता मला उशीर होणार, बॉसची बोलणी उगाचच खावी लागणार, इतरांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा होणार, माझ्या प्रमोशनवर गदा येणार, तो लेले माझ्या पुढे जाणार, आज रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार, बायकोला प्रॉमिस केले होते की लवकर येईन म्हणून, बाहेर जाणार होतो, शी! सगळ्या plan चा चुथडा झाला' या सगळ्या विचारांनी आपण पुरते घेरले जातो. पण या विचारांचे जनक आपणच असतो ना? शिवाय या विचारांनी traffic jam सुटतो का? हे विचार बरोबर घेऊनच आपण ऑफिसला जातो. परिस्थितीचा राग आपण ज्याच्या त्याच्यावर काढतो आणि अनेक मने दुखावतो. आपल्या त्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. आपला सबंध दिवस अर्थातच वाईट जातो. उरलेल्या यातना आपण घरी भोगतो. त्रास होणे हे जरी साहजिक असले तरी तो किती करून घ्यायचा आणि त्यामुळे इतरांना किती द्यायचा हे आपल्या विचारांतच असते ना?
दुसरी माणसे आणि परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या कक्षेबाहेर असतात. अमुक एक परिस्थिती उद्भवल्यास अथवा अमुक एक व्यक्ती आपल्याशी विशिष्ट प्रकारे वागल्यास नेमका कशाप्रकारे विचार करायचा हे शिकवणाऱ्या शाळा नाहीत पण आपल्या मनात अशा वेळी येणाऱ्या विचारांना नेमकी दिशा कशी द्यायची या करता आज त्या संबंधीचे विपुल वाचन, आत्मपरीक्षण, मनन आणि चिंतन करण्याची खरी आवश्यकता आहे. कुटुंब आणि समाज सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनातील विचार आणि विचारांचा स्त्रोत सुयोग्य दिशेने वळवण्याची गरज आहे.
मनाच्या मुळाशी प्रत्येकाने उत्तम व योग्य विचारांचं खतपाणी घातलं तर आणि तरच नशीब म्हणजेच future आपल्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येईल.
एक अतिशय सुंदर विचार मला या ठिकाणी उद्धृत करावासा वाटतो:
'ज्याप्रमाणे तुम्ही रोज चोखंदळपणे आपल्यावर सुंदर दिसतील अशा कपड्यांची निवड करता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी योग्य विचारांची निवड करा. कारण ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुमच्या नियंत्रणात असू शकते.'
मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आपला हात भविष्य समजून घेण्यासाठी ज्योतिषापुढे पसरत भाजपच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. याच्या निषेधार्थ जवळजवळ सर्व channels नी आपापला आवाज उठवला. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. वास्तविक पाहता अनेक दिग्गज राजकारणी, उद्योगपती, अभिनेते आणि समाजातील इतर प्रतिष्ठित यांची ज्योतिषांकडे व्यवस्थित उठबस असते. अनेकांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात गंडेदोरे, बोटांत अंगठ्या असतात आणि हे आपण पाहिलेले असते. फक्त या गोष्टींचा जाहीर बोलबाला होत नाही. या 'activities' अत्यंत गुप्तपणे होत असतात. स्मृती इराणींनी एवढे चातुर्य दाखवले असते तर आज त्यांच्यावर असे टीकेचे अस्त्र सोडण्याची संधी channels ना मिळाली नसती. पण त्या आपल्याबरोबर सगळा लवाजमा घेऊन गेल्या आणि मिडियाला आयतेच खाद्य मिळाले. आता हे त्यांनी हेतुपुरस्सर केले असेल तर माहित नाही किंवा हा 'attention seeking' चा ही प्रकार असू शकेल.
मंत्र्यांना खाजगी जीवन नसते. त्यांना हे मंत्रिपद अपघाताने मिळाले. त्यांनी वेळेचा अपव्यय केला. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्हच आहे. ज्योतिषाला हात दाखवून त्या आजच्या तरुण पिढीसमोर नक्की कोणता आदर्श ठेवू पाहत आहेत? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या गेल्या. त्यांचे या संदर्भातील फोटो सुद्धा प्रसारित झाले. त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल रान उठवून झालं. मात्र त्यानंतर channels वर 'फलज्योतिष' हे शास्त्र की थोतांड आहे ही जी चर्चा सुरु झाली ती पूर्णपणे अप्रस्तुत होती.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी सीमारेषा आहे. जो कर्तृत्ववान आहे तो सुद्धा श्रद्धाळू असू शकतोच की! श्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे. कोणाची श्रद्धा परमेश्वरावर, कोणाची महंत लोकांवर तर कोणाची ज्योतिषावर. ही एक अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. मी अनेक डॉक्टर सुद्धा बुवा-बाबांच्या चरणी लीन झालेले बघितले आहेत. ज्यांचे कर्तृत्व अगोदरच सिध्द झाले आहे व तेही सार्वजनिक रित्या त्यांना ज्योतिषांची गरजच काय असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. मनगटातील कर्तृत्व आणि दैववाद यांची सांगड कशासाठी घालायची? अनेक ज्योतिष्यांनी कालच्या चर्चेत अतिशय सावध भूमिका घेतली होती. कोणाचे चूक किंवा कोणाचे बरोबर, कोण योग्य व कोण अयोग्य हे ठरवण्याचा नैतिक अधिकार दुसऱ्याला नाही जोपर्यंत तो दखलपात्र गुन्हा नाही. देव मुळी नाहीच आहे असे म्हणून तुम्ही मंदिरे उभारण्यासाठी हरकत घेऊ शकता का? मी नास्तिक आहे म्हणून दुसऱ्यानेही नास्तिकच असावे हा आग्रह कितपत रास्त आहे? ज्याप्रमाणे देव आहे असे अत्यंत ठामपणे सांगणारे आहेत तसेच देव अस्तित्वातच नाही असे छाती पिटून सांगणारेही आहेत. ज्योतिष हे एक सन्माननीय शास्त्र आहे असे म्हणणारे आहेत तसे ज्योतिषाचे शास्त्रीयत्व अमान्य करणारे सुद्धा ढीगभर आहेत. याचे कारण प्रत्येक माणूस आणि त्याची मानसिकता ही इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळी असते आणि यापुढेही असणार आहे.
अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत की कर्तृत्व असूनही त्या व्यक्तींना यश प्राप्त झालेले नाही. कारणे काहीही असोत. आपल्या शेतात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने असंख्य वेळा काढला गेला आणि जातोय. तो शेतकरी कुठे प्रयत्नात कमी पडला? परंतु त्याच्या मनगटातील कर्तृत्व सिध्द करून दाखवण्याची संधी मात्र निसर्गाने हिरावून घेतली. आज शिकून सवरून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला जगाच्या पाठीवर निघालेल्या अनेक तरुणांना अपयशाला सामोरे जायला लागतेय. बेकारी, बेरोजगारी यांचा सामना करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक आसन्नमरण अवस्थेत असलेले वयोवृध्द रुग्ण नको झालेला जीव मरण येत नाही म्हणून कसेबसे जगवत आहेत तर दुसरीकडे तरणेताठे अपघाती किंवा अचानक मृत्यूला कवटाळत आहेत. या गोष्टींचे 'logical calculation' काय असू शकेल? अंदाज, तर्क या गोष्टी जर अ-शास्त्रीय ठरवल्या तर मग ज्या तर्काच्या, अनुमानाच्या आधारे पोलिस गुन्हेगार लोकांपर्यंत पोहोचतात ती सुसंगतताही मोडीत काढायला लागेल.
मी घरातून यावेळी बाहेर पडू का? इतपत ज्योतिषाच्या आधीन व्हायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. प्रत्येक माणसाला उपजत विवेकबुद्धी किंवा सद्सद विवेक हा असतोच. त्याचा वापर त्याने केला नाही तर तो त्याचा दोष आहे. माझ्यावर आज मंत्रीपदाची मोठी जबाबदारी आहे. मी जाहीररीत्या ज्योतिषाकडे गेले तर त्याचे समाजात आणि राजकारणात काय पडसाद उमटतील ह्या गोष्टीचा विचार स्मृती इराणी यांनी करायला हवा होता. त्यांच्या विवेकशून्यतेला शास्त्र कसे जबाबदार?
एकीकडे आपला 'TRP' वाढवण्यासाठी पेपर आणि वाहिन्यांमधून भविष्यकथनाचे कार्यक्रम करायचे व दैनंदिन भविष्य छापायचे आणि दुसरीकडे याच शास्त्राची 'TRP' वाढावा या दृष्टीकोनातून संभावना करायची हे दुटप्पी धोरण किती योग्य आहे याचा विचार करण्याची आज आत्यंतिक गरज आहे.
संगीत विदुषी श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्याबद्दल स्वत:ची प्रतिक्रिया पुलंनी अशी दिली की नाव किशोरी असलं तरी तिचं गाणं प्रौढ आहे. त्याच धर्तीवर मी म्हणेन की सावनी शेंडे हिचं शारीरिक वय तेवढं नसलं तरी तिचं सांगीतिक वय अंमळ जास्तच आहे.
पेपरसाठी मी संगीत परीक्षणे करत असताना अनेक गवयांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला. आपल्याबरोबर गाण्याविषयी संवाद साधणारा माणूस दोन तंबोऱ्यांच्या मध्ये जाउन बसला की एकदम वेगळाच भासतो. संगीतातील शास्त्रीय लीला इथून पुढे श्रोते ऐकणार असतात. बहुतेक गवई अतिशय गंभीर चेहरा करून, कोणी तोंडे वेडीवाकडी करून, कोणी बघा मी स्वरांचे शिवधनुष्य कसे पेलतोय अशा अविर्भावात विशिष्ट राग सादर करत असतात. श्रोत्यांमध्ये काही कानसेन सोडले तर सर्वसामान्य लोक गाण्याचा निखळ आनंद लुटायला आलेले असतात. शास्त्रीय संगीत हे खूप कठीण आहे, क्लिष्ट आहे, सहजसाध्य नाही अशा प्रकारच्या सूचना अशा गवयांच्या गाण्यातून श्रोत्यांना मिळत असतात. काही गवयांचे गाणे तांत्रिक दृष्ट्या अचूक असते तरीही त्यांत लालित्याचा, रंजकतेचा अभाव दिसून येतो. असे विद्वज्जड, पांडित्यपूर्ण पण अ-प्रासादिक गाणे फक्त ऐकले जाते ते चिरस्मरणीय असत नाही.
पण सावनीचे गाणे याला अपवाद आहे. सावनीचे गाणे हे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडणारया
संततधारे सारखे आहे. विलक्षण शांत व संयमित! या गाण्यात मी पहा कशी स्वरचमत्कृती लीलया केली असा पांडित्यपूर्ण अभिनिवेश नाही. हसतमुख चेहऱ्याने स्वत: गाण्याचा आनंद घेत तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न खचितच स्तुत्य आहे. तिच्या गाण्यात लालित्य आणि रंजकता यांचा अतिशय सुंदर मिलाफ आढळतो.
संगीतातील शिक्षणाचे धडे हे तिने प्रथम तिच्या आजीकडून आणि वडिलांकडून गिरवले आहेत व तद्नंतर तिला शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले आहे. याच शास्त्रीय संगीताच्या मुशीतून आज तिचे गाणे अधिकाधिक परिपक्व झाल्याची ग्वाही आमच्या सारख्या सुरांच्या आहारी गेलेल्या कानांनी दिली आहे.
कोणताही राग किंवा गाणे सौंदर्यपूर्ण रीतीने फुलवण्याची एक विलक्षण हातोटी सावनीला लाभली आहे. मग तिची 'जाओ सजना , मैं नाहि बोलू' ही मारू बिहाग रागातील स्वरचित बंदिश असो वा 'मतवारे बलमा नैना मिलाके मत जाना' ही ठुमरी सदृश रचना असो वा 'कोई कहियो रे प्रभू आवनकी' ही भक्तिरसपूर्ण रचना असो अतिशय सहजपणे एखादा राग उलगडण्याचे तिचे कसब प्रशंसनीय आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या आजीवासन संस्थेत तिने गायलेली रागमाला ही निव्वळ अप्रतिम! 'हिंडोल गावत सब, ओडव कल्याण राग' इथपासून आरंभ करून भूप, देस, छायानट,तिलककामोद, शंकरा, श्री, मारवा, पुरिया, मालकंस ई. १९ रागांची गुंफण इतकी सुंदर आणि नेटकी की कानांची भूक भागतच नाही.
आजच्या वेगाच्या आणि कृत्रिमतेच्या जमान्यात अभिजात संगीत तग धरू शकेल काय अशी भीती मनाला वाटू लागली आहे. पण सावनीचे आश्वासक गाणे या प्रश्नाचे चोख उत्तर आहे. तिच्या श्रोतृवर्गात तरुणाई मोठ्या संख्येने असते हे ऐकल्यानंतर खूप बरे वाटले. असेच तिचे नितळ, पारदर्शक गाणे शास्त्रीय संगीताचा झरा नव्या पिढीच्या मनात प्रवाही करण्यात आणि त्यांना प्रेरणा देण्यात सफल होऊ दे हीच तिच्या संगीतमय वाटचालीला शुभेच्छा!