Monday 30 November 2015

'Happy to Bleed' च्या निमित्ताने …….

कुठल्याशा देवस्थानच्या अध्यक्षांनी 'मासिक पाळी सुरु असलेली स्त्री शोधणारं यंत्र जेव्हा येईल तेव्हाच त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेऊ' अशा आशयाचं स्वत:चं प्रतिगामित्व सिद्ध करणारं वक्तव्य केलं आणि देशभरातील महिला विशेषत: युवती आक्रंदून उठल्या. मोर्चे, चर्चा, लेख यांना उधाण आलं.    
मुळात स्त्री अथवा पुरुष कोणत्याही देवालयात जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीराबरोबर त्यांचे मनही शुचिर्भूत असण्याची नितांत आवश्यकता असते. पावित्र्याच्या कल्पना या केवळ शरीराशी संबंधित नसून त्या मनाशीही संबंधित असतात. जर शरीराबरोबर मनाची शुचिर्भूतता पारखणारं यंत्र अस्तित्वात आलं तर मला शंका आहे की देशभरातील १% पुरुषांना तरी मंदिरात प्रवेश मिळेल का?  
स्त्रियांना येणारी मासिक पाळी म्हणजे पावित्र्याचा ऱ्हास किंवा अशी स्त्री मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यास अपात्र हे कोणी ठरवलं? 'भाव तेथे देव' या उक्तीप्रमाणे 'देव' या संकल्पनेचा माणसाच्या मनात वसणाऱ्या भावाशीच फक्त संबंध आहे. तिथे शरीराचा संबंध येतच नाही. मनात काडीचाही भक्तीभाव नाही तरी देवळात जाऊन पैसा आणि सोनेचांदी यांची खैरात करणारे महाभाग पवित्र का म्हणून समजायचे? पुरुषांना मासिक पाळी येत नाही म्हणून त्यांच्या तथाकथित पावित्र्यावर शिक्कामोर्तब करणारे पुरुषच ना? म्हणजे देवाबद्दल श्रद्धा, भक्ती मनाच्या गाभाऱ्यात न का वसेनात पण मंदिराच्या गाभाऱ्यात यांना बिनदिक्कत प्रवेश! शरीराचे आणि देवाचे नाते तेवढेच महत्वाचे पण मनात जपलेले पावित्र्य कवडीमोलाचे! प्रत्येकाच्या मनातील परमेश्वराचा अंश ज्याला त्याला जपता येणं हाच खरा धर्म. मनातील विचारांचे पावित्र्य उघड करणारे यंत्र आले तर देवळे ओस पडतील याची खात्री आहे.   
पूर्वीच्या काळी घरातील बाईचा परीघ सीमित होता तरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई, आल्यागेल्याची उठबस करता करता बायका दमून जायच्या. शिवाय त्या काळी यंत्रांची उपलब्धता नसल्याने अंगमेहनतीची कामेही बरीच असायची. मासिक पाळीच्या चार दिवसांतील सक्तीची विश्रांती हा शिणवटा कमी करण्याचा एक हेतू होता. रजस्वला स्त्रीची शारीरिक झीज कमी व्हावी तसेच तिची चिडचिड, तिचा त्रागा कमी व्हावा असाही त्यामागे उद्देश होता. पण अशा 'कावळा शिवलेल्या' स्त्रियांना जी वागणूक मिळत असे ती सर्वस्वी आक्षेपार्ह होती. तिला शिवायचं नाही, तिच्या जवळ जायचं नाही, तिचे जेवणाचे ताट दुरून सरकवायचे, तिला स्वयंपाकघरात प्रवेश द्यायचा नाही, देवघरात जाण्यास मज्जाव करायचा हे सामाजिक वर्तन निंदनीय होते. आज इतक्या वर्षांनंतरही जर ही मानसिकता समाज बदलू शकत नसेल तर अशा प्रतिगामी घटकांनाच बहिष्कृत करण्याची गरज आहे.                   
अनेक वर्षांपासून पौरुषत्वाचे झेंडे मिरवणारयांकडून हे स्त्रीचं 'दमन' होत आलं आहे. स्त्रीचं खच्चीकरण हेच काही पुरुषांच्या आयुष्याचं ब्रीद असतं. बौद्धिक दृष्ट्या प्रगत नसलेले आणि स्त्रीच्या शरीराबद्दल वैज्ञानिक दृष्ट्या अनभिज्ञ असलेलेच असे वाद निर्माण करत असतात. ज्या समस्त पुरुष जातीची उत्पत्ती ज्यापासून झाली आहे अशा उत्पत्तीस्थानाला अपवित्र ठरवणारे आणि या कारणास्तव त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणारे पुरुष 'शिव-शक्ती' च्या नात्याविषयी कितपत सज्ञान आहेत असा प्रश्न पडतो. शुचिता आणि सामर्थ्य यांच्या संयोगातून विश्वाचे सृजन झाले आणि त्यामुळेच स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणतीही श्रेष्ठ-कनिष्ठता नाही तर वास्तविक स्त्री व पुरुष हे परस्पर पूरक आहेत या माहितीकडे यांनी सोयीस्कररित्या डोळेझाक केलेली दिसते.             
वर्षानुवर्षे त्याच त्याच ऐकलेल्या आणि बघितलेल्या गोष्टी महिलांवर लादायच्या आणि आपण आखून दिलेल्या मार्गावरूनच त्यांनी चालायचे हा आग्रह धरायचा हा बहुतांश पुरुषवर्गाचा खाक्या आहे. पण यापुढे नव्या पिढीतील स्त्रिया ह्या बुरसटलेल्या प्रथा , चालीरीती यांना नजीकच्या काळातच तिलांजली देतील. त्या स्वत:चा मार्ग स्वत: निर्माण करतील जो त्यांच्यासाठी सन्मान्य असेल. त्यांच्या पावित्र्याच्या कल्पना या शरीराशी नसून मनाशी निगडीत असतील. मनाच्या पवित्र गाभाऱ्यातील देव त्यांना तिथेच गवसेल आणि मग अशा तथाकथित परंपरांना कवटाळून बसणारयांनी बांधलेल्या मंदिराच्या पायऱ्या चढायची त्यांना गरजच भासणार नाही.                 

Friday 27 November 2015

अंजलीताई टोळे अर्थात टोळेकाकू….

कुठल्याही परिचितांच्या दरवाज्यावरची बेल वाजवल्यानंतर दार उघडतानाच, आकारमान वाढलंय तुझं, केस किती पांढरे झालेत अशी किंवा यापैकी कोणतीही स्वागतपूर्ण वाक्ये ज्या घराच्या उंबरठ्यात बोलली जात नाहीत आणि दार उघडल्यानंतर ज्या ओठांची चंद्रकोर होताना प्रयास पडत नाहीत अशांपैकी एक म्हणजे टोळेकाकूंचं घर!       
तशी अंजलीताईंची आणि माझी ओळख एका तपाची.  त्यांचे सासरे कै. भाऊसाहेब टोळे यांच्याकडे मी काही वर्षांपूर्वी ज्योतिषविषयक मार्गदर्शनासाठी जायचे. तेव्हा अंजलीताईंची प्रथम ओळख झाली.  बहुतेक वेळा त्या लगबगीतच असायच्या. पुढे कधीतरी त्यांनी पेटी  शिकण्याची इच्छा माझ्यापाशी बोलून दाखवली आणि अशा तऱ्हेने त्या माझ्या संगीत परिवारात सामील झाल्या. नंतर काही वर्षे त्या माझ्याकडे गाणेही शिकत होत्या. अतिशय अदबीने बोलायच्या. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान पण त्यांची सांगीतिक मार्गदर्शक म्हणून माझ्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्या-वागण्यातून सतत व्यक्त व्हायचा. आज त्या माझ्याकडे शिकत नसल्या तरी त्यांची ती स्नेहाची, आदराची भावना कायम आहे.                      
मला माहित आहे की त्यांना कौतुकाची, प्रशंसेची allergy आहे. जरा त्यांच्याबद्दल स्तुतीपर दोन शब्द बोलावे की त्या कमालीच्या संकोचतात. सेवाभावी वृत्तीचं अंजलीताई हे मूर्तिमंत प्रतीक आहेत. चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव न आणता त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनोभावे सेवा करताना मी त्यांना पाहिलं आहे. इतरांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. अत्यंत अगत्यशील. स्वभाव रोखठोक. काहीसा कडक वाटणारा. हल्लीच्या तरुण-तरुणींच्या उथळ वागण्याची त्यांना मनस्वी चीड आहे. विवाहित मुला-मुलींनीही एका विशिष्ट चौकटीत राहूनच आचरण करावे असे त्यांना वाटते. अंजलीताई चांगले वाचतात. चांगले विचार ग्रहण करून ते विचार आचरणात आणू पाहतात. त्या परमोच्च शक्तीला मानणाऱ्या जरूर आहेत पण म्हणून त्या कर्मकांडाच्या आहारी जाणाऱ्या नाहीत.                
त्यांच्या घराला 'घरपण' आहे. साधेपणा हा त्यांच्या घराचा 'आत्मा' आहे. त्यांच्या घरात कुठेही बिनदिक्कतपणे वावरावेसे वाटते. टोळे काकांचाही हसरा, प्रेमळ चेहरा स्वागत करण्यासाठी असतोच! आग्रह करकरून पोटभर सुग्रास अन्न खायला घालणे हा अंजलीताईंचा स्थायीभावच आहे. मला जेवायचे निमंत्रण दिल्यानंतर, येताना काहीही घेऊन यायचं नाही निशाताई असा प्रेमळ दमही त्या देतात. त्याकडे मी लक्ष देत नाही हा भाग वेगळा. अंजलीताईंच्या हाताला उत्कृष्ट चव आहे. 'मेतकूट पोहे' ही त्यांची खास डिश आणि मी आणि माझ्या लेकींची खास फर्माइश. त्यांच्या घरी गेल्यावर मला माहेरी आल्यासारखेच वाटते. जेवण असो, दिवाळीचा फराळ असो वा अल्पोपहार असो, अंजलीताईंचा सढळ हात मी नेहमीच अनुभवत आले आहे.                           
अशी निरपेक्षपणे प्रेम करणारी माणसे आज समाजातून हळूहळू लुप्त होत चालली आहेत. उंची फर्निचर, महागडे शो पीस व  इलेक्ट्रोनिक gadgets  आणि  बद्धकोष्ठ झाल्यासारखी हसणारी माणसे अशा प्रकारची घरं मला त्यांची पायरी चढण्यासाठी आकृष्ट करू शकत नाहीत. मेणचट चेहरे, टोमणेवजा बोलणी आणि दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल नको तेवढे औत्सुक्य या गोष्टी मला अशा व्यक्तींच्या दरवाज्यावरची बेल वाजवण्यापासून परावृत्त करतात.        
या सगळ्या पार्श्वभूमीवर टोळेकाकूंचं घर हे माझ्यासाठी आनंदनिधान आहे. आमच्या इतक्या वर्षांच्या ऋणानुबंधाचे हेच सबळ कारण आहे.     

Wednesday 25 November 2015

अभिनेता आणि 'सत्यमेव जयते' फेम आमीर खान यांस उद्देशून …….


का हो तुम्हाला दुर्बुद्धी सुचली असे वक्तव्य करण्याची? ही दुर्बुद्धी म्हणायची की तुमच्या आगामी 'दंगल' या चित्रपटासाठी केलेला पब्लिसिटी स्टन्ट? तुमच्या सारखीच करोडो कुटुंबे या भारत देशात राहतात. असहिष्णुता वाढली म्हणून यापैकी किती कुटुंबे दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याचा विचार करतात? आणि इतर देशांत सगळेच आलबेल आहे का? तिथेही काही खटकणाऱ्या गोष्टी असतीलच ना? थोडे आत्मपरीक्षण केलेत तर तुम्हाला या देशातील सहिष्णुतेची ग्वाही मिळेल.     
एक अभिनेता म्हणून तुमची वाटचाल सुरु झाली त्यावेळेस या भारत देशातील जनता तुमची जात, तुमचा धर्म लक्षात न घेता तुमच्या अभिनयाला दाद देत होती. कोणत्याही जातीच्या,धर्माच्या,पंथाच्या पलीकडे तुमचे आणि सिनेरसिकाचे नाते निर्माण झाले. तुम्ही अभिनयात बाजी मारून जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण केलंत. दिल चाहता है, थ्री इडीयट्स, सरफरोश, लगान, गजनी, पीके हे व असे अनेक चित्रपट रसिकमनात तुमच्या अभिनयाची मोहोर उमटवून गेले.             
पीके या चित्रपटात तुम्ही हिंदू धर्माची, देवदेवतांची यथेच्छ खिल्ली उडवलीत, श्रद्धांची थट्टा केलीत, रुढींचा उपहास केलात, तरीही हा चित्रपट चालला. जरा कल्पना करा की अशा प्रकारचा चित्रपट तुम्ही इस्लामी देशांत केला असतात तर आज हे वक्तव्य करण्यासाठी तरी शिल्लक राहिला असतात का? या देशातील जनतेने तुम्हाला खऱ्या अर्थाने 'हिरो' बनवलं. या जनतेमुळेच तुम्हाला कीर्तीची चव चाखायला मिळाली. तुम्ही प्रथितयश झालात. अनेक मानसन्मान तुम्हाला लाभले. अनेक तरुणांचे तुम्ही 'रोल मॉडेल' झालात तर तरुणींनी तुम्हाला त्यांच्या मनात पूजलं.            
तुम्ही 'सत्यमेव जयते' नावाच्या शो च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आलात. अनेक संवेदनशील मुद्दे हाताळलेत. अनेक उद्बोधक चर्चा घडवून आणल्यात. पीडितांच्या समस्या समजून घेतल्यात. त्यांच्या व्यथा ऐकताना अनेक वेळा तुमच्या डोळ्यांत पाणी तरळलेले अवघ्या भारतवासियांनी पाहिले. तुम्ही या शो द्वारे एक 'अवेअरनेस' जनतेत निर्माण करायचा प्रयत्न केलात जो स्तुत्य होता. अर्थात तुमची ही 'समाजसेवा' चालू आहे या भ्रमात भारतीय जनता मुळीच नव्हती. तरीही या शो ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रत्येक प्रोजेक्ट मधून तुम्ही उदंड पैसा कमावलात. या देशातील जनतेची तुमच्यामध्ये झालेली मानसिक गुंतवणूक एन्कॅश करण्यात तुम्ही यशस्वी झालात. या देशातील जनतेने तुम्हाला जे मिळवून दिले तो त्यांच्या सहिष्णुतेचा परिपाकच होता. आज 'आमीर खान' या नावाला आलेलं वलय केवळ या भारत देशातील जनतेमुळेच आहे याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडला का हो?                       
जगाच्या पाठीवर कोणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता जर आपल्याला एवढी सतावत होती तर आपण केव्हाच हा देश सोडायला स्वतंत्र होतातच. आपल्याला कोणी अडवलं होतं का? या देशातील असहिष्णुतेविषयी जाहीर भाष्य करून आपण अनेकांचा रोष ओढवून घेतलात. सगळीकडे चर्चांची राळ उठवून दिलीत. आपल्याला हेच अपेक्षित होते का? अशा प्रकारे आपल्याला मिळालेल्या कुप्रसिद्धीचा वापर आपल्याला 'दंगल' या चित्रपटासाठी करून घेता येऊ शकतो ही शक्यता आपण विचारात घेतलीत का? या निमित्ताने आमीर खान हे नाव पुनश्च ज्याच्या त्याच्या तोंडी येईल हे तुमचं गणित अचूक आलं का?         
आपल्याकडे लोकांचं चुकतंच. आपण या अभिनेत्यांना एकदम डोक्यावर घेतो. त्यांना देवाचा दर्जा द्यायला मागेपुढे पाहत नाही. कमी म्हणून त्यांची देवळेही बांधतो. आपलं आयुष्य ही हिरो मंडळी व्यापून टाकतात. इतके की आपण त्यांच्यापुढे थिटे वाटायला लागतो. खणखणीत पैसे मोजून ही स्वत:ला कलाकार म्हणवणारी मंडळी समाजसेवेचा आव आणून अभिनय करतात. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात जे आपण ओळखू शकत नाही. अर्थात ह्यालाही अपवाद आहेत. ह्या 'नटश्रेष्ठ' मंडळींची पूजा बांधण्याऐवजी या भूतलावर अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या पूजेस पात्र आहेत त्यांच्या दिशेने आज जनतेने मोर्चा वळवला पाहिजे. या भारत देशासाठी आपले तनमनधन अर्पण करणाऱ्या भूमिपुत्रांचे आपण चाहते झालो पाहिजे. अत्यंत निरलसपणे समाजासाठी, देशासाठी झटणाऱ्या व्यक्ती हेच खरे आपले 'हिरो' असतात, नायक असतात.                 
मेकअपच्या आत दडलेला खरा चेहरा असा प्रसंगी बाहेर येतो आणि मग हीच जनता त्याच लोभस वाटणाऱ्या चेहऱ्याला डांबर फासायला कमी करत नाही. अनेक वर्षे पूजनीय वाटणारी व्यक्ती मग निंदनीय वाटू लागते. भक्तीची जागा संताप घेतो. आतापर्यंत ही गोष्ट आमिर खान ह्यांना समजली असेल असे वाटते. स्वत:च्या वक्तव्याबद्दल त्यांनी फेरविचार जरूर करावा. इच्छा असल्यास समस्त देशवासीयांची माफी मागावी अथवा असहिष्णुतेचे कारण पुढे करून आपल्या कुटुंबकबिल्यासह गाशा गुंडाळावा.                    

Sunday 22 November 2015

माझे दादा आजोबा …

'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' असे समजण्याचा तो काळ होता. समस्त वडीलधारयांचे या विषयी एकमत होते. आपण खाल्लेल्या माराचा आणि प्राप्त होणाऱ्या विद्येचा अर्थाअर्थी काहीही  संबंध नाही हे कळेपर्यंत आमचे शालेय जीवन संपुष्टात आले होते. मी दादा आजोबांच्या म्हणजेच शिवराम त्रिंबक तळवलकरांच्या मार्गदर्शनाखाली कमी आणि धाकाखाली जास्त मुळाक्षरे गिरवली. माझे हस्ताक्षर  जास्तीत जास्त चांगले करण्याचा आजोबांनी जणू विडाच उचलला होता. त्यामुळे मी जे काही उत्तम हस्ताक्षर काढू शकले त्याचे संपूर्ण श्रेय दादा आजोबांना जाते. आपले हस्ताक्षर सुधारले म्हणून आपली डॉक्टर व्हायची दारे बंद झाली असे मला उगाचच वाटायचे. डॉक्टरांचे ते अगम्य भाषेत व गिचमिड अक्षरात लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन जर आजोबांनी कधी वाचलं असतं (वाचलं असेलही ) तर त्या डॉक्टरची धपाट्याने पूजा करून त्यांना बाराखडी पुन्हा पुन्हा गिरवायला लावली असती.                 
त्या काळी बालमोहन शाळेत आम्हाला दिवाळीचा व नाताळचा असा स्वतंत्र अभ्यास असायचा. नेहमीच्या गृहपाठा व्यतिरिक्त वेगवेगळ्या माहितीचे संकलन आणि त्यानुसार चित्रे काढणे अथवा चिकटवणे हे अपेक्षित असायचे. संपूर्ण वहीची सजावट जितकी उत्तम तितकी बक्षीस मिळण्याची शक्यता जास्त! या कामात माझी भिस्त पूर्णपणे दादा आजोबांवर असायची. वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिली वापरून गोळा केलेली माहिती माझ्याकडून सुवाच्य अक्षरात लिहून घेणे, चित्रे काढणे आणि चिकटवणे व वहीची सजावट करणे हे काम आजोबा आवडीने करायचे. आजोबांनी माझ्या वह्यांवर घेतलेल्या परिश्रमांमुळे माझी बक्षिसे कधी फारशी चुकली नाहीत.          
दादा आजोबांचे प्रत्येक काम सुबक असायचे. अत्यंत नीटनेटके. शिस्तीचे. 'मुलांना कधी मारू नये' असा प्रेमळ सल्ला देणारे हितचिंतक तेव्हा समाजात निर्माण झाले नसावेत बहुधा. शिस्तीचा बडगा दाखवण्याबाबत सर्व वडीलधारी मंडळींचे जणू ऐक्य असायचे. मुलांना वठणीवर आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खरपूस मार याबद्दल दुमत असायचं घरीदारी कारणच नव्हतं. त्यात आजोबा शीघ्रकोपी. त्यामुळे हस्ताक्षर नीट आले नाही, खा मार. बेरीज चुकली, खा धपाटा असा 'खाऊ' सातत्याने मिळायचा. पण हेच आजोबा आजीने दिलेला खाऊचा डबा घेऊन रोज माझ्या शाळेत यायचे. मधल्या सुट्टीतील खाऊचा डबा भोपटकरांचा आणि शाळा संपल्यावरचा तळवलकरांचा. मग मी आजोबांबरोबर आजीने दिलेला खाऊ खात रमत गमत लक्ष्मीनारायण बाग येथे माझ्या आजोळी जायचे. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आजोळीच जास्त असायचे.        
 पानात टाकलेले आजोबांना अजिबात चालायचे नाही. ते स्वत: अतिशय सुंदर जेवायचे. पानावर बसले की प्रथम चित्राहुती व नंतर प्रोक्षण करून जेवण सुरु. पहिला भात, मध्ये पोळी वा भाकरी आणि नंतर दही किंवा ताक भात. भाकरीचा पापुद्रा अलगद उचलून त्याला तूप-मीठ लावणे, ताटातील प्रत्येक पदार्थाला योग्य तो न्याय देत त्यांचे जे जेवण चालायचे ते खरोखरीच प्रेक्षणीय असायचे. आजोबांची पूजाही साग्रसंगीत. देवांना आंघोळ घालणे, मलमलच्या तलम कापडाने देव पुसणे, गंध उगाळणे, फुलांना गंधाक्षता लावून ते देवांना अर्पण करणे, दुध-साखरेचा नैवेद्य दाखवणे, स्तोत्र-आरती अशी त्यांची सुमारे एक-दिड तास विधिवत पूजा चालायची.               
स्वत:चे धोतर स्वच्छ धुवून वाळत घालण्याचा त्यांचा सोहळा देखणा असायचा. एकही सुरकुती न पाडता, चोख निरी करत ज्या पद्धतीने ते धोतर वाळत घालायचे ते बघत रहावसं वाटायचं. आजीला तांदूळ निवडण्यात आजोबा मदत करायचे. तांदळातील प्रत्येक भातकण अंगठ्याच्या नखाने अलगद सोलून त्यातून तांदळाचा अख्खा दाणा ते वेगळा काढायचे. लसूण सोलण्यातले त्यांचे कसब सुद्धा वाखाणण्यासारखे होते. पालेभाज्याही ते उत्तम निवडायचे.           
पत्त्याचा डाव लावणे हा आजोबांचा विरंगुळा होता. पण त्यांना पेशन्स कमी असल्याने मनासारखा डाव लागला नाही की पत्ते फेकून द्यायला ते मागेपुढे बघत नसत. माझे बरेचसे बालपण दादा आजोबांच्या सान्निध्यात गेले. त्यांनी माझ्या अक्षराला लावलेले सुबक वळण, माझा घेतलेला अभ्यास, मला बक्षीस मिळावे म्हणून दिवाळी-नाताळच्या वहीच्या सजावटीवर घेतलेली मेहनत ह्या गोष्टी माझ्या लेखी आनंदाचा ठेवा आहेत. माझ्याकडून श्लोक म्हणून घेणे, पाढे म्हणून घेणे, पाठांतर करवणे ही कामेही ते नित्यनेमाने पार पाडीत. कालांतराने माझ्या अभ्यासाची जबाबदारी माझ्या मामाने त्याच्या अंगावर घेतली खरी पण आजोबांबरोबर गिरवलेली मुळाक्षरे, त्यांच्याबरोबर शाळेतून येताना खाल्लेला खाऊ, पाठ केलेले पाढे आणि श्लोक, निजताना त्यांचा डोक्यावर जाणवणारा हळुवार हात  ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.              
 आजही अनेक वेळा कच्चं लिखाण करताना अक्षर वेडंवाकडं आलं, जे येतंच की वाटतं, दादा आजोबा हळूच मागून येतील आणि पाठीत धपाटा घालत म्हणतील, काय हे अक्षर! असं शिकवलं मी? गधडे किती वेळा सांगायचं तुला? पण आता ते दादा आजोबांचे रागाने किंवा कौतुकाने बघणारे डोळे नाहीत, चांगल्यासाठी उगारला जाणारा हात नाही की बघत राहावे असे त्यांचे नेटके हस्तकौशल्यही नाही. उरल्या आहेत त्या फक्त पिठीसाखर आणि साजूक तुपात घोळवलेल्या त्यांच्या सायीसारख्या तलम आठवणी!                   

Friday 20 November 2015

hats off 'जामुन'………।

जामुन हे नाव कदाचित काल्पनिक असेल. स्थळ व इतर पात्रांची नावेही बदललेली असू शकतील पण ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे. एका खेडेगावात जन्मलेल्या एका गोंडस परीची ही कथा आहे. जशी आणि जेवढी हृदयद्रावक तेवढीच जामुनच्या जिद्दीची, धाडसाची. परिस्थितीला सहजासहजी शरण न जाणाऱ्या तिच्या मानसिकतेची.       
आई-बाबांची लाडकी जामुन  वयाच्या आठव्या वर्षी शाळेची पहिली पायरी चढते. तेही आईच्या आग्रहास्तव. तिच्या आईचं तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न असतं. घरची परिस्थिती म्हणजे हातातोंडाची लढाई. काही दिवस अथवा महिने शाळेची अन तिची कुठे तोंडओळख होते आहे तोच तिच्या कुटुंबावर दुर्दैवी घाला येतो आणि तिची आई हे जग सोडून जाते. आपली आई नक्की कुठे गेली आहे हे समजण्याचीही बौद्धिक कुवत नसलेली जामुन आता एकाकी पडते. शाळा सुटलेली असते. वडील हलाखीने अधिकच गांजलेले. लहानग्या जामुनचे नशीब अंधाराच्या उदरात गडप होते.            
एक दिवस जामुनच्या वडिलांचा मित्र एका 'एलाईट' जोडप्याला घेऊन येतो. अलिशान गाडीतून पायउतार झालेल्या या दाम्पत्याला एक लहान मुलगा असतो. ते जामुनला दत्तक घेण्याची त्यांची मनीषा बोलून दाखवतात. तिला उच्च शिक्षण देण्याचं आश्वासन देतात. जामुनच्या वडिलांच्या एका डोळ्यात न मावणारा आनंद तर दुसऱ्या डोळ्यात लेकीच्या विरहाचं दु:ख दाटून येतं. ते जोडपं जामुनच्या वडिलांच्या हातात नोटांची थप्पी देतं. पण तिचे वडील ती नाकारतात. कारण त्यांच्या मुलीचं उज्ज्वल भविष्य त्यांना दिसू लागलेलं असतं. त्यांचा मित्र मात्र हक्काने त्या नोटांचा स्वीकार करतो.              
जामुन मोठ्या शहरात येते. एका टोलेजंग इमारतीत हे कुटुंब राहत असतं. या घरातील सर्व आधुनिक उपकरणे आणि सोयीसुविधा जामुनला स्वप्नवत वाटतात. कुटुंबाच्या मालकीणबाई या सर्व साधनांची तिला माहिती करून देतात. त्या साधनांचा वापर करायला शिकवतात. तिच्या शाळेची व्यवस्था काही दिवसात होईल असे तिला सांगत राहतात. दिवसामागून दिवस उलटतात आणि या उच्चभ्रू कुटुंबाचा खरा चेहरा जामुनला दिसू लागतो. खरकटी भांडी धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, बाहेर जाउन सामान आणणे, झाडू-लादी करणे, छोट्याला सांभाळणे अशी अनेक कामे चिमुरड्या जामुनवर सोपवली जातात. या कामांत कुचराई झाल्यास त्याची शिक्षा म्हणून छडीचे, चामडी पट्ट्याचे फटके, इस्त्रीचे चटके आणि उपासमार हा दंड ठरलेला असतो. तिच्या आजारातही तिची जराही गय केली जात नाही.  लोकांसमोर मात्र आपण ह्या गरीब घरातील मुलीला दत्तक घेऊन किती पुण्याचं काम केलं आहे व आपण तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो आहे  ह्याचे नाटक  अत्यंत चोख पद्धतीने वठवले जात असते.                  
 या मालकीणबाई 'day care' चालवतात. मुलांच्या ट्युशन घेतात. माझा child psychology चा अभ्यास असल्याचेही लोकांना सांगतात. पण जामुनचे त्यांनी चालवलेले अतोनात हाल मात्र त्यांच्यातील एका स्त्रीला ,शिक्षिकेला, मातेला खटकत नाहीत. जामुन अनेकदा तिच्या आईच्या आठवणीने व्यथित होते. तिच्या डोळ्यांतील बाल्य अकाली कोमेजल्यासारखे वाटू लागते. इतक्या लहान वयात तिच्या देहाने आणि मनाने अनन्वित अत्याचार भोगलेले असतात. या कुटुंबाचा मालकही वासनांध होऊन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी दबा धरून बसलेला असतो. योग्य संधीची वाट पाहत असतो. जामुनला या नरकयातनांतून लवकरात लवकर मुक्ती हवी असते. तिला या अघोरी कैदेतून सुटून आपल्या गावी वडिलांकडे जायचे असते. ती खचून न जाता काही मार्ग मिळतो का ते शोधत असते.
एक दिवस day care मधील मुलांची जबाबदारी जामुनवर टाकून मालकीणबाई shopping ला जातात. day care मधील एका मुलीशी जामुनची मैत्री होते. त्या मुलीला जामुनच्या यातनांविषयी काहीच माहिती नसते. जामुन तिला एक प्रश्न विचारते. एखाद्या झाडाला किंवा फुलाला कोणी इजा केली तर ते झाड किंवा फूल काय म्हणेल? तिची मैत्रीण जर विचार करून म्हणते, please save me असं म्हणेल. जामुन म्हणते की हे मला तू एका पेपरवर लिहून देशील का? मग तिची ही मैत्रीण तिला एका कागदावर ते वाक्य लिहून देते. जामुन ह्या मैत्रिणीकडून काही रिकामे कागद मागून घेते. नंतर ते कातरून त्याचे छोटे छोटे तुकडे करते आणि प्रत्येक तुकड्यावर हे वाक्य इंग्रजी येत नसतानाही लिहिते म्हणजेच गिरवते. असे अनेक कागद ती तयार करून घेते. स्वत:जवळ लपवून ठेवते. रोज मालकीणबाई बाहेर गेल्या की त्यातील एक एक कागद अंतराअंतराने बाल्कनीतून अलगद खाली सोडते. सुरवातीस हे कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकले जातात पण रोज सातत्याने पडणाऱ्या या कागदांकडे सफाई कामगारांचे लक्ष जाते आणि अखेरीस हा कागदांचा गठ्ठा पोलिसांपर्यंत पोहोचतो.                  
  कोणालातरी वाचवायचे आहे हे पोलिसांना समजते. पण कोणाला? एव्हाना कागदावरील हस्ताक्षरावरून हे अक्षर लहान मुलाचे आहे ज्याला किंवा जिला इंग्रजी नीट लिहिता येत नाही एवढे पोलिसी बुद्धीला कळलेले असते. यंत्रणा कामाला कागतात. सुरवातीस यश येत नाही. मग एक दिवस अचानक एका कागदाच्या मागील बाजूस  international school तसेच division हा तपशील पोलिसांना मिळतो आणि जामुनच्या मैत्रिणीपर्यंत पोलिस पोहोचतात. पण हे हस्ताक्षर तिचे नसते हेही त्यांना कळते. हे जामुनने लिहिले आहे हे मैत्रीण सांगते आणि अखेरीस पोलिस चौकशीसाठी जामुनच्या घरी पोहोचतात. जामुन पोलिसांना काहीच सांगू शकत नाही कारण तिला मालकीण बाईंनी धमकावलेले असते. पण तिचे डोळे तिची व्यथा बोलून जातात. 
 यानंतरही जामुनवर अत्याचार सुरुच राहतात. आता तिच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हातपाय बांधून तिला खोलीत कोंडले जाते. एक दिवस जमुनची मैत्रीण मालकीण बाईंना विचारते की जामुन कुठे आहे. ती परत आपल्या गावाला गेली असे मालकीणबाई सांगतात. पण मैत्रिणीला संशय येतो. मालकीणबाई बाहेर गेल्या आहेत ही संधी साधून आणि धाडस एकवटून जामुनची मैत्रीण कोपऱ्यातील खोलीत हळूच डोकावते आणि जामुनला या अवस्थेत बघून तिला फार वाईट वाटते. 'ये मम्मी पापा बहोत गंदे है, मुझे रोज मारते,पिटते है' अशी जामुनची कबुली मोबाईलवर रेकॉर्ड करून ती पोलिसांना ऐकवते आणि पोलिसांनी तिच्या आईबाबांना विश्वासात घेऊन जी मोहीम हाती घेतलेली असते ती फत्ते होते.              
यथावकाश मालक आणि मालकीणबाई गजाआड जातात आणि जामुन तिच्या वडिलांच्या हाती सोपवली जाते.
अशी असंख्य लहानगी मुले आणि मुली कुणा नराधमांच्या अत्याचाराला बळी पडतात. काही निराश होतात , खचतात, कुणी सुटकेचा मार्ग न सापडल्याने आत्महत्या करतात. पण केवळ आठ वर्षाच्या व रूढार्थाने काहीही शिक्षण न घेतलेल्या जामुनने जे करून दाखवलं ते इतरांसाठी निश्चित आशेचा किरण ठरू शकेल.
खरंच hats off टू little brave जामुन!                                                      

Tuesday 17 November 2015

'सौरभ' नावाचा 'आदर्श'


'दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती' ही काव्यपंक्ती २३ वर्षीय सौरभ निंबकर नावाच्या तरुणाने सार्थ ठरवली आहे. मी काही महिन्यांपूर्वी, नमस्कार हा वयाला नव्हे तर माणसाच्या वर्तनाला,कर्तृत्वाला करायचा असतो अशा आशयाचा ब्लॉग लिहिला होता. खरंच सौरभच्या या माणुसकी जपणाऱ्या वर्तनाला माझा मनापासून नमस्कार!
त्याची आई cancer होऊन गेली. ती केईएम मध्ये admit असताना इतर समदु:खी परिवारांच्या यातना त्याने बघितल्या. cancer सारख्या दुर्धर रोगाची treatment घेताना सामान्यांच्या तोंडाला फेस आणणारा अमाप खर्च, निकटच्या नातेवाईकांची होत असलेली कुतरओढ, आपल्या ऐपतीपेक्षा कित्येक पटींनी खर्च करून कंगाल झालेली कुटुंबे हे सगळे सौरभने अनुभवले आणि त्याच्या आत असलेला माणुसकीचा झरा खळखळून वाहण्यासाठी आतुर होऊ लागला.  
त्याला cancer ने पिडीत असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी करायचे होते. विचार सुरु झाला. विचार आणि लहानपणापासून जपलेली आवड यांची सांगड घातली गेली आणि मध्य रेल्वेतील डब्यांत गिटारचे सूर निनादू लागले. जरा बऱ्या घरातला आणि चांगल्या कपड्यांमधील हा 'भिकारी' अनेकांना आवडू लागला. गर्दीने खचाखच भरलेला डबा तर हवा परंतु गिटार वाजवण्यासाठी space सुद्धा हवी. त्यामुळे असा नेमका स्पॉट हेरून ही संगीतपूजा सुरु झाली. काही प्रवासी या स्वरलहरीत सामील होऊ लागले. यातून जमणाऱ्या उत्पन्नाचा  cancer पिडीत तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विनियोग केला जाणार होता. सौरभचा हा उपक्रम अनेकांना स्तुत्य वाटला.            

२-३ दिवसांपूर्वी सौरभच्या या उपक्रमाला खुद्द बिग बिंचा हातभार लागला आणि त्याच्या प्रयत्नांना जणू परीसस्पर्शच झाला. या सीएसटी टू अंबरनाथ  ट्रेनमधील सुरांच्या अनोख्या यात्रेत साक्षात अमिताभ सहभागी झाले. त्यांनीही इतर प्रवाशांबरोबर गाणी गात सौरभच्या उपक्रमाला चार चाँद लावले. हा गिटार वाजवणारा अवलिया आता अधिकाधिक परिचित होईल आणि त्याच्या या अभिनव योजनेला आणखी आर्थिक यश मिळेल अशी खात्री वाटते आहे.       
टी व्ही वर नुसते 'शो' करून सामाजिक बांधिलकी जपली जाते का हाच खरा प्रश्न आहे. नामांकित सुपरस्टार अशा शो द्वारे जनजागृती करण्याचा फक्त 'शो' करतात. शो संपला की जाणीवही लोपते आणि हे सो कॉल्ड सुपरस्टार आपापली popularity एन्कॅश करून पुढील प्रोजेक्ट करायला धावतात.   
सौरभला music मध्ये किती गती आहे यापेक्षा जे थोडंफार ज्ञान त्याच्या गाठीशी आहे ते अशा पद्धतीने एन्कॅश करून त्या ज्ञानाचा, छंदाचा तो ज्या कारणासाठी वापर करू इच्छितो आहे ही बाब मुळातच त्याच्यातील उत्तुंगतेची जाणीव करून देणारी आहे. वयाच्या पंचाहत्तरीला सुद्धा प्रॉपर्टी, दागिने, पैसा या भौतिकतेला घट्ट आवळून बसणाऱ्या आणि केवळ शारीरिक वयाच्या हिशेबात स्वत:ला 'ज्येष्ठ' म्हणवून घेणाऱ्या अनेकांना विचारप्रवृत्त करणारा सौरभ समस्त आबालवृद्धांसाठी एक 'आदर्श' आहे यात तिळमात्रही शंका नाही.      


मुग्ध करणारी सूरमयी मुग्धा


व्यासपीठावर वयाने ज्येष्ठ आणि सांगितिक अनुभवाने संमृद्ध अशा गायकांची मांदियाळी दाटली आहे. या गायकांमध्ये अवघी १०-१२ वर्षांची एक छोटी गायिका बसली आहे. गोरी गोरी पान, नाच रे मोरा किंवा जास्तीत जास्त एका तळ्यात होती अशी काही गीते तिच्या वयाला आणि गळ्याला साजेशी अशी ऐकू येतील असे वाटते न वाटते तोच  तिचा खणखणीत आवाज अवघ्या श्रोतृवर्गाचा कब्जा घेतो आणि पुढील दहा एक मिनिटे 'पद्मनाभा नारायणा'च्या सुरावटीत समस्त रसिकांना अक्षरश: न्हाऊ घालतो. तिच्या सांगितिक जाणीवेने स्तिमित व्हावे असा हा क्षण! 
आपल्या डोळ्यांसमोर असते ती 'सारेगमप' मधील छोटीशी, खळखळून हसणारी, बालगीतांत रमणारी मुग्धा! 'सारेगमप' मधील तिचा प्रवास संपल्यावर तिने कमावलेलं सुरांचं ऐश्वर्य जसजसं कानावर पडत जातं तसतसं चकित व्हायला होतं. तिशी-चाळीशी-पन्नाशीला आल्यानंतर अथक रियाजातून जी परिपक्वता गळ्यातील सुरांना येते आणि त्यातून मग जे गाणे श्रोत्यांसमोर साकारते ते गाणे आणि सुरांची ती परिपक्वता षोडशी पूर्वीच ज्या मुग्धाने संपादन केली आहे ती ऐकताना आपण शब्दहीन होतो.   
तोडी रागातील 'सो हम हर डमरू बाजे' असो वा चारुकेशी तील 'हे सुरांनो चंद्र व्हा' असो वा भटियार मधील 'एक सूर चरचर छायो' हे निर्गुणी भजन असो, मुग्धाच्या गळ्यातून एकेक गाणे एकेका  रत्नासारखे बाहेर पडते आणि रसिकांच्या कानांवर गारुड करते. जोहार मायबाप, श्रीरंगा कमलाकांता, अमृताहुनी गोड किंवा अगदी अलीकडचे उगवली शुक्राची चांदणी असो, तिच्या गळ्याला काही अटकावच नाही. खणखणीत आवाज,सुस्पष्ट शब्दोच्चार, कसदार ताना आणि सुरलयीशी खेळण्याची प्रभावी हुकमत या भांडवलावर मुग्धा मैफिलीला लीलया आपलंसं करते. आवाजात कमालीचं माधुर्य. तिचा आवाज नाट्यसंगीतासाठी अतिअनुकुल असाच आहे. डोळ्यांत आत्मविश्वासाबरोबर एकवटून येणारं गाणं ठायीठायी जाणवत राहतं. हल्लीच्या मोबाईल हेच जगणे मानून चालणाऱ्या तरुणाईला तिच्या 'बोलावा विठ्ठल करावा विठठल' या गाण्याचा रिंगटोन करण्याचा मोह पडावा इतकं देखणं गाणं मुग्धापाशी आहे.नेमक्या जागा, गाण्याचं मर्म नेमकं हेरून ते सहीनसही व्यक्त करण्याचं तिचं कसब खचितच वाखाणण्यासारखं आहे. सायन्स शाखा तिच्या आवडीची आहे पण गाणं हा ध्यास आहे. त्यामुळे अभ्यासक्रम hectic वाटल्यास शाखा बदलण्याची तिची तयारी आहे. 'पियरवा घर आवो, घर आवो, ही तिची बागेश्रीतील बंदिशही लाजवाब!    
इतक्या लहान वयातच इतकी सांगितिक तयारी आणि प्रगल्भता पाहून अशी शंका येऊ लागते की गेल्या जन्मीच्या तिच्या सूरसंचिताचे तर हे 'carry forward' नाही ना? असो. तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि तिच्या गळ्यातून स्त्रवणाऱ्या मधुर स्वरांनी सगळ्या श्रोतृवर्गाची तृषा पुन्हा पुन्हा शांत होवो हीच सदिच्छा!