Wednesday 26 March 2014

भारत देश हा कृषिप्रधान की आत्महत्याप्रधान ?


गारपिटीने त्रस्त झालेला बळीराजा विलक्षण नैराश्यापोटी आत्महत्या करत सुटलाय आणि त्याच्या मागे राहिलेले विस्कटलेले कुटुंब छाती पिटत आक्रोश करते आहे हे दृश्य मला वाटतं की आपण सगळ्यांनीच अनेकवार पुन्हा पुन्हा अनेक वाहिन्यांवर पहिले आहे , अजूनही पाहत आहोत आणि डोळ्यांच्या कडेला जमा झालेले अश्रू हळूच टिपून घेतो आहोत. आता त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाचे काय होणार हा अस्वस्थ करणारा प्रश्न आपल्यापैकी  अनेकांच्या मनात कित्येक दिवस घोळत राहणार यात शंका नाही.   
शालेय अभ्यासक्रमात भूगोल अभ्यासताना 'भारत हा कृषिप्रधान देश आहे ' हे वाक्य वारंवार वाचनात आलेले मला स्मरते. पण स्वत: अहोरात्र खपून संपूर्ण देशाचे पोट भरणारा हा बळीराजा आज मात्र  निष्ठुरतेचा, असंवेदनशीलतेचा फक्त बळी ठरला आहे . जिकडे बघावं तिकडे उजाड , उध्वस्त झालेली शेतं, मरून पडलेली जनावरं, झाडावरून खाली पडून निष्प्राण झालेली फळे, भाज्या, धान्ये दिसत आहेत. शेतकरी कुटुंबाचे विझलेले डोळे मनात कालवाकालव करत आहेत. त्यांना सकाळ-संध्याकाळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे, सावकारी कर्जाचा फास त्यांना सतत भेडसावतो आहे, आता यापुढील आयुष्य काढायचे कसे या विमनस्कतेतून धडाधड गळफास लावले जात आहेत.        
हे चित्र कुठल्याही सहृदय माणसाच्या आतड्यास पीळ पडणारे आहे. पण शासन मात्र कोणत्या मातीचे बनले आहे कोण जाणे? ते काही केल्या द्रवत नाही हीच वस्तुस्थिती आहे.  नुसते त्या पिडीत भागाचे दौरे करून, फुकटची पाहणी करून काय साध्य झाले आहे आतापर्यंत ? बरे मदत जाहीर करून झाली ती या बळीराजा पर्यंत नक्की कधी पोहोचणार ? नुसत्या कोरड्या आश्वासनांची खैरात करून कुठल्या शेतकऱ्याचे पोट भरणार? बळीराजा, तू अजिबात खचून जाऊ नकोस, आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ही मलमपट्टीची भाषा करणे फारच सोपे आहे  परंतु याकरता उचलावी लागणारी ठोस पावले सरकार तिळमात्र ही उचलत नाही हीच सद्यस्थिती आहे  उलट चुकीच्या, अवैध पद्धतीने या शेतांचे पंचनामे होत आहेत  असे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते.     
सध्या जिथेतिथे निवडणुकांचे वादळ घोंघावते आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यात सर्वच राजकीय पक्ष मशगुल आहेत. प्रचाराची राळ उठते आहे. मीच तेवढा कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याची अहमहमिका लागलेली आहे.  त्या त्या नेत्याच्या नावाने मंत्र, चालीसा म्हटल्या जात आहेत, कवने-स्तवने यांना उधाण आले आहे , दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणारी उपहासपूर्ण भाषणे हे राजकारण्यांचे शस्त्र झाले आहे , पोस्टर्स, होर्डिंग, जाहीर सभा, इतरांची लफडी-कुलंगडी चव्हाट्यावर आणणे, जाहिरातबाजी यांना नुसता उत आला आहे. आता या सर्व राजकीय रणधुमाळीत बळीराजाच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे  किंवा त्याच्या कुटुंबाच्या वाताहतीकडे कोण लक्ष पुरवणार आणि तेही निवडणुकांच्या तोंडावर?  प्रत्येक वाहिनी मात्र इमाने इतबारे किती शेतकऱ्यांनी आजपर्यंत मृत्यूला कवटाळले याचे आकडे दाखवायचे काम करते आहे आणि प्रत्येक आकड्यागणिक सरकारच्या निष्क्रियतेचा प्रत्यय येत राहतो आहे.         
आम्ही अमुक एक मदत जाहीर केली आहे असे म्हणून शासन यातून आपला पदर सोडवू पाहते आहे. गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, निवडणुका पुढे ढकला, शेतकऱ्याच्या प्रश्नाला अग्रक्रम द्या असे काही मतप्रवाह कानावर आले होते पण बहुधा सरकार दरबारी या कानाने ऐकून त्या कानाने या गोष्टी सोडण्यात आल्या असाव्यात. असेही ऐकिवात आले की कोणी नेते तिथे जाउन काजू-बदाम खात खात पिडीत भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत होते तर कोणी बाटल्या आणि कोंबड्यांचे सप्ते  साजरे करित होते. गेंड्याचा अपमान का उगाच करायचा? सरकारची कातडी तर दिसामाशी त्यापेक्षा कित्येक पटीने निगरगट्ट, कोडगी होत चालली आहे. संवेदनाहीन माणसांचे प्रतिनिधित्व करताहेत ही सत्तेत बसून खुर्च्या उबवणारी माणसे! यांना हृदय हा अवयव तरी देवाने दिला आहे का याविषयी शंका निर्माण होते आहे जनतेच्या मनात. आणि यांना देशाचे नेते म्हणून संबोधायचे! का बुवा?            
भारताला अग्रेसर करण्याची स्वप्ने दाखवत निवडणुका होतील, सत्तांतरे होतील, विजयाची दुंदुभी वाजेल, वरती काढल्या जातील, गुलालांची, पैशांची अमाप उधळण होईल.  पण सामान्य जनतेचे प्रश्न मात्र कायम तसेच आणि तिथेच राहतील. इतक्या वर्षांचा अनुभवही तोच आणि तसाच आहे. एकदा का निवडणुका झाल्या की पुढली पाच एक वर्ष समस्त मतदारांकडे सहज पाठ फिरवता येईल. सत्ताधारी आणि विरोधकांचे शिशुवर्ग तसेच पुढे चालू राहतील. रस्ते, पाणी, वीज, घरे, कचरा, गटारे, भ्रष्टाचार, दैनंदिन प्रवास, महिलांवरील अत्याचार, महागाई , शिक्षण या अशा अनेक मुलभुत समस्या  जैसे थेच राहतील आणि अग्रक्रम मिळेल राजकीय कुरघोड्यांना आणि त्या भांडवलावर गब्बर होणाऱ्या इतर घटकांना!             
भारत या कृषिप्रधान देशात उपेक्षित राहण्याचा मान सर्वतोपरी बळीराजाला देण्यात येईल. भूगोलाच्या पुस्तकात लिहिलेला मजकूर आपण वाचू , 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' . हे वाक्य वाचताना बळीराजाचा खचलेला, केविलवाणा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येईल आणि आपण या वाक्याला हरकत घेऊन पुढे पुस्ती जोडू - नव्हे  'भारत हा आत्महत्याप्रधान देश आहे'.  

Saturday 1 March 2014

स्मार्ट फोन जेव्हा निर्बुद्ध होतो तेव्हा ………।


काही दिवसांपूर्वीच मी बाजारातून नवीन 'android' खरेदी केला. स्मार्ट फोन हे आज्ञाधारक  असावेतच अशा अपेक्षेनेच मी तो घेतला होता. इतर कोणी नाही तर या आपल्या मालकीच्या फोनने तरी आपलं म्हणणं ऐकावं अशी माफक अपेक्षा होती. सुरवातीला काही दिवस तो आज्ञाधारकपणे वागल्याने सुखाचे गेले  
निरनिराळे गेम्स, फोटोज, गाणी, व्हीडिओज, लाइव्ह wallpapers, chats मजा येत होती. जे हवं ते क्लिक करून नव्हे नुसते टच करून मी मिळवत होते.       
पण मग एक दिवस या फोनच्या अंगात आले. त्याला पुरेशी इलेक्ट्रिसिटी खाऊ घालूनही तो माझं काहीच ऐकेनासा झाला. नवा wallpaper डाऊनलोड  कर म्हणून सांगितलं तर जुनाच  wallpaper तो मला वारंवार दाखवू लागला. त्याला बहुधा 'जुनं ते सोनं' या म्हणीची आठवण येत असावी. त्यानंतर मी बुद्धीबळ खेळण्याचा प्रयास केला तर माझी महत्वाची मूव्ह चालली असताना याने एकदम डोळ्यांसमोर अंधार केला. मी शूटिंग बबल्स खेळताना तो मला मनाप्रमाणे शूट करू देईना. म्हणजे समोर आरोपी हात वर करून शरणागती पत्करून उभा आणि त्याचवेळेस पोलिसाच्या हातातली बंदूक घरंगळून खाली पडावी असा काहीसा सीन निर्माण झाला होता. त्यामुळे या खेळातही मलाच शरणागती पत्करावी लागली.    
मी स्वत: संगीत शिक्षिका आहे. मला नुसता गळा 'अपडेट ' करून चालत नाही तर कानही अपडेट करावा लागतो. म्हणूनच मी वेगवेगळ्या शास्त्रीय गायक/ गायिकांची गाणी सातत्याने ऐकत असते.  एखादा आवडीचा राग निवडून त्यातील बंदिश आवडत्या गायकाकडून ऐकावी म्हणून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फोनने नन्नाचा पाढा आळवण सुरु केलं. माझ्या आनंदाचं परिवर्तन घोर निराशेत झालं. आता काय करावं म्हणजे हा आपलं म्हणणं ऐकेल या प्रश्नाने माझं डोकं पुरतं पिंजून काढलं. माझी एक मैत्रीण म्हणाली म्हणून त्याला मी लटक्या रागाने चापट्या सुद्धा मारून पहिल्या . पण ज्याचं नाव ते! तो बहुतेक सुधारण्या पलीकडे गेला होता. त्याला न ऐकण्याचे जणू डोहाळेच लागले होते.     
माझा सगळा राग त्याच्यावर निघूनही तो 'झपूर्झा' स्थितीतच होता. तुला मी ज्या सूचना देते त्या कशा कळत कशा नाहीत. तुझी बुद्धी राजकारणी लोकांसारखी नेमकी कुठे चरायला गेली आहे वगैरे प्रश्नांचा भडीमार लोकप्रिय वाहिनी वरील प्रसिध्द संचालकासारखा हातवारे करून केला तरीही माझा फोन केवळ स्थितप्रज्ञाची अवस्था दर्शवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एकही आठी , एकही सुरकुती नव्हती, त्याच्या भुवया ही वक्राकार नव्हत्या. थोडक्यात निर्बुद्ध आणि गेंड्याची कातडी पांघरलेले महाभाग जसे दिसतात तसाच तो मला वाटत होता. मला काय वाटते आहे याची त्याला जराही फिकीर नव्हती. एवढे पैसे खर्चून विकत घेतलेला हा गुणी , चपळ आणि स्मार्ट असे विशेषण असलेला फोन चक्क मला बधत नव्हता.        
मी तुझे बिघडलेले डोके वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विडा मी तत्क्षणी उचलला. जाण्यायेण्यावर काही पैसे खर्च करून त्याचे डोके एकदाचे तपासून घेतले, त्याच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या आजारावर तात्पुरती का होईना उपाययोजना केली आणि त्याच्या वठणीवर आल्याची हमी मिळताच आनंदाने घरी परतले.    
महागाई, निवडणुका , whats app, परीक्षा असे सगळेच तोंडावर असताना मला ऐनवेळी तोंडघशी पाडणारा हा फोन आता प्रेमाने किंवा धाकाने माझ्या आज्ञेत राहील यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. जय android !