Thursday 27 September 2012

जीवेत शरद: शतम !

लताचा आवाज ही कालमानाच्या अथवा वयाच्या संकल्पनेत बसणारी गोष्टच नव्हे.  निर्गुण, निराकार शक्तिसारखा तिचा आवाज हा सर्वव्यापी आहे. आजवर अनेकांनी लताविषयी भरभरून लिहिले आहे. तिला आकंठ ऐकले आहे. तरीही तिच्याविषयी खूप काही लिहावेसे, बोलावेसे वाटते. तिचा मंजुळ, नितळ, अनुपमेय स्वर कानात साठवण्यासाठी मन आपसूक आतुर होते. तिच्या स्वरातील अध्यात्म पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहते.   
तिच्या शरीराला वयाची मर्यादा असली तरी तिचा आवाज हा चिरंजीव, चिरंतन आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तिचा आवाज हे एक मूर्तिमंत चैतन्य आहे. विरहात पोळलेल्या प्रेमीजनांसाठी तिचा आवाज हे एक मृदुल मलम आहे. भक्तिरसात बुडालेल्यांसाठी तिचा आवाज ही एक योगसाधना आहे. इतका चतुरस्त्र आवाका असलेला हा अलौकिक स्वर आज अजून एका वर्षाने वृद्धिंगत होतो आहे.
लता हा कानसेनांच्या हृदयात फुलणारा बारमाही वसंत आहे. इथे शिशिराची पानगळ औषधालाही नाही.  
किती संगीतकारांसाठी लता गायली? किती संगीतकार तिच्या आवाजातील सौदर्य सर्वदूर पसरवण्यासाठी जन्माला आले? सांगणे मुश्कील आहे. ती जीव ओतून गायली. रात्रीचा दिवस करून गायली. एका चहाच्या कपावर तिने अनेक गाण्यांचे सौदर्य सशक्तपणे तोलून धरले. पोटाला बसणारे चिमटे तिच्या गाण्याला अधिकाधिक परिपक्व, सक्षम आणि दृढ करत गेले. 'पिकोलो' जातीच्या तिच्या आवाजाने अवघ्या दुनियेलाच भ्रमिष्ट केले. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तिच्या आवाजाचे सान्निध्य रसिकाला सुखावू लागले. संसार तापाने शिणलेल्या, श्रमलेल्या लाखो-करोडो जनतेसाठी तिचा आवाज ही एक हमखास दवा झाली.  
तिला कधीच अहोजाहो करावेसे वाटत नाही. तिच्या बाबतीत लौकिक उपचार पाळावेसे वाटत नाहीत. तिने आपल्या कानाद्वारे हृदयाचा कप्पा कधीच काबीज करून त्यात कायमची वसाहत केली आहे. आता जी व्यक्ती इतकी जवळची आहे तिला संबोधताना अहोजाहो काय करायचे? ती आमचे आदरस्थान आहे यात शंका नाही पण तिला आदरार्थी संबोधून आम्हाला तिला परके करायचे नाही. तिचा खडीसाखरेसारखा गोड आवाज सदैव आमच्या भोवती रुंजी घालत राहतो. तिची छोटीशी मूर्ती, दुसऱ्या खांद्यावरून ओढून घेतलेला पदर, तिचे आदबशीर, सौजन्यपूर्ण वागणे, तिच्या डोळ्यांतील मिश्कील छटा, तिचे चांदणहास्य हे सगळे अंत:करणात अनेक वर्षांपासून साठलेले आहे. 
कै.कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात भरारी मारण्याआधीच लताच्या आवाजाने गगनाला गवसणी घातली आहे. अशी विश्वव्याप्त गोष्ट ही प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात नेहमीच निष्ठापूर्वक पूजली जाते. तिच्या 'मीरा भजनांनी' अनेकदा अतींद्रिय अनुभूती दिलेली आहे. ही एका अंशीही अतिशयोक्ती नाही. तिच्या प्रेमागीतांवर अनेक प्रेमींनी आपले सूर जुळवले आहेत.  तिच्या 'जा रे जा रे उड जा रे पंछी' या गाण्याने अनेक विरहीजनांची हृदये विद्ध झाली आहेत. तिच्या 'ओ सजना बरखा बहार आयी' या गीतातील गोडवा आजही रत्तीभरही कमी झालेला नाही. 'रैना बीती जाये', 'बैय्या ना धरो', 'ये जिंदगी उसी की है', 'मोहे पनघट पे', 'जाग दर्दे इश्क जाग', जिया लागे ना', 'मनमोहना बडे झुठे', 'सावरे सावरे' या आणि अशा असंख्य गाण्यांची आपण जन्मोजन्मीची गुलामी पत्करलेली आहे. 
संत तुकारामांच्या अभंगातील आर्त लता आपल्याला अंतर्मुख करून गेली आहे. 'भेटी लागे जीवा', 'कमोदिनी काय जाणे', अगा करुणाकरा' ही लताची साद शब्दातीत आहे. तसेच 'पैल तोगे काऊ कोकताहे', 'ओम नमोजी आद्या, 'घनु वाजे घुणघुणा' हे ज्ञानेश्वारांचे लताने गायलेले अभंग ही भक्तीरसाचे सेवन करणाऱ्यांसाठी एक आनंदपर्वणी आहे. 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' हा अभंग ऐकताना त्या सगुण स्वरूपपलीकडील अगाध सौदर्याची प्रचीती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. 
मदन मोहनने तिच्याकडून गाऊन घेतलेल्या गझलांमधील लुथ्फ ठायी ठायी जाणवत राहतो. 'आपकी नजरोने समझा', 'है इसिमे प्यारकी आबरू, 'यु हसरतों के दाग' या आणि अशा कैक गझला आपल्या मनावर आजही गारुड करून आहेत. अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, नौशाद, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, एस.डी, आर.डी बर्मन, जयदेव, मदन मोहन, सज्जाद, सी.रामचंद्र अशा अनेक संगीतकारांनी लताच्या आवाजात आपल्या रचना अजरामर केल्या किंवा अशा अलौकिक प्रतिभावंत संगीतकारांच्या रचनांतून लता आपल्या काळजात कायमची रुतली आहे. 
तिच्या विषयी किती लिहावं हेच समजत नाही. लता हा एक अजोड ग्रंथ आहे जो कधीच आत्मसात झालेला आहे. पण आपल्या श्रावणशक्तीनुसार तिला कितीही ग्रहण केली तरी ती दशांगुळे उरतेच! हेच तिच्या आवाजाचे खरे मर्म आहे.
अशा या श्रोत्यांच्या कानाला भरभरून तृप्त करणाऱ्या अनमोल आवाजातील माधुर्य कधीही लुप्त न होवो हीच लताच्या वाढदिवशी त्या जगनियंत्याच्या चरणी प्रार्थना! 

Sunday 23 September 2012

रेल्वे स्टेशन आणि मी ........

आज माझा दादरला कवितांचा कार्यक्रम होता तोही दोन ठिकाणी. मी लगबगीने घरातील सारी कामे आवरली आणि निघण्याची तयारी करू लागले. जरा लवकरच निघायला हवे, मी मनाशी म्हटले. इथून बस किंवा रिक्षा जी काही आधी मिळेल ती पकडायला हवी. रिकामी रिक्षा अडवण्यासाठी लोक रस्ताभर पसरलेले असणार. आपल्या भाग्यात रिक्षा येण्यासाठी आपल्याला घरापासून किमान दहा-पंधरा मिनिटे चालावे लागणार. त्यापेक्षा बसचा ऑप्शन बरा. तिथे जाऊन भल्या मोठ्या रांगेत उभे राहायचे. समोर तीन-चार रिकाम्या बसेस दृष्टीला दिसणार. पण त्यापैकी आपल्याला हव्या त्या बसला गतिमान करणारा बसचालक चहा पीत सहकाऱ्यांशी गप्पा मारत असणार. माझ्यासारखेच अनेक उतारू या दृश्याला विलक्षण असहायतेने डोळ्यांत साठवत बसणार. मग काही वेळाने त्याच्या शेड्युलप्रमाणे तो रमत गमत बसच्या दिशेने जाणार. आपण रांगेत अगदी शेवटी असल्याने बसणे सोडून द्या पण उभ्याने तरी जाता येईल काय याची चिंता करत राहणार. या सगळ्या सव्य-पसव्व्याचा हिशेब करत बऱ्याच अगोदर मी घरातून निघाले.  
मी घरापासून बस stop च्या दिशेने चालू लागले. पण अहोभाग्य ! एका उतारूला पोहोचवून एक रिक्षा परत येत होती. मी हावऱ्यासारखी रिक्षा झडप घालून पकडली आणि ती रिक्षा पकडायला आलेल्या काही लोकांकडे विजयी मुद्रेने पाहत मी ठाणे स्टेशनाच्या दिशेने निघाले. मी भलतीच खूष होते. गाडीही अशीच पटकन मिळावी अशी मनोमन प्रार्थना करत होते. मी रिक्षातून उतरले. रिक्षावाल्याकडे चक्क सुटे पैसे होते जे त्याने मला अजिबात न कुरकुरता दिले. रिक्षाचा पल्ला मी आज सर केला होता. मी स्टेशनात शिरले. पर्समध्ये CVM कुपन्स होती. स्टेशनवरील यंत्राने साथ दिली तर त्यांच्यावर शिक्क्याचे संस्कार होणार होते. मी साशंक मनाने त्या यंत्राशेजारी गेले आणि माझी कुपन्स पंच झाली. मला गहिवरून आल्यासारखे वाटले. मी एकवार सभोवार नजर फिरवली  आणि माझ्या लक्षात आले की स्टेशन आमुलाग्र बदलले आहे. मी माझ्याच नादात असल्याने माझे लक्ष इतर कुठे गेलेच नव्हते. तिकीटाची रांग भराभर पुढे सरकत होती. आजूबाजूला भिकारी औषधालाही दिसत नव्हते. पान खाऊन पचापच थुंकण्याच्या अमूल्य खुणा जमिनीवर कुठेच दिसत नव्हत्या. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तिकीट देणारेही शांत आणि समाधानी चेहऱ्याने तिकिटांचे वाटप करत होते. आरडाओरड नाही, गोंधळ नाही, शिवीगाळ नाही सारे कसे शांत, निवांत, सुरळीत चालले होते. कोणीही तिकिटांच्या रांगेत घुसत नव्हते. तिकीट काउंटर वरील कर्मचारी चहा पिण्यासाठी म्हणूनही गायब होत नव्हते. उखडलेल्या फरश्या, पाण्याची थारोळी, कचरापट्टी काही काही म्हणून दृष्टीपथात येत नव्हते. फेरीवाले, भाजीवाले अदृश्य झाले होते. या अनोळखी वातावरणामुळे मी विलक्षण भांबावले. सुन्न झाले. इतक्यात काही हवंय का आपल्याला? अशी गोड आवाजात पृच्छा झाली. मी झटकन वळून पहिले तरं एक महिला कर्मचारी मला मदत करण्यासाठी म्हणून तत्परतेने उभी होती. दादरला जाणारी गाडी कोणत्या फलाटावर लागेल? मुळात एकामागोमाग एक अशा अविश्वसनीय गोष्टी घडल्याने हे रेल्वे स्टेशन आहे यावरील माझा विश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती रेल्वेच्या मालकीची आहे की नाही किंवा या ठिकाणाला नक्की काय म्हणतात हेच लक्षात येत नव्हते. अहो एक, तीन अथवा चार नंबरच्या फलाटावर जा तिथे तुम्हाला इच्छित गाडी मिळेल, फास्ट लोकल हवी असेल तरं सहा नंबरवर जा. गुड डे. ती सुहासिनी, मधुरभाषिणी  इतर भगिनींना मदत करण्यासाठी पुढे गेली. 
रेल्वे प्रशासन एकाएकी इतके पराकोटीचे कसे सुधारले हे मी ह्याची देही, ह्याची डोळा अचंबित होऊन पाहत होते. फलाटावर कोणतीही अनावश्यक गडबड नव्हती. चाकरमानी समाधानी, चिंतामुक्त दिसत होते. कॉलेजकुमारांच्या आणि कुमारींच्या घोळक्यातून वार्तालाप होत होते, हास्याचे फवारे उडत होते. फलाट विलक्षण स्वच्छ दिसत होते. चकचकीत पोलिश केलेल्या बुटासारखे! येणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट वेळेवर होत होती. ती गाडी नेमकी कोणत्या फलाटावर येणार आहे ही पूर्वसूचना मिळाल्याने प्रवाशांची धावपळ वाचत होती. मी सी.एस.टी कडे जाणारी गाडी पकडली. गाडीत चढताना जराही धक्काबुक्की झाली नाही. मुळात गाड्या वेळेवर असल्याने चढण्यासाठी फारशी गर्दी नव्हतीच. मला सकाळच्या गाडीत विनासायास विंडो सीट मिळाली. मी आनंदाने रडण्याच्या बेतात होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीत बसल्यानंतर एकदाही नाक धरायला लागले नाही. भाजी, मासळी, कचरा किंवा विष्ठा यांचा मागमूसही नसल्या कारणाने 'क्षण आला भाग्याचा' असे मोठ्याने म्हणावेसे वाटत होते. गाडीच्या पृष्ठभागावर पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याची भारतीय संस्कृतीला साजेशी अभिमानास्पद चिन्हे नव्हती. आज रेल्वे स्टेशनात आल्यापासून नुसता सुखाचा वर्षाव होत होता. प्रत्येक स्टेशनावर चढता-उतरताना करावी लागणारी जीवघेणी कसरत आज दिसतच नव्हती. जेमतेम काही प्रवासी चढत होते तरं काही उतरत होते. तेही एकमेकांना दाक्षिण्य दाखवून. या सुखाच्या परमावधीचा अनुभव डोळ्यांत साठवत आणि  गाणे गुणगुणत मी दादरला सुखनैव उतरले. माझी न सुटलेली साडी, न विस्कटलेले केस आणि न घामेजलेला चेहरा हे माझ्या सुखाचे भांडवल होते. 
इतक्यात आई ऊठ , आई ऊठ अशा परिचित हाका मला ऐकू आल्या. आज तुझा दादरला कार्यक्रम आहे ना ? मग लवकर निघायला हवं तुला. माझी लेक मला जागं करित होती.    

Thursday 13 September 2012

पांडू


मुळात मी पाळीव प्राण्यांची शौकीन नाही. मला प्राणी पाहायला आवडतात पण दुरूनच! कुत्री-मांजरी हे सर्रास घरात वावरणारे प्राणी. माझ्या लहानपणी माझ्या मनात कुत्र्यांविषयी प्रचंड भीती होती. रस्त्यावरून चालताना गल्लीतली कुत्री एकाएकी भुंकायला लागली की मी माझ्या बाबांचा हात खूप घट्ट धरत असे. जणू काय ही सर्व कुत्री आता माझ्यावर चाल करून येणार आहेत असा माझा एकूण अविर्भाव असायचा. माझे बाबा कुत्र्यांना गोंजारायचे, त्यांचे लाड करायचे पण माझी आत्या मात्र गल्लीच्या दुसऱ्या टोकाला एक जरी कुत्रं दिसलं की 'हायपर' व्हायची. माझ्या बाबांचे मित्र विजय खातू यांच्याकडे चार-पाच कुत्री होती. गणपतीला त्यांच्याकडे आवर्जून बोलावणे असायचे. मी खूप टाळाटाळ करायची पण बाबांपुढे माझे काही चालायचे नाही. त्याच्या घरी गेल्यावर आधी श्वान-दर्शन आणि मग गणपती-दर्शन! गणपती भोवतीची त्यांनी केलेली सुंदर आरास मी कधीच नीट पाहू शकले नाही कारण सगळे लक्ष त्या कुत्र्यांकडे असायचे. ती कोणत्याही कारणाने भुंकू लागली की मला धडधडायला लागायचे. या कारणामुळे कुत्रा या प्राण्यापासून मी सदैव चार हात लांबच राहिले. 
कालमानाप्रमाणे माझे वय वाढले तरीही घरच्या किंवा दारच्या कुत्र्यांची भीती तशीच अबाधित राहिली. समोरून कुत्रं दिसलं की माझा रस्ता बदलत असे. कुत्रांच्या वेगवेगळ्या जातीबद्दलही मला जराही औत्सुक्य नसे. माझ्या सुरतेच्या आत्याचे घर हे कुत्र्या-मांजरांना आंदण दिल्यासारखेच होते. कुठल्या ना कुठल्यातरी प्राण्याचा तिच्या घरात हमखास वावर! तिच्या घरातील कुत्र्यांच्या सवयींविषयी ती भरभरून बोलत असे. त्यांचे अमाप लाड ती करत असे. प्रसंगी त्यांना औषधोपचारही ती करायची. तिच्या घरी तिची लाडकी लंगडी कुत्री तिच्या बेडवर ऐसपैस पहुडलेली आणि आत्या मात्र खाली गादी घालून झोपलेली असे दृश्य अनेकदा दिसायचे. त्यावरून आम्ही तिची भरपूर चेष्टाही करायचो. पण तेव्हाही मला या प्राण्याचे कधीच आकर्षण वाटले नाही. 
मात्र पांडू माझ्या आयुष्यात आला आणि मी बदलले. हा माझ्या घरचा पाळीव कुत्रा नव्हे तर आम्ही राहतो त्या इमारतीच्या जवळ वावरणारा, एका पायाने किंचित अधू असलेला कुत्रा. पावसाळ्यात याचे बस्तान आमच्या इमारतीतच असते. Labrador जातीचा हा फिकट चहाच्या रंगाचा कुत्रा अत्यंत लोभस आणि निरुपद्रवी आहे. त्याच्या भित्र्या,भोळ्या आणि बावळट स्वभावामुळे आम्ही ( मी आणि माझ्या लेकींनी) त्याचे नामकरण 'पांडू' असे केले. हा तसा एरवी शांतच असतो म्हणजे इतर कुत्र्यांसारखे सतत भुंकणे, एखाद्याच्या अंगावर जाणे, एखाद्याच्या हातात पिशवी दिसली की त्याच्यामागे जात हुंगणे ही कुत्र्याच्या जातीला शोभणारी सत्कृत्ये तो करत नाही. तो शांत एका कोपऱ्यात पडून असतो. त्याच्याकडून त्याच्या भाई-बंधुंच्याही काही अपेक्षा नसाव्यात. मात्र कधीतरी एकदम अवसान आल्यासारखा उठून कोणाच्यातरी मागे धावत जातो आणि मी ही तुमच्यासारखाच एक नॉर्मल कुत्रा आहे असे त्याच्या बांधवांना सांगण्याचा प्रयत्न तो करतो. आपापली कुत्री घेऊन हिंडायला येणारे बहुतेक करून रस्त्यावरील कुत्र्यांची टार्गेट्स असतात. त्या पाळीव कुत्र्यांवर ही समस्त रस्त्यावरील कुत्री नुसत्या भुंकण्याच्या फैरी झाडत असतात. तो सगळा सोहळाच अवर्णनीय असतो. पण या सगळ्या गोंधळात पांडू मात्र विलक्षण अलिप्त असतो नव्हे तसा तो राहू शकतो. कधी कधी वाटत की हा पांडू म्हणजे कुत्र्यांच्या जातीला कलंक आहे. भुंकणे नाही, बागडणे नाही, कचऱ्यात तोंड घालणे नाही, आल्या-गेल्याला घाबरवणे नाही. मी बरा आणि माझे अलिप्त राहणे बरे या भूमिकेतून जणू तो वावरत असतो. 
पांडूचे चापल्य आणि कुत्र्याच्या जातीला जन्माला आल्याचे सार्थक फक्त एकाच बाबतीत दिसून येते. दर रविवारी जेव्हा आमच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या सावंत काकांच्या मागे तो ज्या पद्धतीने वारा प्यायल्यासारखा जातो त्यावरून त्याच्यात कुत्रा नामक जातीचा थोडा तरी अंश आहे याची प्रचीती येते. त्यांच्या त्या मासळी-चिकन-मटण या गोष्टींनी भरलेल्या पिशव्या पहिल्या की पांडू फॉर्मात येतो. त्याची रविवारची तरतूद झालेली असते. एकदा चुकून रविवारी मी त्याच्यासाठी सामिष नसलेले अन्न घेऊन आले तेव्हा त्याने माझ्याकडे ढुंकूनही पहिले नाही. तो सरळ सावंत काकांच्या घराच्या दिशेने चालता झाला. थोडक्यात त्याला रविवार नक्की कळत असावा अशी माझी खात्री आहे. तो गोडघाशा आहे. प्लास्टिकच्या पिशवीतून दिलेले खायचे पदार्थ त्याला आवडत नाहीत. प्लास्टिकच्या बाउलमधून दिलेले पदार्थ तो प्रिफर करतो. पदार्थ जरी समोर असला तरी आधी माझ्याकडून लाड करून घेतल्यानंतरच तो अन्न खातो. माझ्या भावना त्याच्यासाठी महत्वाच्या असाव्यात. 
त्याचे भोकरासारखे काळेभोर आर्जवी डोळे बघितले की मी विरघळून जाते. त्याच्याशी (मराठीतच) खूप बोलते. त्याला भाषा कळली नाही तरी लहरी (vibrations) कळत असाव्यात. त्याला आन्जारते-गोंजारते. तोही शेपटी हलवून आणि चारी पाय वर घेऊन माझ्या बोलण्याला प्रतिसाद देतो. काही कारणाने कधी त्याला खायला मिळाले नाही की माझ्या हृदयात कालवाकालव होते. माझ्याकडून त्याचे आवडते असे काही स्पेशल खायला मिळाले की तोही खूष असतो. मात्र रविवार सोडून. रविवार खऱ्या अर्थाने साजरे करणारे सावंत काका त्याला त्या दिवशी जास्त जवळचे वाटतात.  
मला श्वान-संप्रदायाविषयी कुतूहलाने विचार करायला भाग पाडणारा पांडू आज माझ्या प्रेमाचे एक अविभाज्य अंग होऊन बसला आहे.  
(टीप: वरील फोटो पांडूचा नाही. मला तो फोटो काढून देत नाही. त्याच्यासमोर मोबाईल धरल्यास तो तोंड फिरवतो. त्यामुळे साधारण त्याच्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याचा फोटो मी नाईलाजास्तव वर घातला आहे.) 

Tuesday 11 September 2012

बायकांनो, तुमच्यातील 'काली' जागवा!

स्थळ दिल्ली शहर. शेजारच्या गाजियाबाद या छोट्या शहरातून लग्न करून दिल्लीला आलेली विवाहिता. सुशिक्षित. कुलीन. संस्कारी. Dentist . दिल्लीसारख्या मोठ्या शहरात स्वत:चे करियर सुरु करण्याची मनीषा बाळगणारी. हसरी. आत्मविश्वासाने अंतर्बाह्य फुललेली. तिला बघायला आलेल्या मुलामध्ये स्वत:चा जीवनसाथी शोधणारी. आई-वडील-भाऊ असे तिचे कुटुंब. तिचे वडील आणि ती स्वत: हुंडा या प्रथेचा कडवा विरोध करणारे.  
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीकडून श्रीमुखात खाण्याचे सौभाग्य प्राप्त झालेली. अशी ही स्मृती विवाहानंतर केवळ काही महिन्यांतच नैराश्याची शिकार होते. मानसोपचार तज्ञाकडे उपचार घेऊ लागते. सुकलेला चेहरा, डोळ्याखाली साचलेली काळी वर्तुळे, आत्मविश्वास हरवलेली देहबोली, मनातील स्वप्नांची झालेली राखरांगोळी ही तिची लग्नानंतरची पुंजी. तिच्या सासरच्या घरात सदैव सत्संगत रमण्याचा देखावा करणारे सासू-सासरे आणि तिच्या देहावर आणि मनावर अनन्वित अत्याचार करणारा तिचा राक्षसी वृत्तीचा पती.  
तिला एक मोठा दीरही असतो जो त्याच्या मेहनतीवर त्याच्या व्यवसायात मोठा झालेला असतो. प्रसंगी त्याने त्याच्या सासरच्यांकडून काही आर्थिक मदत घेतलेली असते. आणि नेमके हेच स्मृतीच्या पतीच्या दु:खाचे मूळ असते. अशाच भरघोस आर्थिक मदतीची अपेक्षा तो स्मृतीच्या वडिलांकडून करत असतो ज्यावर तो त्याच्या व्यवसायाचा डोलारा उभारणार असतो. ज्या वडिलांनी यथाशक्ती खर्च करून आपल्याला वाढवलं, शिकवलं, बौद्धिक दृष्ट्या सक्षम केलं आणि आपल्या लग्नातही ज्यांनी भरपूर खर्च आनंदाने व मुलीचे कल्याण व्हावे या इच्छेने सोसला त्या बापाला आपल्या पतीला आर्थिक मदत करण्यासाठी भरीस पाडावे असे तिला मुळीच वाटत नव्हते. ती 'नाही' या शब्दावर ठाम होती आणि या नाही म्हणण्याची किंमत ती पुरेपूर मोजत होती. दिवसेंदिवस ती नैराश्याच्या खोल गर्तेत रुतत चालली होती. तिच्या करीयरची स्वप्ने कधीच धुळीला मिळाली होती. पतीच्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी ती तत्पर होती पण तिच्या आत साचलेल्या वेदनेचे गांभीर्य त्यांना कधी कळलेच नाही. तिच्या दीनवाण्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या दिवट्याचा संताप कधी आलाच नाही. 
आपल्या भावाला त्याच्या सासरच्यांकडून मिळणारी आर्थिक मदत आपल्याला का मिळू शकत नाही या विचारांनी स्मृतीचा पती सैरभैर झाला होता. किंबहुना अशी भरघोस आर्थिक मदत मिळावी म्हणूनच त्याने लग्नाचा घाट घातला होता. त्याच्या सगळ्या मनसुब्यांवर डॉक्टर स्मृतीने बोळा फिरवला होता आणि म्हणूनच ती त्याच्या क्रोधाला सारखी बळी पडत होती. अधूनमधून वडिलांशी फोनवरून याविषयी संभाषण व्हायचे परंतु त्यांनीही प्रत्यक्ष तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. रडणाऱ्या मुलीचे फोनवरून सांत्वन करण्यापलीकडे ते विशेष काहीच करू शकले नाहीत. तुला मी घरी न्यायला येतो असे त्यांनी कधी म्हटल्यानंतर ती, मी परत येणार नाही एवढेच म्हणायची. दिसामाशी ती झुरत होती, झिजत होती. ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. तिने निमुटपणे ती परिस्थिती स्वीकारली. पतीच्या जाचाला सहन करत राहिली. अखेर एक दिवस सारे काही असह्य झाल्यानंतर तिने गळफास लावून स्वत:ला संपवून टाकले. तिच्या फुलपाखरासारख्या आयुष्याची शोकांतिका झाली. 
हे सगळे 'क्राईम पेट्रोल' मध्ये बघितल्यानंतर मन क्षणभर सुन्न झाले. तिने अन्यायाचा प्रतिकार का केला नाही या विचाराने मन पोखरून टाकले. तिचे स्वत:चं इतकं सुंदर आयुष्य कुठल्यातरी फडतूस आणि अत्यंत हिडीस माणसासाठी असे फुंकून का टाकावे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. का ती माहेरी निघून नाही गेली? का तिने तिचे करियर कोणातरी पती नामक इसमाच्या सांगण्यावरून अर्धवट सोडले? का ती शेवटपर्यंत त्याच्याकडून अकारण शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करत राहिली? तिचे संस्कार, तिचे शिक्षण, तिचा आत्मविश्वास, तिचे सामर्थ्य कुठे लोप पावले? अशा नालायक लोकांसाठी तिने आत्म-बलिदान का केले?  
अशा अनेक स्मृती आज या देशाच्या नव्हे जगाच्या कैक कोनाड्यांत खितपत पडल्या आहेत. निमुटपणे अत्याचार सोसत आहेत. त्यांचे नैराश्य त्यांना अजगरासारखा विळखा घालून बसले आहे. त्यांचा खचलेला आत्मविश्वास त्यांना या मृतप्राय अवस्थेपर्यंत पोहोचवतो आहे. त्यांच्या मनात भावी गळफास तयार होत आहेत. काहीही कारण नसताना स्वत:चे शारीरिक आणि मानसिक शोषण दुसऱ्याला करू देण्याची अशा सर्व स्मृतींची इच्छा ही सर्वार्थाने निदनीय अशीच आहे. 
अशा सर्व स्मृतींना माझे कळकळीचे सांगणे आहे की कुणाच्या तरी विकृत हट्टाखातर स्वत:च्या जीवनाची आहुती देणे हे सर्वस्वी अयोग्य आहे. या पृथ्वीतलावरील आपला जन्म हा हकनाक कुणाचे भक्ष्य होण्यासाठी खचितच नाही. आपल्या आत्मविश्वासाला, आत्म-सन्मानाला चिरडणारा आपला पती नामक इसम आपल्या आयुष्यात राहण्यास अजिबात लायक नाही. 
सर्व दुष्ट प्रवृत्तींचे हनन करण्यासाठी जसा पार्वतीने कालीचा अवतार धारण केला तसेच स्वत:चे सामर्थ्यपूर्ण उग्र रूप समाजातील अशा अप-प्रवृत्तींना दाखवण्याची आज नितांत गरज आहे. अशी 'काली' प्रत्येक स्त्रीत वसलेली असते फक्त तिचे योग्य वेळ येताच प्रकटीकरण होणे अत्यावश्यक आहे. 
तेव्हा समस्त स्त्रियांनो, पुरुषी अत्याचारावर आरूढ होण्यासाठी तुमच्यातील 'काली' जागवा ! 





Sunday 9 September 2012

विधिलिखित

विधिलिखित हा शब्द तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादाच्या मुळावरच घाव घालतो. स्वत:ला कडवे बुद्धिवादी म्हणवून घेणारे जे काही महाभाग आहेत, त्यांना हा शब्द सलतो, झोंबतो आणि खुपतोही! याची करणे अनेक आहेत. मुळात आपल्या सिमित बुद्धीच्या पलीकडेही काही अतर्क्य, अनाकलनीय असे काही आहे हे मानणे या व्यक्तींना फारच जड जात असावे.  
खडखडीत बरा झालेला एखादा रुग्ण एकाएकी दगावतो आणि त्याच्या दगावण्याची शास्त्रीय मीमांसा वैद्यकशास्त्र करू लागते. या उलट एखाद्याच्या दगावण्याची शंभर टक्के खात्री डॉक्टरला वाटत असताना तो मात्र त्या समस्त वैद्यकशास्त्राच्या नाकावर टिच्चून जगतो आणि पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ कसोट्यांवर हे शास्त्र उगाळले जाते. एखादी प्रवासी बस दरीत कोसळते आणि मृत पावलेल्या त्या शंभर एक जणांत एक छोटेसे बालक एक साधा ओरखडाही न येता लीलया श्वास घेत असते. विमानप्रवासाला निघालेली एखादी सखुबाई किंवा सखाराम अचानक तापाने फणफणतो आणि आपल्या नशिबात विमानप्रवास नाही या जाणीवेने मनोमन खंतावतो.  हेच विमान 'टेक ऑफ' करताना अचानक पेट घेते आणि क्षणार्धात त्या विमानाची आतील प्रवाशांसकट राखरांगोळी होते. अशा वेळी ती सखुबाई किंवा सखाराम त्या 'नशीब' नामक गूढ सामर्थ्याचे पुन्हा पुन्हा आभार मानतात. परमेश्वर नामक चमत्काराचा साक्षात्कार त्यांचे अंत:करण हेलावून टाकतो.  
एखाद्या श्रीमंत कुळात जन्म घेतलेला युवक 'स्व-कर्तृत्वाने' अध:पतनाच्या खाईत जातो तर अठरा विश्वे दारिद्र्यातून 'स्व- कर्तृत्वाने' एखादा अजरामर 'कार्व्हर'ही जन्माला येतो. कुठे शून्यातून आनंदवनाची निर्मिती करणारा महायोगी 'बाबा आमटे' जन्माला येतो तर कुठे सत्तेला मद्यासारखे उपभोगून तिच्या जोरावर असंख्य निष्पापांचे बळी घेणारा सत्तांध 'हिटलर' जन्माला येतो.  
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रचीती जे मोठ्या जीवावरच्या संकटातून वाचले आहेत त्यांच्या बाबतीत येते. काही अपरिहार्य कारणास्तव न्यूयॉर्कच्या 'वल्ड ट्रेड सेंटर' मध्ये काम करणारे सदगृहस्थ वेळेवर पोहोचू शकत नाहीत आणि हीच गगनचुंबी इमारत त्यांच्या डोळ्यांदेखत अतिरेक्यांच्या हल्ल्याचे लक्ष होते. या महाभयंकर संकटातून वाचल्याची जाणीव होताक्षणी हे गृहस्थ साश्रू-नयनांनी त्या जगत्पालकाचे आभार मानतात कारण त्यांना त्या ईश्वरी अस्तित्वाचा प्रत्यय आलेला असतो.   
जो म्हणतो देव आहे त्याच्यासाठी तो असतो आणि जो त्याचं अस्तित्व मान्य करत नाही त्याच्यासाठी तो नसतो. 'देव' या संकल्पनेचा अर्थ अशा रीतीने सोपा करून ज्येष्ठ कविवर्य कै.कुसुमाग्रज यांनी उलगडून सांगितला होता.  
परमेश्वरी संकेताशिवाय कोणतेही चांगले अथवा वाईट कार्य घडणे हे सर्वथैव अशक्य असते. या पृथ्वीतलावर अ-तुलनीय काम करणारी माणसे ही त्या सर्वव्यापी शक्तीचे प्रेषितच असतात. एखादी घटना घडणे हा संकेत असतो आणि त्यासाठी निमित होणारा माणूस हे एक माध्यम असते. तो त्याच्या इच्छेनुसार माणसांची प्यादी या विश्वाच्या विस्तीर्ण पटावर सरकवून खेळ खेळत असतो. काही प्यादी तरतात तर काही नेस्तनाबूत होतात. कालपट चालूच असतो. प्यादी बदलत राहतात. दृष्टी-भ्रमामुळे या खेळालाच आपण सत्य मानतो आणि आपल्या अस्तित्वासाठी, वर्चस्वासाठी झगडत राहतो. 
'शेवटी आपण सारे पत्त्यातल्या नावांचे धनी, मजकुराचा मालक निराळाच असतो'  या पुलंच्या सत्याचा सूर गवसलेल्या ओळी मनाला अशावेळी अंतर्मुख करतात. 

Friday 7 September 2012

आपली माणसे आणि परकी माणसे

कुरुक्षेत्रावरील त्या प्रचंड सैन्यात आपले गुरु, आजोबा, काका, भाऊ तसेच इतर आप्तेष्ट बघून अर्जुन विस्मित झाला, स्तिमित झाला आणि नंतर अक्षरश: गर्भगळीत झाला. 'आपल्या आणि परक्या' या बद्दलच्या संभ्रमात तो हिंदोळू लागला. शत्रुपक्षातील 'आपली' माणसे त्याला आता 'परकी' वाटू लागली. परंतु त्याचवेळी आपल्या माणसांशी युद्ध करायचे ही भावनाही त्याला विद्ध करू लागली. अखेर त्याच्या मनाची ही दोलायमान अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतोपदेश केला. 
ज्या विश्वकर्म्याने हे प्रचंड जग निर्माण केले आहे ते भयंकर गूढ, अनाकलनीय असेच आहे. पण निसर्गाने निर्माण केलेलं माणूस नावाचं खेळणं ही तर गूढतेची परिसीमाच आहे असं म्हणायला हरकत नाही. माणूस हा केंद्रबिंदू आणि त्याने आपल्या भोवती आखलेल्या वर्तुळाच्या परीघावर नाचणारी ही असंख्य 'आपली' व 'परकी' माणसे! असे असंख्य केंद्रबिंदू, असंख्य वर्तुळे आणि तेवढीच अगणित माणसे!     
कालपरवापर्यंत आईचा पदर धरून चालणारा मुलगा चतुर्भुज होतो आणि काही महिन्यानंतर 'माझी काळजी घेण्यास माझी बायको समर्थ आहे' ही मौखिक मेहेरबानी आईवर करतो तेव्हा तो आपलेपणाच्या कक्षेतून आपसूकच बाद झालेला असतो. जातीने, धर्माने परकी असलेली 'ती' विवाहोत्तर सासरच्या माणसांत दुधात साखर मिसळावी तद्वत मिसळून जाते आणि 'आपलीशी' होऊन जाते.  
पं.कुमार गंधर्व भूप रागात वर्ज्य किंवा 'परक्या' समजल्या जाणाऱ्या शुद्ध मध्यमाला अवचितपणे 'आपलेसे' करून श्रोत्यांना व जाणकारांना अचंबित करून टाकत असत. पारंपारिक भूप गाणाऱ्या गवयांना परका वाटलेला भूपातील मध्यम कुमारांच्या भूपाच्या बैठकीत आपलेपणा जागवून जायचा.    
महाभारतातील अर्जुन हा प्रातिनिधीक आहे. आजही जागोजागी, घरोघरी आपलं कोण आणि परकं कोण या संभ्रमात पडलेले कैक अर्जुन दिसतात. गीतेतील तत्वज्ञान प्रत्येकाला पेलेलच असं नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, दुसऱ्याला समजून घेण्याच्या प्रयासातून अनेक गीता, अनेक तत्वज्ञाने तयार होत असतात.  
अगदी 'आमची जेवण करण्याची पद्धत आणि तुमची जेवण करण्याची पद्धत' इथपासून आपल्या-परक्यातल्या सुप्त संघर्षाची ठिणगी पडते. ज्याच्या त्याच्या भाजी-आमटी-चटण्या-कोशिंबिरी करण्याच्या पद्धतीत फरक हा असतोच! या सर्व पद्धती त्या त्या विशिष्ट जातींशी निगडीत अशा असतात. पण आपलीच पद्धत कशी 'सुपीरियर' हे  प्रत्येकालाच दुसऱ्याला पटवून देण्यात धन्यता वाटते. यातूनच आपले आणि परकेपणाची जाणीव वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो.     
वर्ण,जाती,धर्म या सर्वांच्या मूळाशी द्वेषाची भावना इतकी जोम धरून असते की आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर  इतक्या वर्षांनीही जाती-धर्मातील अंतर आपण नाहीसे करू शकलेलो नाही. भारताची शकले होऊन 'हिंदुस्तान' आणि 'पाकिस्तान' जन्माला आले ते मुळी जन्मत:च आपल्या-परक्याची भक्कम तटबंदी आपल्याभोवती बांधूनच! 
एखाद्या चित्रपटामध्ये अन्यायाने पिचलेल्या सुनेची रडकथा पाहताना एखादी सासू नाकाला रुमाल धरून रड रड रडते पण घरी आल्यानंतर तिच्या 'आपल्या मुलीला' आणि 'परक्या सुनेला' वागवण्याच्या दृष्टीकोनात तसूभरही फरक पडलेला नसतो. 
कालपरवापर्यंत आपल्याच बरोबर खांद्याला खांदा लावून समाजसेवा करणारा 'आपला मित्र ' सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाला की एकदम 'परका' किंवा दुसराच कुणीतरी वाटायला लागतो. 
अगदी आत्तापर्यंत आपल्यात वावरणाऱ्या माणसाला ताटीवर निष्प्राण पडलेला पाहिल्यानंतर तो आता 'आपल्यात' नाही ही भावना प्रबळ होते.  तो 'परलोकवासी' झाला असे आपण जाहीर सभेत सांगतो. 'परक्या' या बिरुदावालीत जाऊन बसलेल्या त्याच्यासाठी प्रसंगी आपण चार अश्रू ढाळतो पण आता आपल्याला आधार हवा असतो तो आपल्यासारख्याच जिवंत हाडामांसाच्या कुणाचातरी! 
'सासर आणि माहेर' या दोन शब्दांतही 'आपलं आणि परकं' ही जाणीव निर्माण करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. 'सासरी गेल्यानंतर तू नीट वाग',  'त्या लोकांशी जमवून घे', 'आम्ही तिथे नसणार' ही सगळी वाक्ये त्या 'परक्या' सासरसंबंधीच असतात. कुणाला आपलं म्हणायचं आणि कुणाला परकं म्हणायचं या संभ्रमात ती नववधू आयुष्याची तब्बल पन्नास वर्षे रेटते आणि घरी नवीन आलेल्या सुनेलाही त्याच त्या वर्षानुवर्षे जतन केलेल्या 'आपल्या-परक्याच्या' भिंगातून तपासात राहते. वर्षामागून वर्षे उलटतात, सासवा-सुनांचे चेहरे बदलतात परंतु आपलेपणाची आणि परकेपणाची भावना मात्र जराही बदलत नाही.  
सकाळपासून ज्याला साक्षी ठेवून आपण सर्व कामधाम आटोपतो ते सूर्यबिंबही मावळतीला गेलं की परकं वाटू लागतं आणि क्षितिजावर नव्याने उदयाला आलेला चंद्र आपलासा वाटायला लागतो.  
शेवटी काय 'पुरुष-प्रकृती, 'दिवस-रात्र', 'ऊन-पाऊस', चंद्र-सूर्य' या नैसर्गिक प्रवृत्ती जितक्या प्रबळ आहेत तितकीच 'आपलं आणि परकं' ही मानवी प्रवृत्तीदेखील!  

Tuesday 4 September 2012

महादेव अर्थात शिव तत्व

आजमितीला अनेक शिवभक्त या देशाच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. महादेवाच्या संदर्भातील अगणित कथा आजवर प्रसृत झाल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगाच्या कहाण्याही कैकवेळा ज्येष्ठांच्या तोंडून ऐकल्या गेल्या आहेत. तरीही असं हे दैवत प्रत्यक्षात आहे तरी कसं याविषयीचं कुतूहल काही शमत नाही. अशा या महादेवाला भोलेनाथ म्हणावा की उभ्या अंगाला स्मशानातील राख फासून भूतप्रेतांच्या सहवासात काळ व्यतीत करणारा अघोरी म्हणावा, युगानुयुगे समाधिस्थ राहणारा योगी म्हणावा की जगत्पालक म्हणावा अशा संभ्रमात अनेकजण वावरत असतात. जितके अभ्यासायला जावे तितके हे शिवतत्व अथांग वाटते, अनाकलनीय वाटते, असाध्य वाटते. अशा या शिवाची आणि संबंधित इतर दैवतांचीही अनेक रूपे उलगडून दाखवणारी मालिका 'देवो के देव महादेव'  'Life OK' या वाहिनीवर सध्या गाजते आहे. 
या मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणारा म्हणजेच प्रत्यक्ष शिवस्वरूप साकारणारा कलाकार मोहित रैना याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आजवर पाहिलेल्या अनेक पौराणिक मालिकातील अथवा चित्रपटातील एकही कलाकार मला इतका भावला नाही. शांत, समंजस, दृढ चेहरा, तत्ववेत्याची ओजस्वी वाणी, कधी प्रेमळ तर कधी व्याकूळ तर कधी क्रुद्ध भावछटा समर्थपणे पेलणारे डोळे, शिवतांडव असो वा मोहक नृत्य अतिशय लयबद्ध रीतीने होणारा पदन्यास, गळ्यात रुंडमाला, मृतसर्प, डोक्यावर चंद्र आणि गंगा, हातात त्रिशूल आणि डमरू , कमरेला बांधलेले मृगाजिन या सगळ्या केश आणि वेशभूषेत मोहित अतिशय उजवा वाटतो. 
शिवाच्या आयुष्यातून सती (शिवाची पहिली पत्नी) निघून गेल्यानंतर तिच्या विरहाने उध्वस्त झालेला, शोकविव्हल, विलाप करणारा, अवघ्या विश्वावर रुष्ट झालेला शिव मोहितने फारच परिणामकारक रीतीने अभिनित केला होता. तसेच प्रजापती दक्षाचे मुंडके धडावेगळे करणारे शिवाचे वीरभद्र रूपही अप्रतिम वाटले. आपल्या भक्तांवर पसन्न होऊन त्यांना मागतील ते वर देणारा, शिवगण, प्रेतगण, भूतगण यांच्या सान्निध्यात रममाण होणारा, पतितांचा, दीन-दु:खितांचा उद्धार करणारा, दुष्ट शक्तींचा रौद्र रूपाने संहार करणारा अशा हा शिवशंकर मोहितने पूर्ण सामर्थ्यानिशी साकारला आहे. अशा या शिवाचे आदिशक्तीशी म्हणजेच पार्वतीशी लग्न होऊन एका औसुक्यपूर्ण टप्प्याशी ही मालिका सध्या आली आहे.   
उत्पत्ती जनक ब्रम्हा, स्थितीजनक विष्णू आणि संहारक शिव ही त्रिमूर्ती हे अखिल ब्रम्हांडाचे मूळ आहे.  जन्म, जीवन आणि मृत्यू  या शाश्वत वास्तवाचे हे त्रि-तत्व किंवा त्रि-सूत्र आहे. शरीरातील चैतन्य लोपून जेव्हा ते एक पार्थिव अथवा शव होते तेव्हा ते शिवतत्वात विलीन होऊन जाते. शरीराचे अग्नीसंस्कारा नंतर चिमूटभर भस्म होते आणि पुन्हा एकदा तो स्मशानातील राख अंगाला फासून भणांगासारखा फिरणारा महादेव आठवतो. तारक आणि संहारक अशा शिवाची असंख्य रूपे मनात रुंजी घालू लागतात. असे निर्गुण स्वरुपात चराचरात स्थित असणारे हे शिवतत्व सगुणस्वरुपात प्रस्तुत वाहिनीवर दाखवून माझ्यासारख्या कैक प्रेक्षकांच्या इच्छेची पूर्तता केल्याबद्दल मन:पूर्वक आभार!