Thursday 17 January 2013

प्रवास आणि प्रवृत्ती............


या अवाढव्य जगात अनेक जण प्रवास करत असतात. कुणी व्यवसायानिमित्ताने तर कुणी केवळ भ्रमंती म्हणून! काहीजण सहप्रवासी म्हणून चांगले तर काही अजिबात चांगले नसतात. किंबहुना अशांच्या आपल्याबरोबर असण्याने आपल्या चांगल्या आणि आनंदी मूडचे खोबरे व्हायला जराही वेळ लागत नाही. त्यामुळे कुणाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्याबरोबर एकदा तरी लहान-मोठा प्रवास जरूर करावा. 
आम्ही कोकणातून परत येत होतो. एका प्रायव्हेट कारमधून. आमच्या बरोबर नात्यातील काहीजण होते. ड्रायव्हर जवळील सीटवर माझी मोठी मुलगी बसल्या कारणाने नातलगांमधील एक मध्यमवयीन गृहस्थ फारच रुष्ट झाले. ते नुकतेच ड्रायव्हिंग शिकले होते म्हणून मग ड्रायव्हर जवळ बसून त्याला सारख्या सूचना करणे हा त्यांचा फावल्या वेळातील छंद होता. शिवाय फ्रंट सीटवर एक मुलगी बसल्या कारणाने त्यांचा पुरुषी अहं सुद्धा नाही म्हटलं तरी दुखावला गेला होता. या गोष्टीचा राग ते येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर काढत होते. कोणी गाडीला ओव्हरटेक केले किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांची गाडी पुढे हाकली की त्यांची जीभ नको तेवढी सैल होत होती. आपल्या गाडीत जवळ जवळ सगळ्या महिलाच आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला होता अथवा त्यांना त्याची क्षिती नव्हती. त्यामुळे त्यांनी उच्चारलेल्या अपशब्दांमुळे आम्ही सारे अवाक झालो. 
पुढे कोल्हापूर आले. एका हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण जेवणासाठी उतरलो. उपाहारगृह अद्याप बंदच होते. झाले. त्यांचा संताप शिगेला पोहोचला. मुंबईतील हॉटेल्स कशी लवकर उघडतात आणि येथील कशी नाहीत यावर एकांगी चर्चा सुरु झाली. मुळातच प्रवास करताना किमान सहनशीलता अंगी बाळगावी लागते हे सुद्धा त्यांना ठाऊक नसावे याचे मला मनोमन आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने त्या गजाननाच्या कृपेने हॉटेल उघडले आणि जेवण पोटात गेल्यावर त्यांचा पारा आणखीनच वर चढला. मग बेचव जेवणावर निरुपण झाले. आम्ही सगळेजण गाडीत बसलो.
मुंबई पर्यंतचा जवळ जवळ दहा-बारा तासांचा प्रवास होता. त्यामुळे टप्प्या टप्प्याने थांबून, ड्रायव्हरला मध्येच थोडी विश्रांती देणे गरजेचे होते. त्यामुळे आमचा प्रवास सुरक्षित होणार होता. पण दुसऱ्या दिवशीच्या ऑफिसचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसल्या कारणाने त्यांनी ड्रायव्हरला ताकीद दिली की आता कुठे थांबशील तर बघ. त्यावर त्यांच्याच समोर माझ्या धाकट्या लेकीने ड्रायव्हरला सांगितले की आम्हाला अजिबात घाई नाही. तेव्हा तुला जिथे कुठे थांबावेसे वाटेल तिथे तू बिनदिक्कत थांब.आमची परवानगी घ्यायची गरज नाही. झाले. साहेब आणखी चिडले, धुसफुसत राहिले. एव्हाना आमच्याही चांगल्या मूडचे पुरते खोबरे झाले होते. कोणीच कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हते. 
अखेर मजल दरमजल करित वाशीच्या हद्दीत गाडी शिरली. सगळ्यात आधी ठाणे येणार होते म्हणून आम्ही सज्ज झालो. तर कुत्सितपणे हे गृहस्थ म्हणतात कसे, तिसऱ्या मजल्यापर्यंत गाडी न्यायची का? हा प्रश्न ऐकल्यावर माझे तोंड फारच कडू झाले. स्त्री दाक्षिण्य लांबच राहिले. आमचे घर अगोदर येणार म्हणून हा राग होता. 
इतक्या सगळ्या प्रवासात त्या गृहस्थांनी फक्त आपली सोय पहिली होती. अगदी त्या दिवशी सक्काळी लवकर उठण्याचा तगादाही त्यांनी लावला होता. दुसऱ्या दिवशीचे ऑफिस गाठण्यासाठी विचित्रपणे वागून ड्रायव्हरचा आणि आमचा रोष त्यांनी अकारण ओढवून घेतला होता. अर्थात त्याची त्यांना बिलकुल पर्वा नव्हती. यापुढील प्रवासात असला सहप्रवासी अजिबात नको असे तिथल्या तिथेच मी मनात पक्के ठरवून टाकले.