Sunday 9 February 2014

बालमोहनच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी सोहळा


शाळेतून १९७६ साली 'पास आउट ' झाल्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी जेव्हा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो तो सोहळा केवळ अपूर्व आणि शब्दातीत होता. एका डोळ्यात हसू आणि दुसरया डोळ्यात आसू अशी अवस्था बहुतेकांची झाली होती. अय्या असा आनंदोद्गार काढून एकमेकींना मिठी मारण्यातील सुख काय असतं ते आम्ही अनुभवलं. संपूर्ण कार्यक्रम अतिशय हृद्य झाला. प्रत्येकालाच जणू हरवलेलं बाल्य परत गवसलं होतं आणि आपल्या मुठीत ते आठवणींचे अमूल्य मोती साठवण्याचा जो तो प्रयास करत होता.   
महर्षी दादासाहेब रेग्यांनी नावारूपाला आणलेली बालमोहन शाळा , त्यांचे 'बाळांनो 'असे मन हेलावून टाकणारे अतीव जिव्हाळ्याचे शब्द, 'अंतर मम विकसित करी हे परात्परा' ही पारंपारिक प्रार्थना असे अनेक क्षण आम्ही सर्वांनी पुन्हा एकवार लहान होत अनुभवले. डोळ्यांत साचणारे पाणी महत्प्रयासाने  परतवायचा प्रयत्न माझ्यासारख्या अनेकांनी केला असेल.     


आमच्या गिंडे बाई, सावे सर, वयाचे नव्वदी पार केलेले गायनाचे जोशी सर आणि आम्हा सर्वांचा वर्गमित्र आणि आज शिवसेना या पक्षाची संपूर्ण धुरा  आपल्या खांद्यावर वाहणारा उद्धव ठाकरे या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. आमच्या 'ई ' तुकडीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयीची कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.    
ज्या आमच्या वर्गमित्रांनी अपार मेहनत घेऊन, आपल्या वर्गमित्र किंवा मैत्रिणींचा ठावठिकाणा शोधून हा सोहळा घडवून आणला त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. फोनाफोनी झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली तेव्हा एकेकाला किंवा एकेकीला भेटताना फार मजा आली. किती बदलला आहेस तू / बदलली आहेस तू, तू तेव्हा होतास/होतीस , तसाच /तश्शीच आहेस तू  असे शब्द जिथून तिथून कानावर येऊ लागले. मग काय करतेस / काय करतोस इथपासून तुला किती मुलं इथपर्यंत गाडी आली. मग शाळेत असताना हुशार कोण, ढब्बू कोण , शांत कोण, टवाळ कोण याची चर्चा सुरु झाली. 

    
आमच्या गुरुवर्यांचा सन्मान करण्यात आला, काही दिवंगत विद्यार्थी आणि गुरुजनांना भावांजली वाहण्यात आली. जे कुणी या सोहळ्यात काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नाहीत किंवा काही जणांचा थांगच लागला नाही अशांची यावेळी प्रकर्षाने आठवण झाली.    
गप्पा, गाणी, नाच असा  मनसोक्त धांगडधिंगा करून आम्ही आमचे वय विसरून अगदी शाळेत असल्यासारखे वागलो.  उद्धवच्या शब्दांत 'पदार्थ विज्ञान ' सुद्धा छान जमून आले होते. आता थोड्याच वेळात एकमेकांचा निरोप घ्यायचा ही जाणीव मन हळवं करून गेली. मग पुढच्या वेळी कधी आणि कुठे भेटायचे याचे बेत आम्ही आखायला लागलो. सहलीला जाऊया अशीही टूम निघाली. सहा महिन्यातून एकदा की वर्षातून एकदा  याचा विचारविनिमय सुरु झाला  आणि अजूनही त्याला पूर्णविराम मिळालेला नाही. बघू पुनर्भेटीचा प्रत्यक्ष योग कधी येतोय ते ! 

आपला प्रपंच, मुले, कौटुंबिक जबाबदाऱ्या, दुखलं-खुपलं, कर्तव्ये, आपण भूषवत असलेले मानाचे हुद्दे  या सर्व तपशिलांना तात्पुरते विसरण्याची ताकद शाळा नामक संजीवकात आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या प्रेरणादायी शिक्षकांत आहे यात कोणाचेच दुमत असायचे कारणच नाही.   

शालेय मेळावा ९ फेब्रुवारी २०१४


शाळेमधले मित्र भेटले
पाय वयाचे मागे फिरले
चिंचा -बोरे, कैरया -पेरू
टपरी बुवाची शोधित बसले
वार्षिक सण अन प्रभातफेऱ्या
पाय चिमुकले हिंडून आले
गप्पा -टप्पा, मस्ती -गाणी
सहलीमध्ये हरवून बसले
नाटक -अंकामधले अंतर
कोड जिभेचे पुरवित आले
वडा -समोसा , इडली -चटणी
नाकाशी खमंग दरवळले  

श्लोक -सुभाषित, कविता -गोष्टी
आठवणींचे मोती झाले
निबंध स्पर्धा, पठण -नाटके
विजयाचे सर गळ्यात आले
दिवाळी-नाताळाचे बक्षीस
उर्मी जयाची निर्मित आले
मूल्ये -संस्कारांची  पखरण
नाती मनांची सांधित आले 
अभ्यासाचे होई न ओझे
बाल्य न कोणी असे खुरडले
शिक्षण होते नव्हता धंदा
झाली न अभिमानाची शकले
आज सोहळा हा भाग्याचा
आनंदे मन भरून आले
पाऊलवाटेवर शाळेच्या
क्षण सोन्याचे वेचित आले