Friday 20 September 2013

विचार आणि वास्तव …………


आपण सर्वजण शालेय शिक्षण घेऊन, कॉलेजात जातो, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करू लागतो , यथावकाश संसार थाटतो आणि इतरांप्रमाणे एकदाचे मार्गाला लागतो.  या प्रवासात अनेक खड्डे, खाच-खळगे असू शकतात, सगळ्यांचीच वाट सुकर,सोपी नसते. मग अनेक वेळा आपण परिस्थितीला बोल लावतो, चिंतातूर होतो, हतबल होतो, दडपणाखाली वावरू लागतो. समाज हा आपल्याला शत्रू वाटू लागतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आपण तज्ञांचे सल्ले घेत फिरतो. आपले हित कशात आहे हेच आपल्याला कळेनासे होते. आपल्या या घुसमटीला समोरची व्यक्ती वा परिस्थिती जबाबदार आहे हे आपण मनाशी पक्के ठरवून टाकलेले असते. आपण बाहेर उत्तरे शोधत फिरतो जी केवळ आपल्या आतच आपल्याला सापडू शकतात जी आपल्याशी आयुष्याची नव्याने ओळख करून देऊ पाहत असतात.        
विचार प्रत्येकजण करतच असतो अगदी समजायला लागल्यापासून! फक्त योग्य विचार कसा करावा याचे बाळकडू आपल्याला मिळालेले नसते. माणसाची विचारप्रक्रिया त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वास्तव घडवत असते. समोरच्या व्यक्तीचे विचार हे आपले विचार असू शकत नाहीत. त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेला विचार हा आपल्या आत झिरपू द्यावा अथवा नाही या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाचे असते. विचार आणि माणसाचे आरोग्य यांचे जवळचे नाते असते. घातक विचार, ऋण अर्थात निगेटिव्ह विचार, नैराश्यजनक विचार  आणि निरुपयोगी विचार यांनी आपल्या शरीरातील उर्जेचा ऱ्हास होत असतो. याउलट धन अथवा चांगले विचार, आशावादी विचार यांनी व्यक्तीच्या शरीरातील उर्जा जास्त प्रमाणात स्रवते.               
दोन माणसे मोबाईलवर जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ज्या उर्जालहरींमुळे हा संवाद साध्य होतो त्या लहरी कधीच दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा अमुक एक विचार करते त्यावेळी तिच्या विचारानुसार अशा लहरी अवकाशात प्रक्षेपित होत असतात. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार ज्या प्रकारची उर्जा वातावरणात सोडली जाते तीच उर्जा परतून त्या व्यक्तीकडे येत असते. माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा अनुकूल वा प्रतिकूल अशा उर्जेने भरलेला असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे निर्देशित केलेला एखादा विचार त्यातील चांगल्या-वाईट उर्जेसकट त्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याच प्रकारची उर्जा परतून तुमच्याकडे येते.      
एखाद्या माणसाची हत्या करण्याआधी ती हत्या विचारांत झालेली असते. एखादा घातपात घडवण्याआधी तो विचारात झालेला असतो. एखादी लढाई प्रत्यक्ष हरण्याआधी ती विचारांतून हरलेली असते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तो आधी मनातील विचारांतून मिळवावा लागतो. दहाव्वीतील आपल्या पाल्याचा रिझल्ट अनेक पालकांनी प्रत्यक्ष परीक्षेआधीच कल्पनेत पाहिलेला असतो. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी याचे क्लासेस जरी आज उपलब्ध नसले तरी तसे साहित्य मात्र जरूर आहे. अनेक रोगांचे मूळ हे मनात केल्या जाणाऱ्या विचारांत असते या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वान आले आहेत.      
घातक अथवा निगेटिव्ह विचारांमुळे शरीरातील काही प्रतिकूल हार्मोन्स स्रवू लागतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सतत उदास असणारी माणसे शक्तिपात झाल्यासारखी दिसतात. काही माणसांना सतत काही ना काही तक्रारी करायची सवय असते. मला बरे वाटत नाही, समोरील व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मला समजून घेत नाही, समाज कुठे चालला आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तरुण पिढी ऐकेनाशी झाली आहे अशी कोणतीही कारणे पुढे करून ही माणसे रडत असतात, कुढत असतात आणि स्वत:चे विचार सुधारण्याऐवजी  ज्या गोष्टींवर आपले काडीमात्र नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलायची वाट पाहत बसतात. 
आपण दैव किंवा प्रारब्ध असे जे काही मानतो ते दुसरे-तिसरे काही नसून आपण अवकाशात सोडलेल्या उर्जेचे परतून येणे असते.  जो बाण अवकाशात मारला जातो तोच बाण तीच उर्जा घेऊन जेव्हा आपल्यासमोर येतो त्याला आपण नशीब ही संज्ञा देऊन मोकळे होतो. विचार निवडीचे स्वातंत्र्य आपले असते पण मुळात विचारांची निवड करायची कशी याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपल्याकडून अवकाशात सोडल्या जाणाऱ्या अनुकूल विचार लहरी ही आपल्या आनंदाची, सौख्याची नांदी असते. क्रोध, मत्सर, हेवा, असूया, निंदा या लहरी तीच उर्जा परत आपल्यापर्यंत पोहोचवतात याउलट आनंद, प्रशंसा, प्रेम, वात्सल्य,अनुकंपा,सहिष्णुता या लहरी तीच उर्जा परत आपल्याकडे आणतात. आपण घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, संत -महात्म्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यातील आपल्या विषयीचे प्रेम वा सद्भावना लहरींच्या रुपात आपल्यापर्यंत येउन योग्य ती उर्जा आपल्याला देत असतात.          
मनात आलेला वाईट विचार आपल्या दुष्कर्मात भर टाकतो तर सद्विचार सु-कर्मात! अनेक जण म्हणतात, आम्ही काहीच करत नाही, विचार येताच राहतात. पण असे नसते. वाईट विचारांना थोपवण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते आणि प्रयत्नपूर्वक चांगले विचार करण्याची क्षमताही आपल्यात असतेच असते. चुकीचे, नसते,भलभलते विचार करून अनारोग्याला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आमंत्रण द्यायचे की चांगले, सद्विचार मनात रुजवून आपल्या भोवतीचे वातावरण आणि माणसांना आनंदी करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे!      

Thursday 5 September 2013

शिक्षक दिनाच्या निमित्ताने ………….

मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण आज दुर्मिळ होत चालले आहे. नवीन नवीन शाळा आणि क्लासेसचे जिथेतिथे नुसते पेव फुटले आहे. भरमसाट फी घ्यायची, चकचकीत शाळेत, एअर कंडीशण्ड वर्गात मुलांना बसवायचे आणि तेच ते चाकोरीतले शिक्षण द्यायचे असा सगळा शिक्षणाचा खेळ चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे बहुतेक शाळा फारसे लक्ष पुरवित नाहीत. शारीरिक विकासाइतकाच मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा आहे हे आज शिक्षण क्षेत्रातील महत्वाची पदे भूषवणारे लोकही विसरून गेले आहेत. मुलांचे शिक्षण हे घरापासून सुरु होत असल्याने मुलांचे पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक असतात. पण वेळेच्या अभावापायी म्हणा किंवा इच्छेच्या अभावापायी पण बहुतांश पालक ही आद्य  शिक्षकाची भूमिका निष्ठेने बजावताना दिसत नाहीत. त्यामुळेच की काय शारीरिक आणि भावनिक सक्षमता हरवून बसलेली आणि केवळ पैशालाच परब्रम्ह मानणारी पिढी यापुढे निर्माण होईल की काय अशी शंका मनाला ग्रासू लागली आहे.         
मोकळ्या वातावरणात जाणे, सकाळचा अद्वितीय निसर्ग पाहणे, आजूबाजूच्या परिसरातील झाडा-फुलांशी मायेने बोलणे, सूर्योदय पाहणे, आकाशाचे रंग बदलताना डोळ्यांनी टिपणे, मुक्या प्राण्यांशी ममतेने वागणे, संकटग्रस्तांची  तत्परतेने मदत करणे,  कोणत्याही सामाजिक,आर्थिक स्तरातील माणसाशी शालीनतेने वागणे, त्याच्या व्यवसायाचा यथायोग्य आदर करणे, दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे, घरी पालकांना सर्व प्रकारची मदत करणे या आणि अशासारख्या सवयी आज आपण मुलांना लावतो आहोत का याचा पालकांनी आणि शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची पाळी आली आहे.           
प्रदूषणावर शाळेत धडा असतो पण हे प्रदूषण टाळण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे प्रात्यक्षिक मुलांना का दाखवत नाहीत?  रस्त्यावर इथेतिथे कचरा टाकू नये ही वृत्ती अंगी बाणण्यासाठी मुलांना शहराच्या, गावाच्या अस्वच्छ भागाची पाहणी करायला नेउन तेथील वातावरण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गैरसोय दाखवणे गरजेचे नाही का? विजेचा,पाण्याचा वापर नियंत्रित कसा करावा हे शिकवणे महत्वाचे नाही का? वृध्द,आजारी माणसाची शुश्रुषा कशी करावी, प्रथमोपचार कसे करावेत, शासनाने पुरविलेल्या शासकीय सुविधांचा लाभ कशा प्रकारे घ्यावा, मानवी मुल्यांची जपणूक कशी करावी, झाडे कशी लावावीत व त्यांची निगा कशी राखावी अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यास शाळा तसेच पालक अनुत्सुक दिसून येतात.     
आजकाल मुलांच्या शाळेच्या सहलीही पंचतारांकित हॉटेलात उतरतात. एकंदर पॉश शाळा, हॉटेल्स आणि मॉल्स या सो-कॉल्ड उच्चभ्रू वातावरणात मुले वाढतात पण विकसित होत नाहीत. शिक्षकांनी शिकवलेल्या पाठ्यपुस्तकाच्या धड्यातील  उत्तरे पाठ करून परीक्षेत घोकणे याला बुद्धीचा विकास कसे म्हणायचे? भूमितीतील प्रमेये आणि भाषेचे निबंध मुले पाठ करतात केवळ काही मार्कांचे उद्दिष्ट ठेवून! घरी पालकांना वेळ नसल्याने श्लोक वर्ग, संस्कार वर्ग इथे मुलांना बळजबरीने पाठवले जाते,  कुत्र्यांच्या, मांजरींच्या पिल्लांना दगड मार, त्यांच्या शेपट्या ओढ, झाडांची पाने, फुले कुस्करून त्यांचा लगदा कर, दुपारच्या वेळी लोकांच्या घराची डोअरबेल वाजवून पळून जा अशा बाललीलांत बरीचशी मुले रमताना दिसतात, सगळ्यात कळस म्हणजे छंद वर्गात मुलांना ढकलणे! चित्रकला-गाणे-नृत्य याकडे आपल्या मुलाचा कल आहे की नाही हे आजमावण्यासाठी हा आटापिटा केला जातो. हे सगळे सातव्या-आठव्या इयत्तेपर्यंत चालते. नववी आणि दहावीत मूल गेले की हे सगळे छंद वर्ग ताबडतोब मुलाला न विचारताच बंद केले जातात. मग अभ्यास एके अभ्यास. तू अमके टक्के मिळव, तुला महागडी वस्तू मिळेल हे आमिष दाखवले की आपली जबाबदारी संपली या भ्रमात अनेक पालक वावरत असतात. नापास झालेल्या मुलांना घरी-दारी अपमान सहन करावा लागतो. तू धुणी-भांडी कर, तू वडा-पावाची गाडी चालव असे मौलिक सल्ले पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दिले जातात त्यांच्या हातात असलेल्या एखाद्या कलेची जराही दाखल न घेता!              
आपण माणूस घडवतो आहोत की पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टाकसाळी बनवतो आहोत, आपण भावना-संवेदनांची कदर करणारी पिढी घडवत आहोत की कोरडेठक्क पाषाण घडवत आहोत, आपण दुसरयाला माणुसकीने वागवणारी पिढी घडवत आहोत की दुसऱ्याला सतत निंदनीय, तिरस्करणीय पद्धतीने अवमानित करणारे, अर्वाच्च्य शब्दांनी संबोधणारे, केवळ काही रकमेसाठी समाजातील कार्यनिष्ठ माणसांचा खून पाडणारे, स्त्री-जातीची अब्रू वेशीवर टांगणारे नर-राक्षस घडवत आहोत, आपण निसर्गाचे, प्राणीमात्रांचे मित्र घडवत आहोत की शत्रू, आपण जीवनातील आव्हाने खंबीरपणे स्वीकारणारी पिढी घडवत आहोत की नैराश्याच्या गर्तेत स्वत:ला झोकून आयुष्य पणाला लावणारी, आत्महत्येस प्रवृत्त होणारी, व्यसनांच्या आहारी जाउन स्वत:ला बरबाद करणारी  पिढी घडवत आहोत का याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ कधीच येउन ठेपली आहे.